पूर्वेत पाऊल..

बर्लिनचे वेध या लेखाचा पुढचा भाग ..


याआधीचा भाग इथे ....


गाडी थांबली आणि मी फलाटावर उतरलो. पूर्व जर्मनीच्या जमीनीवर माझे पहिलेच पाऊल. फलाटाचे एकंदरीत स्वरूप म्हणजे डोक्यावर ऍस्बेस्टॉसचे पत्रे आणि पायाखाली साध्या फरश्यांचे अंथरूण. अशा वातावरणात मी आपला निष्कर्ष काढला 'पूर्वेने बरेच सहन केलेले दिसतेय'.


फलाटाची परिस्थितीच अशी होती. लख्ख प्रकाशाचे दिवे, काचेचे आच्छादन असलेली बाकडी, गुळगुळीत फरश्या या सगळ्यांनीच  दडी मारली होती. मी आजूबाजूची परिस्थिती अजमावत पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. पुढची गाडी पकडण्यासाठी मला आता भुयारीमार्गाने दुसऱ्या फलाटावर जायचे होते. जुन्या गाडीतले बरेचसे प्रवाशीही पुढच्या गाडीच्या दिशेने माझ्याबरोबरच येऊ लागले. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना मला पूर्वेतील आर्थिक परिस्थितीतील फरक जाणवत होता. सहसा फलाटावरून भुयारात उतरताना escalators (धावत्या पायऱ्या?) असतात. सायकलींसाठी लिफ्ट्सचीही सोय असते. इथे मात्र आम्हाला आपल्या पायांना काम देण्याशिवाय पर्याय नव्हता. जिना उतरत उतरत मी भुयारात पोहोचलो. हलकेच भुयारातील भिंतीकडे लक्ष गेले. भिंतींना पडलेल्या चिरा दिसून येत होत्या. प्रकरण थोडे अवघडच होते.


मला एकदा जर्मन सहकाऱ्याने सांगितले होते की पूर्व जर्मनीचा जर्मन राष्ट्रामध्ये समावेश झाला तेंव्हापासून पश्चिम जर्मनीतील कामकरी वर्गावर एक नवा कर लागू झाला. हा कर म्हणजे पूर्व जर्मनीच्या विकासाचा कर.  मोठ्या भावाने लहान भावाचे जोपन करावे तसे पश्चिम राष्ट्र पूर्वेची काळजी घेत असावे. परंतू या कराचा सांगरहौसेनच्या या फलाटावरतरी असर दिसून येत नव्हता.


भुयार संपले आणि जीने चढून मी शेवटी नवीन फलाटावर पोहोचलो. गाडीची वाट बघायला सुरुवात झाली. गाडी इतक्यात येत नाही हे जाणवल्यामुळे मी इकडेतिकडे नजर फिरवायला सुरुवात केली. फलाटावरील बरेचसे सहप्रवासी माझ्याबरोबर गेल्या २-३ टप्प्यांपासून प्रवास करत होते. सगळेच कसे बिनाकामाचे एक दुसऱ्याचा आढावा घेत होते. फलाटावर मंद हवा सुटली होती. आकाशातही काळ्या ढगांची जुळवाजुळव सुरू झाली होती. सकाळपासूनच सूर्यदेवाने सुट्टी घेण्याचे ठरवले होते. फलाटावर एक दोनच मिणमिणत्या प्रकाशनलिका (tubelights) होत्या. पश्चिमेतील रेल्वे स्थानकावरील लख्ख उजेडाची कमतरता जाणवत होती.  बाहेरचे निरीक्षण करताना आत मात्र हळूहळू कावळ्यांनी आरडाओरड सुरू केली होती.


सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. गेले एक दोन टप्पे गाड्यांच्या दरम्यान फारसा वेळ नसल्यामुळे मीसुद्धा जास्त लक्ष दिले नव्हते. पण आता भूक लागू लागली होती. दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नव्हता. मी इकडे तिकडे नजर फिरवली. तिथेच असलेल्या एका खाद्य यंत्राकडे लक्ष गेले. एरवी खाद्ययंत्रात पैसे टाकल्यावर सँडविचचे पाकीट वगैरे बाहेर पडते. पण रेल्वे स्थानकावरील खाद्ययंत्रांची तऱ्हा थोडी वेगळीच. जुने अनुभव असे की काही यंत्रे आत खाद्य असूनही नाणी परत करतात तर काही यंत्रे नाणी परत द्यायलाही काचकूच करतात.


