बर्लिनचे वेध (भाग एक)

या वर्षी परदेशिय आणि परभाषिक प्रवासाचा एकट्याने अनुभव घेण्याचा प्रसंग आला होता. प्रवासाचा कालावधी लहान असला तरी या प्रवासात बरेच नवनवीन अनुभव मिळाले. या लेखामध्ये  मी अनुभवलेल्या अविस्मरणीय बर्लिन प्रवासाचे वर्णन करायचा प्रयत्न करतोय.  लेख थोडा लांबलेला असल्यामुळे दोन भागात लिहीत आहे -- परेश


 


 


मी एकट्याने बऱ्याचवेळा प्रवास केला आहे. पण परदेशामध्ये एकट्याने दूरचा प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग.


यावेळी मार्च महिन्यामध्ये कामानिमित्त जर्मनीला गेलो होतो. माझा मुक्काम नेहेमी जर्मनीच्या ऱ्हाईन नदीकाठी. हा भाग तसा फ्रान्सच्या सीमेला जोडूनच आहे. यावेळी लायमन नावाच्या गावी राहिलो होतो. तिथे पोहोचल्यावर माझ्या एका दूरच्या चुलतभावाशी फोनवर बोलायचा योग आला. बऱ्याच वर्षांनंतर बोलत होतो. तो अलीकडेच जर्मनीमध्ये शिकायला गेलेला. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काम करण्यासाठी बर्लिनमध्ये राहिला होता. बोलता बोलता तो म्हणाला, वेळ मिळाला तर ये बर्लिनला. मीही नेहेमीच्या पध्दतीने म्हणालो, 'ठिकाय' (दोन आठवड्यांनी बंगलोरला परत जायचे होते, त्यामुळे वेळ मिळणे जरा कठीणच होते).


पण योगायोगाने माझा मुक्काम एक आठवड्याने लांबला. आणि त्यातच मला ४ दिवसांचा लांबलेला weekend ही काढायचा होता. बरोबर आलेले मित्र मात्र त्या शुक्रवारी परत जाणार होते. मला ४ दिवसांची सुट्टी एकांतवासामध्ये कशी काढावी हा मोठा प्रश्न पडला. एक दिवस असाच काही न करता घरी बितवला. शेवटी चुलतभावाला दूरध्वनीने सांगितले, 'मी येतोय बर्लिनला'.


मी जेंव्हा जेंव्हा युरोपी जातो, तेंव्हा तेंव्हा मित्रवर्गाबरोबर युरोपाचे विविध भाग बघून येतो.  पण या वेळी मात्र परिस्थिती वेगळी होती. मी एकट्याने बर्लिनला जायचे ठरवले होते. मंडळी, तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? हं, परिस्थिती अशी होती की बर्लिनसारख्या मोठ्या शहरामध्ये मला एकट्याने माझ्या चुलतभावाला हुडकायचे होते. आणि जर्मनीमध्ये वावरताना जर्मन येत नसेल तर पिण्याच्या पाण्याचीही पंचाईत. आणि त्यात माझे जर्मन म्हणजे फक्त माझ्या बंगलोरमधल्या जर्मन वर्गातील मित्रांना समजणार.


तरीही मी प्रवासाची तयारी सुरू केली. मी ठरवले होते की बर्लिनला जाताना पैसे वाचवून आगगाडीच्या weekend तिकिटाने प्रवास करायचा. या तिकिटाचा अर्थ असा की मला ५ वेळा आगगाडी बदलावी लागणार होती. आणि त्यात भर अशी की प्रवास पहाटे ४ वाजता सुरू होणार होता. आदल्या दिवशी यात्रेच्या वेळापत्रकाचे प्रिंटआऊट काढले.  आणि चुलतभावाला दूरध्वनीने माझा कार्यक्रम समजावला. सगळे काही व्यवस्थित ठरले होते. पण..


बर्लिनला जाण्याच्या पूर्वरात्री झोपण्याआधी सहजच चक्कर मारायला होटेलच्या स्वागतकक्षामध्ये गेलो. तिथे एक माहिती लिहिलेली होती. रात्री बारा वाजता पूर्णं जर्मनीचे घड्याळ एका तासाने मागे होणार होते. म्हणजे जे प्रवासाचे वेळापत्रक होते ते या बदललेल्या वेळेप्रमाणे होते.  झाले, म्हणजे, माझी बर्लिनला जाण्यापूर्वी ४ तासाची ठरवलेली झोप ३ तासांवर आली.


