पैसा थोडा बँका फार !

          काटकसरीचे धडे आम्हाला प्रथम परिस्थितीने दिले कारण हातात पैसाच मिळत नसल्यावर खर्च या गोष्टीवरच काट मारलेली असे.त्यानंतर पैसा थोडाफार खर्च करण्याची ऐपत आल्यावर काळ्या बाजार करणाऱ्याना भर चौकात फाशी देण्याची आरोळी ठोकून शासनाने वस्तू मिळणारच नाहीत अशी तरतूद करून टाकली.कारण काळाबाजारवाले त्यामुळे अगदी गुपचुप आम्हाला नकळत आपले व्यवहार करू लागले. त्यानंतर परिस्थिती सुधारल्यावर प्रथम पुण्यातील व्यापारी व नंतर बॅन्का यानी आम्हाला काटकसरीचे धडे द्यायला सुरवात केली.त्याकाळी पुण्यातील दुकानात पाऊल टाकल्यावर हा कशाला आलाय इथे कडमडायला असा आविर्भाव करून आमच्याकडे पाहिले जायचे. त्यात दुकानात लावलेल्या सुसंस्कृत पाट्या पहाव्यात. "उदा:"उधारीची भीड घालू नका " आणि " भीड भिकेची बहीण " त्या वाचल्याव्र  आपण चुकून एकाद्या प्राथमिक शाळेत तर आलो नाही ना असा भास व्हायचा. मग अशा निर्भीड दुकानदारांचे दुकान पाहून मी पण  अगदीच भिडस्तपणे वागत असे.आणित्यामुळे अगदी गरजेपुरतीच वस्तु कशीबशी घेऊन पळायचा विचार  करे.
      बॅंकेतील वातावरणही काटकसरीला पोषकच असे. बॅन्केत शिरतानाच माझ्या अंगावर काटा यायचा कारण सावकाराकडे कर्ज मागायला शेतकऱ्याला वाटत नसेल तितकी भीती माझ्याच खात्यातील पैसे काढायला या इमारतीच्या आत प्रवेश केल्यावर वाटू लागे.कारण बॅंकेतील कर्मचारी मी जणु बॅंकेवर दरोडा घालायलाच आलो आहे अशा मुद्रेने माझ्याकडे पहायला लागत. अर्थात त्यावेळी आमच्या पासबुकातील आकडेही फारच दैन्यवाणे असत.त्यामुळे माझ्या बाबतीत ही शक्यता त्याना वाटत असल्यास नवल नाही.त्यातील़च काही पैसे काढून ते आकडे अधिकच बापुडवाणे करायचे जिवावर येई पण तोच जीव राखण्यासाठी पैसे काढणे भाग पडे.
    पुण्याला शिकायला फर्गसन महाविद्यालयात गेल्यावर प्रथम मी बॅंकेत खाते उघडले. अर्थात बॅंकेत ठेवण्याइतके पैसे जवळ होते म्हणून नाही.डेक्कन जिमखान्यावरील महाराष्ट्र बॅंक जवळ होती हेच एकमेव कारण. महाराष्ट्र या शब्दामुळे त्या संस्थेविषयी आपुलकी कदाचित त्यावेळी असावी पण त्या बॅंकेला तशी नसावी असे वाटते.पुढे बॅंकेने महाविद्यालयाच्या आवारातच वसतीगृहाच्या पहिल्या ब्लॉकमधील एका खोलीत आपली खिडकी उघडली त्यामुळे माझे खाते तेथे आले त्यावेळी मला एक झटका बसला अर्थात त्याला बॅंकेपेक्षा माझाच बावळटपणा कारणीभूत ठरला.
