गझल
वृत्त: ?
लगावली: गागाल/लगागागा/गागाल/लगागागा
****************************************
आहेच मला माझ्या, अभिमान नकारांचा!
भोगून अरे, झाला अभिशाप रुकारांचा!!
होतील तुझे कावे येथून पुढे निष्प्रभ!
अंदाज तुझ्या आला साऱ्याच प्रकारांचा!!
आयुष्य असे आले वाट्यास अरे, माझ्या;
केलाच अखेरी मी स्वीकार विकारांचा!
मी कोण? कसा आहे? ठाऊक मला आहे!
अदमास मला आहे फाजील टुकारांचा!
चुकलेच जरा माझे, माणूस समजताना.....
पदरात उगा केला सांभाळ चुकारांचा!
विरतात हवेवर त्या वरचेवर डरकाळ्या!
परिणाम कधी होतो का वांझ डकारांचा?
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१