गझल
हात तो कोणापुढे पसरायचा नाही!
मोडणे चालेल,पण वाकायचा नाही!!
मीच माझ्या जिंदगीला द्यायचो खांदा....
भार प्रेताचा मला वाटायचा नाही!
पार चक्काचूर झालो, हे बरे झाले!
आरसा आता तडे मोजायचा नाही!!
काळजी काटेच घेवू लागले अमुची;
मोह आम्हाला फुलांचा व्हायचा नाही!
देत आळोखेपिळोखे ती उभी आहे!
हा तिचा शृंगार तुज सोसायचा नाही!!
कौतुकाची भीक द्यावी लागते येथे;
येथला तुज कायदा समजायचा नाही!
त्यामुळे त्याचे पिणे चिंताजनक नाही!
रेचतो इतकी तरी झिंगायचा नाही!!
काय अत्याचारही चुपचाप सोसावा?
काय पापांचा घडा फोडायचा नाही!
कर कितीही गोड, घाला कात वा काही!
प्रेम नसले तर विडा रंगायचा नाही!!
बोल काहीही, लिही काही, तुझी मर्जी;
वाद कोणाशीच मी घालायचा नाही!
अर्थ त्याच्या बोलणायाचा नीट ध्यानी घे;
एवढेही तो कधी बोलायचा नाही!
निस्तरावा लागतो मज शेवटी गोंधळ
घोळ कुठलाही नवा घालायचा नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१