अभिनंदन.

आज १.८.२०१३ म. टा. मध्ये वाचलेली बातमी...

दुवा क्र. १

वाई तालुक्यात भुईंजमधली शिकण्याची व जगण्याची लढाई पुढे सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधनाच्या संधीसाठी झगडण्यात परावर्तित होईल , असे मेघाला वाटले नव्हते. स्पेनमध्ये पीएचडी केल्यानंतर मेघा लोखंडे हेपटायटिसमधील संशोधन पुढे नेत स्वित्झर्लंडच्या बर्न्स विद्यापीठात रुजू होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत...

ध्रुवताऱ्याची गोष्ट तिला लहानपणापासून प्रेरणा देत आली , त्यामुळेच वाईजवळ भुईंजमध्ये शिकण्यासाठी धडपडणारी ही मुलगी केवळ चिकाटीच्या जोरावर आज संशोधनाच्या जगात मोठी झाली आहे. स्पेनच्या अल्कला विद्यापीठात रक्ताच्या काविळीवर संशोधन करून अव्वल मानांकन मिळविणारी डॉ. मेघा लोखंडे हिचे आयुष्य हे छोट्या गावात शिक्षणाची आस धरणाऱ्या मुलींना प्रेरणा देणारे आहे.

आर्थिक हलाखीमुळे तुटपुंज्या शेतीवर लोखंडे कुटुंबाची गुजराण सुरू झाली. मेघाचे वडील अल्पबचत गोळा करण्यासाठी वणवण करीत आणि आई शेतावर काम करायची. साहजिक शेतातले थोडेसे पीक विकण्यासाठी मेघा आणि तिचे भाऊ हातभार लावत. भुईंजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात दहावी आणि नंतर साताऱ्यात यशवंतराव चव्हाण कॉलेजात बीएससी अशी तिने मजल मारली. पदवी घेतली की मुलींची लग्न लावून द्यायची , असा आसपासचा रिवाज. त्या मार्गाने जायचे नाही , हे मेघाच्या मनात ठाम होते. आयटीआय , नर्सिंग करेन , पण शिकेन , यावर ती ठाम होती. आईवडिलांनी तिला कायमच पाठबळ दिले. मग कराडच्या वायसी कॉलेजमध्ये तिने सूक्ष्मजीवशास्त्रात एमएससी केले. लहान भावाने ताईसाठी करिअरमधून ब्रेक घेतला आणि सांगितले , ' ताई तू शीक. '

एमएससीनंतर वर्षभर बारामतीच्या टीसी कॉलेजात अध्यापन केल्यावर मेघाने संशोधनाकडे वळण्याचे ठरविले. पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत पहिली संधी मिळाली. मेघाने अभ्यासाला वाहून घेतले. इतरांप्रमाणे जीआरई , टॉफेल या अमेरिकेच्या प्रवेश परीक्षांसाठी दहा-दहा हजार मोजणे तिला शक्य नव्हते. छोट्या भावांच्या शिक्षणाची चिंता होती. दुसरीकडे आईवडिलांना तिच्या भविष्याची चिंता वाटत होती. सुदैवाने , विजय बनसोडे (माळी) या तिच्याप्रमाणेच कष्ट करून उच्च शिक्षणाच्या वाटेवर असणाऱ्या तरुणाशी तिचा विवाह जुळून आला. सासरीही उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले. काही काळ संसारापेक्षा उच्च शिक्षणावर लक्ष द्यावे , यावर दोघांचे एकमत होते.

पती आयर्लंडमध्ये होते , तर मेघाला स्पेनच्या अल्कला विद्यापीठात पीएचडीची संधी आली. तोवर तिने इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. स्पेनमध्ये इम्युनॉलॉजीवर संशोधन सुरू झाले. शोधनिबंध प्रकाशित झाले. एका प्रोजेक्टला तर कार्लोस इन्स्टिट्यूटकडून ७५ हजार युरो ग्रॅन्ट मिळाली. ७८४ संशोधकांतून निवडलेल्या दहा प्रोजेक्टमध्ये तिचा समावेश होता. या काळात ती बर्लिन , बार्सिलोना , अॅमस्टरडॅम येथे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी झाली. स्पॅनिशही शिकली. पीएचडीच्या अखेरच्या तीन महिन्यात फ्रान्समधील स्ट्रासबर्गमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सेल अॅन्ड मोलेक्युलर बायॉलॉजी येथे ती गेली. तेव्हा पतीही तेथे होते. अल्कला विद्यापीठाने तिला सर्वोच्च मानांकनासह पीएचडी दिली. पुढील संशोधनासाठी तिला स्वित्झर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ बर्न्समध्ये संधी मिळाली आहे. हेपटायटिसवर तिचे संशोधन सुरू होत आहे. मात्र , हे ज्ञान मिळवून तिला परत यायचे आहे ते मायभूमीत. आपल्या संशोधनाचा उपयोग इथे करण्यासाठी.

डॉ. मेघा लोखंडे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन. 

राजेंद्र देवी