बर्लिनमध्ये शिरलो..

बर्लिनचे वेध या लेखाने सुरू झालेल्या मालिकेचा पुढचा भाग. याआधीचा भाग इथेआहे.


एव्हाना दुपारचे तीन वाजले होते. पहाटे तीन वाजल्यापासून पोटात काही गेले नव्हते.. आणि प्रवासातला शेवटचा (?) टप्पा राहिला होता.. इथून पुढे.

मागडेबर्ग स्थानकावर उतरल्यावर पावले पुढे सरकवली. कडाडून भूक लागली होती. रेल्वे स्थानकावर थोडीशी दुकानेही दिसत होती. काही खाद्यपदार्थांची तर काही वर्तमानपत्रांची. पण मला थोडी शांत जागी बसून पोटभर खाण्याची इच्छा होती.  एकाही दुकानात  बसून खाण्याची सोय दिसत नव्हती. स्थानकातच थोडी भटकंती केल्यावर विचार केला बाहेर काही तरी सोय असेल. म्हणून मग मी बाहेर जाणाऱ्या मार्गाचा शोध घेतला. बाहेर जाण्यासाठी पूर्वेच्या प्रथेप्रमाणे पायऱ्यांनीच वर जाणारा जिना. पहिल्या आणि दुसऱ्या पायरीमधील जागेत लाल अक्षरात लिहिले होते 'मॅकडोनल्डस ५० मीटरवर'. मनात विचार आला काही नाही तरी इथे बसूनतरी काही खायला मिळेल. बाणाची दिशा मॅकडोनल्डस डावीकडे असे दाखवत होती. प्रश्न! मॅकडोनल्डस स्थानकाच्या आत डाव्या बाजूला की स्थानकाबाहेर डाव्या बाजूला?


विचार केला की आधी बाहेर शोध घ्यावा. जिना चढून मी बाहेर पडलो. बाहेर पडताक्षणी थंड वाऱ्याचा झोंबता प्रवाह अंगाला लपेटला. बाहेर फारच हलकी वर्दळ होती. मी मॅकडोनल्डसची डावीकडे वेध घ्यायला सुरुवात केली. थोड्या अंतरावर काही घरे होती. पण ५० काय ५०० मिटरवरसुद्धा मॅकडोनल्डसची पाटी दिसत नव्हती. भूक तर क्षणाक्षणाला वाढत होती. हताश होऊन मी मॅकडोनल्डस स्थानकाच्या व्यवस्थापनाला नावे ठेवायला सुरुवात केली आणि त्याचा फारसा फायदा नाही हे जाणवून पावले स्थानकाकडे वळवली.


आत शिरताना एक १५ - १६ वर्षाची मुलगी वाटेत उभी होती. मुलीच्या चेहऱ्याची ठेवण थोडी पूर्व युरोपातली वाटली. तिने विचारले schones wochen ende?  तिच्यामागे एक ४०-४५ वर्षांचा माणूसही होता. विचार केला ही मुलगी अचानक मला शनिवार, रविवार उत्तम जावा असे का म्हणू लागली आहे? पण पूर्व युरोपीय लोकांच्या काही गुन्हेगारी कथा पूर्वी ऐकल्या असल्यामुळे मी आपला फारसे न लक्ष देता स्थानकामध्ये प्रवेश केला. आत शिरल्यावर प्रकाशनलिका पेटली की ती मुलगी माझ्याजवळ weekend तिकीट आहे का असे विचारत होती (हे तिकीट पाच लोकांच्या समूहासाठी दिवसभर चालत असल्यामुळे माझ्यासारख्याला गाठणं जास्त स्वस्ताचं काम होतं).


स्थानकाच्या आत मॅकडोनाल्डसचा तपास सुरू केला. पायऱ्यांवरील मॅकडोनाल्डसच्या बाणाच्या दिशेने नजर फिरवली तर थोड्याच अंतरावर भिंत उभी दिसत होती. मॅकडोनाल्डसचा कोठेही पत्ता नव्हता. मी आपला मॅकडोनाल्डसमध्ये बसूनच खायचे हा नाद सोडून दिला आणि बाकीच्या पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली. थोड्या शोधानंतर एक साधे खाद्यपदार्थांचे दुकान दिसले. दुकानात प्रवेश केला आणि संत्र्याच्या रसाची एक बाटली आणि एक बिस्किटांचा पुडा अशा दोन वस्तू उचलल्या. पैसे देण्यासाठी दुकानात पैशाची फळी वेगळी अशी दिसत नव्हती. त्यामुळे पैसे कोठे द्यायचे हा प्रश्नच होता. मी दुकानाच्या मध्यभागी काहीतरी खात बसलेल्या एका जपानी महिलेला ओलांडून दुकानाच्या अजून आत जाऊ लागलो. त्या स्त्रीने माझ्या हातातील बाटली आणि बिस्किटे पाहिली आणि आपल्या खाद्यांची थाळी टेबलाआड सरकवली. तिने एका रुमालाने आपला चेहरा नीटनेटका केला आणि हसून म्हटले, पैसे इथेच द्यायचे असतात. मी थोडा गोंधळलो आणि मग जास्त विचार न करता तिला पैसे देऊन टाकले. गाडीची आता वेळ झाली होती. मी फलाटाकडे जायला सुरुवात केली.


