पडला प्रघात आहे

मरणास भीत जगणे पडला प्रघात आहे
मरण्या अधीच शतदा मेलो जगात आहे

स्वार्थास साधण्यास्तव बनलो परोपकारी
मेल्यावरी जगावे, उर्मी उरात आहे

अलबेल सर्व असता, धडधड मनी उगा का?
संकेत वादळांचा माझ्या कपात आहे

भरडून कैक जाती, चक्कीत जीवनाच्या
जात्यातले मरू द्या, मी तर सुपात आहे

वैफल्यग्रस्त असती अतिदूर ध्येय ज्यांचे
क्षितिजास गाठाणारा कोणी जगात आहे?

सुखदु:ख भोगताना इतके कळून आले
बेताल हास्य आणी रडणे सुरात आहे

कळपात मत्सराविन, जगती जनावरेही
जे माणसात नाही, दिसते गुरात आहे

सतशील सदगुणांना मडीत भाव नाही
हर्रास दुर्गुणांची चढत्या दरात आहे

रमज़ान पाक महिना, मशिदीत काय गर्दी!
हाजी न मी नमाजी, अल्ला मनात आहे

सुर्यास तप्त बघण्या आहे मजाल कोणा?
ग्रहणास त्यास जो तो, बघतो नभात आहे

बघता वळून मागे, "निशिकांत" काय दिसले?
माझ्याच वेदनांची बघतो वरात आहे

निशिकांत देशपांडे

E Mail -- nishides1944@yahoo.com