स्मितांचे जीवघेणे वार करणे ठीक नाही
स्वत: जखमा, स्वत: उपचार करणे ठीक नाही
"नको ना"ला असे हळुवार करणे ठीक नाही
अनंतर सोवळी तक्रार करणे ठीक नाही
किती झाले तरी आहे नजर पुरुषीच त्याची
असे ऐन्यापुढे शृंगार करणे ठीक नाही
किती चाळा करुन चुरगाळले आहेस त्याला
पदर आहे म्हणुन बेजार करणे ठीक नाही
तुझे आयुष्य तू घुसळून बेशक काढ रत्ने
फुका माझा मध्ये मंदार करणे ठीक नाही
कशाला काळजी पडक्या मशीदी-मंदिरांची?
मनुष्याचाच जीर्णोद्धार करणे ठीक नाही?
सतत संबंध शब्दांशी नको ठेवूस, 'भृंगा'
सतत प्रतिभेसही गर्भार करणे ठीक नाही