नाटाचे अभंग...१४

१३. आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तिमारग हळूचि धरा ।
 काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा दचकसी ना ॥१॥
 नाहीं त्या यमासी करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा ।
 ओढाळ सांपडे जैसें धान्या (धन्या) । चोर यातना धरिजे तो ॥धृ॥
 नाहीं दिले पावईल कैसा । चालतां पंथें तेणें वळसा ।
 नसेल ठाउकें ऐक तो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥३॥
 क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं ।
 ओढिती कांटवणा सोई । अग्निस्तंभ बाहीं कवटाळिती ॥४॥
 देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती ।
 लागे ठाव ना न चलवे बुडविती । वरी मारिती यमदंड ॥५॥
 तहानभूक न सहावे वेळ । तो राखिती किती एक काळ ।
 पिंड पाळूनि कैसा शीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥६॥
 म्हणऊनि करा कांहीं सायास । व्हावेल तरी व्हारे उदास ।
 करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका म्हणे ॥७॥

      मनुष्य योनी प्राप्त होऊन जो जीव या संसारात आलेला आहे, त्याला जागे करून, त्याला त्याचे आत्यंतिक कल्याण साध्या सोप्या मार्गाने साधता यावे, यासाठी तुकोबाराय या अभंगाद्वारे अत्यंत कळकळीने उपदेश करीत आहेत. मनुष्य म्हणून संसाराला आलेला जीव, मग तो स्वेच्छेने (संत या वर्गात येतात) वा परेच्छेने (भगवंत जो पीडलेल्या जीवांनी केलेल्या धाव्यापोटी अवतार घेतो) वा अनिच्छेने (सामान्य जीव या वर्गात येतात), कसाही आलेला असो, तो आपले आत्यंतिक कल्याण अथवा कैवल्य प्राप्त करून घेण्याचा अधिकारी आहे. संसाराला आलेला जीव हा जाणारच असतो. परंतु कर्मबंधनात अडकलेला असल्याने त्याला पुन्हा पुन्हा जन्म घेणे क्रमप्राप्त असते. अशा जीवाला त्याचा योग्य तो ठावठिकाणा प्राप्त व्हावा, ही तुकोबारायांची मनीषा आहे. मिळालेला मनुष्यजन्म बेफिकीरपणे (अघोरपणे) जगून आयुष्य वाया घालवू नये, यासाठी काही उपदेश करण्याचा तुकोबारायांचा मनोदय येथे दिसून येत आहे. अभंगात तुकोबारायांनी वर्णन केलेल्या यमयातना कदाचित् अविश्वसनीय वाटतीलही, परंतु हे लक्षात घ्यावे लागते की, अनाचारामुळे माणसाला शारीरिक-मानसिक अनेक छोट्या-मोठ्या व्याधी व त्यातून भोगाव्या लागणार्‍या यातना प्रत्यक्षतः याच जन्मी अल्पकाळ वा दीर्घकाळ सहन कराव्या लागतात. हे मनुष्याच्या लिंगदेहाचे एक प्रकारे शुद्धीकरण आहे, असे म्हणता येते. या शुद्धीकरणाचा साधा सोपा मार्ग तुकोबाराय या अभंगातून सांगत आहेत.
     अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबारायांनी संसारात आलेल्या मनुष्याला वस्तुस्थिती सांगत एक किंचित् प्रश्न केला आहे. सुखाच्या मागे लागणे, हा जीवाचा स्थायी भाव आहे. तथापि, जे सुख त्याला हवे असते, ते अशाश्वत आहे, हे तो विसरतो. क्षणिक सुखाच्या लालसेने तो रोजच्या जीवनात विवेकाने विचार न करता जी कर्मे आचरतो, त्यात त्याला त्या कर्मांचा परिपाक काय आहे, याचा विसर पडतो किवा त्याबद्दल तो अनभिज्ञ असतो. पुढील गतीबद्दल जो मनुष्य बेफिकीर असतो. त्याला तुकोबाराय येथे ‘अघोरा’ (घोर म्हणजे चिंता नसलेला, निष्काळजी राहणारा) म्हणून संबोधित आहेत. ‘क्रिया तेथे प्रतिक्रिया’ या न्यायाने त्याच्या प्रत्येक कर्माचा झाडा त्याला द्यावयाचा असतो. सामान्यतः मनुष्याने केलेली कर्मे ही स्वार्थमूलक, दुसर्‍यावर कमी-जास्त अन्याय करणारी असल्याने, अधर्माचा अवलंब करून केलेली असतात. त्यामुळे त्या कर्मांची फेड करताना त्याला देहयातना भोगाव्याच लागतात. या यातना काळदंडाचे तडाखे बसल्याने तसेच नरकवास लाभल्याने होणार्‍या असतात. (‘अवश्यमेव भोक्तव्यं कृतकर्म शुभाशुभम्’ असे आद्यशंकराचार्य सांगतात.) जन्माला आलेल्या जीवावर काळाची सत्ता असते, हे ‘काळदंड’ या शब्दाने सांगितले आहे, तर ‘कुंभीपाक’ या शब्दाने नरकवासाची तुकोबाराय आठवण करून देत आहेत. ‘असे असूनही तुला भीती कशी वाटत नाही’ (का दचकसी ना), असा स्वाभाविक प्रश्न ते करीत आहेत. अशा या यातना या जन्मीच भोगावयाच्या असतात किंवा पुन्हा कुठल्या तरी योनीत जन्म घेऊन उतराई करून घ्यायची असते. यातून मुक्त होण्यासाठी तुकोबाराय येथे सुचवीत आहेत की, जन्म-मृत्युच्या चक्रात अडकलेल्या जीवाला या यातना क्रमप्राप्त असल्याने त्यातून सुटण्यासाठी त्याने एकच काम करावे आणि ते म्हणजे मुक्तीचा मार्ग ‘हळूच’ धरायचा. इथे ‘हळूच’ या शब्दाने तुकोबारायांना सुचवायचे आहे की, सावध राहून, काळजीपूर्वकरित्या हे काम करावे. नुकत्याच जन्मलेल्या पिलाला मांजर दातात धरून ज्या पद्धतीने एका जागेवरून दुसर्‍या सुरक्षित जागी नेत असते, तो भाव इथे अध्याहृत आहे.
     अभंगाच्या धृपदात प्रधान विचार तुकोबाराय मांडतात. जीवाच्या कर्मफलाचा सारासार विवेक करून त्याबद्दल प्रायश्चित्त रूपाने कर्माचरण करून घेणारा जो शास्ता असतो, त्याला ‘यम’ या नावाने शास्त्रात संबोधिले जाते. हा यम ईश्वराने नेमून दिलेला असल्याने, ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून जीवाला, जीवाच्या हितासाठीच आवश्यकतेनुसार शासन देत असतो. त्याचे एकमेव अद्वितीय लक्षण म्हणजे तो संपूर्णत: करुणारहित आहे. त्याचा करुणेशी काहीही संबंध नाही. जीवाची निष्ठुरपणे कर्मातून शुद्धी करून घेणे, हे यमाचे कर्तव्य ठरवून दिलेले आहे. श्रीमद् भागवताच्या पाचव्या स्कंधातील सव्वीसाव्या अध्यायात नरकांचे आणि कोणत्या कर्माचा परिणाम म्हणून कोणत्या नरकात कुठल्या प्रकारे यातना जीवास भोगाव्या लागतात, याचे सविस्तर वर्णन वाचावयास मिळते. हजारो प्रकारचे नरक असून जीवाला संपू न देता, त्याचे कसे हाल केले जातात, हे तेथे सांगितलेले आहे. कर्मे काही अंशी सारखी दिसत असली तरी कर्ता सात्त्विक, राजस, तामस असा त्रिविध असल्यामुळे त्याची श्रद्धा निरनिराळी असते. सात्त्विक श्रद्धेपोटी केलेल्या कर्मांमुळे कर्त्याला सुख प्राप्त होते. राजस श्रद्धेने सुख-दुःखांकित संमिश्र फलप्राप्ती होते तर तामस श्रद्धेमुळे दुःख व मूढपणा वाट्यास येतो. श्रुति-स्मृतींनी निषेध केलेल्या धर्माला अनुसरून प्रामुख्याने जो आचरण करतो, त्याची श्रद्धा विचित्र असते. त्यामुळे त्याच्या कर्माची फळेही विचित्र व तीव्र असतात. म्हणूनच ‘परधर्मो भयावहः’ असे वचन आहे. अनादी अविद्येच्या योगाने इच्छा केलेल्या अधर्माच्या फलरूपात हजारो प्रकारच्या नरकयातना जीवाला भोगाव्या लागतात. मृत्युपूर्व याच देहाने आणि मृत्युनंतर लिंगदेहाने या यातनांचा सामना करावा लागतो, असे भागवत सांगते. आपले कर्तव्य निभावताना यम कशाप्रकारे निष्ठुर होत असतो, त्याची सर्वांना परिचित अशी दोन उदाहरणे तुकोबाराय देतात. एखादे ओढाळ जनावर उभ्या पिकात जाऊन पिकाची नासाडी करताना धन्याच्या तावडीत सापडल्यानंतर जसे तडाखे खाते किंवा चोराला पकडल्यानंतर तो ज्या यातना भोगतो, त्याप्रमाणे यम कुठल्याही प्रकारे दयामाया न दाखविता प्राण कुडीतून बाहेर खेचून काढतो व यातनाकेंद्रावर (नरकात) घेऊन जातो. त्यामुळे कुडी सोडताना जीवाची असीम कासाविशी होत असते. येथे असेही म्हणता येते की, जीव जाणता-अजाणता शास्त्र-नियमांकडे डोळेझाक करून जी कृत्ये आचरितो, ती एकप्रकारे चोरकर्मेच ठरणारी आहेत. त्या चौर्यासाठी त्याला शासन करणे, हे धन्याचे म्हणजेच यमाचे कार्य आहे.
     आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते, ‘मी असे काय पाप केलेय् की मला हे क्लेष भोगावे लागावेत्?’ याविषयी तुकोबाराय लक्षणात्मक विधान करतात की, ‘काही दिले नाही, तर मिळणारही नाही’. पेरले तेच उगवते हा एक भाग तर जिथे धूर तिथे अग्नी असणारच हा दुसरा भाग. आद्य शंकराचार्य सांगतात, ‘ना दत्तं उपतिष्ठति।’ पेरलेच नाही तर उगवणार नाही आणि उगवले आहे, ते पेरले आहे. यातना आहेत म्हणजे निःसंशय तसे कर्म घडलेले आहे. जीव कर्माने बांधला गेलेला आहे आणि कर्म करणे व त्याचे भोग भोगणे हा जीवनक्रम (- पंथ) ठरून गेलेला आहे. कर्म तिथे वासना आणि वासना हे अनंत जन्माचे बीज आहे, असे शास्त्राचे सांगणे आहे. एकूण काय तर, जन्म घेणे, कर्म करणे, भोग भोगणे, यातनांना सामोरे जाणे, मरणे, पुन्हा जन्म घेणे, हे जीवनचक्र (- वळसा) चालूच राहते. संसारात आला तो जीव बंदिवान् होतो, असे इथे तुकोबाराय सांगतात. बेफिकीरपणे आयुष्य कंठणार्‍या भ्रमित माणसांना तुकोबाराय आठव देतात की, ‘तुला माहित नसेल तर (- तो) मी सांगतो, ऐक; जबरदस्तीने जीवाच्या कुडीतील प्राण काढून घेतल्यानंतर, घोर अपराध केलेल्या एखाद्याला बंदी म्हणून जसे नेले जाते, त्याप्रमाणे यमदूत घेऊन जात असतात, लक्षात ठेव’.
       कुडीतून बाहेर काढलेला लिंगदेह कसा नेला जातो, हे सांगताना सौम्य शब्दात कान उघाडणी करतात व पुढे तुकोबाराय आठव देतात की, ‘काहीही असो, आयुष्यात अनवाणी पायांनी चालणे तुला नकोसे वाटत होते. यमदूत तुला जेव्हा त्या नरकाच्या मार्गाने (- सोईं) फरपटत घेऊन जातील, तेव्हा मात्र काट्यांच्या वनातून तुला चालावेच लागेल. त्यावेळी किती यातना होतील, त्याची जरा कल्पना कर’. आहार, निद्रा आणि मैथुन यांचा यथेच्छ उपभोग अज्ञानी जीवांना अतिसुखावह वाटत असतो. यातील मैथुन हा विषय घेऊन तुकोबाराय जीवास समजावितात की, ‘अविवेकाने आयुष्य जगत असताना कामाग्नीने पेटून व्यभिचाराने कुणाही स्त्रीला मिठ्या मारताना (पुरुषाला) किंवा कुणाही पुरुषाला मिठ्या मारताना (स्त्रीला) आनंदाच्या उकळ्या फुटत असतात, पण त्या कृत्याचे प्रायश्चित्त देताना यमदूत नंतर अग्निस्तंभाला कवटाळावयास लावतील, त्यावेळी होणार्‍या यातनांची जरा कल्पना कर’.
     जीवाच्या मृत्युनंतरच्या प्रवासाचे भीषण वर्णन केल्यानंतर, यमनगरीच्या सीमेवरील जी वैतरणी नदी पार करावी लागते, त्या नदीचे भागवतात केलेले वर्णन अंगावर शहारे आणणारे आहे. हाही एक नरकच आहे. ही नदी मल, मूत्र, रक्त, केस, नखे, हाडे, चर्बी, मांस, मज्जा वगैरे घाणेरड्या पदार्थांच्या चिखलाने भरलेली आहे. तिचा ठाव लागत नाही. त्यातून चालणे शक्य नसते. परंतु, धर्माच्या मर्यादांचे उल्लंघन करणार्‍या महत्पापी माणसास त्या अत्यंत किळसवाण्या चिखलातून यमदूत दंडुके मारत चालावयास लावतात, इतकेच नव्हे, त्याला बुडवितात, जेणेकरून ती घाण जीवाच्या नाकातोंडात जाईल. 
     अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबारायांनी उल्लेख केलेल्या भयानक कुंभयातना, अशा मांसभक्षी पाप्याला भोगाव्या लागतात, जे आपली भूक भागविण्यासाठी जिवंत पशु-पक्षी मारून, शिजवून खातात. अशा पाप्यांना यमदूत उकळत्या तेलाच्या कुंभात शिजवतात. तहान-भूक भागविताना विवेक न सांभाळता केवळ पिंडाचे पाळण करण्यातच ज्यांनी पोटाची आग शमविली व त्यात आनंद उपभोगला, त्यांना प्रायश्चित्त देताना यमदूत तोच मापदंड लावतात व पशु-पक्षी मारून त्यांचे मांस शिजवताना होणार्‍या यातना जीवास निर्घृणपणे सोसावयास लावतात. जी माणसे आपले माता-पिता, ब्राह्मण, वेदादींचा अवमान करतात, त्यांच्या वाट्याला येणार्‍या यातनांचा उल्लेख तुकोबाराय पुढे करतात...(कालसूत्र नावाच्या नरकात) तांब्यासारखी तप्त लाल भूमी असून वरून सूर्य असह्य आग ओकीत असतो. त्या नरकात नेलेला जीव खालून जाळ व वरून आग यामुळे भाजून निघतो. तहान-भूकेने व्याकूळ होऊन जातो. त्याचा देह आतून बाहेरून जणु जळू लागतो. त्या दाहापासून स्वतःला वाचविण्यासाठी तो सैरावैरा धावतो, गडबडा लोळतो. शरीरावर जितके रोम असतील, तितके हजार वर्षे त्या जीवाला या यातना यमदूत भोगावयास लावतात. 
     अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय, त्या भयानक यातनांचे स्वरूप स्पष्ट केल्यानंतर, जीवाने आपली सोडवणूक करून घेण्यासाठी थोडे सायासयुक्त साधन करावे, असे सांगतात. हे साधन बहिरंग आणि अंतरंग अशा दोन्ही प्रकारे ते समजावितात. हे साधन असे की, ‘अंतरंगातून साधकाने जीवनात कर्माचरण करताना अथवा कर्मफल भोगताना आपली वृत्ती साक्षीरूप (- उदास) ठेवावी. बाह्यांगाने, करता येईल तसा (भगवंताचा) नामघोष करावा. तुकोबाराय नामघोष अशासाठी सांगतात की, ते एकच असे कर्म आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण होत नाही आणि ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्याप्रमाणे पापांचे डोंगर जळून जातात. हे साधन करीत असताना कधीही न विटणारा असा जो भक्तिरस प्राप्त होईल, तो सेवन करून चिंतारहित आनंदात निमग्न होता येईल. इथे हे लक्षात घ्यावयाचे की, तुकोबाराय प्रथम चरणात ‘हळूच मुक्तिमार्ग धरण्या’स सांगतात व शेवटी ‘भक्तिमार्गा’चा उल्लेख करतात. यात मुक्ती ही यातनातून सुटका आहे नि भक्ती ही आनंदाचा स्त्रोत आहे. भक्ती एकदा रुजली की, जन्म-मरणाच्या पुनरावृत्तीचे भय राहत नाही, कारण तिथे चित्तशुद्धी होऊन भगवंताचा आधार गवसलेला असतो.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)