डॉक्टर , औषधकंपन्या आणि आम्ही

       आमच्या लहानपणी खोक पडल्यावर तत्काळ होणारा उपाय म्हणजे घराच्या अंगणात निश्चितपणे सापडणारा दगडीचा पाला चुरून त्याचा रस जखमेवर शिंपडून तोच पाला जखमेवर गुंडाळणे व त्यावर एकाद्या स्वच्छ कापडाची चिंधी बांधणे. त्यानंतर आमचे त्या जखमेकडे एकदम ती बरी झाल्यावरच  लक्ष जात असे. दगडीचा पाला सापडला नाही तर घरातीलच हळदीची पूड  त्या जखमेवर सोडून तशीच स्वच्छ कापडाने ती जखम बांधली की चालत असे. खोक पडल्यावर डॉक्टरकडे जाणे आम्हाला माहीतच नव्हते म्हटले तरी चालेल. आता मात्र घरात आयोडीन वा बेंझाइन असेल तर ते लावून लगेच आपण डॉक्टरकडे पळतो.
    माझा मुलगा लहान असताना त्याला झालेल्या अशाच प्रकारच्या दुखापतीनंतर डॉक्टरकडे नेल्यावर प्रथमोपचार करून त्याने ऍंटीटीटॅनसचे इंजेक्शन तर दिलेच वर एक भली मोठी अंटिबायॉटिक्सच्या गोळ्यांची यादी दिली‌. सुदैवाने माझ्या डॉक्टर भावाच्या सहवासात राहून अशा गोळ्यांची  कितपत आवश्यकता असते हे माहीत असल्यामुळे मी त्यापैकी अगदी आवश्यक त्याच गोळ्या घेऊन घरी आलो.
     जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाचा विषयच सूक्ष्म रोगजंतूंवर मात करणे हा ठरवला आहे .संघटनेच्या पहाणीत प्रतिजैविकांवर मात करण्याची सूक्ष्म रोगजंतूंची क्षमता वाढत चालली आहे आणि त्याचबरोबर भारतात हिंवताप, क्षय अशा संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे व त्याचबरोबर रोगजंतूंच्या वाढत्या शक्तीमुळे पूर्वी वापरात असलेल्या प्रतिजविकांची मात्रा चालेनाशी झाली आहे.उदा:मलेरियावर पूर्वी चालनारे क्लोरोक्विनॉल आता उपयोगी पडत नाही व त्यामुळे उच्च दर्जाच्या व अधिक महाग प्रतिजैविकांचा वापर करणे आवश्यक होऊ लागले आहे.
         ऍन्टिबायॉटिक्सचा अनावश्यक वापर होण्याचे कारण डॉक्टरांच्या शिफारशीविना ती सहज उपलब्ध असतात.त्यामुळे मनाला येईल तेव्हां कोणीही ती विकत घेऊ शकतो.त्याचबरोबर कोणत्याही दुखण्यावर ठराविक काळपर्यंत ती घेण्याची आवश्यकता असली तरी बरेच रुग्ण थोडे बरे वाटू लागताच ती बंद करून टाकतात आणि त्यात पैसे वाचवण्याचा हेतु नसून केवळ आळस व औषध घेण्याची अनिच्छा हेच कारण असू शकते.त्याचबरोबर प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर करण्याची भारतातील बहुतांश डॉक्टरांना संवय असते.बोधि (Bulletin on Drugs and Health Information)या वैद्यकीय द्वैमासिकात याविषयी आलेल्या आकडेवारीनुसार प्राथमिक आरोग्यकेंद्रात आवश्यकतेच्या दुप्पट मात्रेत रोग्यांवर ऍंटिबायॉटिक्सचा मारा करण्यात येतो. भारतात ९०% डॉक्टर ऍंटिबायॉटिक्सची मात्रा  निः:संदिग्धपणे सुचवत नाहीत.
