५४. ध्यान

ध्यान या अध्यात्मातल्या अत्यंत केंद्रीय विषयावर हा लेख आहे, माझ्या साऱ्या आध्यात्मिक आकलनाचं सार तुमच्यापुढे मांडतोय, लक्षपूर्वक वाचा.
______________________________

ध्यानाचे अनेक अर्थ आहेत आणि जितके अर्थ तितक्याच ध्यान प्रणाली आहेत, अगदी शेवटाला ‘ध्यानाची गरज नाही’ असा सांख्ययोगाचा दावा आहे कारण कोणतीही प्रक्रिया तुम्हाला स्वतःप्रत आणू शकत नाही असं सांख्याचं म्हणणं आहे. माझ्या लेखनाची महत्ता इतकीच आहे की या सर्व प्रणालींचं प्रयोजन ते सांख्याचा दावा या सर्व गोष्टींचा वेध मी या लेखात घेतलाय.
_____________________________________

प्रथम प्रश्न काय आहे ते पाहू. प्रश्न इतकाच आहे की आपण स्वतःपासून दुरावलोत म्हणून सारं अस्वास्थ्य आहे, एकदा आपण स्वतःशी जोडलो गेलो की मग आपणच सत्य आहोत, अमृत आहोत आणि आनंद आहोत.

हे आपलं स्वतःपासून दुरावणं भासमान आहे, एकदा आपण स्वतःप्रत आलो की दुरावणं भास होता हे कळतं किंवा दुरावणं शक्यच नव्हतं हे कळतं म्हणून सांख्याच म्हणणंय की फक्त बोध हवा.

जर कोणतीही प्रक्रिया (खुद्द मृत्यू सुद्धा) आपल्याला स्वत:पासून वेगळं करू शकत नाही तर मग कोणतीही प्रक्रिया (इथे ध्यान) आपल्याला स्वत:प्रत आणू शकणार नाही असा सांख्याचा दावा आहे आणि अंतिम विश्लेषणात तो निर्विवाद आहे.

सांख्याचा आणखी एक अद्वितीय पैलू इथे लक्षात घेण्यासारखा आहे, स्वरूप किंवा आपण म्हणजे नुसतं स्थिरत्व आहे, निर्वैयक्तिक स्थैर्य आहे; क्रिया मग ती साधी विचारांची हालचाल असो किंवा जाणीवेचं उन्मुख होणं असो, हालचाल आहे. सांख्याचं म्हणणंय की स्थिरत्वाचा बोध हालचालीतून कसा होईल?

कॅन यू अंडरस्टॅंड धीस? अष्टावक्रानी स्वरूपाचं वर्णन : ‘न क्वचित गंता न क्वचित आगंता’  असं केलंय (म्हणजे आपण कधीही आणि कुठेही जात नाही’!) आता या परिस्थितीत प्रत्येक क्रिया एकच काम करेल ‘तुम्हाला स्वत:पासून दूर नेणं’! म्हणून सांख्ययोगात ध्यानादी प्रक्रियांना स्थान नाही; अष्टावक्र तर इतक्या परिसीमेला आहे की तो म्हणतो ‘अनुष्ठानच बंधन आहे’ आता बोला!

पण मजा अशीये की बोध ही बौद्धिक मान्यता नाही तो अनुभव आहे आणि कुणीही गुरू असला आणि त्याचा कितीही वकूब असला तरी तो संवादानंच तुम्हाला बोधाप्रत आणायचा प्रयत्न करतो, याशिवाय जगात दुसरा कोणताही मार्ग नाही. संवाद बौद्धिक आहे त्यामुळे बुद्धी एक प्रश्न सुटला की दुसरा उभा करते आणि हा सिलसिला संपता संपत नाही. म्हणजे मी तुम्हाला बुद्धीनं निर्विवादपणे पटवून देऊ शकतो की तुम्हीच सत्य आहात आणि तुम्ही मला मानू शकता पण मी जे सांगतोय तो जोपर्यंत तुमचा अनुभव होत नाही तोपर्यंत तुमची मान्यता निव्वळ बौद्धिक राहते आणि अशा मान्यतेनं अस्वास्थ्य दूर होत नाही.

कृष्णमूर्तींना आपण समजू शकत नाही कारण एक प्रश्न सुटला असं वाटतं तोपर्यंत दुसरा उभा राहतो आणि ते ध्यानाच्या विरोधात आहेत त्यामुळे मग बोधही नाही आणि ध्यानही नाही अशी परिस्थिती होते.

ओशो अनेकविध आणि व्यापक आहेत, ते ध्यानाच्या प्रणाली विशद करतात, नव्या ध्यानप्रणाली स्वत: निर्माण करतात, सांख्ययोगावर तितक्याच निर्विवादपणे बोलतात आणि पुन्हा म्हणतात ‘ध्यान की उपयोगिता उसकी व्यर्थता जाननेमे है’! साधक पुन्हा संभ्रमित होतो, म्हणजे नक्की ध्यान करायचं की नाही?
____________________________

ध्यानाचे जगात हजारो अर्थ आहेत पण खरा अर्थ ‘लक्ष’ असा आहे. हिंदीत ‘आपका ध्यान किधर है? ’ या प्रश्नातून ध्यानाचा अचूक अर्थ व्यक्त होतो.

ध्यान म्हणजे आपलं लक्ष जे सदैव इतरत्र लागलंय ते स्वतः:कडे वळवण्याची प्रक्रिया! मग ती जगातली कोणतीही ध्यानप्रणाली असो.

ध्यान म्हणजे काय नाही हे समजणं फार महत्त्वाचंय.

ध्यान म्हणजे काँसंट्रेशन नाही, काँसंट्रेशन म्हणजे मन ‘कशावर तरी’ एकाग्र करणं. या प्रक्रियेत तुम्ही ध्यानाचा रोख इतर सर्व गोष्टी सोडून एका गोष्टीवर केंद्रित करता म्हणून जरा लक्ष विचलित झालं की उद्विग्नता येते. पूजाअर्चा, किंवा त्राटकादी तांत्रिक प्रक्रिया म्हणजे ध्यान नव्हेत. एकाग्रतेचा उपयोग कार्यकौशल्य किंवा एखाद्या गोष्टीचे जास्तीतजास्त बारकावे जाणणं यासाठी निश्चित आहे पण ती तुम्हाला स्वतः:प्रत आणू शकत नाही.

ध्यान म्हणजे मेडिटेशन नाही कारण मेडिटेशन म्हणजे एखाद्या विषयाचं चिंतन, ‘टू मेडिटेट अपॉन समथिंग’ असा ध्यानाचा अर्थ नाही कारण तुमच्या जाणीवेचा रोख पुन्हा ‘कशावर तरी’ राहतो.

अष्टावक्रानं त्याच्या संहितेत म्हटलंय ध्यान म्हणजे ‘अनावधानस्य सर्वत्र’, ‘जाणीवेचा रोख कुठेही नाही अशी अवस्था म्हणजे ध्यान’. ही व्याख्या सर्वोच्च आहे पण ती अशी मांडायला हवी, ‘जाणीवेचा रोख कुठेही नाही आणि याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे अशी अवस्था म्हणजे ध्यान’!

कारण जाणीवेचा रोख कुठेही नाही ही अवस्था संभ्रमित आहे आणि कोणत्याही क्षणी जाणीवेचा रोख कुठेही वेधला जाऊ शकतो. वास्तविक अशा अवस्थेत आपणच फार काळ राहू शकत नाही कारण सदैव उन्मुख असणं हेच आपल्याला बालपणापासून शिकवलंय. त्यामुळे तुम्ही पूर्ण भानावर आहात पण तुमची जाणीव कुठेही उन्मुख नाही अशी सर्वलक्षी अवस्था म्हणजे ध्यान. मग गरज भासली तर काहीही करायला तुम्ही तो रोख हवा तिथे वळवू शकता आणि गरज नसेल तेव्हा तुम्ही परत ‘अनावधानस्य सर्वत्र’ या जाणीवेच्या प्रार्थमिक अवस्थेला येऊ शकता.

‘अनावधानस्य सर्वत्र’ ही जाणीवेची प्रार्थमिक स्थिती आहे म्हणून बाल्यावस्थेत, जाणीव सदैव उन्मुख ठेवण्याचं शिक्षण मिळण्यापूर्वी, आपण आनंदी असतो. बालपणीचा सर्व आनंद त्या स्थितीचा नॉस्टालजिआ आहे. ध्यान म्हणजे बालपण सरलं असताना जाणीवपूर्वक त्या स्थितीला परत येणं!

ध्यानामुळे आपण सांसारिक विवंचनांतून मुक्त होतो याचा अर्थ संसार लयाला जातो असं नाही किंवा आपण संसाराचा त्याग करून संन्यस्त होत नाही तर जाणीव सांसारिक विवंचनांतून मुक्त झाल्यानं आपण स्वस्थ होतो!
____________________________

ध्यानाचे तीन पैलू आहेत. पहिला पैलू आकलन आणि त्याचं आचरण हा आहे.

एकदा तुम्हाला कळलं की वेळ हा भास आहे की तो बोध आचरणात आणायला हवा; प्रत्येक वेळी घड्याळ पाहणं, मुहूर्त, वेळ गाठण्यासाठी होणारी जीवापाड धडपड, वगैरे थांबायला हवं. तुम्हाला कळलं की देव ही कल्पनाये की तुमच्या पूजाअर्चा, तीर्थक्षेत्रांच्या सहली, कर्मकांड सर्व संपायला हवं. सगळी नाती आपल्याच मान्यता आहेत म्हटल्यावर प्रसंग निर्वैयक्तिकपणे हँडल करता यायला हवा; काय सहज आणि सोपं आहे ते बघून निर्णय घेता यायला हवा.
आकलन आणि त्याचं आचरण जाणीवेचा रोख वर्तमानात आणतं.

ध्यानाचा दुसरा पैलू, आपण निराकार आहोत याचं सतत स्मरण हा आहे.

स्मरण आणि चिंतन यात फरक आहे. चिंतन हे त्या विषया भोवती असतं आणि त्याचा बराच पसारा असू शकतो पण स्मरण हे सिंगल डायमेन्शनल असतं. जसं गाडी चालवताना आपण अनेक गोष्टींवर चिंतन करतो पण आपल्याला आपण गाडी चालवतोय याचं कायम स्मरण असतं तसं!

निराकारच स्मरण तुमचा मूड एकदम लाइट ठेवतं आणि तुम्ही सदैव वर्तमानात राहता त्यामुळे जाणीवेशी संलग्न असता. स्वरूपाचा उलगडा होवो न होवो, हे स्मरण आपल्याला स्वरूपाप्रत यायला साहाय्य करतं, आपण स्वतःपासून दूर जात नाही.

ध्यानाचा तिसरा पैलू अफलातून आहे. हा आजतागायत कुणीही सिद्धानं सांगितला नाही किंवा कोणत्याही सायकिऍट्रीच्या कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही.

आजपर्यंत मनाचं तटस्थ निरीक्षण हा सर्वोच्च ध्यान प्रकार मानला गेला आहे पण तो व्यर्थ आहे कारण त्यात जाणीवेचा रोख मनाकडे राहतो, काही वेळात झोप येते आणि कालांतरानं हाती काहीही न लागल्यानं साधक वैतागतो.

मनाच्या आकलनासाठी केव्हाही स्वस्थ बसा (किंवा तुम्हाला दिवसभरात कुठेही वेळ मिळेल तेव्हा हे करा), विचार कसेही आणि काय वाटेल ते चालू द्या फक्त ज्या क्षणी ‘हा विचार आहे’ ही जाणीव तुम्हाला होईल त्यावेळी एक गोष्ट करा: त्या विचाराच्या आधीचा विचार कोणता होता, त्याच्या आधीचा कोणता होता असा माग घेत जिथून पहिला विचार उमटला तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा.

