दैवस्पर्श - भाग दुसरा

दुवा क्र. १ इथून पुढे सुरू .. 
~*~
"आई सचिन आलाय" अंकितने असं म्हणून थेट जिन्याची वाट धरली. सचिनने जाता जाता आईला नमस्कार केला. आज बऱ्याच दिवसांनी सचिनला पाहून आईला सुद्धा आनंद झाला. आईबरोबर काही गप्पा मारून सचिनने जिन्यांवर पाय टाकला.
लाकडाच्या त्या जीर्ण पायऱ्या कडकड वाजत होत्या. काही फळ्या दोन तुकड्यात विभाजित झाल्या होत्या. सचिन अगदी सावधपणेच चढला. वर आल्यावर इतक्या वर्षात घरात दिसत असलेले बदल तो न्याहाळत होता.
तितक्यात आईनं चहा न्यायला खालच्या खोलीतून हाक मारली. अंकित खाली जाऊन चहा घेऊन वर आला. चहाचा घोट घेताना दोघांमध्ये काही औपचारिक गप्पा झाल्या. मुख्य विषयाच्या चर्चेमध्ये कोणत्याच प्रकारचा व्यत्यय येणार नाही ही खात्री झाल्यावर सचिनने विषयाला हात घातला.
"अंकित ते समोर दिसतंय तेच ते औदुंबराचे झाड का ?" खिडकीतून बाहेर बोट दाखवत सचिनने अंकितला विचारलं.
औदुंबर खूप बहरला होता. त्यावर उंबराचे घड लागले होते. त्याच्याकडे बघून तो आजारी आहे असं अजिबात वाटत नव्हतं.
 सचिनने त्या झाडाबद्दल अधिक खोलात विचारपूस केली.
अंकित भावनिक होऊन सांगू लागला.
"हा औदुंबर साधारण वीस एक वर्ष जुना असेल. मी लहान असताना ह्यानं स्वतःचे पाय इथल्या मातीत रोवले. बघता बघता हा माझ्यापेक्षा मोठा झाला. औदुंबर म्हणजे दत्ताचं देवस्थान असं म्हणून भरपूर लोकांची श्रद्धा मिळवली ह्यानं. वाड्यातले आणि वाड्या बाहेरचे सुद्धा बरेच लोक यायचे, पूजा करायचे, देवाचं उरलेलं पाणी घालायचे, फुलं वाहायचे... "
 इथपर्यंत सांगताना अंकित खूप उत्साहात वाटत होता. पण एकाएकी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो पुढे सांगू लागला.
"आणि एक दिवस... एक दिवस ह्याच बहरलेल्या झाडाला एक प्रकारच्या अळ्या लागल्या. काळ्या रंगाच्या. सुरवंट असतो ना ? अगदी त्यासारख्या. त्याची सगळी पानं त्यांनी कुरतडून टाकली. बहरलेला औदुंबर अगदी खिळखिळा झाला. त्याचा आणि त्या किड्यांचा सर्वांना त्रास होऊ लागला. अळ्या घरात शिरायला लागल्या. जे लोक त्याची पूजा करायचे, आज तेच लोक त्याला कापून टाकू म्हणायला लागले. ते दत्ताचं देवस्थान असल्यानं त्याला असं थेट कापता येणार नाही असं कोणीतरी म्हटलं. म्हणून मग पूजा घातली गेली. ती लवकरात लवकरात उरकून सगळे त्याच्यावर तुटून पडले. कोयता आणि कुऱ्हाडीचे घाव घातले त्याच्यावर... नाही टिकू शकला त्या मारापुढे तो... त्याचं ते उरलेलं शरीर तुकडे तुकडे होऊन खाली पडलं. काही तासांमध्ये त्याच्या खेळ खलास झाला. मनाला खूप हुरहूर झाली रे. ज्याची पूजा केली, ज्याला दैवत मानलं, त्याला असं निष्ठुरपणे मारून टाकलं ?"
सगळं बोलत असताना अंकितच्या अंगावर एक रोमांच उभा राहिला. औदुंबराबद्दल सांगत असताना तो त्यात पूर्णपणे गुंतून गेला होता.
"अंकित, अरे इतका भावनिक का झालायस ? त्या झाडाचा, त्या किड्यांचा सर्वांना त्रास होत होता म्हणून सर्वांनी ते झाड कापायचं ठरवलं ना ? त्यात इतकं गुरफटून जायचं काय कारण आहे ?" सचिनला त्या झाडाबद्दल जे घडलंय त्यामध्ये काहीच रस नव्हता. अंकित त्या झाडात इतका का गुंतला गेला आहे ते त्याला माहीत करून घ्यायचं होतं.
सचिनच्या ह्या प्रश्नानंतर खोलीत दोन मिनिटं शांतता पसरली. अंकित काहीतरी सांगायची मनामध्ये तयारी करत होता.
"गुरफटून जायचं कारण आहे सचिन. ह्या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी मी स्वतः:ला अपराधी मानतो. त्याचं कारण हे आहे की त्याला कापायच्या आधी जी पूजा करण्यात आली, त्या पूजेसाठी मी स्वतः: बसलो होतो." आवंढा गिळून अंकित पुटपुटला.
"मी ऐकतोय बोलत राहा " संभाषणाच्या चावीचा पीळ घट्ट राहील ह्याची काळजी घेत सचिन हळू आवाजात बोलला.
