नदीने घेतलेला बळी
(प्रसिद्ध लेखिका अगाथा क्रिस्टी यांच्या "Death by Drowning" ह्या कथेचा स्वैर अनुवाद)
स्कॉटलंड यार्डचे सेवानिवृत्त आयुक्त सर हेन्री क्लिदरिंग हे त्यांचे स्नेही कर्नल बँट्री यांच्याकडे काही दिवस रहायला आले होते. बँट्रींचे घर सेंट मेरी मीड ह्या छोट्याश्या गावात होते. शनिवारी सकाळी साधारण सव्वादहाच्या सुमाराला ते नाश्त्यासाठी खाली आले तेव्हा जेवणघराच्या दारात त्यांची घराच्या यजमानीण बाईंशी टक्करच होत होती. श्रीमती बँट्री घाईघाईने बाहेर पडत होत्या आणि त्या जराश्या अस्वस्थ वाटत होत्या.
कर्नल बँट्री जेवणाच्या टेबलाशी बसले होते. त्यांचाही चेहरा नेहमीच्या मानाने जरा जास्तच लालसर दिसत होता.
"गुड मॉर्निंग, क्लिदरिंग. ये, नाश्ता तयार आहे. सुरुवात कर."
सर हेन्रींनी लगेच आज्ञापालन करून नाश्त्याची बशी पुढे ओढली.
"डॉलीचा आज जरा मूड नाहीये."
"हो. मला तशी शंका आलीच." सर हेन्री म्हणाले.
मनातल्या मनात त्यांना जरा आश्चर्य वाटले. त्यांच्या यजमानीण बाई शांत, सौम्य स्वभावाच्या होत्या. जास्त उत्तेजित होणे किंवा एकदम वाईट मूडमध्ये जाणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. सर हेन्रींना एक मात्र निश्चित माहीत होते! ते म्हणजे श्रीमती बँट्री बाग आणि बागकाम ह्या एका विषयावर खूपच उत्साहाने बोलत असत.
"हो. आज सकाळी एक बातमी समजली आणि त्यामुळे तिचा मूड गेला आहे. गावातली एक मुलगी -तो ब्लू बोअर चालवतो ना, तो एमट. त्याची मुलगी, रोझ!"
"तिचं काय?"
"मुलगी दिसायला सुंदर होती. आली अडचणीत! नेहमीचीच कथा! मी डॉलीशी वाद घालत होतो, पण तो मूर्खपणाच होता. बायकांना काही कळत नाही. डॉली तर त्या मुलीच्या बाजूने भांडायला अगदी कंबर कसून उभी आहे. तुला माहीतच आहे, बायका कशा असतात! पुरुष निर्दयी असतात, बायकांना फसवतात आणि स्वत: नामानिराळे रहातात वगैरे, वगैरे, नेहमीचंच सगळं. पण आता ते दिवस राहिले नाहीत. मुली पण काही कमी नसतात. एखाद्या मुलीवर भुरळ घालणारा मुलगा म्हणजे लगेच काही व्हिलन होत नाही. बऱ्याचदा मुलीचा पण तेवढाच सहभाग असतो. मला तर तो सॅन्डफर्ड चांगला वाटतो. आता तो जरा बिनडोक आहे पण तो ’डॉन वॉऽन’ नक्कीच नाही."
"म्हणजे त्या मुलीच्या परिस्थितीला सॅन्डफर्ड जबाबदार आहे तर!"
"असं वाटतंय खरं. मला तसं नक्की माहीत नाही." कर्नल बँट्री सावधपणे म्हणाले. "पण गावात सगळे हेच म्हणतायत. तुला माहीत आहे, हे गाव कसं आहे ते! पण मी काही डॉलीसारखा काही तरी ऐकून त्यावरून घाईघाईत निष्कर्ष काढून दुसऱ्यावर दोषारोप करणारा नाही. असं करणं चूकच आहे. शिवाय आता ती चौकशी वगैरे होणार आहे."
"चौकशी?"
"हो. मी तुला सांगितलं नाही का? त्या मुलीनं नदीत जीव दिला. त्यामुळेच तर सगळी भानगड झालीय."
"भानगड आहे खरी."
"नक्कीच आहे. मलाही हे सगळं काही ठीक वाटत नाहीये. बिचारी मुलगी! तिचा बाप म्हणजे एकदम कडक आहे. त्यालाच ती घाबरली असेल." थोडं थांबून कर्नल बँट्री म्हणाले, "म्हणूनच डॉली एवढी अपसेट झाली आहे."
"कुठे जीव दिला तिनं?"
"नदीमध्ये. गिरणीच्या जवळ नदीच्या पाण्याला खूप ओढ आहे. नदीच्या कडेकडेनं एक पायवाट आहे आणि तिथेच नदीवर एक पूलही आहे. त्या पुलावरूनच तिनं खाली उडी टाकली. छे, छे, त्याचा विचार सुद्धा करायला नको वाटतंय." असे म्हणून कर्नल बँट्रींनी वर्तमानपत्र उघडलं आणि दु:खद घटनेपासून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकारने नवीन काय गोंधळ घालून ठेवलेत ते वाचायला सुरुवात केली.
सर हेन्रींना गावातल्या ह्या घटनेत फारसा रस नव्हता. नाश्ता झाल्यावर ते अंगणातल्या हिरवळीवर एक खुर्ची घेऊन बसले. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून डोक्यावरची हॅट थोडी कलती करून ते निवांत बसले.
साधारण साडेअकराच्या सुमाराला एक मोलकरीण तिथे आली आणि म्हणाली, "साहेब, तुम्हाला भेटायला मिस मार्पल नावाच्या एक बाई आल्या आहेत."
"मिस मार्पल?" असे म्हणून सर हेन्री उठले आणि त्यांनी आपली हॅट नीट केली. ते नाव ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना मिस मार्पल आठवत होत्या. त्या जुन्या जमान्यातल्या एक वृद्ध महिला होत्या पण त्यांची बुद्धी मात्र तल्लख होती. त्यांना आठवले की अशा दहा-बारा तरी केसेस होत्या ज्यांचे गूढ काही उकलले नव्हते पण ह्या खेड्यातल्या बाईने अचूकपणे ते शोधून काढले होते. सर हेन्रींना मिस मार्पलबद्दल आदर होता. पण त्यांना कळेना की आता तिने काय काम काढले असेल?"
मिस मार्पल बैठकीच्या खोलीत खुर्चीवर अगदी ताठ बसल्या होत्या. ती त्यांची पद्धतच होती. बायका खरेदीसाठी वापरतात तशी रंगीबेरंगी, परदेशी बनावटीची पिशवी त्यांच्या शेजारीच होती. त्या एकूणच थोड्या उत्तेजित दिसत होत्या.
"सर हेन्री, तुम्ही भेटलात, फार बरं झालं. मला कळलं, तुम्ही इथे रहात आहात म्हणून... मला माफ करा हं. मी अशी एकदम आले."
"छे छे, उलट मलाही तुमच्या भेटीने आनंद झाला आहे. अं.. मला वाटतं, श्रीमती बँट्री बाहेर गेल्या आहेत. " सर हेन्री मिस मार्पलशी हस्तांदोलन करत म्हणाले.
"हो. मी पाहिलं तिला. ती फूटिटशी, इथल्या खाटकाशी बोलत होती. हेन्री फूटिटच्या, म्हणजे फूटिटच्या कुत्र्याच्या अंगावरून गाडी गेली आणि तो मेला बिचारा! छान होता कुत्रा, फॉक्स टेरियर. खाटकांच्याकडे असे कुत्रे असतात."
"हो." काय प्रतिक्रिया द्यावी ते न कळल्याने सर हेन्री एवढेच म्हणाले.
"डॉली घरी नसताना मी इथे पोहोचले हे फारच बरं झालं. कारण मला तुम्हालाच भेटायचं होतं. आज जी दु:खद घटना घडली त्यासंबंधी बोलायचं होतं."
"हेन्री फूटिटबद्दल?" सर हेन्रींचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता.
मिस मार्पलच्या चेहऱ्यावर सूक्ष्म नाराजी दिसली. त्या म्हणाल्या, "नाही हो. रोझ एमटबद्दल. तुम्ही ते ऐकलं असेलच."
"हो बँट्री सांगत होता. वाईट झालं. " सर हेन्री म्हणाले. ते जरा कोड्यात पडले. मिस मार्पल, रोझ एमट आणि ते स्वत: यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते त्यांना कळेना.
हस्तांदोलन करतेवेळी दोघेही उभे राहिले होते ते खाली बसले. मिस मार्पल बोलायला लागल्या तेव्हा त्या खूप गंभीर झाल्या होत्या आणि त्यांच्या आवाजात एक वेगळाच भारदस्तपणा आला होता.
त्या म्हणाल्या, "सर हेन्री, तुम्हाला आठवत असेल, पूर्वी एकदा आपण पाच सहा जण एक खेळ खेळलो होतो. एकाने स्वत:ला माहीत असलेली एखादी केस सांगायची पण त्यातील रहस्याचा उलगडा मात्र करायचा नाही. तो उलगडा बाकीच्यांनी करायचा. मी त्या खेळात जरा बरी खेळले होते."
"काय म्हणता मिस मार्पल! तुम्ही तर सर्वांच्यावर मात केली होती आणि प्रत्येक वेळी अचूक उत्तर सांगितलं होतं. मला हेही आठवतंय की तुमच्या हे कसं लक्षात आलं हे विचारल्यावर दरवेळी तुम्ही गावात घडलेली एखादी तशाच प्रकारची घटना सांगितली होती."
सर हेन्रींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते पण मिस मार्पलचा चेहरा गंभीरच होता.
"तुम्ही असं म्हटल्यामुळे मला तुमच्याशी बोलायला आता जास्तच धीर आला आहे. तुम्ही माझं म्हणणं हसण्यावारी नेणार नाही असं मला वाटतं."
मिस मार्पल हे अगदी कळकळीने बोलत होत्या हे सर हेन्रींच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले तुम्ही सांगाल ते मी अगदी गंभीरपणे घेईन. तुम्ही काळजी करू नका."
"सर हेन्री, ही मुलगी, रोझ एमट, तिनं स्वत: नदीत उडी घेतली नाही, तिचा खून झालाय आणि तो कोणी केलाय हेही मला माहीत आहे."
सर हेन्री हे ऐकून इतके आश्चर्यचकित झाले की जवळजवळ तीन सेकंद ते गप्पच होते. मिस मार्पलचा आवाज अगदी शांत आणि नेहमीसारखाच होता. त्या एखादी साधी घटना कथन करत असाव्यात असा त्यांचा आवाज होता.
सर हेन्री त्यांच्या आश्चर्याच्या धक्क्यातून बाहेर आले आणि म्हणाले, "मिस मार्पल, असं विधान करणं हे धाडसाचं आहे."
मिस मार्पल यांनी अनेकदा आपली मान हलवली आणि त्या म्हणाल्या, "मला माहीत आहे, मला माहीत आहे ते. पण म्हणूनच तर मी तुमच्याकडे आले आहे."
"पण बाईसाहेब, माझ्याकडे येऊन काही उपयोग नाही. आता मी तुमच्यासारखाच एक सामान्य नागरिक आहे. तुमच्याजवळ जर अशा तऱ्हेची काही माहिती असेल तर तुम्ही पोलिसात जायला पाहिजे."
"पण मला पोलिसात जायचं नाहीये."
"का?"
"कारण तुम्ही म्हणताय तशी माहिती अशी माझ्याजवळ काहीच नाही."
"म्हणजे हा तुमचा निव्वळ अंदाज किंवा तर्क आहे?"
"हो, पण अगदी तसंच नाही. म्हणजे मला माहीत आहे. पण मला माहीत असण्याची कारणं जर मी इन्स्पेक्टर ड्रुइटला सांगितली तर तो नुसता हसेल आणि मी त्याला त्याबद्दल दोष देणार नाही. हा प्रकार समजायला जरा कठीण आहे. मला जे माहीत असतं त्याला आपण ’विशिष्ट ज्ञान’ असं म्हणू या."
"म्हणजे काय ते जरा स्पष्ट करून सांगाल का?"
मिस मार्पल हसली आणि म्हणाली, "हे बघा, मी जर तुम्हाला म्हटलं की मला ते ज्ञान आहे कारण काही वर्षांपूर्वी माझ्या भाचीकडे एक पीजगुड नावाचा माणूस भाजी विकायला येत असे आणि तो तिच्या दारात गाजराच्या पिशवीऐवजी शलगमची पिशवी ठेवून जात असे."
"वा! पीजगुड! धंद्याला अगदी शोभेसं नाव आहे. असो, तर तुमचं म्हणणं असं की अशा प्रकारच्या एका जुन्या घटनेवरून तुम्ही हा अंदाज बांधला आहे."
"हो. मला मनुष्यस्वभावाचं चांगलं ज्ञान आहे. एवढी वर्षं ह्या लहानशा गावात राहून मनुष्यस्वभावाबद्दल ज्ञान मिळणं सहज शक्य आहे. पण मुख्य प्रश्न हा आहे की तुम्हाला माझं म्हणणं पटतंय की नाही?" मिस मार्पल हे बोलत असताना सर हेन्रींकडे सरळ सरळ पहात होत्या आणि त्यांची प्रतिक्रिया अजमावत होत्या.
सर हेन्री हे एक अनुभवी गृहस्थ होते. झटकन निर्णय घेणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. मिस मार्पल यांचे म्हणणे वरवर पाहता न पटण्यासारखे वाटत असले तरी सर हेन्रींना ते मनोमन पटले होते.
ते म्हणाले, "माझा तुमच्यावर विश्वास आहे, मला तुमचं म्हणणं पटतंय पण मला हे कळत नाही की तुम्ही माझ्याकडे का आला आहात? मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे?"
"मी ह्या सगळ्याचा पुन्हा पुन्हा विचार केला आहे. मी आधी म्हणाले त्याप्रमाणे हातात काही भक्कम पुरावा नसताना पोलिसांकडे जाण्यात काही अर्थ नाही. माझी अशी विनंती आहे की तुम्ही ह्या गोष्टीत रस घ्यावा. मला खात्री आहे, तुम्ही ह्या केसमध्ये स्वारस्य घेतलेलं पाहून इन्स्पेक्टर ड्रुइट खूष होईल आणि केस आणखी वर गेली तर चीफ कॉन्स्टेबल कर्नल मेल्चेट यांचं मन वळवणं तुम्हाला मुळीच कठीण जाणार नाही."
मिस मार्पल सर हेन्रींकडे अपेक्षेने पाहात होत्या.
"बरं. मग सुरुवात करण्यासाठी तुम्ही मला काय डेटा देणार आहात?"
"मी तुम्हाला एका कागदावर एका व्यक्तीचं नाव लिहून देते. सगळी चौकशी वगैरे झाल्यावर ती व्यक्ती निर्दोष ठरली तर माझी चूक झाली हे मी मान्य करीन." त्या जरा थांबल्या आणि म्हणाल्या, "एखाद्या निरपराध्याला फासावर जावं लागलं तर ते फारच भयंकर होईल."
"पण तुम्हाला असं का वाटतंय?"
"मला वाटतं इन्स्पेक्टर ड्रुइट तसा बरा आहे पण बेताची बुद्धिमत्ता काही वेळेला घात करते. कदाचित असं मानण्यात मी चूकही करत असेन पण मला असं वाटतंय खरं!"
सर हेन्रींनी त्यांच्याकडे कुतुहलानं पाहिले. त्यांनी आपली पर्स उघडली. त्यातून एक छोटीशी वही काढली, तिच्यातून एक पान फाडून घेतले आणि त्यावर काही तरी लिहिले. मग त्याची घडी करून तो कागद सर हेन्रींच्या हातात दिला.
सर हेन्रींनी कागद उघडून त्यावरचे नाव वाचले. त्यांना काहीच बोध झाला नाही. त्यांनी नुसतेच भुवया उंचावून मिस मार्पलकडे पाहिले आणि पुन्हा घडी करून तो कागद खिशात ठेवून दिला.
"ठीक आहे. हे सगळं जरा विचित्रच आहे. असं मी यापूर्वी कधीच केलं नाही. पण माझा स्वत:वर विश्वास आहे. तुमच्याविषयी माझं जे मत झालेलं आहे ते मला दगा देणार नाही याची मला खात्री आहे."
---------------------
क्रमशः