हे अत्यंत नेटानं करायचं काम आहे, सुरुवातीला प्रयास पडेल पण नंतर जाम इंटरेस्टिंग होईल. तुम्ही एखादी जरी विचार मालिका संपूर्ण बॅकट्रॅक करू शकलात तर तुम्हाला धन्य वाटेल कारण यात तीन गोष्टी झालेल्या असतील.

एक, पहिला विचार हा कोणत्या तरी ‘जाणीवेचं’ आकलन होताना निर्माण झाला हे तुमच्या लक्षात येईल.

दोन, मनाच्या समग्र प्रक्रियेवर तुमची हुकुमत चालायला लागेल, ती प्रक्रिया ‘स्टार्ट टू फिनिश’ समजल्यामुळे तुम्हाला स्वत:बद्दल आत्मविश्वास वाटायला लागेल. मन तुम्हाला फार काळ भरकटवू शकणार नाही, मनाच्या कमीतकमी आवर्तनात तुम्ही पुन्हा वर्तमानाशी संलग्न होऊ शकाल, जिथे शरीरानं आहात तिथे हजर होऊ शकाल!

आणि तीन, तुम्ही वारंवार जाणीवेच्या संपर्कात याल कारण विचार हे जाणीवेचं, आपण बेसावध असल्यानं झालेलं रूपांतर आहे. तुम्ही पुन्हा तोच ट्रॅक वापरून जाणीवेप्रत याल.

हे पुन्हा पुन्हा जाणीवेप्रत येणं म्हणजे ध्यान!
_____________________________________

जाणीव, सनातन वर्तमान, ‘नुसतं असणं’ ही सगळी एकाच गोष्टीची नांवं आहेत ती म्हणजे तुम्ही!

ध्यान, म्हणजे जाणीवेचा रोख, हा रोख तुम्हाला स्वतःप्रत आणतो आणि स्वतः:शी संलग्न ठेवतो. एका क्षणी तुम्हाला उलगडा होतो की आपण स्वतःच जाणीव आहोत आणि ज्या क्षणी हा उलगडा होतो त्या क्षणी तुमच्या लक्षात येतं की आपण निराकार आहोत कारण जाणीव निराकार आहे.

आपल्याला वाटतं जाणीव मेंदूत आहे, नाही, ते तसं नाही, मेंदूत स्मृती आहे.

जाणीव (किंवा खुद्द आपण) आपला रोख मेंदूकडे वळवून झालेल्या जाणीवेला (किंवा संवेदनेला) डिकोड करायचा प्रयत्न करतो, म्हणजे एखाद्या ध्वनीची जाणीव झाली की आपला रोख तो ध्वनी कसला आहे हे जाणण्यासाठी मेंदूकडे वळतो, मग आपल्याला कळतं की वीज कडाडली, मग विजेचं चित्र मेंदूत उमटतं, मग पाऊस पडेल असं वाटायला लागतं, मग लाइट जातील असं वाटतं, मग ऑफिसमध्ये जायला काय सायास पडतील याचा विचार चालू होतो, मग रेनकोट किंवा छत्री नक्की कुठे ठेवलीये याचा आपण शोध घ्यायला लागतो आणि मग ऑफिसमध्ये काय मजा करता येईल असं वाटतं, त्यातनं तुमचे कलिग्ज दिसायला लागतात आणि मग मनाचा हजर नसलेल्या लोकांशी संवाद सुरू होतो! तुम्ही स्वतःपासून दूर गेलेले असता.

ज्या क्षणी तुम्ही हा मनाचा संपूर्ण प्रवास पुन्हा जसाच्या तसा रिप्ले करू शकाल तेव्हा तुम्ही पुन्हा बसला आहात त्या ठिकाणी याल, तुमची जाणीव पुन्हा तिच्या मूळ स्थितीला आलेली असेल.

या जाणीवेच्या मूळ अवस्थेला सतत येणं तुम्हाला स्वस्थ करेल, मनाच्या कोलाहलातून मुक्त करेल. एक दिवस तुम्ही त्या मूळ अवस्थेत कायमचे स्थिर व्हाल, मग तुम्हाला ध्यानाची गरज राहणार नाही, तुम्ही सिद्ध झालेले असाल!

संजय

मेल : दुवा क्र. १