११,१२ बालगीते - बालकवी

११. घोडा


घोडा घोडा खेळू चला रे । मौज घडीभर करू चला.

घोडे शंकर विठू करा,
लगाम हाती कुणी धरा,
दोरीचा चाबूक करा,
हां ! तर आता पळा चला रे, घोडा घोडा.

भले मुलांनो बसा जरा,
चित्त आपुले शांत करा,
धावत जाऊ पुन्हा घरा रे, घोडा घोडा.

गेली धावत मुले घरी,
गंमत झाली घडीभरी,
आनंदहि चित्ता झाला रे, घोडा घोडा.

१२. चिमणीचा घरटा चोरिस गेला

चिंव् चिंव् चिंव् रे । तिकडे तू कोण रे?

'कावळे दादा, कावळे दादा, माझा घरटा नेलास, बाबा?'
'नाही ग बाई, चिऊताई, तुझा घरटा कोण नेई?'

'कपिला मावशी, कपिला मावशी, घरटे मोडून तू का जाशी?'
'नाही ग बाई मोडेन कशी? मऊ गवत दिले तुशी'

'कोंबडी ताई, कोंबडी ताई, माझा घरटा पाहिलास बाई?'
'नाही ग बाई मुळी नाही तुझा माझा संबंध काही?'

'आता बाई पाहू कुठे? जाऊ कुठे? राहू कुठे?'
'गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला'

चिमणीला मग पोपट बोले ' का गे तुझे डोळे ओले?'
'काय सांगू बाबा तुला? माझा घरटा कोणी नेला?'

'चिमूताई चिमूताई, माझ्या पिंजऱ्यात येतेस, बाई?'
'पिंजरा किती छान माझा! सगळा शीण जाईल तुझा'

'जळो तुझा पिंजरा मेला! त्याचे नाव नको मला !'
'राहीन मी घरट्याविना!' चिमणी उडून गेली राना.