सेल्युलायटिस, मधुमेह आणि केंजळगड

गेल्या वर्षाभरात कुठे म्हणजे कुठेच गिर्यारोहण झाले नाही. जाऊ जाऊ म्हणताम्हणता
दिवस नि महिने नुसते उलटून गेले. या वर्षी तर मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका
जाणवायला लागला, त्यामुळे अजून तीन महिने कुठे जाण्याचे होईलसे दिसत
नव्हते.

मार्चचा पहिला आठवडा उलटतो न उलटतो तोच एक दिवस गडबडीला सुरुवात झाली.
विद्यापीठात एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आखला होता. निम्मा दिवस होईपर्यंतच
माझा घसा घोगरायला लागला. उरलेले चार तास बोलता येईल असा काही भरंवसा वाटेना.
नाईलाजाने कार्यक्रम रद्द केला नि परत कार्यालयात आलो. तोवर उजवा पायही दुखायला
लागला. आपण जिथे बुटाची लेस बांधतो तिथे काहीतरी टोचल्यासारखे दुखत होते. फार दुखत नव्हते म्हणताना दुर्लक्ष केले.
संध्याकाळी घरी गच्चीवर 'बार्बेक्यू-बिअर' असा कार्यक्रम होता. तो संपेस्तोवर पाय
जरा जास्तच बोलायला लागला होता. त्यामुळे मध्यरात्र व्हायच्या आतच झोपी
गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर पाय भप्प सुजलेला. त्यावर किंचितही भार टाकता
येईना. लंगडत इकडून तिकडे जायचे म्हटले तर लंगडी घालताना
बसणाऱ्या पिटक्या हिसक्यांनीही मरणप्राय वेदना होऊ लागल्या. आणि घशातून आवाज
फुटायचे एव्हाना बंद झाले होते. दुखते तर आहे आणि बोंबलता तर येत नाही ही अवस्था फारच केविलवाणी असते याचा शोध लागला.

सुदैवाने अस्थिरोगतज्ञ जुना मित्र असल्याने तो माझ्या बसक्या आवाजातूनही अर्थ
काढू शकत होता. माझ्या फोनवरच्या कुजबुजीनंतर त्याने भेटायला दवाखान्यात
बोलावले. त्याचा दवाखाना औंधला. तिथे जाण्यासाठी हिमांशूला साकडे घातले. कारण माझे
वजन पेलू शकेल असा दुसरा मानव मला आठवला नाही. आनंद देशपांडेंनी हिमांशूला असली
कामे करण्यासाठी भरपूर मोकळा वेळ मिळावा म्हणूनच 'पर्सिस्टंट सिस्टीम्स' सुरू
केलेली असल्याने हिमांशू एका पायावर तयार झाला. चला, दोघांमध्ये मिळून का होईना,
दोन पाय झाले.

आंघोळ कशीबशी उरकली. गरम पाण्याने पाय चांगला शेकून घेतला. तोवर
हिमांशू आलाच. त्याच्या आधाराने कसाबसा त्याच्या गाडीत बसलो.

मित्रवर्यांनी
पाय फ्रॅक्चर नसल्याचा निर्वाळा दिला. मग होती काय ही भानगड? तर
'सेल्युलायटिस'. शरीराच्या कुठल्याही भागात रक्त साकळणे. हे कशाने होते? कुठल्याही
कारणाने अंतर्गत (वा कधीकधी बहिर्गतही) जखम झाली तर. त्यात सर्पदंश, विंचूदंश ही
उदाहरणे होती. प्रशिक्षणवर्गात रेम्याडोक्याची गाढवमंडळी बरीचशी होती, पण
साप-विंचू बघितल्याचे आठवत तर नव्हते. इतर कारणांमध्ये साध्या जखमा, भाजणे,
सर्जनकडून झालेल्या जखमा आणि तत्सम यादी होती. पण मला तिथे तसे काहीच झालेले
नव्हते. पायाच्या त्या भागाला नकळत मार लागेल असेही होणे कठीण होते.

असो, झाले होते ते झाले होते. आता प्रतिजैविके गिळणे भाग होते. तीन दिवसांत जर
अपेक्षित बदल घडला नाही (सूज उतरणे आणि साकळलेल्या रक्ताने काळानिळा पडलेला पाय मूळ
रंगाकडे वाटचाल करू लागणे) तर एक छोटीशी शस्त्रक्रिया करून ते रक्त काढावे लागेल
असे मित्रवर्यांनी सांगून टाकले. त्याला एकमेव उपाय म्हणजे कायम आडवे पडून पाय
उंचावर ठेवणे. थोडक्यात, सक्तीची बिछाना-विश्रांती.

पण त्याआधी घसातज्ञाकडे जाऊन
घशाचे काय ते बघणे भाग होते. तिथे निदान झाले की स्वरयंत्र सणाणून सुजले आहे आणि
मौनव्रत पाळण्यावाचून दुसरा उपाय नाही.

दोघा वैद्यकीय तज्ञांनी मिळून दिवसाला
तेरा गोळ्या असा माफक औषधोपचार जाहीर केला नि मी सोफा-शायी होण्यासाठी घरी पोहोचलो.
आडवे पडून टीव्ही बघणे वा संगणक वापरणे शक्य नव्हते. वाचन आणि संगीत यांच्या साथीने
दिवस गेला. रात्री दोनच्या सुमारास अचानक रक्तदाब वाढला आणि एक तासभर फारच अस्वस्थ
व्हायला झाले. म्हणजे दुसऱ्या दिवशी हृदयरोग तज्ञ गाठणे आले.

हिरेमठ म्हणाले की
ईसीजी व्यवस्थित आहे पण रक्तदाब १६०-११० आहे. पाय नि घसा यांच्यासाठीच्या औषधांनी
रक्तदाब वाढला असेल असे त्यांचे मत पडले.

आणिक एक उपकथानक म्हणजे
'सेल्युलायटिस'च्या अनेक कारणांपैकी एक मधुमेह. सहा महिन्यांपूर्वी रक्ततपासणी केली
तेव्हा तरी मला तो नव्हता. पण याचा अर्थ तो आता नसेल असा नव्हे. थोडक्यात,
आठवडा-दहा दिवसांत रक्ततपासणी करून घेणे आले.

'मधुमेह असेल का?' या विवंचनेत मुकाट पडून राहिलो. विवंचना अशासाठी की हृदयविकार
जडवून घेऊन आठ वर्षे झाली होती. त्यात अजून मधुमेह म्हणजे औषधे आणि/वा पथ्यपाणी कशाप्रकारे
बदलेल ते माहीत नव्हते.

औषधांचे सगळे डोसेस संपेस्तोवर पुढच्या आठवड्याची अखेर आली. घैसासांनी सांगितले
होते की प्रतिजैविकांचा परिणाम शरीरातून निचरून जायला ३६ ते ४८ तास लागतात. तीन
दिवस थांबलो नि रक्ततपासणी करून घेतली. घसा सुदैवाने मूळपदावर आला होता.

मधुमेह नव्हता. हिमोग्लोबिन उत्तम होते. कोलेस्टेरॉल मर्यादेत होते. स्ट्रेस
टेस्ट केली तीही झकास झाली.

सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. माझ्या तब्येतीची काळजी माझ्यापेक्षा माझ्या
सहकार्‍यांनाच जास्त लागली होती. मी कार्यालयात नसलो तर शांततेने कान किटतात असे
पौर्णिमाचे मत पडले.

काही म्हणजे काहीच नाही म्हटल्यावर मी आनंदाने हुशारलो. आणि लगेच रक्तदान करायला
निघालो. बर्‍याच दिवसांपासून करीन करीन म्हणत होतो. पण मधुमेह झालेल्या लोकांकडून
रक्त घेत नाहीत असे ऐकले होते. त्यामुळे मधुमेह नसल्याचे जाहीर झाल्यावर तो आनंद
साजरा करायला रक्तदान करणे ठीक झाले असते.

कार्यालयातले अजूनही चारजण माझ्याबरोबर रक्तदानाला तयार झाले. 'दीनानाथ'मध्ये
गेलो तर ते म्हणाले की त्यांच्याकडे सध्या रक्त ठेवायला जागा नाही इतके रक्त आहे.
मग 'ससून' गाठले.

'ससून'मधल्या जुन्या इमारती आणि त्यातून हिंडणारी शिकाऊ डॉक्टर व नर्स मंडळी....
वीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवले.

'ससून'मधली रक्तपेढी खूप विचारपूर्वक लपवलेली आहे पण आम्ही ती शोधलीच. तिथे
फॉर्म वगैरे भरले. एक हाडकुळा तरुण शर्ट-जीन्स या वेषात थंडी वाजत असल्यासारखा अंग
आखडून येराझार्‍या घालत होता. फॉर्म भरल्यावर कळाले की तो तिथला रेसिडेंट डॉक्टर.
त्याने आमचे फॉर्म 'ओके' केले. पौर्णिमाचा सोडून. तिचे हिमोग्लोबीन कमी निघाले. खरे
म्हणजे ती आमच्या सगळ्यांत गब्दुल असल्याने तिच्याकडून लिटरभर तरी रक्त घेतील अशी
आमची अपेक्षा होती.

रक्तदान करून थेट 'ब्लू नाईल' गाठले. इतके सगळे सुशेगात झालेले साजरे
करायला दुसरी जागा कोणती?

तिथे कबाब नि तंदुरी चिकन हाणताना विचार डोकावला की उन्हाळा सुरू झालेला असला
तरीही एखादा किल्ला पदरात पाडून घ्यायला काय हरकत आहे? कुठला करावा? 'मंगळगड' हा
माझ्या टप्प्यात केव्हाचा होता. फक्त पायथ्यापर्यंत जायलाच तीनेक तास लागले असते.
अर्चनाने 'केंजळगड' हे नाव काढले. मग मला एकदम आठवले की आमच्या कार्यालयातला
सहाय्यक ओंकार हा केंजळगडच्या पायथ्याशी असलेल्या कोर्ले गावचा. ओंकार आयुष्यात
पहिल्यांदाच 'ब्लू नाईल'मध्ये आलेला असल्याने रवंथ करणार्‍या गायीच्या तन्मयतेने
कबाब चघळत होता. 'केंजळगड' म्हटल्यावर लगेच 'घरी जाता येईल' या विचाराने त्याचे डोळे लकाकले.

परत कार्यालयात येऊन बेत जाहीर केला. कोणकोण येणार याबद्दल चर्चा होत होत मी, पराग, त्याची
बायको ज्योती आणि मुलगा माधव, ओंकार, सचिन, पौर्णिमा, अर्चना, अर्चनाची मुलगी सई,
अर्चनाची शेजारीण सुवर्णा आणि सुवर्णाची मुलगी अमृता असे आठ फुल नि तीन हाफ जमले.
सगळे 'हाफ' तीन ते पाच वर्षांचे होते. त्यामुळे दोन चारचाकी गाड्यांत सगळे बसवता
आले असते.

खाण्याजेवणाची सोय ओंकारने करायचे पत्करले. त्याचे आई-वडील अद्याप कोर्ल्यालाच
होते.

'निघायची वेळ' हा नेहमीचा घोळ घालणारा विषय होताच. मी मारे पहाटे साडेपाच अशी
वेळ जाहीर केली, पण पौर्णिमा येते आकुर्डी प्राधिकरणातून आणि सचिन हडपसरहून.
त्यामुळे 'निघू ती वेळ आपली' या नेहमीच्या निष्कर्षाप्रत पोहोचलो. निघायला फार
नाही, फक्त साडेसहा झाले.

हवा छान होती, वाहतूक कमी होती. पण कापूरहोळला पोहोचल्यावर परागला तिथे मिसळ
खायची इच्छा झाली. तिथे ओंकारला त्याचे एक शाळेतले मास्तर भेटले आणि अमृताला एक
कुत्र्याचे पिलू दिसले. मिसळ पटकन खाऊन झाली, पण मास्तर (ते एस्टीची वाट बघत होते
आणि एस्टी येत नव्हती) आणि कुत्र्याचे पिलू (त्या बिचार्‍याला एरवी हाडुतहुडुत करून
घ्यायचेच नशिबी होते) बराच काळ पुरले. शेवटी कोर्ल्यात पोहोचेपर्यंत साडेनऊ वाजून
गेले होते. ओंकारच्या घरी येताना जाऊ असे ठरवून थेट केंजळगडाच्या दिशेने गाड्या
मारल्या. केंजळगड आणि रायरेश्वर हे अगदी लोहगड-विसापूर नसले तरी शेजारीशेजारीच
आहेत. आणि एक मातीचा रस्ता त्या दोघांच्या मधल्या खिंडीत नेऊन सोडतो. परागची
'सिटी' हळूहळू पुढे झाली. माझी जुनी झेन असल्याने मी फारच सावकाश मागोमाग गेलो.

रस्ता केंजळगडच्या बाजूने खिंडीत जातो. त्यामुळे खिंडीपर्यंत जाण्याऐवजी वाटेतच
एका वडाच्या झाडाखाली थोरली सावली बघून गाड्या लावल्या आणि पायपिटीला सुरुवात केली.
ऊन अजूनही फारसे जाणवत नव्हते. वीसेक मिनिटांतच पायथ्यापासच्या वाडीत पोहोचलो.

केंजळगड हा तसा एका कोपर्‍यातला किल्ला. आम्ही सोडता किल्ल्यावर जायला आलेले असे
कुणीच नव्हते. वाडीतली पुरुषमंडळी आपापल्या शेतीच्या वगैरे कामांना बाहेर पडली
होती. घरांत स्त्रिया, मुले आणि कुत्री तेवढी होती. मुलांनी उगाचच आरोळ्या मारल्या,
कुत्र्यांनी भुंकून कालवा केला आणि स्त्रियांनी खिडक्यांआडून डोकावून पाहिले.

