डुक्कर !!

डुक्कर!!

हा शब्द बाहेर पडला की काय आठवतं?

गावाबाहेरचा
उकिरडा? - शहरातली तुडुंब वाहणारी कचरापेटी? -  डझनभर पिले आणि
त्यांच्या आईसोबतची वरात? - वराह अवतार? - शोले मधला गब्बर?
म्युन्सिपल्टी वाल्यांची धावपळ? -  --- काय काय नाही आठवतं ... पण मला
सर्वात आधी काही डोक्यात येत असेल तर ते म्हणजे - एक विशेषण
(मूर्ख/नालायक/त्रासदायक/तापदायक व्यक्तीचे! )

हा लेख लिहिण्याचा विचार मनात आला तोदेखील ह्याच स्पेशल कारणामुळे! डुक्कर हा शब्द किती सहजपणे वापरला जातो ना? ---

कंपनीत
आपल्या टीम मधल्या माणसांपैकी कोणी ऑनसाईट जाऊन आला आणि त्याने चॉकलेटस
आणून डेस्क वर ठेवली की ती घेण्यासाठी झुंबड उडते.. त्यात शेवटच्या माणसाला
अगदी चवीपुरते एक'च चॉकलेट मिळते तेव्हा तो/ती म्हणते - कसले डुक्कर आहात यार तुम्ही..!

आजकालच्या
कॉर्पोरेट जगात ५ दिवस  काम केल्यावर २ दिवस मिळणाऱ्या सुट्टीमध्ये त्या
पाच दिवसांचे कपडे धुणे, रूम आवरणे, घरची कामे, बाहेरची कामे करून काही तास
शिल्लक राहतात, त्यामध्ये समजा आपण दुपारी किंवा सकाळीच टी. व्ही पाहत
लोळत पडले असू तर घरातून हमखास एक आवाज येतो - "अरे डुकरासारखा लोळतोयस नुसता... ऊठ जरा काही अजून कामं कर...!

एवढेच काय, रमेश सिप्पींच्चा ब्लॉकबस्टर शोले आठवतोय का? त्यामधले गब्बरसिंगदेखील आपल्या पराभूत गुंडांना म्हणतो - "सुवर के बच्चों"
!!   (आता मला सांगा हे असले राकट, दांडगट गुंड 'डुकराच्या' पिलांची उपमा
घेण्याच्या लायकीचे आहेत का?   --- डुकराचे पिलू तर किती क्युट असते.. (असे
माझे नाही आमच्या कॉलेजमधल्या स्नेहाचे मत होते! ) )

वराह अवतारात
विष्णूने देखील डुकराचे रूप घेतलेले आहे, त्याबाबतची आख्यायिका आणि
कारणीमिमांसा सर्वश्रुत आहेच, मध्यंतरी पोगो वर दशावतार हा अनिमेटेड
चित्रपट पाहताना विष्णूच्या सर्वचं रूपांचे दर्शन झाले आणि हात आपोआप जोडले
गेले...

एकंदरीतच लहानपणापासून ज्या प्राण्याची किळस वाटते..  पाल,
सरडा, अळी, झुरळ, इ. अश्या प्राण्यांपैकी फक्त डुकराचे नाव  एकमेकांना
उपाधी म्हणून दिले जाते... कोणी असे म्हणताना पाहिले नाही की "अरे झुरळा,
नीट चाल... " पण  "अरे ए डुक्कर"  हे वाक्य अनेकदा हमखास ऐकायला मिळते...!!

एवढेच
काय, लायनकिंग च्या "हकुना-मटाटा" मध्ये टिमोन आणि पुंबा
असतात-- तो पुंबा म्हणजे सुद्धा एक डुक्करच बरं का! फरक फक्त एवढाच की ते
रानडुक्कर होत...  !
पण ह्या रानडुकराने लहान थोरांचे एवढे छान मनोरंजन केले की बाबा सहगल आणि
अनाय्डा यांनी मिळून ह्या गाण्याचे हिंदी व्हर्जनदेखील काढले-- त्यामध्ये
तर डुकराचे जीवनगान'च आहे   ==" हकुना मटाटा -- फिकर ना करो... हमेशा खूश रहो!! "

मध्यंतरी
तर 'स्वाईन फ्लू' मुळे डुक्कर हा प्राणी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला
होता.... तोंडाला मास्क लावून फिरणाऱ्या माणसांनी मास्क विक्रेत्यांचा
चांगला धंदा करून दिला... मी तर असेही ऐकले होते की एक मास्क विक्रेत्याने
एका दिवसात २००० रुपयांची मास्क विक्री झाल्याच्या आनंदात कचराडेपोजवळ
फिरणाऱ्या डुकरांना चितळ्यांचे अर्धा किलो श्रीखंडाचा डबा ठेवला होता
म्हणे... (खी खी खी.. )

डुक्कर पकडायला आलेल्या कॉर्पोरेशन च्या
लोकांच्या टीम ला पाहिले आहे का? नुसता दंगा असतो डुक्कर पकडताना, एरवी
गप्प गार पडलेले डुक्कर ह्या वेळी भलतीच चपळाई दाखवते.. लाइव्ह एंटरटेनमेंट
असते ह्या वेळी... जमल्यास बघा कधीतरी !!

लहानपणी च्युंइंग-गम
डुकराच्या चरबीपासून बनवतात हे ऐकून च्युंइंग-गम खाणे सोडले होते, फिरंगी
लोक तर डुकरे पाळतात म्हणे, पांढरीशुभ्र, गुलाबी, आणि करड्या
रंगांची....   आणि पोर्क पोर्क म्हणत त्यांच्या मांसावर ताव पण मारतात...!
तिकडे डुकरांची शेती(पालन)  करणारा झटपट धनवान होतो म्हणतात.. सुदैवाने
आपल्याकडे अजून तरी हे  फॅड आलेले नाही...

डुक्कर हा काही कोणाचा
आवडता प्राणी होऊ शकत नाही कबूल... पण ह्या प्राण्याइतके स्वच्छंदी आयुष्य
दुसऱ्या कोणा प्राण्याच्या नशिबी आल्याचे दिसत नाही... रानडुकराची ताकद तर
सर्वांना माहीत आहेच, त्यामुळे ह्या प्राण्याकडून थोडेफार काही घेण्यासारखे
असेल तर तो मस्तवालपणा  ! डुकराला कोणी घाण्याला जुंपत नाही, त्याच्यावरून
ओझी वाहत नाहीत, डुकराचा रपेटीसाठी वापर शून्य... हे नुसते इथून तिथे भटकत
असते, जोडीला आपला प्रपंचगाडा घेऊन दोनाचे चार चाराचे आठ ह्या दराने वाढवत
बिचारे ओला कचरा, सुका कचरा - जिथे जाते तिथे खाते....

असो, कोणाच्या
खाण्यावर बोलू नये, म्हणून लेख इथेच संपवतो... (बराच वेळ जमिनीला पाठ
टेकली नाही... त्यामुळे आता जरा लोळावे म्हणतो.. मस्त, स्वच्छंदी,
बेफिकीर........ अगदी डुकरासारखे )

-

आशुतोष दीक्षित.