हा भ्रमर अती अज्ञानी - पाहुणा असे उद्यानी

हा भ्रमर अती अज्ञानी
पाहुणा असे उद्यानी
परी कलिकांचे स्मित मुळीच तो ना जाणी ।ध्रु।

कधि उडून जाई, वा भिरभिरे कधी तो;
परि मनोगुपित ना खोले
कधि समोर येई, दृष्टिस दृष्टी देई,
मुख बघे, न काही बोले ।१।
हा भ्रमर अती अज्ञानी  ...

संकोचुन डोळे जपून जपुनी जाई
परकाच जसा की काही
राही मनात परि, ना भेटे भेटुनही
तो अज्ञात असा राही ।२।
हा भ्रमर अती अज्ञानी ...

थांबवून त्याला, त्याला काही पुसता
गुणगुणत निघूनी जाई
ना विचारीतसे, कळे न त्याला काही
वाटतो अडाणी बाई ।३।
हा भ्रमर अती अज्ञानी ...

टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चालः   भाषांतराची चाल मूळ गाण्याप्रमाणे नाही. भाषांतराचे वृत्त :

ध्रुवपदाच्या पहिल्या दोन ओळी : गा गागागागा गागा (उद्धव)
ध्रुवपदाची तिसरी ओळ : गा गागागागा गागागागा गागा (भूपती)
कडव्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या ओळी : गा गागागागा गागागागा गागा (भूपती)
कडव्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या ओळी : गा गागागागा गागा (उद्धव)

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक कुठलेही जमवलेत तरी चालेल  (कडव्याच्या ओळी आणि ध्रुवपदाच्या ओळी यामध्ये यमक जुळलेले नाही. यमकाची जागा ठळक केलेली आहेच.