     मी पैसे काढण्यासाठी पासबुक घेऊन गेलो त्यावेळी  एक पाच रुपयाची नोट कशी काय कोण जाणे त्यातच राहिली. त्या वेळी पाच रु.ही अगदी लहानसहान रक्कम नव्हती म्हणजे इतके धन जवळ असताना पैसे काढायला जाण्याचीच आवश्यकता नव्हती पण आपल्या श्रीमंतीची कल्पना नसल्यामुळे मी पैसे काढण्याची  स्लिप भरून पासबुकासह दिली आणि माझ्यापुढे काही विद्यार्थीमित्र असल्यामुळे जरा बाहेर गेलो व माझा नंबर आल्यावर एकदम मला त्या पासबुकातील नोटेची आठवण झाली.पैसे व पासबुक घेताना खिडकीवरील कारकुनास या पासबुकात माझी पाच रुपयाची नोट राहिली होती असे म्हटल्यावर त्याने मख्ख चेहऱ्याने नव्हती असे सांगितले.त्या नोटेबरोबर "अनाडी " या सिनेमाच्या जाहिरातीचे एक कार्ड पण त्या पासबुकात होते ते दाखवून "हे मात्र त्यात होते ते जपून ठेव " असे मला सांगत मी किती अनाडी होतो याची जाणीव करून दिली.
      त्यानंतर औरंगाबादला आल्यावर  केवळ नाइलाज म्हणूनच कोठल्यातरी बॅंकेत खाते उघडायचे म्हणून ज्या बॅंकेत आपल्या कोणत्यातरी सहकाऱ्याचे खाते आहे तेथे खाते उघडण्याचा विचार केला आणि त्या सहकाऱ्याचे खाते नेमके महाराष्ट्र बॅंकेतच होते.त्यावेळी महाराष्ट्र बॅंकेची औरंगाबादमधील एकुलती एक शाखा (आमची इतरत्र कोठेही शाखा नाही) अगदी गैरसोयीच्या ठिकाणी होती तरी मी त्याच बॅंकेत खाते उघडले. त्यावेळी औरंगाबादेत सेन्ट्रल,देना व दोन सहकारी म्हणजे जनता सहकारी व सांगली कोऑपरेटिव्ह (तीही पुढे डुबली) याच बॅंका होत्या.स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद असल्यामुळे  भारतीय स्टेट बैंकही नव्हती.
     महाराष्ट्र बॅंक गैरसोयीच्या ठिकाणी असल्यामुळे नंतर औरंगाबाद जिल्हा सहकारी बॅकेची शाखा अगदी घरासमोर उघडल्यावर मी तेथेही खाते उघडले. अश्या रीतीने पैश्याचा फारसा पत्ता नसताना माझी दोन बॅंकांमध्ये खाती झाली. त्याच वेळी इंदिराजींनी बॅंकांचे राष्ट्रीयिकरण केल्यावर महाराष्ट्र बॅंकेलाही आपला व्यवसाय वाढवावासा वाटून औरंगाबाद जिल्हा सहकारी बॅंकेपासून अर्धा  किलोमीटर अंतरावरच त्यानी आपली शाखा उघडली,त्याबरोबर मी माझे गावातील त्या बॅंकेचे खाते तेथे स्थलांतरित करून घेतले.या बॅंकेने मात्र आतापर्यंतची माझी बॅंकेविषयीची भीती बरीच कमी केली कारण नवीनच शाखाधिकारी झालेले श्रीयुत मुळे तरुण होते व कधी नव्हे ते लोकमंगल या आपल्या बॅंकेशी संबंधित असलेले ब्रीदवाक्य त्याना पटलेले दिसले त्यामुळे आम्ही चांगले मित्रही झालो.त्यानंतर आमच्या कुटुंबाच्या परिचयाचा एक तरुण देशपांडे नावाचा, त्याच शाखेत काम करू लागला व बरेच वेळा तो पैसे काढण्याच्या खिडकीत असे व माझे काम लवकर होत असे.
