कैरीचे आंबट वरण !

  • १ छोटी वाटी (रोजच्या इतकी) तुरीची डाळ,
  • दोन मध्यम आकाराचे कांदे, ४/५ हिरव्या मिरच्या
  • चवी-आवडी नुसार गुळ (लिंबा एव्हढा)
  • मध्यम आकाराच्या २ कैऱ्या, नारळाचा किस १/२ वाटी
  • आमटीचा गोडा मसाला व फोडणीचे साहित्य.
३० मिनिटे
४ माणसांसाठी

कांदा उभा पातळ कापून घ्यावा. मिरच्या कापतांना मोठे तुकडे करावेत. कैरी किसून घ्यावी.

डाळ शिजायला ठेवतांनाच कुकर मध्ये कापलेले कांदे व मिरच्या डाळीबरोबरच एकत्र शिजवून घ्यावे. 

रोजच्या इतकी डाळ शिजून झाल्यावर फोडणीला टाकावी.

फोडणीत मोहरी, हिंग, मेथीचे १०/१२ दाणे टाकून फोडणी तडतडली की डाळ (कांदा-मिरची सकट) फोडणीला टाकावी.

त्यावर १ चमचा हळद, आवडीनुसार गोडा मसाला, किसलेली कैरी, गुळ व शेवटी ओला नारळ टाकावा.  

आवडी/गरजे नुसार पाणी घालावे.

                                          चांगली उकळी येई पर्यंत रटरटले की आंबट वरण तय्यार !  

ह्यात शेवगाच्या शेंगा - किंवा - वांगी किंवा - काकडी घातली तरी छान लागते.

कच्च्या कैरी ऐवजी आवडी नुसार चिंचेचा कोळ करून घातला तरी चालेल.

ज्यांना वरणभात हा एकच मेनू असलेले जेवण चालते त्यांनी थोडे जास्त प्रमाण घ्यावे.  

आंबटवरण - भात सोबत तळलेला पापड, हिरव्या मिरच्या अख्या तळून व मिठ लावून, सांडग्या मिरच्या असतील तरी चालतात व खोबरे लसणाची कुटलेली चटणी ..... जेवायचे व मस्त ताणून द्यायची...... !

माझ्या आजोळी आम्ही पोरं सुट्टीत जमली की, रात्री "वरणाचा हंडा लावला का गो ?" अशी आजी आरोळी द्यायची ते अजूनही आठवते. - सांगण्याचे तात्पर्य आंघोळीला आपण जेवढ्या हंड्यात पाणी तापवतो तेव्हढा हंडा भरून एका वेळी आंबटवरण घरात लागायचे - भाताचाही तोच प्रकार पातेली - पातेली भात कधी कधी कमी पडे.

माझी सुग्रण आई