आहे प्रवास अजुनी

ठेचाळलो तरी मी नाही उदास अजुनी
हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी

विसरून प्रेम पहिले जगणे मला न जमले
धोका दिला तरीही मज तू हवास अजुनी

वृध्दाश्रमात दिसले चैतन्य आपुलेपण
कोमेजल्या फुलांना आहे सुवास अजुनी

दसर्‍यास पारध्यांनी शस्त्रास पूजिले पण
आक्रोश सावजांचा नकळे कुणास अजुनी

विसरून सर्व जावे समजावले मला मी
पण काचतात धागे माझ्या जीवास अजुनी

क्षितिजास गाठण्याला उडतोय मी कधीचा
थकण्यास वेळ नाही माझ्या परास अजुनी

साठीत खूप ग़ज़ला श्रंगार काव्य लिहितो
मी मोजलेच नाही माझ्या वयास अजुनी

शोधात आपुल्यांच्या आयुष्य खर्च केले
दु:खी कुणी न माझ्या दिसले शवास  अजुनी

परकाच वाटलो मी "निशिकांत" का जगाला?
जगणे तृणासवे ना जमले दवास अजुनी

निशिकांत देशपांडे   मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com