"काळ आहे जिंकला मी" गर्व निष्फळ दांभिका
शेवटी संपायला आलीच ही एकांकिका
चालवावे घर किती तू? लक्ष दे अपुल्याकडे
भाग्यरेषांची स्वतःच्या तूच व्हावे लेखिका
पाहुनी तिज झेप घेता, ध्येय शिखरे जिंकता
मज शिळा उध्दारल्याची, वाटते आख्यायिका
कैक आले कैक गेले, मार्ग क्रमिता जीवनी
जाहले आयुष्य विरही आठवांची मालिका
मग्न मी माझ्यात जगलो, जोडले नाही कुणी
प्रेत पुरण्या खोल माझे कोण टाकिल मृत्तिका?
घेतली थोडी नशा अन विश्व माझे (?) जाहले !
जी दिसे ती भासते माझीच आहे नायिका
दीड हळकुंडात पिवळे जाहलेले पाहिले
अल्प संतोषी असावे हीच त्यांची भूमिका
आसवे "निशिकांत" का ही? अन उदासी जीवनी
भोवती कोणी न उरले, ही खरी शोकांतिका
निशिकांत देशपांडे
E Mail-- nishides1944@yahoo.com