दैवस्पर्श - भाग चौथा

अंकित चा फोन आल्यावर दुसऱ्याच दिवशी सचिन घरी आला. काल घडलेलं सगळं नाट्य अंकितने त्याला सांगितलं. 
"त्या मूर्तीविषयी आईला किंवा इतर कोणाला विचारलंस का ? काही माहिती मिळाली ? " चहाचा शेवटचा घोट घेत सचिनने प्रश्न केला.
"हो, मी आईला विचारलं मूर्तीबद्दल. काल बराच वेळ आम्ही मूर्तीबद्दलच गप्पा मारत बसलो होतो. त्या कारणानिमित्त मलासुद्धा बऱ्याच  माहीत नसलेल्या गोष्टी समजल्या " अंकित सांगू लागला.
"आईला त्या मूर्तीबद्दल थोडीफार माहिती आहे. तिच्या लग्नाच्या आधीपासून ती मूर्ती घरामध्ये आहे. मास्तरांना, म्हणजे आमच्या आजोबांना कोणीतरी ती भेट म्हणून दिली होती. पूर्वी मूर्ती आमच्या देवघरातच असायची. तिची रोज रीतसर पूजा व्हायची. पण मध्येच ती मूर्ती घरातून गायब झाली. कुठे गायब झाली, किंवा कोणी चोरली त्याबद्दल कोणालाच काही कळू शकलं नाही."
"अच्छा.. असं आहे तर  .. मग पुढे ? " सचिनने अंकित ला श्वास घ्यायला वेळ दिला.
"आमच्या घराशेजारी ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आधी आमच्या घरासारखंच लाकडी बांधकाम असलेलं एक घर होतं.  तिथे वाळिंबे बंधू राहायचे. बरेच म्हातारे होते. धाकटे वाळिंबे आजोबा बरेच आधी गेले. थोरल्या आजोबांना मी पाहिलंय.  ते साधारण वीस बावीस वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या पश्चात घराकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हतं. तीन चार वर्षातच घराची अवस्था इतकी वाईट झाली की ते कधीही कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली ! महानगरपालिकेतर्फे 'धोकादायक' घरांमध्ये त्याची गणना झाली आणि पालिकेने ते बांधकाम उतरवून टाकलं. ह्या गोष्टीला सुद्धा आता पंधरा एक वर्ष झाली असतील बघ."
"त्या उतरवलेल्या बांधकामाच्या राड्या-रोड्यात आईला ही मूर्ती सापडली ! " -अंकित इतकं बोलून सचिनच्या रिप्लाय ची वाट पाहू लागला.
"हम्म...  म्हणजे ती मूर्ती तुमच्या घरातून गायब झाली, त्यानंतर ती वाळिंबे यांच्या घरी गेली. मूर्ती तुमच्या घरातून त्यांच्या घरी जाण्यामागे काय कारण होतं ते आपल्याला माहीत नाही. म्हणजे, तशी बरीच कारणं असू शकतात.. पण मला त्या कारणांपेक्षा वेगळ्याच गोष्टीबद्दल आश्चर्य वाटतंय ! सुस्थितीत असणारं वाळिंब्यांचं घर त्यांच्या निधनानंतर केवळ तीन चार वर्षात इतकं कमजोर व्हावं की ते पडायला यावं ? ...ही गोष्ट खटकतीये बघ मनाला." सचिन अजून बोलणार आहे ते अंकित ला ठाऊक होतं, सचिन कसला तरी विचार करतोय ते त्याला समजलं. पुढे साधारण मिनिटभर खोलीत शांतता होती.
"बरं मला सांग, वाळिंबे यांच्या घरालासुद्धा वाळवी लागली होती का रे ?  तुला काही कल्पना ?" - सचिनचा हा प्रश्न अंकितच्या मनात विचारचक्र सुरू करणारा ठरला.
