कठोपनिषद / मराठी साकीबद्ध रुपांतर प्रथमवल्ली नं २५ पासून

 प्रवासार्थ यम गेला होता नव्हता स्वीय गृहांत /

परतुनी ये तों स्वस्थ राहिला त्याची वाट पाहत //२५//

चवथे दिवशी येतां त्यातें कथिलें परिवार जनी /

' अतिथी पातला आज तयातें तीन जाहल्या रजनी //२६//

अतिथी ब्राह्मण सामान्य नव्हे केवल वैश्वानर की /

पाद्यादिजलीं शंतविती त्या ना तरी पडती नरकी //२७//

मान न पावे अन्नपान वा अतिथी जयाचे सदनीं /

दुरित तयाचें सिद्ध होय ते तत्सुकृताचे कदनीं //२८//

आशा सारी प्रतीक्षा तशी इष्टापुरतं फलां हो /

सूनृत भाषणफला तेविं तो जाणा आंचवला हो //२९//

अल्पबुद्धी तो; पशुपुत्रादिक त्याचे जाय लयातें /

अतिथी पावतां सत्कारावें यास्तव शि-घ्र तयातें //३०//

असे उपोषित म्हणुनी अम्हांवरी कुपित जाहला गमतो'/

परिसुनी यापरी नचिकेत्यातें सत्कारितसे यम तो //३१//

'विप्रश्रेष्ठा' यम   मग बोले; जोडुनी तयास हात /

'त्रिदिन लागले तुला राहावे अनशन ताप सहात //३२//

पुज्य अतिथी परी नसे झाला येथ तुझा की /

हात जोडिता  दोष सर्व हे उदरीं अपुल्या झाकी //३३//

माग तीन वर यथेच्छ मजसी कथितों तुजलांभावें /

जेणे होईल कोप शांत तव मंगल मज लाभावे '//३४//

वर मागितला पहिला तेणें पितयाचा संतोष /

'चिंता जाउनी' म्हणे 'तयाला न उरो स्वल्पही रोष //३५//

परतविले त्वां मज भूलोकी तेणें मनी जाणावे /

जाणुनियां हे प्रसन्न होउनी मजला वाखाणावे //३६//

यम मग बोले ' पुर्वी ऐशी ममता करील पिता की /

तशीच देतो बुद्धी तयातें संशय सारा टाकी //३७//

पाहुनी तुजला परविलें म्यांजाणुनी मनांत सारे /

न म्हणेल तुला आज्ञा मोडुनी आला परत कसा रे? //३८//

नगमेल तया रोष अल्पही त्यापरी पुढिल्या राती /

पूर्वी ऐशी येईल तया स्वस्थपणे निद्रा ती ' //३९//

यापरी देउनी आश्वासन ते यमराज उगाराही /

निश्चित तेणे गमे तया की मिळतो वर दुसराही //४०//

स्वर्लोकीचें सुख चिंतुनियां बोले दुसरा वर तो /

'न जरा स्वर्गी भय बा कसले, न कुणी प्राणी मरतो //४१//

क्षुधा तृषा ती न कुणा बाधे मग त्या शोक कशाचा? /

सर्वांहुनियां स्वर्ग लोक तो गमे सुखावह साचा //४२//

स्वर्लोकप्रद अग्निचयन ते ठावे तुम्हा स्वभावें /

बोध करावा मला तयाचा पुसतो तुम्हांस भावे '//४३//

यम मग बोले ' ज्ञान अग्नीचे ज्ञात्या केवळ ठावे /

हृदयं त्यांच्या गुप्त असे ते इतरां केविं पटावे? //४४//

सर्व सृष्टीला आश्रय दे जे; स्वर्गप्रद त्यापरिस /

ज्ञान तयाचें तुला सांगतो; सावध होउनी परिस' //४५//

इतुकें बोलुनी निरुपिलें मग त्याअग्निचयन त्या सांग /

यम मग बोले ' कळले तुज तरी पुनरपी मज ते सांग '//४६//

आदिभूत जो या सृष्टीचा अग्नी तयाचें ज्ञान /

पुनरपी कथितां नचिकेत्यानें यमें डुलविली मान //४७//

'आणिक  वर घे तुष्ट तुजवरी ' यम बोले 'झालो की'/

अग्नी होय हा तुझिया नांवे ख्यात यापुढे लोकी //४८//

चातुर्याने तुझिया झाला तोष अंतरी माला /

स्वयें देतसें स्वीकारी की वररुपी हे माला //४९//

छायांना अग्नीचे तीन वेळ जोकरुनी शिष्टजनांशीं /

सख्य जोडुनी उल्लंघीना वेदस्मृतिवचनासी //५०//

यज्ञापरी करी अध्ययनातें धन सत्पात्री वेची /

जन्ममृत्यूची नचिकेत्या रे! भीती तयाला कैची //५१//

विश्वसृष्टा देव तयाचें ज्ञान तयाला पावे /

शांत होउनी नलगे त्यातें केव्हाही विलापावें //५२//

पाश मृत्यूचे तोडुनी तेणें स्वर्गी सुख भोगावे /

