नदीने घेतलेला बळी - ३

ते चटकन घरात शिरले. सॅन्डफर्ड तसाच खुर्चीत बसलेला होता, शून्याकडे नजर लावून. सर हेन्री त्याला म्हणाले, "हे पहा तुला शक्य तितकी मदत करण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी परत आलो. पण त्यासाठी तू मला, ही मुलगी रोझ आणि तू- तुमच्यामध्ये नेमकं काय घडलं ते सांग."

सॅन्डफर्ड तुटक तुटक शब्दात सांगू लागला, "ती दिसायला छान होती, खूपच छान आणि आकर्षक. ती माझ्या मागेच लागली. मला ती एकटं सोडतच नव्हती. गावातल्या कुणाला मी विशेष आवडत नव्हतो. त्यामुळे मलाही इथे एकटं एकटं वाटत होतं. आणि मी आधी म्हटलं त्याप्रमाणे ती देखणी होतीच आणि पुरुषांना कसं आकर्षित करावं हे तिला चांगलंच माहीत होतं."  तो थोडा वेळ गप्प बसला. "आणि मग हे झालं! मी तिच्याशी लग्न करावं असं तिचं म्हणणं होतं. पण मला ते शक्य नव्हतं. सर, माझं लग्न आधीच ठरलेलं आहे. ती मुलगी लंडनमध्ये आहे. तिला जर हे कळलं तर -आणि तिला कळेलही- तर संपलंच सगळं! हे झाल्यावर तिनं माझ्याशी लग्न करावं अशी मी अपेक्षा तरी कशी करू? मला काही सुचत नव्हतं, मला वाटलं, लंडनला जावं, माझ्या वकिलाला भेटावं, तिच्यासाठी पैशाची वगैरे व्यवस्था करावी. पण, माय गॉड, मी किती मूर्ख होतो! संशयाची सुई सरळ सरळ माझ्यावरच येतेय. पण तरीही मला वाटतं पोलिसांची काही तरी चूक झाली असावी. तिनं स्वतःच जीव दिला असेल."

"तिनं कधी तुला ’लग्न केलं नाहीस तर जीव देईन.’ अशा प्रकारची धमकी दिली होती का?"

"कधीच नाही. ती आत्महत्या करणाऱ्यांमधली नव्हती."

"जो एलिस तुला माहीत आहे? कसा आहे तो?"

"तो सुतार ना? गावातला साधा सरळ माणूस आहे. जरासा मंदच! पण रोझसाठी तो वेडा झाला होता."

"त्याला तुझा मत्सर वाटत असेल."

"शक्य आहे. पण तो अगदी मवाळ आहे. आपलं दुःख गप्प बसून सहन करणाऱ्यांमधला."

"ठीक आहे. मी निघतो."   असं म्हणून सर हेन्री बाहेर पडले. कर्नल मेल्चेटना ते म्हणाले, "मेल्चेट, मला वाटतं आपण काही निर्णय घेण्यापूर्वी तो दुसरा मुलगा, कोण तो? हं, जो एलिस- त्याला भेटू या. तुम्ही कुणाला अटक केलीत आणि नंतर ते चूक ठरलं तर ते किती लाजिरवाणं होईल! शिवाय मत्सर हेही खुनामागचं कारण असू शकतं. अशी कित्येक उदाहरणं आपण पूर्वी पाहिलेली आहेत."

"आपलं म्हणणं बरोबर आहे."  इन्स्पेक्टर म्हणाला पण जो एलिस तशा प्रकारचा माणूस नाही. तो अगदी किडामुंगीला सुद्धा मारणार नाही. त्याला कधी संतापलेलं कुणी पाहिलं नाही. तरीही तुम्ही म्हणताय तर आपण त्याच्याकडे जाऊया आणि त्याला विचारू की काल रात्री तो कुठे होता. तो आता घरीच असेल. गावात मिसेस बार्टलेट  नावाची एक बाई आहे. धोबीण आहे. गावातले बहुतेक लोक तिच्याकडेच कपडे धुवायला देतात. बाई विधवा आहे, चांगली बाई आहे. जो एलिस तिच्याकडे भाड्याने राहतो."

बोलत बोलत ते एका छोट्याश्या स्वच्छ आणि नीटनेटक्या घरासमोर आले. एका मध्यमवयीन धडधाकट बाईने दार उघडले. तिचे डोळे निळे होते आणि चेहरा प्रसन्न होता.

"गुड मॉर्निंग, मिसेस बार्टलेट, जो एलिस घरात आहे का?" 

"हो, साहेब. आताच घरी आला. आपण आत या नं."

तिने आपले हात एप्रनला पुसले आणि ती त्यांना बैठकीच्या खोलीत घेऊन गेली. तिथे इकडेतिकडे पडलेल्या एकदोन वस्तू तिने घाईघाईने उचलून जागेवर ठेवल्या आणि तिघांना बसायला जागा करून दिली. नंतर जोला हाक मारली, "जो, तुला भेटायला काही लोक आलेत."

आतून आवाज आला, "आलोच मी. जरा हात धुवून येतो."

मिसेस बार्टलेट  हसली. सर हेन्री तिला म्हणाले, "तुम्ही पण बसा नं." 

मिसेस बार्टलेट जरा दचकलीच आणि म्हणाली, "छे, छे काहीतरीच काय साहेब!"

कर्नल मेल्चेटने सहजच विचारल्यासारखे विचारले, "जो एलिस भाडेकरू म्हणून कसा आहे हो?"

"काय सांगू साहेब, त्याच्याइतका चांगला भाडेकरू कुठेही मिळणार नाही. अगदी सरळमार्गी मुलगा. दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही. आपलं काम व्यवस्थित करतो. मला नेहमी मदत करतो. ती कपाटं दिसतायत ना, ती त्यानंच बनवली आहेत आणि स्वयंपाकघरातही त्यानं एक शेल्फ बसवून दिलं आहे. शिवाय घरातल्या बारीकसारीक गोष्टीतही तो मला मदत करतो. त्याबद्दल त्याचे साधे आभार मानलेलेही त्याला आवडत नाही. खरंच साहेब, त्याच्यासारखी मुलं हल्ली फारशी दिसत नाहीत."

"तो जिच्याशी लग्न करेल ती मुलगी भाग्यवानच म्हटली पाहिजे. त्याला ती रोझ एमट आवडत होती नाही का?"  मेल्चेटने सहजच विचारले.

मिसेस बार्टलेटने  एक सुस्कारा सोडला आणि म्हणाली, "मी त्याच्यापुढे हात टेकले. त्याचं त्या मुलीवर जिवापाड प्रेम होतं आणि ती त्याच्याकडे ढुंकूनही पहात नव्हती."

"जो संध्याकाळच्या वेळी साधारणपणे कुठे असतो?"  

"बहुतेक वेळा घरीच असतो. घरातलीच काहीबाही कामं करत असतो. शिवाय हल्ली पत्रव्यवहाराने बुक-कीपिंग पण शिकतोय."

"हो का? वा! मग काल संध्याकाळी पण तो घरातच होता का?"

"होय साहेब."

"नक्की, मिसेस बार्टलेट?" सर हेन्री एकदम म्हणाले.

मिसेस बार्टलेटने एकदम चमकून पाहिले. ती म्हणाली, "हो, साहेब."

"नीट आठवून सांगा, तो काल रात्री आठ-साडेआठच्या सुमारास  कुठे बाहेर गेला नव्हता?"

"छे,छे."  मिसेस बार्टलेट हसत म्हणाली, "काल संध्याकाळभर तो माझ्या स्वयंपाकघरातलं कपाट बसवत होता आणि मी त्याला मदत करत होते."

मिसेस बार्टलेट इतक्या सहजपणे आणि खात्रीपूर्वक हे बोलत होती की सर हेन्रींना तेच जरा संशयास्पद वाटायला लागले. तेवढ्यात जो  एलिस बैठकीच्या खोलीत आला.

तो चांगला उंचनिंच, देखणा तरुण होता. त्याच्या देखणेपणात थोडी गावरान झाक होती. थोडासा बुजरा वाटत होता. पण एकंदरीत कुणालाही चटकन आवडेल असा तरुण!

मेल्चेटने बोलायला सुरुवात केली आणि मिसेस बार्टलेट  स्वयंपाकघरात निघून गेल्या.

"एलिस, आम्ही रोझ एमटच्या मृत्यूबद्दल चौकशी करतोय. तुला ती माहीत होती नं?"

"हो, मला तिच्याशी लग्न करायचं होतं. गेली बिचारी." जो एलिसच्या तोंडून हे शब्द कसेबसे बाहेर पडले.

"ती कोणत्या परिस्थितीत होती तुला माहीत आहे?"

"हो."  जोच्या डोळ्यात संताप दिसू लागला. तो पुढे म्हणाला, "त्यानं तिला फसवलं. पण एका दृष्टीनं ते बरंच झालं. ती त्याच्याशी लग्न करून कधीही सुखी झाली नसती. हे झाल्याचं कळल्यावर तर माझी खात्रीच झाली की ती आता माझ्याकडे येईल. मी तिला नक्कीच आधार दिला असता."

"हे माहीत असूनसुद्धा..?"

"हो! त्यात तिचा काय दोष? त्यानं तिला खोटी वचनं दिली आणि फसवलं. तिनं मला सगळं सांगितलंय! तिला जीव द्यायचं काहीच कारण नव्हतं. त्याची तेवढी लायकीही नव्हती."

"एलिस, काल रात्री साडेआठच्या सुमाराला तू कुठे होतास?"

"मी इथेच होतो. मिसेस बार्टलेटच्या स्वयंपाकघरात एक कपाट बसवत होतो. तुम्ही त्यांना विचारा, त्या तेच सांगतील."

सर हेन्रींना वाटलं, एलिसचं उत्तर फारच लवकर आलं, म्हणजे उत्तर तयार असल्यासारखं. पण त्यातही त्याच्या चेहऱ्यावर ताण असल्याची एक सूक्ष्मशी छटा त्यांना दिसली. सर हेन्री मनात म्हणाले. ’हा मुलगा स्मार्ट दिसत नाही तरी उत्तर लगेच आलं.  ते आधीपासून पाठ करून ठेवलं होतं की काय?’ पण पुन्हा त्यांना वाटलं, ’नाही हा आपल्या कल्पनेचा खेळ आहे.’

एलिसला त्यांनी आणखी काही प्रश्न विचारले आणि ते सर्वजण बाहेर पडले. पण सर हेन्री काही तरी कारण सांगून स्वयंपाकघरात गेले. मिसेस बार्टलेट ओट्यावर काहीतरी करत होती. सर हेन्रींची चाहूल लागताच तिने वर पाहिले आणि त्यांच्याकडे पाहून ती हसली. नवीन कपाट बसवलेले दिसत होते. अजून थोडे काम बाकी होते. सुतारकामाची हत्यारे आणि काही लाकडाचे तुकडे तिथे पडलेले होते.

"काल रात्री एलिस हेच करत होता का?" सर हेन्रींनी विचारले.

"हो. छान केलंय नं? जो चांगलाच कारागीर आहे."

’तिच्या डोळ्यात काही भीती, अवघडलेपण काहीच दिसत नाही. पण मग एलिसच्या चेहऱ्यावरील ती ताणाची छटा? का हे सर्व माझ्याच कल्पनेचे खेळ? नाही, नाही. काही तरी भानगड आहे. एलिसशी पुन्हा बोलायला पाहिजे.’ हे सर्व सर हेन्रींच्या मनात चालले होते.

स्वयंपाकघरातून बाहेर पडताना एका बाबागाडीसारख्या दिसणाऱ्या गाडीला सर हेन्रींचा धक्का लागला. ते चटकन बाजूला झाले आणि म्हणाले, "अरेरे, मी बाळाला उठवलं तर नाही नं?"

मिसेस बार्टलेट हसली आणि म्हणाली, "नाही साहेब. मला मूलबाळ नाही." मिसेस बार्टलेटच्या चेहऱ्यावर हसतानाही विषाद उमटला. ती पुढे म्हणाली, "त्या ढकलगाडीतून मी धुवायचे कपडे घेऊन येते आणि धुतलेले कपडे घेऊन जाते." 

"ओह, असं आहे होय?"

क्षणभर थांबून ते एकदम म्हणाले, "मिसेस बार्टलेट, एक सांगा. ह्या रोझ एमटबद्दल तुमचं काय मत होतं?"

"माझ्या मते ती उच्छृंखल, जरा चवचाल म्हणावी अशीच होती. पण जाऊ दे. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये."

"बरोबर आहे तुमचं, पण मला तुमचं मत जाणून घ्यायचंय आणि त्याला सबळ कारणही आहे."

मिसेस बार्टलेट जरा थांबल्या, त्यांनी जरा विचार केला आणि मग त्यांनी सांगायचे ठरवले.

"साहेब, ती चांगली नव्हती. जोसमोर मी हे म्हणणार नाही. पण तिच्यासारख्या मुली असंच करतात. तुम्हाला माहीतच असेल साहेब."

सर हेन्रींना माहीत होते. जो एलिससारखी मुले चटकन कोणावरही विश्वास ठेवतात. त्यामुळेच त्यांना सत्य कळले की त्यांना फार मोठा धक्का बसतो.

ते घरातून बाहेर पडले तेव्हा ते बुचकळ्यात पडले होते. त्यांना आता पुढे काही मार्ग दिसत नव्हता. जो एलिस संपूर्ण संध्याकाळ घरीच होता. मिसेस बार्टलेटनं त्याला काम करताना पाहिलेलं आहे. मग काय झालं असेल? जो एलिसचा संशय घेण्यासारखं काहीच नव्हतं. केवळ सर हेन्रींना त्यानं दिलेलं उत्तर पाठ करून दिल्यासारखं वाटलं इतकंच.

कर्नल मेल्चेट म्हणाले, "आता हे स्पष्ट झालं. जो एलिस ह्याच्यात नाहीये."

इन्स्पेक्टर म्हणाला, "सॅन्डफर्ड गुन्हेगार आहे. सगळा पुरावा त्याच्याविरुद्ध आहे. सर्व काही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. ती मुलगी आणि तिचा बाप तिला ब्लॅकमेल करायला निघाले असणार. ह्या माणसाकडे म्हणावा तसा पैसा काही दिसत नाही. आणि हे प्रकरण त्याच्या लंडनमधल्या मैत्रिणीच्या कानावर गेलं तर त्याचं लग्नच मोडलं असतं. तेव्हा त्याला हाच एक मार्ग उरला होता. तुम्हाला काय वाटतं सर?"  त्याने सर हेन्रींकडे आदराने पाहात विचारले.

सर हेन्री म्हणाले, "असं वाटतंय खरं पण तरीही सॅन्डफर्ड असं काही कृत्य करेल असं मला वाटत नाही."

पण मनातल्या मनात त्यांनी कबूल केले होते की गरिबातली गरीब गाय सुद्धा पेचात सापडली की शिंग उगारतेच.

ते एकदम म्हणाले, "मला त्या मुलाला भेटायचंय. तो हो, ज्याने त्या मुलीची किंकाळी ऐकली."
--------
क्रमशः