दैवस्पर्श

   ज परत एकदा अंकित झोपेतून दचकून जागा झाला. आजसुद्धा तेच स्वप्न,  प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना, सगळं अगदी कालच्या सारखंच. हताश होऊन त्यानं घड्याळात पाहिलं. लहान काटा चारच्या आसपास होता.
गेल्या कित्येक दिवसांपासून हेच सुरू होतं. अनेक रात्री ते गूढ, कोड्यात टाकणारं स्वप्न. सुरुवातीला त्यानं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण आता हे सगळं सहन करण्यापलीकडे चाललं होतं. ह्या विचित्र अनुभवामुळे अंकितचा जीव प्रचंड हैराण झाला होता. ह्यामागे नक्की काय कारण आहे हे शोधल्याशिवाय त्याच्या जीवाला चैन पडणार  नव्हती.
ऑफिस मधील कामे, घरच्या जबाबदाऱ्या, यांच्यामुळे थोडा मानसिक ताण होता त्याच्या मनावर. त्याला वाटलं त्याचाच परिणाम म्हणून हे स्वप्न पडतंय. पण मग हे असले विचित्र स्वप्न का पडावे ? रोज तेच स्वप्न ?
कशाचाच संबंध जुळत नव्हता. भूत, प्रेत, पुनर्जन्म; असल्या गोष्टींवर अंकितचा कधीच विश्वास नव्हता आणि त्यावर विश्वास ठेवायची त्याची तयारीही नव्हती.
ही गोष्ट कोणाच्यातरी निदर्शनास आणून त्या व्यक्तीची मदत घेणं आता गरजेचं झालं होतं. आपण पूर्णपणे हतबल आहोत ह्याची जाणीव झाल्यावर अखेरीस त्यानं ह्या बाबतीत सचिनचा सल्ला घ्यायचं ठरवलं.
सचिन एक मानसोपचार तज्ज्ञ होता, आणि अंकितचा बालपणापासूनचा मित्र सुद्धा.
"बोला अंकित सर, काय म्हणताय..आज माझ्या क्लिनिक मध्ये कशी वाट चुकली ?" अंकितला क्लिनिक च्या दरवाज्यात बघून सचिन आश्चर्यानं म्हणाला.
"आलो सहज, म्हटलं तुझी गाठ घ्यावी.." हे ऐकताना सचिनने अंकितच्या चेहऱ्यावरची निराशा योग्यपणे टिपली.
"मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्यामुळे माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्नसुद्धा करून नकोस. नक्की सहज आला आहेस की काही गडबड ? चेहरा सांगतोय तुझा.. बोल काय अडचण आहे .. " सचिनने त्याच्या पद्धतीनं सुरुवात केली.
खरंतर असं बोलायची सचिनची सवयच होती. समोरचा अगदी मोकळेपणाने हसत बोलत असेल, तरी असलं काहीतरी विचारून त्याच्या मनातलं काढून घ्यायचं हे स्किल सचिनला चांगलंच अवगत होतं.
"मी जरा अडचणीत आहे रे.. सगळं सांगतो तुला. फक्त मी तुझ्या क्लिनिकमध्ये मध्ये आलो होतो आणि आपल्यात काही बोलणं झालं ते प्लीज बाहेर कळू देऊ नकोस." मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणे म्हणजे आपण वेडेच आहोत  किंवा मानसिकदृष्ट्या आजारी आहोत असा काहीतरी विचित्र समज अंकितने करून घेतला होता.
"एका मित्राला सांगतोयस, बिनधास्त बोल.. " सचिननं त्याला बोलायला वाट मोकळी करून दिली.
"गेले काही दिवस मला एक विचित्र गूढ स्वप्न पडतंय. जवळपास महिना झाला असेल. रोज तेच स्वप्न. सगळं अगदी हुबेहूब.."
"काय दिसतं स्वप्नात ?" सचिनला उत्सुकता निर्माण झाली.