     थोड्याच दिवसात माझी सोलापूरला बदली झाली म्हणून जाताना काही पैशांची जरुरी असल्याने मी बॅंकेत गेलो.तोवर माझे पासबुक पूर्ण भरले होते व त्यात नोंदी करण्यास जागा नव्हती हे मी मुळे यांच्या निदर्शनास आणून नवे पासबुक देण्याची विनंती केली होती. पण अजून त्याना वेळ मिळाला नव्हता त्यामुळे माझी शिल्लक किती हे कळत नव्हते.तसे मी खिडकीवरील देशपांडेला सांगितल्यावर "तुम्हाला आत्ता किती पैसे पाहिजेत तेवढे काढा, मग पासबुक तयार करून ठेवतो "असे तो  म्हणाला व माझ्या विथड्रॉल स्लिपवर सही करून ती रोखपालाकडे त्याने पाठवली व मी हवी तेवढी रक्कम घेऊन घरी आलो.सोलापूरला जायचे असल्याने मी खाते बंदच करणार होतो पण त्यात वेळ गेला असता म्हणून मी शिल्लक असेल तेवढी रक्कम अंदाजाने काढली होती.
   मी सोलापूरला गेलो तो जून महिना होता.त्यानंतर ते वर्षही संपले आणि मार्चमध्ये एकदम मुळे सोलापूरला माझ्या दारात उभे.मी आश्चर्यचकित झालो .त्याना आत बोलावून "वा वा अलभ्य लाभ तुम्ही येथे कसे ?"असे मी विचारले पण ते अश्या अवांतर गप्पांच्या मनस्थितीत नव्हते,"अहो जरा घोटाळा झाला आहे म्हणून आलो आहे.तुम्ही शेवटचे पैसे बॅंकेतून काढले त्यावेळी ५०० रु.जास्त काढले आहेत. तेवढी शिल्लक तुमया खात्यात नव्हती. प्लीज ते आत्ताच्या आत्ता परत करा म्हणजे मला निघता येईल" त्यावेळी ५०० रु.ही रक्कम बरीच मोठी वाटत असे त्यामुळे तेवढी रक्कम घरात नव्हतीच आणि सोलापूरच्या बॅंकेतील माझ्या खात्यातही होती की नाही शंकाच होती, त्यामुळे,"सॉरी मुळेसाहेब,तेवढी रक्कम तर आत्ता माझ्याकडे नाही.आणि मी शेवटचे पैसे काढताना   पासबुक संपल्यामुळे  माझ्या खात्यातील शिलकीची कल्पना  मला नव्हती हे तुमच्या निदर्शनास आणले होते म्हणजे बॅंकेला फसवण्याचा माझा हेतू नव्हता हे तर तुम्ही जाणताच " असे म्हणून माझी असमर्थता मी व्यक्त केली. मुळ्यांची परिस्थिती दगडाखाली हात सापडलेल्या माणसासारखी झाली असल्याने ते त्यानी मान्य केले व शक्यतो लवकर पैसे पाठवून द्यायला सांगून निघून गेले.
  त्यानंतर बॅंकेकडून मला पत्र आले व त्यात ताबडतोब रक्कम भरण्याची विनंती करण्यात आली होती.कधी नव्हे ती बॅंक माझ्या तावडीत सापडल्याने मी त्या पत्रास मी कोणत्या परिस्थितीत पैसे काढले होते हे कळवून एवढी रक्कम एकदम भरणे शक्य नाही असे कळवले.आणि दरमहा १०० रु.अश्या हप्त्याने ते पैसे भरण्यास परवानगी द्यावी असेही सुचवले.माझ्या औरंगाबादमधील भावाला देशपांडेही एक दोनदा भेटला आणि "अण्णाला ( माझ्या भावाप्रमाणे तोही मला अण्णाच म्हणे) लवकर पैसे भरायला सांग अशी त्याने विनवणी केली तेव्हां त्याला उगीच त्रास व्हायला नको म्हणून माझ्या सांगण्यावरून माझ्या भावानेच ते पैसे बॅंकेत भरले व मी त्याला ते नंतर पाठवले.