"लोक त्याला देव समजत असतील.. पण मी ? ३-४ वर्षांनी लहान असेल तो माझ्यापेक्षा.. मी तर त्याला माझा जवळचा मित्र मानायचो..जसा तू आहेस ना अगदी तसाच.. कधी कधी गप्पा मारायचो त्याच्याशी.. ज्या गोष्टी कोणाला सांगता येत नाहीत, किंवा ज्या गोष्टींवर मला उपाय सापडत नाहीत, ते मी त्याला सांगायचो.."
अंकितचे हे बोलणं ऐकून सचिनला अजून उत्सुकता निर्माण झाली. काही गोष्टी त्याच्या लक्षात येऊ लागल्या होत्या.
" 'सांगायचो' म्हणजे ? आज आहे की तो परत एकदा उभा तुझ्यासमोर.. आज नाही त्याच्याशी गप्पा मारत ? आज नाही सांगत त्याला मनातल्या गोष्टी ?" - सचिन
"सांगतो ना ! आजपण सांगतो .. पण त्या दिवसापासून स्वतःला अपराधी मानत आलोय मी. मी केलेल्या कृत्याबद्दल रोज हात जोडून त्याची माफी मागतो. आणि मगच मी त्याच्याशी गप्पा मारतो."
'गप्पा मारतो' ह्या संज्ञेचा अर्थ सचिनला नीट समजत नव्हता. तो मानसोपचार तज्ज्ञ असल्या कारणानं त्यानं ही लक्षणं एका विशिष्ट मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये पहिली होती. त्या आजारात निर्जीव वस्तू किंवा प्राणी पक्षी आपल्याशी बोलत आहेत असा रुग्णाला भास होतो. अंकित कदाचित त्याच आजाराचा रुग्ण आहे की काय अशी भीती सचिनला वाटून गेली. त्यामुळे तो मुका वृक्ष अंकितला नक्की कसा प्रतिसाद देतो ते सचिनला काढून घ्यायचं होतं.
"तू तुझ्या मनातल्या गोष्टी त्याला सांगितल्यावर तो काय प्रतिसाद देतो रे तुला ? तो वृक्ष तुझ्याशी माणसासारखा बोलतो की काय ?" सचिनने थोडं स्पष्टपणे विचारलं. अंकितला हा प्रश्न बहुतेक अपेक्षित होता.
"मी एखादी छान किंवा आनंदाची गोष्ट त्याला सांगितली की तो त्याची पानं हालवतो, वाऱ्याच्या तालावर अक्षरशः: डोलतो. त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारे पक्षी एकदम सूर लावतात. एखादी दुःखद किंवा मला टोचत असलेली गोष्ट सांगितल्यावर मात्र तो शांत असतो. ना त्याची पानं हालतात ना फांद्या. पक्षी कुठे गायब होतात काय माहीत.." - अंकितने स्पष्ट केलं.
हे ऐकल्यावर सचिनने एक सुस्कारा सोडला. हे सगळे अंकितच्या मनाचे खेळ आहेत किंवा त्याच्या कल्पना आहेत हे त्याला समजलं. अंकितच्या बोलण्यावरून त्याला दिसणाऱ्या गोष्टींना तो गोंडस रूप द्यायचा प्रयत्न करतोय हे स्पष्ट झालेलं. त्याला मानसिक आजार वगैरे काही नव्हता हे सचिनला स्पष्ट झालं.
अंकितच्या मनात त्या उंबराच्या झाडाविषयी इतक्या भावना आहेत, त्यावरून ते झाड त्याच्या स्वप्नात येणं हे सचिनला खूप आश्चर्यकारक वाटत नव्हतं. पण अंकितला गेले अनेक दिवस स्वनामध्ये जे दिसतंय त्याचा, आणि आज मिळवलेल्या माहितीचा फारसा संबंध लागत नव्हता. रोज तेच स्वप्न - 'उंबराच्या झाडाला वाळवीचे किडे पोखरून काढत आहेत. त्याच्या वेदना तो वृक्ष ओरडून सांगतोय' -  असल्या स्वप्नाचा अंकिताच्या जीवनाशी नक्की काय संबंध असेल ते काही केल्या सचिनला उमगत नव्हतं. त्याला सचिनच्या जीवनाबद्दल बद्दल अजून थोडी माहिती मिळणं गरजेचं वाटत होत. त्याच्याशिवाय काही अनुमान लावणं मुश्कीलच होतं.
आजच्या दिवसासाठी इतकी माहिती खूप होती. चर्चा सुरू होऊन दोन तास उलटून गेले होते. अंकितसुद्धा खूप डिस्टर्ब वाटत होता.
"बरं अंकित, आत्ता काही निष्कर्ष काढायची घाई मला करायची नाहीये. आज आपण इथे थांबूयात. मी २-३ दिवसांनी परत येतो. ते वाळवीचं काम मात्र उद्याच्या उद्या करून घे. टेक इट ऑन हाय प्रायोरिटी ! मला असं वाटतंय की ह्या भिंतींना पण वाळवी लागली आहे. उगाच उशीर करून रिस्क घेऊ नकोस. तातडीनं पेस्ट कंट्रोल करून घे घरात." इतकं बोलून सचिनने अंकितचा निरोप घेतला.

काही वेळानं अंकितने मोबाईल वरून पेस्ट कंट्रोल वाल्या माणसाचा नंबर डायल केला.
-क्रमशः