निरुपिले तुज चयन तयाचें कवणें यश हो गावें ' //५३//

ज्ञान जोडिलें वरें जयाचे तो हा अग्नी असारे! /

तुझिया नांवे ख्यात होउनी म्हणतील तुझाच सारे //५४

स्वयें दिला हा वर म्यां तुजला नोव्हे वर हा तिसरा /

तोच कधी  मज निज वचनाचा नाही मजला विसरा ' //५५//

'वर हा तिसरा' नचिकेता मग बोले परिसावा हो /

संदेह मनी असे एक तो तेणें निरसावा हो //५६//

मृत्यू पावतां नर हा लोकी तनू ते गळोनी जाय /

नष्ट होतसे; दिसे दृष्टीला उरेल कोठे काय? //५७//

आत्मा म्हणुनी असे वेगळा म्हणती कोणी नर की /

यथाकर्म तो फळे भोगतो स्वर्गी अथवा नरकी //५८//

शिष्टजनांही कथितां या परी संशय केविं गळावा? /

म्हणे आपुल्या कृपेकरुनी मज आशय सत्य कळावा //५९//

' न नरां केवळ ' यम बोले ' हा संशय दैवांनाही /

त्यांनी केली चर्चा बहू परी निरस्त झाला नाही //६०//

देवांतेंहीं अगम्य ऐसा धर्म सूक्ष्म हा फार /

स्पष्ट दिसे मज बाळा! तुझिया बुद्धिबळाच्या पार //६१//

वर माग दुजा; करी योजना लाभ आणखी जोड /

हट न करावा अति केव्हाही आशा याची सोड //६२//

'सहज कळेना म्हणतां 'बोले नचिकेता ऐकोनी /

'धर्म हा कळे ऐसा म्हणतां नसे सुरांतही  कोणी //६३//

तुम्हांपरी परी वक्ता न दिसे तो मज सांगायासी /

वरही  न ऐसा तोच म्हणोनी झडकरी सांगा यासी'//६४//

'पुत्र पौत्र घे शतायू मागुनी'दावी माया यम ही /

'राज्य करावे वाटेल तरी घेई मागोन मही //६५//

हत्ती, घोडे, मागुनी घे वा नानाविध पशुगण तो /

मागसी तितुकीं वर्षे त्यापरी आयुही देतो म्हणतो //६६//

धन घे मागुनी; चिरायुष्य घे; न काय त्यापरी वर हा? /

भुमंडल घे; राज्य तयांचें चिरकाल करीत  राहा //६७//

असेल चित्तीं काम सांग तो दुर्लभ येथे जरी तो /

साशंक नको होऊ बाळा! त्वरित पूर्णं तो करितों //६८//

रथवाद्यांसह घे भोगाया सुंदर अप्सरसा वा /

लाभ जयांचा भूलोकी कोणतेही नसावा //६९//

स्वर्गींच्या या स्त्रिया न त्यांचा अव्हेर करावयास /

सेवा घेई करोनी;   होवो अखंड तुज सहवास //७०//

प्राणी जाती मरोनी जगती म्हणती तो मेला हो /

नको पुसू मज; कोठे जातो? काय तुज तरी लाहो '//७१//

नचिकेता परी मोहित नोहे तसाच सावध राहे /

म्हणे 'आपुले भोग सर्वही सांभाळोनी धरा हे //७२//

आज भोगू परी नसे उद्यांचा त्या विषयी विश्वास /

सुख सुख म्हणतां जर्जर करिती साऱ्याही विश्वास //७३//

इंद्रियगण हा तेज तयाचें नेती सर्व हरोनी /

घे घे म्हणतां मोहक परी ते दिसती मात्र वरोनी //७४//

आयुष्य तुम्ही किती दिले तरी मृत्यू न चुकावयाचा /

दीर्घही म्हणुनी अल्प गमे मग कसला लाभ तयाचा! //७५//

यथेच्छ धन ते मिळेल देवा तुमची मूर्ती पाहता /

त्यापरी येई जिवांच्याही आयुष्य दीर्घ हाता //७६//

तुमचे हाती सत्ता सारी नलगे श्रम मज परी, ते, /

अनुदिनी त्याने तृष्णा वाढे, तृप्ती न चित्तीं करितें //७७//

दावुनी माया विविध म्हणोनी मोहित मजला न कराहो /

हाच मला द्या वर; सुख सारे ते चित्तादिक राहो //७८//

अजरामर, जे देव तुम्हांशीं येउनी मर्त्य जनांहीं /

वित्तादिक ही जोडावी का? ज्यात नित्यता नाही //७९//

सुख हे अस्थिर म्हणुनी भावना जेणे दृढ केली /

दीर्घायुष्यी वृत्ती तयाची होई काय भुकेली //८०//

संशय जो की प्राणी मरतां  आत्मा म्हणती नसावा /

 परत्र कोणी जातो म्हणती सारा तो निरसावा //८१//

गुप्त गुप्त ते म्हणुनी सांगतां व्यक्त करा ते मजलां /

नको दुजा वर; तोच घ्यावया नचिकेता हा सजला '//८२//