  महाराष्ट्र बॅंकेला मी असा धडा शिकवल्यामुळी ती कधीतरी मला धडा शिकवणार असा अंदाज होता तो पुढे खरा ठरला. सोलापूरहून माझी पुन्हा औरंगाबादला बदली झाल्यावर मात्र मी पुन्हा महाराष्ट्र बॅंकेच्या नादाला लागायचे नाही असे तर ठरवले होतेच.शिवाय पुन्हा खाते उघडताना सोलापुरात पॉलिटेक्निकच्या जवळ असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेत माझे खाते असल्याने तेच औरंगाबादला स्थलांतरित करणे मला सोयिस्कर वाटले..त्यामुळे आपोआपच महाबॅंकेचा सासुरवास टळला ,पण त्या काळात अनेक बॅंकांमध्ये माझी खाती काही कारणाने उघडली गेली.युनायटेड बॅंक कॉलेजच्या जवळ म्हणून,देवगिरी बॅंक अगदी घराच्या दारात असल्याने व आमच्या गृहनिर्माण संस्थेचे खाते तेथे असल्याने शेवटी तर स्टेट बॅंक ऑफ हैदराबादचा कौंटर आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उघडला व त्यातच शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार जमा होऊ लागल्यामुळे अशी एकूण चार बॅंकांमध्ये माझी खाती झाली. त्यात भरीस भर म्हणजे आय.सी.आय.सी.आय. बॅंकेने नुकतीच औरंगाबादमध्ये शाखा उघडली.
    त्या बॅंकेचे कर्मचारी अगदी घरी येऊन खाते उघडण्यास मदत करीत. त्यावेळी पाचव्या वेतन आयोगानुसार पगाराच्या थकबाकीची बरीच रक्कम सर्वांनाच मिळाली. ती या नव्या बॅंकेत ठेवणे त्यांच्या ऑटोस्वीप योजनेमुळे फायदेशीर होते.म्हणून मी त्याही बॅंकेत माझे पाचवे खाते उघडले.  या खात्याचा आणखी एक फायदा म्हणजे माझ्या पुण्याला नोकरी करणाऱ्या मुलाला वाहन घेण्यास किंवा फ्लॅटचे बुकिंग करण्यास बरीच रक्कम लागे व तो नुकताच नोकरीस लागल्यामुळे मलाच ती पाठवण्याची आवश्यकता असे.इतर कोणत्याही बॅंकेचा धनादेश किंवा डी.डी.मोठ्या रकमेचा असल्यास जबरदस्त कमिशन पडे मात्र आय.सी.आय.सी आय.बॅंकेचे संगणकीकरण झाल्याने त्याच्याच  खात्यात व्यवहार करायचे झाल्यास रक्कम पाठवणे कुठलीही वटणावळ न देता शक्य होत असे.शिवाय ए.टी.एम. कार्डमुळे पैसे काढायला बॅंकेत जाऊन रांगेमध्ये उभे रहावे लागत नसे.
       सेवानिवृत्तीनंतर या पाच खात्यातील स्टेट बॅंक ऑफ हैदराबादचे खातेच काय ते आपोआप बंद झाले पण बाकी खाती माझ्या आळशीपणामुळे व काही सोयींमुळे तशीच चालू राहिली.इतकेच काय सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतन घेण्यासाठी राष्ट्रीयिकृत बॅंक आणि घराच्या जवळची हवी म्हणून त्यावेळी नुकतीच महाराष्ट्र बॅंकेची शाखा त्या भागात उघडली म्हणून तेथे व माझे एक मित्र शेळके यानी "लोकविकास सहकारी बॅंक " आमच्या घराजवळच उघडली त्यांच्या आग्रहाने त्याही बॅंकेत अशी परत सहा बॅंकांमधे माझी खाती झाली.म्हणजे "रात्र थोडी सोंगे फार"मध्ये बदल करून "पैसा थोडा बॅंका फार "अशी माझी परिस्थिती झाली.
   सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र बॅंकेत  निवृत्तिवेतन खाते उघडावे या उद्देशाने चौकशी करू जाता माझ्या सुदैवाने  त्या शाखेत त्यावेळी ती सोय उपलब्ध नव्हती असे कळले.सुदैवाने म्हणण्याचे कारण पुढे ती बॅंक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जी वागणुक देते ती पहायला व ऐकायला मिळाली त्यावेळी आपण तेथे खाते उघडू शकलो नाही हे आपले महाभाग्य असे वाटून गेले. त्यांच्या कडक शिस्तीचा अनुभवही मला लगेचच आला.चेकबुक सेवा घेणाऱ्यांसाठी खात्यात कमीतक्मी १००० रु.शिल्लक असण्याचा बॅंकेचा नियम.माझ्या खात्यात तेवढी शिल्लक ठेवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करे पण एकदा चेक देताना ही बाब लक्षात न ठेवल्याने अगदी थोड्या काळापुरती खात्यातील शिल्लाक रु.१०००/-च्या खाली गेली व पुढील वेळी पैसे काढताना काहीतरी दहा पंधरा रु.माझ्या खात्यातून वसूल केलेले दिसले मी विचारणा केल्यावर "तुमच्या खात्यातील शिल्लक कमी झाल्यामुळे" असे उत्तर मॅनेजरस्त्रीने दिले.ती आमच्या कुटुंबाची परिचित होती त्यामुळे मी "असे चुकून झाले व प्रथमच झाले" असे म्हणून पाहिले पण तिचा हेका काही तिने सोडला नाही.प्रश्न दहा रु.चा नसून मला तो अपमान झाल्यासारखे वाटले.शिवाय मॅनेजरच्या अखत्यारीतली ती गोष्ट होती. पण चूक माझीच होती त्यामुळे मी गप्प बसलो.
    त्यानंतर एकदा मी चेकबुक वापरून पैसे काढू लागलो तर तेथील कर्मचारी स्त्रीने "अहो तुम्ही चेकने पैसे काढले तर प्रत्येक चेकमागे तीन (की दोन असेच काहीतरी) रु.पडतात असे सांगायला सुरवात केली आता मात्र मी आवाज चढवला व माझी आणखी पाच बॅंकांमध्ये खाती आहेत पण कोणत्याच बॅंकेत असा नियम नाही असे सांगायला सुरवात केली आणि तरीही ती हेका सोडत नाही म्हटल्यावर मी तिला "मग असे करा माझ्या खात्यात किती शिल्लक आहे तेवढे सांगा म्हणजे तेवढ्या रकमेचा हा चेक करून माझे खातेच बंद करतो " असे म्हटल्यावर आमचा संवाद ऐकणारा पुरुष शाखाधिकारी (यावेळी स्त्री अधिकारी नव्हती) पुढे आला "तसे काही नाही तुम्हाला जेवढी रक्कम काढायची तेवढीच काढा, चेकने काढल्यामुळे काही ज्यादा आकार पडणार नाही " असे त्याने म्हटल्यामुळे मी त्यावेळी त्याचे ऐकले पण थोड्याच दिवसात माझे त्या बॅंकेतील खाते बंद करून टाकले.अश्या प्रकारे मला खाते बंद करण्यास भाग पाडण्यात महाबँक यशस्वी ठरली.