     ऍन्टिबायोतिक्सचा अनावश्यक वापर भारतातच होतो असे नव्हे.  चुकीच्या मात्रेमूळे चीनमध्ये श्वसननलिकेच्या संसर्गाचे प्रमाण ९७% रोग्यात आढळले तर घानामध्ये ते ८१% रोग्यात आढळले.  कॅनडामध्येही ४२% यूएसए मध्ये ४१% इतक्या मोठ्या प्रमाणावर या औषधांचा वापर करण्यात येतो.आश्चर्य म्हणजे त्या वापरामागे असणारया कारणात पहिले आणि महत्वाचे कारण निदानाच्या अचूकतेबद्दल असणारी शंका हे असते.या संदर्भात जुलाई १९९२ मधील प्रमोद वर्मा या ३५ वर्षाच्या रोग्याचा दाखला लक्षात घेण्यासारखा आहे.ताप आल्याच्या कारणावरून डॉक्टर अश्विन पटेल कड़े तो गेला असता त्याला पॅरासिटेमोल व ऍन्टिबायोटिक्स  घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे ताप कमी न झाल्यामुळे कोठल्याही तपासणीशिवाय त्याला टायफॉइड झाला आहे असे निदान करून दुसरया ऍन्टिबायोटिक्सचा मारा त्याच्यावर करण्यात आला.शेवटी रोग्याला डॉक्टर पटेलाच्या रुग्णालयात दाखल  करण्यात आले व शेवटी त्यातूनही बरे न वाटल्यामुळे मोठ्या होस्पिटलामध्ये दाखल करण्यात आले व तेथेही तो बरा झालाच नाही तेथे त्याचा शेवटच झाला.डॉक्टर पटेल याना होमिओपथिक तज्ञ असताना ऍलोपथिक औषधांचा वापर करण्याबद्दल दोषी ठरवून मोठी रक्कम मयताच्या नातेवाइकाना देण्याची शिक्षा फर्मावण्यात आली.
     ऍन्टिबायोतिक्सचा वापर ही नित्याचीच गोष्ट झाल्यामुळे त्याबाबतीत जी खबरदारी घेणे आवश्यक आहे ती घेतली जात नाही.त्याला फार्मास्यूटिकल उद्योगही जबाबदार आहे.अर्थात फार्मास्यूटिकल उद्योग केवळ ऍन्टिबायोटिक्ससाठीच जबाबदार असतो असे नसून कोणत्याही औषधाच्या बाबतीत ही गोष्ट लागू असते.आपल्याच कंपनीचे औषध डॉक्टरने रोग्याना सुचवावे म्हणून अनेक आमिषे त्याना दाखवण्यात येतात.आणि या बाबतीत त्याना औषधनियंत्रण संस्थेची मदत होते कारण तेथील अधिकारी भ्रष्ट असल्याने पुरेशा पूर्वकसोट्याशिवायच औषधनिर्मितीस मान्यता (याविषयी ऑर्थर हेले यांची स्ट्राँग मेडिसीन ही काअदंबरी वाचण्यासारखी आहे)देण्यात येते आणि रोगाऐवजी शा औषधांच्या वापरामुळेच यू.एस.ए. सारख्या प्रगत देशातही प्रत्येक वर्षी सुमारे १ लक्ष रोगी मरतात तर भारतासारख्या देशाविषयी बोलायलाच नको अर्थात औषधासाठी द्यावयास पैसा नसल्यामुळे औषधे वापरू न शकल्यामुळे कदाचित  ही संख्या आपल्याकडे कमी असेल आणि त्याहून जास्त रोगानेच मरत असतील.
       प्रतिजैविकांचा अति वा अयोग्य वापर टळावा म्हणून WHO ने त्यांची अनिर्बंध विक्री होऊ नये अशी शिफारस केली आहे,आरोग्य मंत्रालय त्यासाठी प्रतिजैविकांना ओळखण्यासाठी वेगवेगळे रंग देऊन फक्त रुग्णालयातच ती उपलब्ध होतील अशी तरतूद करण्याची शक्यता आहे अर्थात त्यातून अशा औषधांचा काळाबाजार सुरू होण्याची शक्यता नाकारण्यात येणार नाही.नुकत्याच वाचलेल्या बातमीनुसार अमेरिकेतील काही स्टेटसमध्ये इंजेक्शनच्या सीरिंज डॉक्टरच्या परवानगीपत्राशिवाय विकण्यास मनाई होती कारण ड्रग्जना सोकावलेले लोक त्यांचा वापर करतात पण आता मात्र त्यांचा काळाबाजार होऊ नये म्हणून ही बंदी उठवण्यात आली आहे.
