दैवस्पर्श - भाग तिसरा

दुवा क्र. १ इथून पुढे सुरू.
~*~
     पेस्ट कंट्रोल एजन्सी कडून प्रवीण कांबळे नावाचा इसम घराची परिस्थिती पाहायला आला. अंकितने त्याला खालच्या खोलीतल्या तुळया दाखवल्या. त्या तुळयांना जोडून असणारे वासे सुद्धा दाखवले.
प्रवीण अगदी बारीक लक्ष देऊन पाहणी करायला लागला. त्यानं प्रत्येक लाकडावर हाताच्या बोटांनी वाजवून पाहिलं. लाकडातून येणारा तो आवाज कानाला फारसा चांगला वाटत नव्हता. लाकूड आतून खूप पोकळ झाल्याचा तो इशारा होता.
"सर, ही लाकडं खूपंच खराब झाली आहेत, ह्याला बरंच काम करायला लागेल" प्रवीण म्हणाला.
चिंतातुर झालेल्या अंकितने एक हुंकार देऊन प्रतिसाद दिला. खालची खोली पाहून झाल्यावर तो प्रवीणला वरच्या खोलीत घेऊन गेला. वरच्या खोलीत भिंतीमध्ये वाळवी लागली होती. प्रवीणने सगळं पाहून एकंदर परिस्थिती लक्षात घेतली आणि ह्यावर काय काय काम करायला लागेल ह्याचं स्पष्टीकरण तो देऊ लागला.
"हे बघा सर, काम खूप आहे. वाळवीनं सगळी लाकडं पार पोखरून काढली आहेत. भिंतीमध्येसुद्धा बऱ्याच खोलवर वाळवी पोचली आहे. आपल्याला इंजेक्शन थेरपी करायला लागेल. तुळया, वासे आणि भिंतींना छिद्र पाडून त्यात मोठ्या प्रमाणावर औषध सोडायला लागेल. उद्या मी अजून एका माणसाला मदतीला घेऊन येतो. सकाळी नऊ वाजता चालेल? सामान वगैरे जरा आधीच बाजूला काढून ठेवा, म्हणजे काम लवकर संपेल."
इतकं सगळं सांगताना आपण ह्यापेक्षा भयानक वाळवीला कश्या प्रकारे औषध मारून संपवलं आहे आणि बाहेर आपली किती ख्याती आहे हे सांगायचं प्रवीण विसरला नाही.
अंकितने त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. ह्या सर्व कामाला होकार देण्याखेरीज त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता.

दुसऱ्या दिवशी प्रवीण त्याचा पंप आणि इतर साहित्य घेऊन आला. त्यानं सोबतीला एकजण आणला होता. तो आपला लहान भाऊ - सुनील असल्याचं त्यानं अंकितला सांगितलं.
प्रवीणने कामाला सुरुवात केली. तुळयांच्या ज्या भागात वाळवी लागली आहे, तिथे तो स्क्रू-ड्रायव्हर मारून छिद्रे पाडू लागला. काही ठिकाणी संपूर्ण स्क्रू-ड्रायव्हर लाकडाच्या पूर्णपणे आत जात होता. तुळईची रुंदी स्क्रू-ड्रायव्हर पेक्षा एखाद दोन सेंटिमीटरनेच जास्ती होती; आणि अशा जीर्ण तुळईवर संपूर्ण वरची खोली उभी होती.
हे पाहून प्रवीण फारच अवाक झाला.
"सर तुमचं घर कसं काय टिकून राहिलंय अजून, ह्याचंच आश्चर्य वाटतंय. वाळवीनं तुळया इतक्या पोखरल्या आहेत की आतापर्यंत वरची खोली खाली यायला हवी होती. हे घर अजून उभं आहे ह्यावर विश्वास बसत नाही. सगळी स्वामींचीच कृपा ! " असं म्हणून त्या जीर्ण तुळईच्या खालीच असणाऱ्या, भिंतीवर चिकटवलेल्या स्वामींच्या फोटोला त्यानं नमस्कार केला.
अंकित हे सगळं बघत होता. लाकडाचे वासे आणि तुळया ह्यांची झालेली परिस्थिती त्याला दिसत होती. आश्चर्य आणि त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त भीती त्याच्या मनावर स्वार झाली होती.
खोलीत दिसणाऱ्या सगळ्या लाकडावर असंख्य लहानमोठी छिद्रे पाडण्यात आली. त्यात इंजेक्शनची सिरींज वापरून औषध सोडण्यात आलं. स्प्रे-पंप वापरून उरलेल्या सगळ्या भागावर औषध फवारण्यात आलं. वरच्या खोलीत भिंतींवर हीच प्रक्रिया करण्यात आली. फवारणी झाल्यावर दोन्ही खोल्यांना कड्या लावून तिघे बाहेर आले.
पंपामध्ये अजूनही काही औषध शिल्लक राहिलं होतं.
"जा रे हे औषध तिथे जिन्याखाली मारून ये. तिथलं सामान मध्ये येत असेल तर बाजूला करून त्याच्याखाली पण औषध मार" प्रवीण सुनीलला म्हणाला.
जिन्याखालची जागा म्हणजे घरातल्या जुन्या, नादुरुस्त किंवा टाकाऊ वस्तू ठेवायची जागा होती. पंप घेऊन सुनील औषध मारायला आत गेला.
प्रवीण आणि अंकित बाहेरच थांबून हिशोबाचे बोलू लागले. खर्चात काही तडजोड होतीये का म्हणून अंकित प्रयत्न करत होता. पण घराची एकंदर स्थिती बघून अंकितने विषय जास्ती ताणला नाही.
काही वेळानं उरलेलं औषध संपवून सुनील बाहेर आला. तो जरासा गोंधळला होता. "सर हे बघा जिन्याखाली काय सापडलं" असं म्हणून त्यानं दत्ताची एक सुंदर मूर्ती अंकितच्या हातात ठेवली. मूर्ती वेगळ्या वेगळ्या धातूंनी बनली होती. तिच्याकडे बघून ती खूपच जुनी असल्याचं वाटत होतं. अंकितला आपल्या घरात असणाऱ्या ह्या मूर्तीबद्दल काहीच कल्पना नव्हती. आईच्या तोंडून कधी ह्या मूर्तीबद्दल ऐकल्याचं त्याला आठवत नव्हतं. अंकितने ती मूर्ती स्वत:कडे ठेवून घेत सुनीलचे आभार मानले.