खरंतर ह्याबद्दल अंकित ला फारशी माहिती नव्हती. पण सचिन जे म्हणतोय त्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. वाळवीने ते घर इतकं पोखरून काढलं म्हणूनच त्याची इतक्या लवकर इतकी दुरवस्था झाली असावी असं अंकितला सुद्धा वाटून गेलं. अंकितच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून सचिन काय समजायचं ते समजला.
"ती मूर्ती त्या राड्या-रोड्यात  सापडल्यावर पुढे त्या मूर्तीचं काय झालं ? तुमच्या घराच्या जिन्याखाली धूळखात कशी काय पडली  ?" सचिनने विचारलं.
"आई म्हणाली की मूर्ती जेव्हा सापडली, तेव्हा ती खूप खराब झाली होती. म्हणून मग मूर्ती  देव्हाऱ्यात न ठेवता त्या वेळेस तिनी फक्त पुसून डब्यांच्या मागे ठेवून दिली. नंतर फारसं काही लक्ष दिलं गेलं नाही. अनेक दिवस सरले, मूर्तीचा आईला विसर पडला; आणि अखेर...काल ती मूर्ती आम्हाला जिन्याखाली सापडली " अंकितने बोलणं पूर्ण केलं.
अंकितच्या ह्या बोलण्यानंतर थोड्यावेळ शांतता होती
"असं झालंय तर एकंदरीत .. " सचिन विचार करत म्हणाला.
अंकित ला सचिनच्या चेहऱ्यावर एक चमक दिसत होती. सचिनला काहीतरी समजलं आहे ते अंकितच्या लक्षात आलं.
"काही समजलंय का तुला सचिन ? मला पडणारी स्वप्न ..  त्या मूर्तीचं इतिहास.. घराला लागलेली वाळवी .. ह्या सगळ्या घटनांमागे नक्की काय असू शकेल ?"अंकितने खूप अधीरतेने सचिनला विचारलं.
सचिनला अंकित ची उत्सुकता आणि त्यामागची कारणं जाणून घ्यायची जिद्द समजत होती.
"मला जितपत ह्या गोष्टीचा अर्थ उमगला आहे, तो मी तुला सविस्तर सांगेन.. पण त्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर दे .. काल तू घरामध्ये वाळवी साठी पेस्ट कंट्रोल करून घेतलंस. त्या दरम्यानच तुला ती दत्ताची मूर्ती सापडली. तू त्या मूर्तीला अगदी साफ करून, अगदी जपून ठेवलं आहेस.
अंकित मला सांग, काल रात्री तुला स्वप्न पडलं का रे ? दिसलं का तुला ते उंबराचे झाड ? ऐकू आल्या त्याच्या किंकाळ्या ?" - मानसशास्त्रामध्ये असलेला अभ्यास आणि सगळे अनुभव वापरून सचिन निष्कर्ष काढण्याच्या मार्गावर होता.
ह्या प्रश्नानंतर अंकितने एक मिनिट विचार केला. त्याला लक्षात आलं की काल आपल्याला स्वप्न पडलंच नाही. बऱ्याच दिवसांनी आपल्याला खूप शांत झोप लागली.
अंकितने स्वप्न न पडल्याची कबुली दिली. त्यावर सचिनच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
"ओके अंकित सर, तुम्हाला होणाऱ्या त्रासापासून तुमची सुटका तुम्ही स्वत:च करून घेतली आहे ! आपण एक काम करू, शुक्रवारी संध्याकाळी माझ्या क्लिनिकमध्ये भेटूयात. अजून चार दिवस आहेत. तुला ते विचित्र स्वप्न पडण्यामागे काय कारण आहे ते तेव्हाच सांगतो ! जर का ह्या चार रात्रीमध्ये ते स्वप्न पुन्हा पाहिलंस, तर लगेच मला कळव ! .. चाल आता निघतो मी " इतकं बोलून सचिनने निरोप घेतला.
शुक्रवारी संध्याकाळी अंकित अतिशय उत्साहाने सचिनला भेटायला निघाला. गेल्या चार दिवसात दोघांमध्ये एकही फोन झाला नाही 
क्रमश: