तेव्हां आणि आता

     "बाबा,एका शब्दाचा अर्थ हवा आहे." माझ्या मुलाचा अमेरिकेतून फोन होता.अर्थात शब्दाचा अर्थ विचारण्यासाठी त्याने फोन केला नव्हता पण फोन केल्यावर त्याला आठवल्यामुळे त्याने विचारले होते. "विचार की " मी म्हणालो अर्थात माझ्याही मराठीच्या ज्ञानावर माझ्या विस्मरणशक्तीने मात केली नसेल या आशेवर मी तसे म्हणू शकलो. " औट म्हणजे काय ? " मुलाने विचारले.इतक्या साध्या शब्दावर  तेसुद्धा अमेरिकेत सॉफ्ट वेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्याने औट व्हावे  याचे मला आश्चर्य वाटले."अरे औट म्हणजे बाद " शक्य तो स्वर फार चढू न देता मी उत्तर दिले कारण कदाचित त्याला मराठी प्रतिशब्द आठवत नसावा म्हणून व माझ्या नातवाला म्हणजे त्याच्या मुलाला मराठी शिकवताना त्याला तो हवा असेल असे मला वाटले.पण त्याने त्यावर "अहो बाबा,ते तर मला माहीतच आहे मला मराठी औट शब्द हवा आहे,म्हणजे सुमितला ,त्याच्या मुलाला,त्याच्या मराठीच्या गृहपाठात विचारला आहे." असे तो म्हणाल्यावर मात्र काही वेळ मीही डोके खाजवले,आणि एकदम आठवले,आणि मी उत्तर दिले,"अरे,आठवले औट म्हणजे साडेतीन ,आमच्या लहानपणी आम्हाला पाढे पाठ करावे लागत त्यात औटकी पण असे.
"कमाल आहे असले आडनीड पाढे कशाला शिकावे लागत ?".त्याच्या लहानपणी तीसपर्यंतच पाढे पाठ करून दमलेल्या मुलाने विचारले.
"अरे इतकेच नाही तर पावकी,निमकी,पाउणकी,सवायकी,दिडकी,अडीचकी पण पाठ करावे कागत असे.त्यात आकड्यांचे १/४,१/२.३/४,तसेच सव्वापट,दीडपट,अशा हिस्से व पटी पाठ कराव्या लागत.त्या काळात चलनात रुपया अधेली,पावली अशी नाणी व वजना मापात शेर,चिपटे मापटे,अडीश्री ,पायली अशी वजने मापे असल्यामुळे तोंडी हिशोब करायला या पाठांतराचा उपयोग व्हायचा " मी उत्तरलो. पाढ्यांचे एवढे प्रकारच नाही तर पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तोंडपाठ करण्यात मोठी बहादुरी वाटायची.त्याव्यतिरिक्त श्रीमद्भगवद्गीतेचे बरेच अध्याय निदान १२ वा आणि पंधरावा तरी आमचा पाठ असायचा आता हे पाठांतर करायला नातवंडाना सांगितले तर शाळेतच न जाण्याची धमकी ती देतील असे वाटते.मात्र दूरदर्शनवर क्रिकेटची मॅच पहायला लागताच  कोणत्या फलंदाजाने कोणाला कितीवेळा बाद केले किंवा सचिनने कोणत्या सामन्यात किती धावा केल्या याविषयीची आकडेवारी त्यांच्या तोंडून फटाफट ऐकायला मिळते.त्याना ते पाठही करावे लागत नाही. 
          काही गोष्टी आपण कधीच वापरणार नाही असे तेव्हां मला उगीचच का वाटत असायचे कुणास ठाउक.उदाः   फ्रीज आपण कधीच घेणार नाही . त्यात शक्यतेचा भाग अगदी नव्हता असे नाही पण शक्याता निर्माण झाल्यावरही  घ्यायचा नाही ही माझी पर्यावरणवादी भूमिका  अगदी  औरंगाबादला स्वत:चे घर बांधेपर्यंत बदलली नव्हती त्यामुळे फ्रीजसाठी स्वयंपाकघरात जागा सोडून वीज जोडणी घेण्याचाही   मी विचार केला नव्हता.कमीतकमी पुढे मुले या जागेतच राहिली तर त्याना तरी फ्रीज घ्यावा असे वाटेल इतका सुद्धा दूरवरचा विचार मला करावा वाटला नाही.त्यावेळी नैसर्गिक तेच  हितकारक उदा : डेऱ्यातले थंडपाणी ,असे काहीतरी तत्त्व माझ्या डोक्यात बसले असावे. पुढे या तत्त्वाप्रमाणे वागण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात आल्यावर ,अर्थात त्या माझ्या लक्षात आल्या असे म्हणण्यापेक्षा त्या सौ.ने लक्षात आणून दिल्यानंतर मला त्याच जागेत तीनदा फ्रीज घ्यावा लागला.पण इतके दिवस तिने माझ्या तत्त्वप्रणालीला विरोध कसा केला नाही समजत नाही.
    टेलिफोनच्या बाबतीतही माझे मत बरेचसे असेच होते इतकेच काय बरेच लोक त्याबाबतीत माझ्याशी सहमत होते.माझा डॉक्टर भाऊ सुद्धा उगीच लोक केव्हांही फोन करून त्रास देतात असे मत व्यक्त करून टेलिफोन नाही तेच बरे असे म्हणायचा.अशी मनोवृत्ती होण्यामागे टेलिफोन खात्याचाही बराच मोठा हात होता.अर्थात हे खाते जनतेला कोणतीही गोष्ट सहजासहजी उपलब्ध होऊन देण्याच्या शासकीय धोरणाशी सुसंगत असेच वागत होते.त्यामुळे त्यावेळी टेलिफोन हे कार असण्याइतकेच श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते. मुलगा अमेरिकेला गेला तरी माझ्याकडे टेलिफोन नव्हता.आता अमेरिकेला जाणारा माणूस तेथे जाईपर्यंत प्रवासास सुरवात करण्यापासून ते ज्या ठिकाणी प्रवासात विमान थांबत असेल त्या प्रत्येक ठिकाणी व नियत स्थानी पोचल्यावर आपल्या घरातील लोकांशी संपर्क साधू शकतो पण तेच माझा मुलगा अमेरिकेस पोचला तरी माझ्याकडे फोन व त्याच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे दोन तीन दिवस तो माझ्याशी संपर्क साधू शकला नाही.त्याने निघताना त्याच्या तेथील ऑफिसचा क्रमांक दिला होता त्यावर एस.टी. डी. केंद्रावरून  फोन लावण्याचा मी प्रयत्न केला आणि अर्धा मिनिट बोलून शेवटी त्याच्याशी संपर्क साधता आलाच नसला तरी त्या अर्ध्या मिनिटासाठी साठ सत्तर रुपये मोजून गप्प बसलो शेवटी निघाल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्या भावाच्या घरी त्याचा फोन आला व तो सुखरूप पोचल्याचे कळून जीव भांड्यात पडला.
        आता मात्र आठवड्यातून केव्हांही आम्ही दोघेही एकमेकांशी कितीही वेळा आणि कितीही वेळ बोलतो यात काही विशेष नाही  आमची मोलकरीणही आपण येत नाही हे फोन तोसुद्धा मोबाइल करून कळवते.एके काळी मोबाइल फोन म्हणजे श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते यावर कोण विश्वास ठेवील ? आश्चर्य म्हणजे भारतापेक्षा अमेरिकेत मोबाइल वर बोलणे  महाग आहे.शिवाय भारतात येणारे फोन विनाशुल्क होतात तर अमेरिकेत मात्र अजूनही येणारा कॉलसुद्धा सशुल्क असतो. काही प्रकारच्या फोनवरील संभाषण त्यामानाने स्वस्त असते व त्यावरून परदेशीही फोन करणे स्वस्त पडते हे तितकेच खरे पण आता भारतात फोन ही चैन राहिली नाही.
      त्यावेळी रेडिओ ही चीज आमच्याकडेच काय पण आख्या गावात तरी कुणाकडे होती असे वाटत नाही.फारच संगीतप्रेमी व ऐपत असेल तर फोनोग्राफ असायचा.बहुतेक आमच्या गावात असलेल्या तीन चार होटेलमध्ये मात्र हटकून असायचा त्याला सगळेच जण नुसतेच फोनो म्हणत..माझ्या वडिलांचे एक मित्र तेही जरा परिस्थितीने बऱ्यापैकी त्यामुळे त्यांच्याकडेही फोनो होता.  आम्ही रहात असलेल्या भाड्याच्याच घरासमोर एक दिलखुष होटेल होते तेथेही फोनो होता. त्यानंतर आम्ही घर बदलले या घराच्या समोरच शंकरराव नावाचा हरहुन्नरी माणूस रहात असे.कुठलीही वस्तु बिघडली की ती शंकररावाकडे दिली की ती दुरुस्त करण्याचे कौशल्य त्याच्याकडे होते.त्याच्याकडे असाच एक फोनो होता आणि तो अगदी दिवसभर त्यावर गाणी लावायचा.त्यात त्यावेळची "चारसौ बीस" "बरसात" नागिन""कठपुतळी" या सिनेमांची गाणी असत तर काही ठराविक मराठी गाणी पण असत.त्यामुळे त्यावेळी आपण मोठे झालो की असाच एक फोनो घ्यायचे आणि हव्या त्या रेकॉर्ड घेऊन मनसोक्त गाणी ऐकायचे माझे ध्येय निश्चित झाले होते.
    त्यानंतर गावातील काही घरात रेडिओचा प्रवेश झाला,आणि माझे ध्येय जरा बदलले आणि आपण रेडिओ घेऊन रेडिओ सिलोन व विविध भारती ऐकत बसायचे याविषयी मी ठाम बनलो. त्यानंतर देशपांडे आणि मी संयुक्त रेडिओ औरंगाबादला नोकरीस लागल्यावर घेतला व दोघांच्या ओढाताणीत ( संदर्भ :देशपांड्यांचा रेडिओ-मनोगत) तोच रेडिओ पूर्णांशाने माझा झाल्यावर अगदी मोठे ध्येय साफल्य झाल्यासारखे वाटले.पण थोड्याच दिवसात तो रेडिओ लहान वाटून मी मर्फीचे मोठे धूड घरात आणले.
       त्याच काळात हवे ते गाणे ऐकण्यासाठी रेकॉर्ड प्लेअर हवा म्हणून एच.एम.व्हीचाच कॅलिप्सो रेकॉर्ड प्लेअर घेतला व त्याच बरोबर बऱ्याच ७८,४५ व ३० फेऱ्यांच्या ध्वनिमुद्रिका पण घेतल्या.त्याना त्यावेळी ७८ आर.पी.एम. एलपी व ई एलपी असेच म्हणत.त्यावेळी मोठ्या हौसेने पन्डित रविशंकर,रामनारायण,निखिल बॅनर्जी,डी.व्ही.पलुस्कर यांच्या ई एल पी,तसेच बऱ्याच भावगीतांच्या,नाट्यसंगीताच्याही ध्वनिमुद्रिका घेतल्या.
           तेवढ्यात कॅसेटचा जमाना आला आणि रेकॉर्ड प्लेअर काढणे ,तो रेडिओला जोडणे,हवी ती रेकॉर्ड शोधून लावणे आणि ती संपल्यावर बदलणे इ.गोष्टींचा कंटाळा येऊ लागला. अर्थातच असा एक रेडिओ खरेदी करणे भाग पडले की त्यावर कॅसेट प्लेअरही होता.पहिल्यांदा कोऱ्या कॅसेटही महाग वाटायच्या  आणि पूर्वमुद्रित ध्वनिफिती मिळत नव्हत्या.त्या काळात काही जणानी आपल्याला नको असलेल्या फिती विकायला काढल्या व त्यावर पुन्हा हवे असलेले संगीत ध्वनिमुद्रित केले तरी चालत होते.अश्या बऱ्याच जुन्या फिती मी त्यावेळी घेतल्या.
    थोड्याच दिवसात पूर्व ध्वनिमुद्रित फिती बाजारात फारच स्वस्तात मिळू लागल्या त्या बहुधा मूळ फितींची नक्कल करून (पायरेटेड) तयार केलेल्या असत.मग तश्या अनेक फितींचा भरणा माझ्याकडे झाला. आणि कपाटातील एक कप्पा अश्या फितींनी भरून गेला तोवर सीडीचा जमाना सुरू झाला.
   संगणक प्रथम मला वापरण्याची पाळी आली ती अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रॉजेक्टसाठी.त्यावेळी अक्ख्या महाराष्ट्रात एक संगणक होता तो टाटा इन्स्टिट्युट ऑफ फन्डामेन्टल रिसर्च या संस्थेत.त्याचा आकारएवढा मोठा होता की एक आख्खा हॉल तो व्यापून टाकी. पुण्यात राहून आम्ही आमच्या प्रॉजेक्टसाठी संगणकीय भाषेत कार्ड पंच करून तो कार्डांचा गठ्ठा मुंबईस पाठवायचो.तेथील भव्य संगणकात त्यांची छाननी व्हायची व योग्य प्रकारे ती तयार झाली असली तर आमच्या समीकरणाची उत्तरे आमच्या हातात यायची नपेक्षा तो कार्डांचा गठ्ठा परत यायचा त्यातील चुकांच्या यादीसह.मग पुन्हा आम्ही ती कार्डे पन्च करून पाठवायचे.त्यावेळी प्रॉजेक्टच्या विषयापेक्षा व त्यातून मिळणाऱ्या रिझल्ट्सपेक्षा हे कार्ड पंचिंग करणे, पाठवणे ,दुरुस्त करणे हे काम हाच मोठा प्रॉजेक्ट असे.आताच्या संगणकावर जे उत्तर पाच मिनिटात मिळेल तेच उत्तर आम्हाला सहा महिन्यात मिळे व तोच आमचा प्रॉजक्ट समजण्यात येई.शिवाय त्यासाठी मुंबईच्या एक दोन वाऱ्याही कराव्या लागत.
      हळू हळू संगणकाचा आकार लहानलहान होत गेला इतका की तो आता मोबाइलच्या स्वरुपात खिश्यात बसू लागला. पण आता नव्या पिढीला मात्र त्याचे काहीच विशेष वाटत नाही.दोन तीन वर्षाची माझी नात एक दिवस मोबाइल कानाला लावून काहीतरी ऐकत होती.ती काय ऐकते हे तिच्या आईला विचारल्यावर तिने दिलेल्या उत्तराने मी अगदी चाट झालो,"अहो ती तिचेच गाणे रेकॉर्ड करून ऐकत असते."म्हणजे मला अजून मोबाइलवरून फोन करण्यासाठी कुठले बटण दाबावे च घेण्यासाठी काय करावे याचा गोंधळ उडतो थोडक्यात . आमची पिढी अश्या प्रकारे पाठांतरात वाकबगार असली तरी नव्या नव्या गोष्टींशी जुळवून घेण्याच्या बाबतीत मात्र कमी पडते हे निश्चित.तर येथे ही तीन वर्षाची पिटुकली आपलेच गाणे स्वत:च रेकॉर्ड करून ऐकत होती. उद्या बोलताही न येणारे एकादे पिटुकले मोबाइलवरून आपल्या आईला "ए आई मला दूध पाजायची वेळ झाली"असा एस.एम.एस. करून सांगते असे कळले तरी त्याचे आश्चर्य वाटायला नको.