     डॉक्टरांच्या निदानातील त्रुटि व औषधनिर्माण कंपन्यांचा दबाव या व्यतिरिक्त आणखी एक कारण औषधांच्या  अतिरेकी वापरास आहे ते म्हणजे रोग्यांची  मागणी. उदा.भारतातील बऱ्याच लोकांचा विश्वास टोनिक्स वर असतो व त्यांच्या आग्रहास्तव टॉनिक्सचा काहीही उपयोग नसतो हे माहीत असूनही डॉक्टराना टॉनिक्सची शिफारस करावी लागते. खेड्यातून आलेल्या रोग्याना तर सुई टोचणारा डॉक्टर हाच खरा हुशार असे वाटते.आणि त्याना बरे वाटावे म्हणून डिस्टिल्ड पाण्याचे इंजेक्शन टोचून गबर झालेले कितीतरी डॉक्टर आहेत.
      काही डॉक्टर स्वत:च रोग्याना औषधे विकतात अर्थात भाराभार औषधे रोग्याच्या माथी मारणे किंवा ज्या औषधकंपनीकडून अधिक कमीशन मिळते त्याच कंपनीचे औषध रोग्याला विकण्यात त्यांचा फ़ायदा असतो.
      औषधकम्पन्यांकडून होणार जाहिरातींचा मारा रोग्याना काही गोष्टी आवश्यकच आहेत असे वाटायला लावतात.उदा.: तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का ?असे जोरात विचारणारी तरुणी टी.व्ही. वर दररोज आपल्याला विचारू लागली तर खरोखरच त्याची आवश्यकता आहे असे आपल्याला वाटू लागते.बोधि मध्ये अशा तीन चार प्रकारच्या ब्रॅन्डची उदाहरणे दिली आहेत. त्यातील पहिले आहे लिस्टरिनचे .१९२० मध्ये वार्नर लॅम्बर्ट कंपनीने आपल्या या ब्रॅन्डचा खप वाढवण्यासाठी हॅलिटोसिस या नावाच्या( म्हणजे साध्या भाषेत मुखदुर्गंधी) रोगाचा उल्लेख करणे सुरू केले ते नाव मोठे भारदस्त वाटते आणि त्यामुळे हा रोग भयानक आहे असे वाटू लागते त्यामुळे आपल्या कारकीर्दीवर वा वैवाहिक आयुष्यावर परिणाम होतो असा डांगोरा पिटून त्यावर लिस्टरिन हा कसा एकमेव उपाय आहे याची जाहिरात सुरू झाल्यावर लिस्टरिनचा खप अमेरिकेत जो फक्त १ लाख डॉलर्सचाच होता तो सहा वर्षात ४० लाख डॉलर्स म्हणजे ४० पटीने वाढला.
       दुसरे उदाहरण ग्लॅक्सो कंपनीचे. त्यांच्या झानटॅक (ZANTAK)या औषधाचा खप वाढवण्यासाठी वर्षानुवर्षे लोकांना छळणाऱ्या पण अगदी साध्या छातीतील जळजळ या नावाने आतापर्यंत ओळखल्या जाणारया रोगाच्या जागी  गॅस्ट्रोइसोफगल रिफल्क्स (GERD) या भयंकर नावाच्या रोगाचे भूत त्यानी उभे केले  त्यासाठी त्यानी ग्लॅक्सो इन्स्टिट्यूट फॉर डायजेस्टिव्ह  हेल्थ नावाची संस्था उभी केली व तिच्यातून या रोगाविषयी लोकांना इषारे देणे सुरू केले आणि वर्षभरातच ZANTAK चा खप २० लाख डॉलर्सवर पोचला.तिसरे उदाहरण आहे VIAGRA चे.त्यासाठी उत्पादक कंपनीने त्या विकृतीला इरेक्टाइल डिसफन्क्शनिंग असे गोंडस नाव देऊंन त्यावर त्या गोळ्यांचा उपचार सुचवून त्या जादू-इ- उपचाराचा खप वाढवण्यात यश मिळवले.या बाबतीतही रोगीच डॉक्टराना उपाय सुचवू लागले
      अशा पद्धतीने औषधकंपन्यांची  दादागिरी मोडू इच्छिणारया डॉक्टरानी रोग्याला औषध सुचवताना "या औषधाचा काही उपयोग नाही याची मला कल्पना आहे तरीही तुझा आग्रहच आहे म्हणून हे मी सुचवतो."अशा सौम्य शब्दात रोग्याची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करावा असे बोधि चे मत आहे,अर्थात अशी मनोवृत्ती असणारा डॉक्टर सापडणे हे रोग्याचे सुदैवच म्हणावे लागेल.

संदर्भ :१)BODHI
         २)The Times of India 27/04/2011
         ३)डॉ. सुधीर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन