कोणाची वाट बघणे - वेड्या मना हे चाले?

कोणाची वाट बघणे - वेड्या मना हे चाले?
ना अंत एकान्ताला - अवकाश ना शब्द बोले
जग विसरे - कधीचे - मलाही - तुलाही - मग का डोळे ओले? ।ध्रु।

कुणि सावली दिसे ना वाटे
कुणि येउनी मला ना भेटे
तुजकरता, मजकरता कुणी कुठे रडणाराहे?

लटकेहि ना जुळतसे नाते
झुरणे तुझे मग कशाला ते?
कुणी कुणासवे मरे असे कुठे घडणाराहे?

कोणीच नाही जगती उगा ह्या परदुःख घ्याया बसले ।१।
कोणाची वाट बघणे - वेड्या मना हे चाले?

तुज काय सांग गत रातींचे?
मज काय प्रेम हत गोष्टींचे?
शेज नसो चिता असो मिळे तिथे पडणे आले

सुटलेत जर बंध हातीचे
उपकार ना विलग साथीचे
जिथे सुखे हवी तुला तिथे मला रडणे आले

कोणी तुझे ना, माझे कुणी ना मग कोण हे आठवले? ।२।
कोणाची वाट बघणे - वेड्या मना हे चाले?

टीपा :

१. येथे तपशीलाचा क्रम बदललेला आहे. मूळ गाण्यात अवकाश (स्पेस) आधी आणि काल (टाईम) नंतर आहे.

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चालः   मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )
वृत्त असे आहेः
ध्रुवपदः
गागा गागा गागा - गागा गागा गागा
गागा गागा गागा - गागा गागा गागा
ललगागा लगागा लगागा लगागा - गागा गागा गागा
कडवी:
ललगा लगा लगा गागागा
ललगा लगा लगा गागागा
लगा लगा लगा लगा लगा लगा गागागागा
ललगा लगा लगा गागागा
ललगा लगा लगा गागागा
लगा लगा लगा लगा लगा लगा गागागागा
गागा गागा गागा गागा गागा गागा गागा
कडव्याच्या १,२,४,५ ह्या ओळींचे यमक आहे. ३,६ या ओळींचे यमक आहे आणि शेवटच्या ओळीचे यमक ध्रुवपदाशी आहे
गाण्यात आणि भाषांतरात लगा लगा ... ऐवजी क्वचित गाल लगा ... असे घेतलेले आहे आणि गागा .. गागा .. गागा ह्या लयीत मध्ये गागाल गागाल ... असे क्वचित घेतलेले आहे.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक निदान ...    ले जमवा बरका!   यमकाची जागा ठळक केलेली आहेच.