हासत ऱ्हा लाऽडक्या हासत ऱ्हा

हासत ऱ्हा लाऽडक्या हासत ऱ्हा
कुठलेही फूल नाही मुळी इतके सुंदर
जितका तुझा चेहरा हा
हासत ऱ्हा लाऽडक्या हासत ऱ्हा ।ध्रु।

हासू हिरावू तुझे दे कधी ना कुणी
शय्या फुलांची मिळू दे तुला यौवनी
देवाला ही प्रार्थना - ही प्रार्थना
कुठलेही फूल नाही मुळी इतके सुंदर
जितका तुझा चेहरा हा
हासत ऱ्हा लाऽडक्या हासत ऱ्हा ।१।

बघता तुला दिन जुने आठवू लागले
नयनांत विझते दिवे लुकलुकू लागले
होतो मी अगदी असा - अगदी असा
कुठलेही फूल नाही मुळी इतके सुंदर
जितका तुझा चेहरा हा
हासत ऱ्हा लाऽडक्या हासत ऱ्हा ।२।

तू चाल जपुनीच वाईट जग हे असे
रे सावली आपली साप बनुनी डसे
निष्ठा न येथे कुणा - येथे कुणा
कुठलेही फूल नाही मुळी इतके सुंदर
जितका तुझा चेहरा हा
हासत ऱ्हा लाऽडक्या हासत ऱ्हा ।३।

टीपा :

चालः   मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल ) गागा - गागा -गागा .... अशी दादरा तालात मध्यलयीत चाल आहे. गागा- गागा ऐवजी कधी कधी गागागा - गागागा किंवा गागाऽल गागाऽल असे आहे. 

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.   (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. ठळक केलेल्या जागी हा असे यमक हवे. अधोरेखित जागी स्वरांचे यमक आहे. ध्रुवपद आणि कडवी ह्यांच्यादरम्यान हे स्वरांचे यमक आहे.