दिसावयाला हरेक माणूस संत आहे!

दिसावयाला हरेक माणूस संत आहे!
दिलास तू हात त्यामुळे मी जिवंत आहे!!

सुपूर्त एकेक स्वप्न केले तुझ्याकडे मी;
हरेक मर्जी तुझी मलाही पसंत आहे!

चहूकडे पाहतो सडा मी तुझ्या फुलांचा....
मलाच आले न वेचता हीच खंत आहे!

न एकटा मी तुझ्या सुधेचा तहानलेला;
तुझ्या सुगंधात नाहला आसमंत आहे!

सुरात त्यांनी पुन्हा सुरू कावकाव केली....
कसे म्हणू कोकिळे तुझा हा वसंत आहे?

मला पुन्हा घ्यायची न शोभा करून माझी;
तुझा खुलासा भले जरी शोभिवंत आहे!

पुन्हा पुन्हा मी गुन्हा करावा जगावयाचा!
अखेर माणूस एक मी जातिवंत आहे!!

विचार आता मला, तुझ्या जे मनात आहे...
निवांत आहेस तू, मलाही उसंत आहे!

लहान माझ्या मुलात माझाच भास होतो!
जणू पुन्हा मीच जन्मलो मूर्तिमंत आहे!!

म्हणून हा वेदने, लळा चांगला न माझा...
चिरंजिवी तू, शरीर हे नाशिवंत आहे!

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,   
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१