      महाबॅंकेचा आणखी एक अनुभव आला तो अमेरिकेला जाताना व्हिसासाठी लागणाऱ्या डी.डी. काढण्याच्या वेळी.व्हिसाची फी त्यावेळी कोठल्याही राष्ट्रीयिकृत बॅंकेच्या धनादेशात चालत असे.त्यावेळी ( वा आताही)आम्ही पुण्यात होतो व माझे जनसेवा सहकारी बॅंकेत खाते होते.तेथील डी.डी. चालणार नव्हता आणि महाराष्ट्र बॅंकही जवळ होती म्हणून तेथे चौकशी करण्यास गेलो.त्यावेळी मी मला डी.डी. हवा म्हणून सांगितल्यावर गंभीर चेहरा करून तेथील कर्मचाऱ्याने मला विचारले,"तुमचे आमच्या बॅंकेत खाते आहे का?" मी नाही म्हटल्यावर त्याने सांगितले,"मग तुम्हाला शंभर रु.कमिशन पडेल" "आणि खाते असेल तर ?""तर मग पन्नास रु." हे त्याचे उत्तर ऐकून मी  तडक बाहेर पडलो व जरा दूर असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेकडून धनादेश तयार करून घेतले तेथे त्यानी माझे खाते आहे का याची चौकशीही केली नाही.
     महाबॅंकेत नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या माझ्या मित्रास माझा अनुभव सांगितल्यावर ते म्हणाले,"अहो अशीच आहे आमची बॅंक.मी आता तेथूनच सेवानिवृत्त झालो म्हणून तेथली एक मुदतठेव घेतली आहे ती रिन्यू करायला दिली.करून ठेवतो असे मला सांगण्यात आले आणि आता परत गेलो तर म्हणतात त्या ठेवीची मी दिलेली पावतीच हरवली,आता काय बोलायचे?" दुसऱ्या एका मित्राने महाबॅंकेच्या ए.टी.एम.कार्डचा वापर पुणे विद्यापीठाजवळील ए.टी.एम.यंत्रावर केला तर पैसे काढल्याची स्लिप बाहेर आली पण पैश्यांचा पत्ताच नाही.मशीनमधील पैसे कधी कधी संपतात त्यावेळी पैसे मिळत नाहीत पण तरीही ते वजा होण्याचा हा अनुभव एकमात्र असावा. त्याने नंतर बॅंकेला फोन केल्यावर त्यानी"तुमच्या खात्यातून तुम्ही रक्कम काढलीच आहे" असाच शेरा मारला शेवटी तो स्वत: त्या शाखेत गेला पण आपल्याला पैसे मिळाले नाहीत हे तो सिद्ध करू न शकल्यामुळे त्याला त्यावर पाणीच सोडावे लागले.
       महाबॅंकेत चुकूनही जायचे नाही असा कानाला खडा लावलेला असला तरीही कधी तो मोह झालाच तरी मी तसे करू नये याबाबत ही बॅंक फारच दक्ष असते.अलीकडेच एके दिवशी सकाळ पेपरात "महाबॅंकेची महाबचत योजना ,ठेवीवर दहा टक्के व्याज ’असे छापून आले.त्याच वेळी आय डी.बी आय.बॅंकेचीही तशी योजना जाहीर झाली होती.माझ्या दृष्टीने दोन्ही बॅंका सारख्याच अंतरावर होत्या फक्त महाबॅंक रस्त्याच्या मी रहातो त्या बाजूस होती तर आय.डी.बी.आय.रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस होती.आमच्या सिंहगड रस्त्यावर वाहन चालक रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुतर्फा वाहने चालवतातच पण तेवढेही कमी नाही म्हणून पदपथावरूनही दुचाकी वाहने चालवतात व त्याना हटकल्यावर आम्हालाच "सायकल पथ" असे  लिहिलेले दाखवतात. त्यांची दुचाकी ही सायकल नाही हे समजावून सांगण्यात अर्थ नसतो.त्यांच्या तडाक्यात सापडण्यापेक्षा महाबॅंकेच्या तडाक्यात सापडायला हरकत नाही असे वाटून मी महाबॅंकेत शिरलो तर तेथे माझ्यासारखे बरेच ज्येष्ठ नागरिक गर्दी करून राहिलेत असे दिसले पण बॅंकेला मात्र आपण अश्या प्रकारचे निवेदन दिले आहे याचाही पत्ता नसावा अशी आतील परिस्थिती दिसली म्हणून मी रस्ता ओलांडण्याचे धाडस करून पलीकडेच असलेल्या आय.डी.बी.आय.बंकेत गेलो तेथील स्वागतिकेने लगेच मला बसवून घेऊन योग्य ते अर्जाचे नमुने माझ्याकडून भरून घेऊन मला दहा पंधरा मिनिटात मोकळे केले. परत जाताना महाबॅंकेत डोकावलो तेव्हां तेथील कोंडाळे अजून तसेच आहे असे दिसले.
    महाबॅंक असलेल्या किवा होऊ इच्छिणाऱ्या  खातेदारांचा असा उघड उघड छळ करते तर आय सी.आय.सी.आय.सारख्या बॅंक जरा छुप्या मार्गाने  अश्या गोष्टी करतात.याचा अनुभव मला एकदा अमेरिकेस जाताना आला.माझ्या सौ.चा एक विम्याचा हप्ता भरायचा होता त्याचा आय.सी.आय.सी.आय.बॅंकेचा धनादेश तिच्या भाच्याकडे देऊन आम्ही अमेरिकेस गेलो.ठरलेल्या तारखेस त्याने तो धनादेश भरला व तसा मेलही आम्हास पाठवला.नंतर पंधरा दिवसांनी त्याचा पुन्हा मेल आला की तो धनादेश बाउन्स झाला आहे. बॅंकेत शिल्लक ठेवण्याची दक्षता आम्ही घेतली होती तरीही असे झाले हे पाहून आश्चर्य वाटले.पण शेवटी दुसरी काहीतरी व्यवस्था करून हप्ता भरला.
  अमेरिकेतून आल्यावर बॅंकेचे स्टेटमेंट पाहिल्यावर मला आणखीनच संताप झाला कारण माझ्या खात्यात योग्य तेवढी शिल्लक असून बॅंकेने तो चेक नापास केला होता आणि त्याबद्दल उलट मला १५० रु.दंड आकारला होता. बॅंकेस फोन करून विचारले की खात्यात शिल्लक असताना असे कसे झाले.त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले.ते खाते सौ.चे होते व ते मूलत: डेमॅटसाठी उघडलेले होते म्हणून त्यानी उत्तर दिले की जी शिल्लक तुमच्या खात्यात होती त्यातील दहा हजार रु.काही शेअर्स वगैरे खरेदी करण्यासाठी राखून ठेवले होते त्यामुळे तुमची उपलब्ध शिल्लक तो चेक मंजूर करण्यास पुरेशी नव्हती.त्यावर मी त्यांची चांगलीच हजेरी घेतली व ती रक्कम राखून ठेवण्याच्या सूचना खातेदाराकडून नसताना हा निर्णय तुम्हाला कोणी घ्यावयास सांगितला असे विचारले या प्रश्नास त्यांच्याकडे उत्तर नव्हते.चेक बाउन्स झाल्यामुळे माझे झालेले नुकसान तर भरून निघणे शक्य नव्हते तरी हा दंड आकारण्याचा आगाउपणा जो केला होता तो त्यानी सुधारला नाही तर मी खातेच बंद करेन असा दम दिल्यावर त्यानी ती रक्कम पुन्हा माझ्या खात्यात जमा केली.
      थोडक्यात बॅंकांचे  वाईट अनुभव येण्यास फार पैसाच जवळ असावा लागतो असे  नाही.किंवा पैसे वाल्यांना  चांगलेच अनुभव  येत असतील. ते त्यानी बँका डुबवल्यावरच आम्हाला कळतात आणि आमच्या वाईट अनुभवात आणखी एक भर पडते.