आठवणीतले गाव - अकोला

मनोगतावर सध्या आठवणीतील गावांची बरीच चलती दिसते... म्हणून हा लेखन प्रपंच!

तसेही जन्मगाव म्हणून आणि प्राथमिक शिक्षण तेथे झाले म्हणून अकोला माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे. सत्तरचे दशक. टी व्ही आणि फोन ही आमिषं नव्हती, सायकल चालविणे सर्वमान्य आणि प्रचलित होते... तेव्हाचा तो काळ.

कोर्टाच्या मागची नॉर्मल स्कूल (डी एड अभ्यासक्रमाची संलग्न शाळा) हि माझी शाळा. आम्हाला निंबाळकर बाई होत्या. त्यांचे बोलणे अजून आठवते. त्या पदराने ग्लास कव्हर करून गाळून पाणी प्यायच्या. खाली बसायला फाऱ्या व छोटी डेस्क्स लिहायला. आवारात हेड मास्तरांचे क्वार्टर होते. शाळेच्या मागे मोकळे मैदान होते. तिथे एकदा एक साधू  स्वतःला जमिनीत गाडून घेऊन फक्त डोके तेव्हढे जमिनीवर व थोड्या अंतरावर एक हात जपमाळ ओढतांना असे दृष्य अजून आठवते व अंगावर शहारा येतो. नंतर न्यू ईरा हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. अजून काही नावाजलेल्या शाळा म्हणजे भारत विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल,गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल, खंडेलवाल शाळा इ.

नगर वाचनालय फार मोठे होते... मोठ्या राम मंदिराजवळ. टॉकिज लाईन वरील चित्रपट गृहांविषयी विशेष आकर्षण असायचे. माणिक, चित्रा, न्यू प्लाजा ही काही थिएटर्स व प्रमिला ताई ओक हॉल आणि खुले नाट्यगृह ही काही नाट्यगृहे होती.

लेडी हार्डींग्ज हे मोठे नगरपालिकेचे स्त्रियांसाठीचे रुग्णालय होते. त्यानजिक असलेल्या मोठ्या चर्चचे, तिथल्या येशूच्या व मदर च्या पुतळ्यांचे खूप नवल वाटायचे.

श्रावण सोमवारी लवकर घरी यायचे. केळ्याची शिकरण ठरलेली. दसऱ्याला बिर्ला च्या राम मंदिरात दर्शन घेउन सोनं घेऊन घरी जायचो... मग सर्व नातेवाईक, मित्र मैत्रिणी, सर-मॅडम यांना सोनं द्यायला जायचो. राम जन्माला मोठ्या राम मंदिरात जायचो. तिथला दवणा (ऊन लागू नये म्हणून मिळणारी एक वनस्पती) पुढचा उन्हाळा सुसह्य करायचा. गड्डम प्लॉटस मधे नवीन राम मंदिर झाले होते... तिथल्या सीतेचे डोळे घारे होते.... मला फार आवडलेले.

टॉवर च्या थोड अलिकडे एक सुरेख दत्त मंदिर होतं त्याला मी गच्चीचं दत्त मंदिर म्हणायचे.. कारण बाहेर रोड च्याच लेव्हल ला गच्ची होती.... मागचं ग्राउंड खालच्या बाजूने होतं.

भाजी बाजार, एम जी रोड, एस टी स्टँड, आर एल टी कॉलेज ही आमची फिरण्याची ठिकाणं. सदा बंद असलेला गांधी नेहरू पार्क, टाकीवरचा बगिचा, राजेश्वराचे देऊळ, सिव्हील लाइन्स मधील हिरवीगार बाग, म्युनिसिपाल्टी समोरिल भेळेच्या गाड्या.. ही काही प्रसिद्ध ठिकाणं.

टिळक पार्क मध्ये न चुकता उसाचा रस प्यायला जायचो उन्हाळ्यात. ऊन फार प्रचंड पडायचे. वाळ्याच्या ताट्या, कुलर्स व पंखे सतत चालू ठेवावे लागायचे. पण वीज जाण्याचा इतका ससेमिरा मात्र नव्हता! 

कधीतरी उन्हाळ्याच्या सुटीत प्रदर्शन यायचे. तिथला आकाशपाळणा, भाज्यांचे लिलया काप करणारे अद्भुत कटर (जे की घरी आणल्यावर जमायचेच नाही), कि चेन्स, भूत बंगला, आरसेमहाल... मनाला मोहून टाकायचे.

लगोऱ्या, लंगडी असेच खेळ अंगणात रंगायचे... किंवा भातुकली. पुढे वाचनाची आवड लागली तर पुस्तकेच सर्वस्व वाटायची. चिवडा म्हणजे खाऊच्या आनंदाची परमावधी! पिझ्झा, पावभाजी तर ऐकलेही नव्हते.

तेव्हा अपेक्षाही छोट्या होत्या आणि एक्स्पोजरही नसायचे. टी व्ही सुद्धा नंतर आला... चित्रहार, खानदान, हमलोग.. हे दिवस आठवतात. नो केबल. तेव्हाच्या छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा अपार आनंद आज मात्र कुठेतरी हरवलाय. ती जिद्द, यश मिळाल्यावर मिळणारा निर्भेळ आनंद, कौतुकाची थाप...सारे गेले कुठे..?