फलाटावर आमच्याच गाडीचे लोक थांबले होते. लोकांनाही काही विरंगुळा नव्हता. एखादी लहानशी घटना घडली तरी सगळ्याच लोकांच्या नजरा तिकडे वळायच्या. आता खाद्ययंत्राजवळ जाऊन खटपट केल्यास किती नजरा वळतील याची मला जरा भितीच वाटली. विचार केला आधीच वेगळे दिसत असल्याने आपण प्रसिद्धीच्या प्रकाशात आहोत.  आता आणखी कष्ट करायची काय गरज? मी आपला दुसरा कोणी मांजराच्या गळ्यात घंटा अडकवतोय का अशा भावनेनी वाट बघू लागलो.


माझ्यासारखेच इतरही काही जीव भूकेजलेले असावेत. परंतू माझ्या मनात शंका होती की सगळ्यांच्याच मनात मांजराच्या घंटेची शंका असावी.  सुदैवाने भूकेजलेला एक तरूण धीर धरून यंत्राजवळ गेला. त्याने यंत्राला पैसे द्यायला सुरुवात केली. यंत्रात सगळे कप्पे भरलेले होते. तरीही यंत्र आज काही द्यायला तयार नव्हते.  दोन तीन प्रयत्न केल्यावर शेवटी त्या तरुणाने हार मानली आणि यंत्राने परत केलेले पैसे खिशात टाकले.


एकापाठोपाठएक अशा तीन चार लोकांनी प्रयत्न केले. मला थोडा धीर आला. म्हटले, चला आता आपण प्रयत्न करायला हरकत नाही. यंत्रात पैसे टाकले आणि वाट बघितली. अपेक्षेप्रमाणेच यंत्राने फक्त नाणी परत केली. मनात म्हटले, काही हरकत नाही, प्रयत्नतरी केला. नाहीतर गाडीत बसल्यावर विचाराचा धागा बोचरी आठवण करत राहणार..


थोड्या वेळाने मागडेबर्गला जाणारी गाडी आली. गाडीत शिरलो आणि नेहेमीप्रमाणे दाराजवळच असलेल्या रिकाम्या खुर्चीवर मुक्काम ठोकला. बाहेरच्या ढगाळ हवामानामुळे आता पुन्हा थंडी पडली होती. गाडीत मात्र नेहेमीप्रमाणे heater ची सेवा सुरू होती. शरीर पुन्हा गरम झाल्यावर मी गाडीचे निरीक्षण करायला सुरुवात केली. एकूण गाडीची रचना पूर्व जर्मनीच्या फलाटाला विषम अशीच. जणू काही DB ने जर्मनीच्या आर्थिक सुबत्तेतील प्रदर्शनात पडलेला फरक भरून काढायची शपथच घेतली होती. बसायला मऊ मऊ खुर्च्या, उंचच्या उंच चकचकीत काचा आणि प्रकाशनलिकांचा लख्ख प्रकाश. छतालासुद्धा आतून गालिचे. एकंदरीत थाटच होता. गाडीला मजला एकच मात्र गाडीची उंची डबलडेकरसारखी.  ही झाली गाडीची परिस्थिती. शेजारी बसलेले सहप्रवाशी नेहेमीप्रमाणेच शांतपणे बसलेले. काही वर्तमानपत्र वाचत बसलेले तर काही पुस्तके हातात धरून बसलेले. काहीही माध्यम असो, सगळे काही जर्मनमध्ये लिहिलेले. काय लिहिलेय कळायला मार्ग नाही..


प्रवास शांतपणे पार पडला. मजलदरमजल करत गाडी पोहोचली मागडेबर्गला. एव्हाना दुपारचे तीन वाजले होते. पहाटे तीन वाजल्यापासून पोटात काही गेले नव्हते.. आणि प्रवासातला शेवटचा (?) टप्पा राहिला होता..