सुदैवाने, पहाटे (म्हणजे रात्रीच) वेळेवर जाग आली. माझे राहण्याचे ठिकाण जवळच्या रेल्वे स्थानकापासून २० कि.मी. अंतरावर. रात्रीच्या वेळी बस सेवा नसल्यामुळे कार बाहेर काढून कार्यालयात पोहोचलो.  आणि कार तिथेच टाकून चालत रेल्वे स्थानक गाठले. पहाटेचे बदललेले ४ (म्हणजे आदल्या दिवशीचे ३) वाजले होते.  धापा टाकत तिकीट यंत्रापाशी पोहोचलो. यंत्रात तीस युरो टाकले, आणि तिकीट येण्याची प्रतीक्षा सुरू केली. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर गाडीचा आवाज आला. हे रेल्वे स्थानक म्हणजे भारतातील सगळ्यात लहान रेल्वे स्थानकाइतके मोठे. त्यामुळे गाडी फक्त १ मिनिट प्लॅटफॉर्मवर थांबणार. माझे तिकीट यंत्रातून बाहेर येईपर्यंत गाडीचे दरवाजे बंद झाले. माझ्या कळत नकळत माझी गाडी माझ्या समोरून निघून गेली.


स्वतःला जास्त न रागावता मी चुपचापपणे बाकड्यावर येऊन बसलो.  प्लॅटफॉर्मवर -३ अंश तापमान. आणि त्या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर माझ्याशिवाय एकही व्यक्ती नाही. प्लॅटफॉर्मवरच्या वेळापत्रकात बघितले की साडेपाचच्या आधी कुठलीही गाडी नाही. मी स्वतःला एका कान्गारूच्या बाळाच्या आकारात गुंडाळून बाकड्यावर शांतपणे कुडकुडत बसलो. बघता बघता चार चे पाच आणि पाच चे साडे पाच झाले. पण गाडीचा पत्ता नाही. शेवटी मी प्लॅटफॉर्मवर वेळापत्रक पुन्हा नीट निरखून बघितले. आकृत्यांवरून कळले की ही गाडी फक्त कामाच्या दिवशीच उपलब्ध होती. मी कपाळावर हात मारला. सुट्टीच्या दिवशी पुढची गाडी ७ वाजता होती. म्हणजे अजून दीड तास याच बाकावर बसायचे होते.


एव्हाना गाडीच्या प्रतीक्षेमध्ये २-३ लोक प्लॅटफॉर्मवर येऊ लागले होते. काही वेळाने एक जर्मन आजीबाई माझ्या बाकड्यावर येऊन बसल्या. थंडी थोडीशी कमी झाली होती. तरीही आजीबाईंवर थंडीचा परिणाम हळूहळू दिसू लागला.  सोलापूरच्या ४५ अंश तापमानाच्या  सवयीचा मी आणि माझ्या शेजारी बसलेल्या जर्मन आजीबाई या दोघांमध्ये थंडी सहन करण्याची क्षमता मात्र सारखीच दिसत होती. 


शेवटी सकाळी सात वाजता गाडी आली. माझ्या बर्लिन प्रवासातील पाच टप्प्यांपैकी पहिला टप्पा एकदाचा सुरू झाला. गाडीमध्ये बसल्यावर शरीराचे तापमान हळूहळू सुरळीत होऊ लागले. जर्मनीमध्ये थंडीत प्रवास करताना सगळ्यात सुखाची गोष्ट म्हणजे संपूर्ण आगगाडी हिटरने गरम झालेली असते. थंडीमध्ये सुन्न झालेल्या गालांमध्ये जीव येऊ लागला. थोड्या वेळाने डब्यामध्ये इकडे तिकडे पाहिले. फार तर ८-१० माणसे होती. आणि आजीबाई माझ्या समोरच्या खुर्चीमध्ये शांतपणे बसल्या होत्या. पूर्ण प्रवासात गाडीमध्ये कोणाचाही आवाज नव्हता. कदाचित यामुळेच गाडीही आवाज न करता अंतर काटत होती. बाहेर अजूनही अंधार होता.


अर्ध्यातासातच आगगाडी मॅनहाईम नावाच्या शहरात पोहोचली.  हे शहर जर्मनीमधल्या मोठ्या दहा शहरांपैकी एक. इथे उतरून मला लगेचच पुढच्या टप्प्यासाठी गाडी बदलायची होती. मी गडबड करत खाली उतरलो. आजी बाईही त्यांच्या वेगाने खाली उतरल्या. मी प्लॅटफॉर्मवर वेळापत्रक बघितले आणि आपल्या नवीन प्लॅटफॉर्मकडे जाऊ लागलो. आजीबाईंना काय वाटले कोण जाणे, त्यांनी विचारले 'gehen Sie zu Hamburg?' (तू हॅम्बुर्गला जात आहेस काय?). हॅम्बुर्ग म्हणजे अगदी जर्मनीचे उत्तर टोक. मी मनातल्या मनात म्हणालो, बर्लिनला पोहोचलो तरी पुरेसे आहे. मी फक्त नकारात्मक मान हालवली. आजीबाई हसून प्रवासाच्या शुभेच्छा देऊन आपल्या हॅम्बुर्ग गाडीकडे रवाना झाल्या.


आणि मी फ्रँकफर्टला जाणाऱ्या आगगाडीचा शोध घेत रेल्वे स्थानकावर भटकू लागलो..


मी शेवटी बर्लिनला पोहोचलो की नाही हे पुढच्या भागात...