बर्लिनकडे आगेकूच

बर्लिनचे वेध (भाग १) या लेखाचा पुढचा भाग लिहायचा गेले काही दिवस विचार करत होतो. शेवटी वेळ मिळाला आणि पुढचा भाग लिहायला सुरुवात केली. यावेळेस लिहिलेल्या भागात माझ्या बर्लिन प्रवासातील मधल्या टप्प्यांचे वर्णन करत आहे ..


फ्रँकफर्टला जाणाऱ्या आगगाडीचा शोध घेत रेल्वे स्थानकावर भटकू लागलो (येथून पुढे ...)



सकाळचीच वेळ होती. हवेमध्ये अजूनही गारठा होता. वेळापत्रकातील माहितीप्रमाणे फ्रँकफर्टला जाणारी गाडी नऊ क्रमांकाच्या फलाटावर येणार होती.  मी मजल दरमजल करत योग्य फलाटावर पोहोचलो. तिथे आधीपासूनच एक आगगाडी वाट पाहात थांबली होती. थोडे जवळ जाऊन बघितल्यावर लक्षात आले की गाडी कोब्लेंझ नामक गावाकडे निघाली होती.


फ्रँकफर्टला जाणाऱ्या गाडीची वाट पाहण्याशिवाय दुसरे काहीच काम नसल्यामुळे मी वेळापत्रकाचा पुन्हा एकदा अभ्यास सुरू केला. वेळापत्रक वाचता वाचता माझ्या आळसावलेल्या मेंदूच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. तिथे दिलेल्या माहितीप्रमाणे या फलाटावर पुढच्या तासाभरात फक्त एकच आगगाडी थांबणार होती. आणि तिचा शेवटचा टप्पा फ्रँकफर्ट हा होता. परंतु फलाटावर  लिहिलेल्या फलकावर तर गाडीचा टप्पा वेगळाच होता. काय प्रकरण आहे, काही कळेना. आजूबाजूला फार लोक नसल्यामुळे कोणाला विचारणेही अवघड (लोक असते तरी फारसा फरक पडला नसता म्हणा. लोकांना माझा गोंधळ समजावता समजावताच माझी नाकीनव झाली असती. मागे एकदा मला उन्हाळ्यामध्ये हॉटेलच्या खोलीमध्ये table fan (टेबलपंखा?) हवा होता. पण तुटकं इंग्रजी समजणाऱ्या हॉटेलच्या कर्मचाऱ्याला पंखा म्हणजे नक्की काय प्रकरण असते हे समजावता समजावताच माझा अर्धातास गेला होता).  


थोड्याच वेळात फलाटावर प्रवाश्यांचे एक दोन घोळके यायला सुरुवात झाली होती. हेही लोक माझ्यासारखेच गोंधळात पडले होते. थोडा वेळ सगळ्यांचाच अश्या गोंधळलेल्या अवस्थेत गेला. तेवढ्यात DB ची (जर्मन आगगाडीसेवेची) एक महिला कर्मचारी फलाटावर आगमन करताना दिसली. मघाशी आलेल्या घोळक्यांतील काही लोकांनी लगेच तिला गाठले आणि जर्मनमध्ये काहीतरी बडबड सुरू केली. मला काही कळेना काय सांगतेय ती कर्मचारी.  लोकांच्या हावभावावरूनसुद्धा मला काही समजत नव्हते. या लोकांचे हावभावही थोडे जर्मनच असावेत. छोट्याश्या संवादानंतर या लोकांनी त्या कर्मचाऱ्याचे आभार मानले आणि गाडीत चढायला सुरुवात केली.


आमची परिस्थिती मात्र अजूनही गोंधळलेली. लोकांनी काय तोडगा काढला हे कळायला मार्ग नाही. शेवटी धीर करून थोड्या अंतरावर असलेल्या एका सहप्रवाश्याला गाडीकडे बोट करून विचारले 'फ्रँकफर्ट?'. त्याने होकार दिला. मी त्याच्या उत्तराचा 'फ्रँकफर्टकडे जाणारी गाडी' असा अर्थ लावला आणि मग जास्त चौकशीच्या भानगडीत न पडता 'भारतीय रेल्वे सेवा फलक बदलण्यात किती वेळा अशी गडबड करत असावी' अशी नेहेमीच्या पद्धतीने मनात तुलना करत गाडीमध्ये प्रवेश केला. गाडी फ्रँकफर्टलाच निघाली होती याची गाडीत शिरल्यावर अजून एकदा खात्री करून घेतली. आणि समोरच असलेल्या रिकाम्या बाकड्यावर कब्जा केला.