"आमच्या घरासमोर उंबराचे झाड आहे आठवतंय तुला ? रोज तेच झाड दिसतं. त्याचं वेगळंच रूप बघायला मिळत स्वप्नामध्ये.
त्याच्या फांद्या विचित्र पद्धतीनं हालत असतात. त्याची पानं एकाएकी कोमेजून जातात आणि गळून पडतात. झाडाला लागलेल्या असंख्य उंबरांचा अंगणामध्ये जणू काही पाऊसच सुरू होतो. बहारदार, मजबूत वटवृक्षाचे रूपांतर  क्षणार्धात एका जीर्ण, जीव नसलेल्या झाडात होतं. त्याची मुळे जमिनीच्या बाहेर आलेली दिसतात. त्या मुळांना वाळवी लागलेली असते. त्याचं संपूर्ण खोड त्या पांढऱ्या किड्यांनी पोखरून काढलं आहे.
त्याची जीर्ण अवस्था पाहता तो कधीही खाली कोसळू शकतो असं वाटतं. ह्या सगळ्या प्रकारामुळे त्याला होणाऱ्या वेदना मला जाणवतात. एखादी जिवंत पेटलेली व्यक्ती ज्याप्रमाणे सैरावैरा धावत सुटेल, अगदी तशीच अवस्था झालेली वाटते त्याची. तो अक्षरशः किंचाळत असतो आणि त्या किंचाळ्या फक्त माझ्याच कानावर पडतात" अंकित बोलू लागला.
"अगदी हेच सगळं मी रोज रात्री स्वप्नामध्ये बघतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या औदुंबराकडे प्रत्यक्ष बघतो. त्याची मुळे खरंच जमिनीच्या बाहेर आली आहेत का ते तपासतो. मात्र अस्तित्वात ते झाड एकदम मजबूत आहे. त्याचा बुंधा अगदी भक्कम आहे. संपूर्ण वृक्ष उंबराच्या फळांनी बहरला आहे. खूप उंच वाढलाय. हिरव्यागार पानांनी त्याचं खोड झाकलं गेलंय. स्वप्नात तो औदुंबर जसा दिसतो, त्याचा प्रत्यक्षात काहीच संबंध वाटत नाही." अंकितचं बोलणं आता संपत आलेलं. सचिनच्या प्रतिसादाची तो वाट पाहत होता.
सचिन इतका वेळ शांतपणे ऐकत होता. अंकित सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावरची व्याकुळता सचिननं पहिली होती.
"हम्म .. मला समजतंय.. पण आताच्या क्षणाला मी फार काही सांगू शकत नाही. हे स्वप्न नक्की का पडतंय ते शोधण्यासाठी आपल्या दोघांना थोडा वेळ द्यायला लागेल.
तू मगाशी बोलताना वाळवीच्या किड्यांचा उल्लेख केला होतास. माझ्या माहितीनुसार वाळवीचे किडे लाकडाला आतून पोखरून संपवून टाकतात. बाहेरून दिसायला मात्र ते लाकूड अगदी पाहिल्यासारखंच दिसतं." सचिन म्हणाला.
"हो. अनेक जुन्या बांधकामामध्ये जिथे लाकूड आहे, तिथे हा वाळवीचा प्रश्न गंभीर आहे. आमच्या घराच्या तुळईला सुद्धा वाळवी लागली आहे. पण आम्ही नियमित औषध मारतो. त्यामुळे ते अगदी कंट्रोलमध्ये आहे" अंकितने पूरक उत्तर दिले.
अंकितच्या ह्या वाक्यावरून सचिनला काहीतरी सुचलं.
"बरं आता आपण थांबूयात, बराच उशीर झाला आहे. उद्या सकाळी चहाला येतो घरी. काकूंना सांग." सचिननं अंकितच्या घरी जायचा एक बहाणा काढला.
क्लिनिक मधला रिसेप्शनिस्ट कधीच निघून गेला होता. क्लिनिकला कुलूप लावून दोघांनी आपापल्या घरचा रस्ता धरला.
क्रमशः: