लिहिण्यास आज आम्हा आली नवी खुमारी!

आमची प्रेरणा प्रोफ़ेसर यांची गझल जगण्यास अमृताची आली जणू खुमारी! , कुमार जावडेकरांच्या साथ या गझलेवर झालेली चर्चा आणि आमच्या गुर्जींचे फर्मास विडंबन जगण्यास का फुकाची येते अशी खुमारी?

लिहिण्यास आज आम्हा आली नवी खुमारी!
जालावरी कवींची आली नवीन स्वारी!!

थकले न ते कधीही मज काव्य पुरवताना.....
जावू दिली न मीही पुकटातली सवारी!

नाही कधीच जमल्या मज ऎसपैस गझला;
बदलीत शब्द काही करतो तरी सुमारी!

आवाज बंद झाले! काही चकीत झाले!
मी काव्यकर्तनाची घेताच ही सुपारी!!

आजन्म हिंडलो मी जालावरी मराठी ....
जेव्हा मिळेल तेव्हा मी दावतो हुशारी!

'दोघां'मधेच चर्चा रात्रीत रंगलेल्या ;
होता अलामतीचा मुद्दा तिथे विचारी!

घेऊ नये कधी ही गझलेत सूट कुठली....
वर्षानुवर्ष लागे थांबायची तयारी!

छळतोस "केशवा"का जाली सदा कवींना;
तू लाज शरम मेल्या का सोडलीस सारी !

आली गजल 'कुमारी', 'साथी'स अन दुरुस्ती
हृदयात "केशवा"च्या उसळे नवी उभारी !!

                 ...........प्रोप्रा.केशवसुमार
केशवसुमार यांचे काव्यकर्तनालय,
बर्मिंगहाम रोड, फ्रँकफुर्ट.
    फोन नंबर: ००४९१७२१०३४६११