किल्ल्यावर राबता असा नसल्याने मळलेली पायवाट हा प्रकार नव्हता. आम्ही आपल्या
मनानेच इकडून तिकडून चढायचा प्रयत्न करीत होतो. सोबतची तीन 'हाफ'मंडळी एव्हाना
कडेवर/पाठीवर विराजली होती. वाट अशी काही सुधरत नव्हती. शेवटी एका विशीच्या
तरुणीने खणखणीत आवाजात आरडाओरडा करून आम्हांला नीट दिशा सांगितली (त्याच खणखणीत
आवाजात तिने आम्ही कसे स्वतःची शेपूट पकडणार्‍या कुत्र्यासारखे गोलगोल फिरतो आहोत
हेही अख्ख्या वाडीला सांगितले). एव्हाना प्रसाद, ज्योती, माधव, अर्चना आणि सुवर्णा
हे वेगळ्या मार्गाला लागले होते. त्यांचा आवाज ऐकू येत होता, पण ते दिसत नव्हते.
सुवर्णाची मुलगी अमृता माझ्या पाठीवर होती. पाच वर्षांच्या मानाने पोर खूपच धीराची
होती. "काका, आपण वरपर्यंत गेलो आणि ममा सापडलीच नाही तर बाबाशी बोलायला तुमचा
सेलफोन द्याल? आणि तो 'मीटिंगमध्ये आहे' म्हणाला तर तुम्ही मला पुण्यात घरी सोडाल?"
या तिच्या प्रश्नांना मी होकार दिल्यावर तिने काही ममा-ममा भुणभूण लावली नाही. जरा
वेळानेही ती मंडळी दिसेनात तेव्हा उलट तिने माझीच समजूत घातली "काका, उगाच ओरडू
नका, तुमचाच घसा दुखेल. ममाला सवय आहे अशी न सांगता जायची. बाबाही वैतागतो
तिच्यावर".

आम्हांला जी वाट दाखवण्यात आली होती (अशी आमची समजूत झाली होती) ती 'वाट' अशी
वाटतच नव्हती. ऊन एव्हाना तापायला लागले होते. वाट मुरमाड आणि निसरडी होती. एव्हाना
आम्ही निम्म्याहून जास्त अंतर चढून आलो होतो असे खालच्या वाडीकडे बघून वाटत होते.
एका झुडुपामधून घुसारा करून ओंकार पलिकडे गेला आणि आनंदाने ओरडला. आम्ही थेट
किल्ल्याच्या भिंतीपाशी पोहोचलो होतो. प्रसाद आणि कंपनी किल्ल्याच्या पायर्‍यांवर
जाऊन बसली होती.

किल्ला छोटासाच आहे. अगदी तिकोन्याएवढा छोटा नाही, पण रोहिड्याहून लहान. वरती
अवशेष असे काही फारसे नाहीत. वीस मिनिटांत सगळ्या किल्ल्याची प्रदक्षिणा झाली. 
आता ऊन चटके द्यायला लागले होते.

उतरायला सुरुवात केली तेव्हा मध्यान्ह झाली होती.
उतरताना अगदी भडभुंजाच्या भट्टीतल्या फुटाण्यासारखी गत झाली. निसरड्या वाटेवरून
बसून उतरू म्हटले तर बूड भाजून निघण्याची भीती होती. सुवर्णा एवढ्यातेवढ्या उताराला
असल्या भयाकारी किंकाळ्या मारत होती की तिने अमृताला घेण्याची अपेक्षा करणे व्यर्थ
होते. त्यामुळे अमृताचा मुक्काम माझ्या पाठीवरच होता.

गाडीपाशी पोहोचेपर्यंत पारच घामटा निघाला. मला एकदम राजगड-तोरणा ट्रेकची आठवण
झाली.

कोर्ल्यात पोहोचून पिठले-भाकरी-भात-भाजलेल्या शेंगा या फक्कड बेतावर ताव मारताना
सेल्युलायटिस, मधुमेह असल्या रोगट शब्दांनी सुरू झालेल्या मार्च महिन्याला रक्तदान, केंजळगड अशी फक्कड सुरुवात झालेल्या एप्रिल महिन्याने चांगला शह दिला याचा आनंद दाटत राहिला.

आता मंगळगडही उन्हाळ्यातच करून टाकावा असे बेत चालू झाले आहेत.

ता. क. : फोटो काढण्यासाठी कॅमेरा नेला होता तो गाडीतच राहिल्याने फोटो निघाले नाहीत. सेलफोनवरच्या कॅमेऱ्याने काढलेले फोटो किल्ल्याचे नसून तिथे गेलेल्या व्यक्तींचे असल्याने ते देत नाही.

तसेही प्रवासवर्णन आणि पाककृती यात फोटो नसावेत असे माझे प्रामाणिक मत आहे.