थोड्याच वेळात गाडीने फ्रँकफर्टकडे धाव घेतली...फ्रँकफर्टला पोहोचता पोहोचता दीड तासा गेला. रेल्वे स्थानकावर उतरल्यावर लगेचच मी चुलतभावाला दूरध्वनीवर संपर्क केला. ५० सेंटमध्ये (म्हणजे दूरध्वनीच्या एका मिनिटात) माझ्या बदललेल्या प्रवासाची कल्पना देण्याचा प्रयत्न केला. ठरलेल्या वेळापेक्षा मी उशीरा पोहोचणार असल्यामुळे तो मला रेल्वे स्थानकावर घेण्यास येऊ शकणार नव्हता. पर्याय म्हणून त्याने मला त्याच्या room partner (खोलीमित्र?) चा चलितदूरध्वनी क्रमांक दिला आणि बर्लिनला पोहोचल्यावर त्याला संपर्क करायला सांगितले. मी दूरध्वनी बंद केला आणि पुढच्या प्रवासाच्या गाडीकडे माझी दिशा बदलली. पुढचा बराचसा प्रवास जर्मनीच्या पठारावरून होणार होता. फ्रँकफर्ट ते कासल आणि मग कासल ते सांगरहौसन असा. कासल, सांगरहौसन वगैरे गावं म्हणजे जर्मनीच्या मध्यातली लहान लहान गावं. आपल्याकडे वाडी, दौंडसारखी गावं फक्त रेल्वेच्या नकाश्यात मोठी दिसतात तशीच.


दोन्ही टप्प्यांमध्ये गाडीमध्ये बसलेले सहप्रवाशी म्हणजे एकतर माझ्यासारखे weekend तिकिटावर गाड्या बदलून बर्लिनला जाऊ इच्छिणारे लोक किंवा मग गावाकडची जर्मन माणसं. हे गावाकडले लोक म्हणजे जर्मनीतले शेतकरी असावेत. मनात विचार आला हे शेतात स्वतः घाम गाळत असले तरी प्रत्येकाच्या दारात मात्र एकतरी mercedez benz असणारच.  एकूण प्रवासात शेजारी बसलेल्या लोकांशी समान भाषेअभावी संभाषण कसे करायचे हा प्रश्नच असल्यामुळे मी आपली बाहेरच्या परिस्थितीचे निरीक्षण करायला सुरुवात केली. प्रवासाच्या दोन्ही टप्प्यांत बाहेरचे चित्र साधारणपणे एकसारखेच होते. लांबच लांब मेणकापडांनी आच्छादलेली शेते. मेणकापडाखाली उगवलेले खुरटे हिरव्या रंगाचे गवत (की पीक?). आणि मधून मधून दिसणारा अजूनही न वितळलेला पारदर्शित बर्फ. एकूण प्रवासामध्ये हिवाळी शेती न बघितलेल्या मला मेणकापडांनी अंथरून पीकं घेण्याची कल्पना भलतीच पसंत पडली. मी हळूच माझ्या प्रवासी पिशवीतला कॅमेरा बाहेर काढून बाहेरच्या दृश्यांची दोन चार छायाचित्रे टिपली. बाकी बाहेरच्या दृश्यामध्ये एक दोन फरक मात्र दिसायचे. हे फरक म्हणजे क्षणातच दिसणारा जर्मन महामार्ग आणि त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या आणि मधूनच दिसणारी कोंकणातल्या उतारू कौलांच्या घरांसारखी जर्मन घरे  (अर्थात जर्मन घरं बाहेरुन कितीही साधी वाटत असली तरी आतून बऱ्याचवेळा अत्याधुनिक सोयीसवलतींनी समृद्ध असतात.. ).


मजल दरमजल करत गाडी पोहोचली सांगरहौसनला..  मध्यान्हाची वेळ झाली होती. गाडी थांबली, आणि पूर्वीच्या पूर्व जर्मनीतल्या जमीनीवर माझे पहिले पाऊल ठेवले...


मंडळी, कथानक लांबतंय त्यामुळे मी पूर्व जर्मनीतल्या या रेल्वे स्थानकावरचं माझे निरीक्षण आणि माझा उरलेला बर्लिनचा प्रवास याचे वर्णन लवकरच मी पुढच्या (आणि बहुधा शेवटच्या) भागात करेन..