नदीने घेतलेला बळी - ४

ते सर्वजण जिमी ब्राऊनकडे गेले. जिमी ब्राऊन चांगला हुशार चुणचुणीत मुलगा होता. पोलिस आपल्याला विचारायला आलेत ह्याचा त्याला झालेला आनंद आणि अभिमान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आणि पोलिसांनी त्याला लांबड न लावता थोडक्यात सांगायला सांगितलं त्यामुळे तो थोडा निराशही झालेला दिसला. 

"तू पुलाच्या दुसऱ्या बाजूला होतास नं, म्हणजे नदीच्या गावाकडच्या बाजूला नाही, दुसऱ्या बाजूला. बरोबर?"  सर हेन्रींनी जिमीला विचारलं. ते पुढे म्हणाले, "तू पुलाजवळ आलास तेव्हा तुला त्या बाजूला कोणी दिसलं का?"

"तिथल्या झाडीतून कोणी तरी चालत होतं. बहुतेक ते सॅन्डफर्ड असावेत. ते आर्किटेक्ट आहेत आणि काही तरी वेगळ्याच प्रकारची घरं बांधतात ते."

तिघांनी एकमेकांकडे पाहिलं!

"हे केव्हा झालं? तू किंकाळी ऐकलीस त्याच्या आधी की नंतर?"

"त्याच्या आधी साधारण दहा मिनिटं असेल."

"तुला नदीच्या गावाकडच्या बाजूनं येणारं कुणी दिसलं का?"

"त्या बाजूला नदीच्या कडेनं जी पायवाट आहे तिथून मला एक माणूस येताना दिसला. तो सावकाश, शीळ घालत चालत होता. बहुतेक तो जो एलिस होता."

इन्स्पेक्टर एकदम सावध झाला आणि म्हणाला, "एखाद्याच्या शिळेवरून तो माणूस कोण आहे हे कसं ओळखता येईल. शिवाय संध्याकाळची वेळ होती आणि धुकंही होतं." 

जिमी ब्राऊनचा चेहरा जरा चमकला. तो हसत म्हणाला, "शिळेवरून म्हणजे तो शिळेवर जे गाणं म्हणत होता त्यावरून! जो एलिसला तेवढं एकच गाणं येतं आणि तेच तो नेहमी शिळेवर म्हणत असतो.  I wanner be happy.."  जिमी ब्राऊनच्या स्वरात आधुनिक गोष्टींचा अभिमान आणि जुन्याबद्दलची तुच्छता स्पष्ट दिसत होती.

कर्नल मेल्चेट म्हणाले, "शीळ काय कोणीही घालेल. बरं, पण तो माणूस पुलाकडे चालला होता का?"

"नाही, तो गावाकडे चालला होता."

मेल्चेट म्हणाले, "ठीक आहे. आता त्या माणसाबद्दल विचार करण्यात वेळ घालवायला नको. तू आता हे सांग की, तू किंकाळी ऐकलीस, पाठोपाठ पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाजही ऐकलास, आणि त्यानंतर काही वेळानं तुला कोणी तरी पाण्यात वाहतंय असं दिसलं. बरोबर? मग तू लोकांना बोलावण्यासाठी पुलावर आलास, पूल ओलांडलास आणि गावात गेलास. त्यावेळी तुला पुलाजवळ कुणी दिसलं का?"

"अं..., हो. मला नदीकडेच्या पायवाटेवर दोन माणसं एक ढकलगाडी चालवत जात असलेली  दिसली. पण ती लांब होती म्हणून मी त्यांना हाक न मारता गाईल्सचं घर जवळ होतं तिकडेच गेलो."

कर्नल मेल्चेट म्हणाले, "तू योग्य तेच केलंस बाळ. तू खूपच प्रसंगावधान दाखवलंस आणि अगदी शहाण्यासारखं वागलास. तू बालवीर असशील. हो न?"

"हो सर." जिमी ब्राऊन अभिमानाने म्हणाला.

"छान, छान."

सर हेन्री मात्र एकदम गप्प झाले होते. त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार चालला होता. खिशातली चिठ्ठी काढून त्यांनी पहिली, नकारार्थी मान हलवली. त्यांना ते अशक्यच वाटत होते. पण तरीही...!

त्यांनी मिस मार्पलला भेटण्याचे मनाशी ठरवून टाकले.

मिस मार्पलने आपल्या घराच्या जुन्या पद्धतीच्या बैठकीच्या खोलीत त्यांचे स्वागत केले.   

सर हेन्री म्हणाले, "मी केसची प्रगती सांगायला आलोय आणि जी प्रगती झालीय ती आपल्या दृष्टीनं बरोबर दिशेनं झाली नाही. पोलिस सॅन्डफर्डला अटक करणार आहेत. मलाही वाटतं ते बरोबर आहे."

मिस मार्पल बुचकळ्यात पडल्या. त्या म्हणाल्या, "म्हणजे माझ्या थिअरीचं समर्थन करेल अशी एकही गोष्ट तुम्हाला सापडली नाही?  मग कदाचित माझंच चुकलं असेल. तुम्ही लोक एवढे अनुभवी आहात, माझं म्हणणं बरोबर असतं तर त्याच्या पुष्टीसाठी तुम्हाला नक्कीच काहीतरी सापडलं असतं." 

सर हेन्री म्हणाले, "एकीकडे मला स्वतःला पोलिसांचा निष्कर्ष पटत नाहीये तर दुसरीकडे जो एलिस त्या संध्याकाळी घटनास्थळाच्या जवळपासही नव्हता याचा सबळ पुरावा आहे. तो घरीच काही काम करत होता आणि खुद्द मिसेस बार्टलेट त्याला मदत करत होती."

मिस मार्पलचा चेहरा एकदम बदलला. त्या म्हणाल्या, "पण ते शक्य नाही कारण तो शुक्रवार होता."

"शुक्रवार? म्हणून काय झालं?"

"शुक्रवारी संध्याकाळी मिसेस बार्टलेट तिने धुतलेले कपडे घरोघर पोचते करते."

सर हेन्री खुर्चीत जरा रेलून बसले. त्यांना जिमी ब्राऊन त्या शीळ वाजवत जाणाऱ्या माणसाबद्दल बोलला होता ते सर्व आठवले. ते जरा विचारात पडले आणि एकदम मनाशी म्हणाले ’सापडलं!’

त्यांनी उठून मिसेस मार्पलशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाले, "मला काय झालंय ते कळलंय असं वाटतंय, मी प्रयत्न करून बघतो."

पाचच मिनिटांत ते मिसेस बार्टलेटच्या घरी पोहोचले. जो एलिस बैठकीच्या खोलीत बसलेला होता. सर हेन्री त्याला कडक स्वरात म्हणाले, "एलिस, तू आम्हाला खोटं सांगितलंस. काल रात्री आठ ते साडेआठच्या मध्ये तू घरात कपाट बसवत नव्हतास. तुला नदीकडेच्या पायवाटेनं पुलाच्या बाजूला जाताना एकानं पाहिलं आहे. ते सुद्धा रोझ एमटचा खून झाला त्याच्या काही मिनिटं आधी."

जो एलिसने आश्चर्याने आणि भीतीने आ वासला. "नाही, नाही. तिचा खून नाही झाला. मी काहीच केलं नाही. तिनंच पुलावरून उडी टाकली. बहुतेक तिला वाटलं आता दुसरा काही मार्गच नाही. मी तर तिच्या केसालाही धक्का लावला नसता."

"मग तू आमच्याशी खोटं का बोललास?"

जो एलिसने जरा इकडेतिकडे पाहिले आणि मग खाली मान घालून म्हणाला, " मगाशी मी खूप घाबरलो होतो.  झालं असं की, मिसेस बार्टलेट तेव्हा मला तिथे भेटल्या. थोड्या वेळानं आम्हाला काय झालंय ते कळलं. मिसेस बार्टलेटना वाटलं मी तिथे होतो हे इतरांना कळलं तर ते मला धोकादायक ठरेल म्हणून आम्ही दोघांनी कपाटाची आयडिया काढली आणि मिसेस बार्टलेटनं मला दुजोरा द्यायचं ठरवलं. साहेब, त्या खूपच चांगल्या आहेत."

सर हेन्री काहीही न बोलता सरळ स्वयंपाकघरात गेले. मिसेस बार्टलेट आत भांडी विसळत होती.

सर हेन्री म्हणाले, "मिसेस बार्टलेट मला सगळं कळलंय. तेव्हा तुम्ही आपला कबुलीजबाब द्या. नाही तर जो एलिसला विनाकारण फासावर जावं लागेल. ठीक आहे. तुम्ही स्वत: सांगणार नसाल तर मीच काय झालंय ते सांगतो. तुम्ही धुतलेले कपडे घरोघर पोहोचवायला निघाला होतात. वाटेत तुम्हाला रोझ एमट दिसली. तुम्हाला वाटलं की तिनं जोला डावलून त्या लंडनहून आलेल्या आर्किटेक्टशी सूत जमवलं. आता ती अडचणीत आली आहे. आता जो तिच्या मदतीला नक्कीच धावून जाईल. तिच्याशी लग्नसुद्धा करेल."  जरा थांबून ते म्हणाले, "जो तुमच्या घरात गेली चार वर्षं राहतोय. तुम्हाला तो आवडायला लागला. तुमच्या त्याच्यावरच्या प्रेमात तुम्हाला वाटेकरी नको होता. तुम्हाला त्या मुलीचा खूप राग आला. ती तुम्हाला आवडत नव्हतीच आणि तिनं जोला तुमच्यापासून हिरावून घेणं तुम्हाला सहन होण्यासारखं नव्हतं. मिसेस बार्टलेट तुम्ही मागून जाऊन तिच्या दोन्ही दंडांना धरलं आणि तिला पुलावरून नदीत ढकलून दिलं. काही वेळानं तुम्हाला जो एलिस भेटला.  तो पोरगा, जिमी ब्राऊन, त्यानं तुम्हा दोघांना लांबून पाहिलं. पण अंधार आणि धुकं ह्यामुळे त्यानं तुम्हाला ओळखलं नाही. कोणी तरी दोन माणसं ढकलगाडी ढकलत चालले होते एवढंच त्याला दिसलं. तुम्ही जोच्या मनात भरवून दिलंत की त्याच्यावर संशय येईल. म्हणून ते कपाट बसवण्याची गोष्ट  रचलीत पण ती जो एलिससाठी नसून ती तुम्ही स्वत: घरात असल्याचा पुरावा म्हणून तुम्ही रचली. काय, मी म्हणतोय ते बरोबर आहे नं?"

सर हेन्री श्वास रोखून बसले होते. काही गोष्टी त्यांनी केवळ तर्काच्या आधारे सांगितल्या होत्या.

मिसेस बार्टलेट कारण नसताना आपले हात एप्रनला पुसत उभी रहिली. शेवटी तिने मनाचा निर्धार करून बोलायचे ठरवले.

"साहेब, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. मला काय झालं होतं तेच मला कळत नाही. ती एक निर्लज्ज मुलगी होती. मला खूप राग आला. मी मनात म्हटलं, नाही, ती जोला माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. मी ते होऊ देणार नाही. साहेब, मी फार वाईट दिवस पहिलेले आहेत. माझा नवरा अपंग होता आणि स्वभावानं पण जरा तिरसट होता. तरीही मी त्याची मनापासून सेवा केली. पण तो गेला. काही दिवसांनंतर जो इथे रहायला आला. साहेब, माझं वय फार नाही. मी जेमतेम चाळीशीची आहे. जो लाखात एक मुलगा आहे. मी त्याला छान सांभाळलं असतं. तो लहान मुलासारखाच साधा, सरळ आहे. साहेब, मी त्याची जशी काळजी घेतली असती तशी कुणीच घेतली नसती. आणि ही.. ही "  मिसेस बार्टलेटने तोंडांत आलेले अपशब्द गिळून टाकले, आणि म्हणाली, "ही आली आणि..."   ती ताठ उभी होती आणि सर हेन्रींकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पहात होती. "साहेब, तुम्ही सांगाल तिथे यायला मी तयार आहे. पण मला हे कळत नाही की हे सगळं तुम्हाला कसं कळलं? मला वाटत होतं, कुणाला कळणार नाही."

सर हेन्रींनी त्यांची मान नकारार्थी हलवली आणि एवढंच म्हणाले, "हे मला नाही कळलं."   

त्यांच्या खिशात तो कागदाचा तुकडा होता ज्यावर मिस मार्पलनं जुन्या वळणाच्या सुवाच्य अक्षरात लिहिलं होतं, मिसेस बार्टलेट, जिच्या घरात जो एलिस भाड्याने राहतो. पत्ता: २, मिल कॉटेजेस

मिस मार्पलचा तर्क पुन्हा एकदा बरोबर ठरला होता!
---------------------
समाप्त