फलाटावर पोहोचलो आणि वाट बघत असलेल्या बर्लिन झूलॉगिश गार्डनला जाणाऱ्या गाडीत प्रवेश केला. हा माझ्या मोठ्या आगगाडीतील प्रवासाचा शेवटचा टप्पा...


प्रवास हा संत्र्याचा रस पिण्यात आणि बर्लिनला जाणाऱ्या गाडीतील गर्दीचे निरीक्षण करण्यातच गेला. बराचसा प्रवासीवर्ग तरूणच होता. अधुनमधुन इंग्रजीही कानावर पडत होती. बऱ्याचजणांकडे मोठ्या मोठ्या प्रवासी पिशव्या होत्या. शेजारी बसलेल्या जोडप्याच्या समोरच्या खुर्चीवर अशाच प्रवासी पिशव्या ठेवल्या होत्या. एका स्थानकावर एक जर्मन कुटुंब बसण्यासाठी जागा हुडकत हुडकत त्या खुर्चीच्या दिशेने आले. कुटुंबातल्या मातेने बसलेल्या जोडप्यातील युवकाला विचारले की कृपया तुम्ही खुर्ची रिकामी करू शकता का? युवकाने जास्त विचार न करता सांगितले की पिशव्या मोठ्या आहेत, इतरत्र ठेवायला जागा नाही. डब्यामध्ये कोठेही रिकामी खुर्ची दिसत नव्हती. तरीही त्या मातेने त्याला हसून उत्तर दिले, ठीक आहे काही हरकत नाही. आणि ते कुटुंब पुढच्या डब्यामध्ये जागा हुडकायला निघाले. मला जर्मन सभ्यतेचा अजून एक धक्का बसला. उद्यान एक्सप्रेसमध्ये असे कोणी उत्तर दिले तर त्या प्रवासी पिशवीचीच गादी होऊन दोन चार टाळकी त्यावर एव्हाना विराजमान झाली असती. पण हे होते जर्मनी, येथे सगळे शिष्टाचार थोडे वेगळेच.


गाडी आता बर्लिनच्या बरीच जवळ आली होती. इतिहासात ऐकलेले एखादं दुसरे गाव हळूहळू नजरेस येऊ लागले.  त्यातीलच एक म्हणजे पोस्टडॅमर प्लात्झ नामक स्थानक. स्थानकावरून मला युटूच्या बोनो भाऊच्या गाण्याची आठवण झाली. हळूहळू खिडकीबाहेरचे दृश्य दुहेरी रस्त्यांवरून चौफेरी आणि मग आठपदरी अशा रस्त्यांमध्ये होऊ लागले. रस्त्यावर रंगीबेरंगी गाड्या भरधाव वेगाने जात होत्या. मधूनमधून मोठ मोठ्या इमारती आणि लांबलचक हिरव्यागार बागाही दिसत होत्या. प्रवास करत करत माझी गाडी एकदाची पोहोचली बर्लिन झूलॉगिश गार्डनला. गाडीतून उतरलो.


बर्लिनच्या या एका टोकाच्या प्राचीन कालीन स्थानकावर मला आता चुलतभावाच्या घराचे वेध लागले होते. काल रात्रीपासून मला एवढेच पाठ होते की बर्लिनमध्ये आपल्याला दोन ट्रॅम्स बदलून भावाच्या उपनगरात पोहोचायचे आहे. बाकी मला ना त्याच्या घराचा पत्ता माहित होता ना नकाशा. सगळ्यात जवळ असलेल्या दूरध्वनी डब्यावर मी चुलत भावाच्या फिरत्या दूरध्वनीचा क्रमांक फिरवला. दूरध्वनीची किणकीण सुरू झाली. बराच वेळ किणकीण सुरू राहिली. किणकिणीच प्रत्येक स्वराबरोबर माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले. हळूहळू भावाचा दूरध्वनी बंद असला तर घराचा पत्ता कसा कळणार या चिंतेने मनात प्रवेश केला.  बराच वेळ झाला तरी कोणी दूरध्वनी उचलला नाही.  शेवटी मी दूरध्वनीचे कान खाली ठेवले आणि पर्यायी व्यवस्थेचा विचार करू लागलो. परतीचे तिकीट तर दुसऱ्या दिवसाचे होते. आणि अनोळख्या बर्लिनमध्ये एक दिवस व्यवस्था कशी करायची हाही एक प्रश्न होता. एव्हाना माझी मानसिक शांतता वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळून गेली होती...