प्रवीण आणि सुनीलने त्यांचं कम संपवलं होतं. त्यांची आवारावर सुरु झाली.
"मला सांग, इतक्या मोठ्या प्रमाणात वाळवी लागायचं कारण काय असू शकेल ?" अंकितने तेव्हड्यात विचारलं.
"वाळवी भिंतीमधून आली आहे सर. भिंतीमध्ये नक्कीच जमिनीतून आली असणार." - प्रवीणने स्पष्टीकरण दिलं.
"हो पण जमिनीच्या आत वाळवी कशी आली असेल ?" अंकितने उत्सुकतेपोटी विचारलं.
"तशी बरीच कारणं असतात. जसं की, घराच्या आजूबाजूला एखाद्या झाडाला वाळवी लागली असेल तर त्याच्या मुळांमधून किंवा पानांच्या मार्फत ती घरात येऊ शकते "
इतकं बोलून प्रवीण आणि सुनील चालते झाले.
प्रवीणचं शेवटचं विधान अंकितला चक्रावून टाकणारं होतं.
घराला लागलेली प्रचंड वाळवी; त्याच्यामुळे कामातून गेलेल्या लाकडाच्या तुळया; तरीसुद्धा टिकून उभं असणारं आपलं घर; अचानक सापडलेली दत्ताची अतिशय जुनी धातूची मूर्ती; समोरच असणारं औदुंबराचं झाड; वाळवी का लागू शकते ह्याचं  प्रवीणने सांगितलेलं स्पष्टीकरण; ... ह्या सगळ्या गोष्टी अंकितच्या डोक्यामध्ये फिरत होत्या.
जे स्वप्न आपल्याला पडतंय त्यात सुद्धा औदुंबराच्या मुळाला वाळवी लागलेली असते. त्याला होणाऱ्या वेदनांनी तो किंचाळत असतो. त्याची जीर्ण अवस्था पाहता तो कधीही खाली कोसळू शकतो असं वाटत असतं. तरीपण त्या वेदना सहन करत तो उभा असतो.
अंकित स्वप्नातील गोष्टी प्रयत्नपूर्वक आठवायला लागला. आपल्या स्वप्नात येणाऱ्या ह्या गोष्टींचा आपल्या आयुष्याशी आणि खास करून आज घडलेल्या घटनांशी कुठे ना कुठेतरी संबंध आहे हे आता अंकितला समजलं होतं.
दिवसभर विचार करून अंकित हैराण झाला. गोष्ट आता आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे जात आहे हे त्याला समजलं होतं. त्याने सचिनचा नंबर डायल केला.

क्रमश: