नदीने घेतलेला बळी - २

सर हेन्री चीफ काँस्टेबल कर्नल मेल्चेट आणि इन्स्पेक्टर ड्रुइट यांच्या बरोवर बसले होते. चीफ काँस्टेबल धिप्पाड नसले तरी त्यांची लष्करी पार्श्वभूमी कळून येत होती. इन्स्पेक्टर मात्र उंचापुरा होता आणि एकूणच समंजस दिसत होता.

"मी आपला तुमच्यामध्ये असाच घुसतोय पण मी हे का करतोय हे मलाच सांगता येणार नाही!" सर हेन्री हसत हसत म्हणाले.

"अहो, आम्हाला बरंच वाटतंय. एक प्रकारे ही आमची तारीफच आहे." चीफ काँस्टेबल म्हणाले.

"सर हेन्री, हा आमचा सन्मान आहे." इन्स्पेक्टर म्हणाला.

चीफ काँस्टेबल मनात म्हणत होते, ’साहेबांना बँट्रीकडे जाम बोअर होत असणार. तो कर्नल बँट्री सरकारला नावं ठेवण्यापलीकडे दुसरं काही बोलत नसणार आणि त्याच्या बायकोला तर तिची बाग, तिच्यातली झाडं आणि फुलं याशिवाय बोलायला दुसरं काही नसतंच.’

इन्स्पेक्टर विचार करत होता, ’सर हेन्री म्हणजे इंग्लंडातला सर्वांत तल्लख मेंदू असं म्हणतात. पण ते इथे असताना अगदी साधी, सरळ केस आमच्याकडे यावी हे आमचं दुर्दैवच म्हणायचं.’

उघडपणे चीफ काँस्टेबल म्हणाले,"मला वाटतंय की केस अगदी सरळ आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं मुलीनंच आत्महत्या केली. ती.. म्हणजे..  शी वॉज फॅमिली वे  हे तुमच्या कानावर आलं असेलच. पण आमचे डॉक्टर हेडॉक हुशार आहेत. त्यांना तिच्या दोन्ही हातांवर, म्हणजे दंडांवर दाब दिल्याच्या खुणा दिसल्या आणि त्या मृत्यूपूर्वी झालेल्या आहेत ह्याबद्दल त्यांची खात्री आहे. शिवाय एखाद्यानं तिला नदीत ढकलताना दंडाला जिथे धरलं असेल तिथेच त्या खुणा आहेत."

"असं ढकलून द्यायला खूप शक्ती लागत असेल नाही का?"

"असंच काही नाही. त्या मुलीच्या नकळत कुणी मागून आलं असेल तर तिला काही प्रतिकारही करता आला नसेल. तो पूल लाकडाचा आहे, त्याच्यावर घसरडंही झालेलं असतं आणि त्या बाजूला कठडा पण नाहीये."

"तुमची खात्री आहे ही घटना तिथेच घडली?"

"हो. एक दहा-बारा वर्षांचा मुलगा -जिमी ब्राऊन त्याचं नाव- तो नदीच्या पलीकडच्या बाजूच्या झाडीत होता. त्यानं पुलाच्या दिशेनं आलेली किंकाळी आणि त्यापाठोपाठ नदीत धपकन काही तरी पडल्याचा आवाज ऐकला. संध्याकाळची वेळ होती. नीटसं दिसत नव्हतं. त्याला काही तरी पांढरी वस्तू नदीत पडलेली दिसली. त्यानं धावत जाऊन लोकांना जमा केलं आणि त्या सर्वांनी तिला वर काढलं पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता."

सर हेन्रींनी मान हलवली आणि म्हणाले, "त्या मुलाला पुलावर कुणी दिसलं नाही का?"

"नाही. पण मी तुम्हाला म्हटलं नाही का, संध्याकाळची वेळ होती आणि त्या भागात धुकं पण असतं. तेव्हा त्याला वाटलं, त्यालाच काय सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं की तिनं स्वत:च नदीत उडी घेतली. अर्थात मी त्याला विचारणार आहे की किंकाळीच्या आधी किंवा नंतर त्यानं कुणाला पाहिलं का?"     

"शिवाय आपल्याकडे ती चिठ्ठी पण आहे."  मेल्चेट सर हेन्रींकडे वळून म्हणाले, "त्या मुलीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. चित्रकार किंवा अर्किटेक्ट लोक वापरतात त्या पेन्सिलीने लिहिलेली होती. कागद चांगलाच भिजलेला होता पण तरी आम्हाला ती वाचता आली."

"काय होतं चिठ्ठीत?"

"ती सॅन्डफर्डने लिहिलेली होती. त्यात लिहिलं होतं, ’ठीक आहे. मी संध्याकाळी साडेआठ वाजता तुला पुलाजवळ भेटीन. -आर.एस.’ -- तर जिमी ब्राऊननं जो आवाज ऐकला तो साधारण साडेआठनंतर काही मिनिटांनी."

"तुम्हाला सॅन्डफर्ड माहीत आहे का? तो काही महिन्यांपूर्वी गावात आला. आर्किटेक्ट आहे. आताच्या काळातला! आधुनिक! ॲलिंग्टनच्या घराचं नूतनीकरण तो करतोय. काचेचं जेवणाचं टेबल, स्टीलच्या वेबिंग लावलेल्या खुर्च्या. म्हणजे हे धड नवंही नाही आणि जुनंही नाही. पण त्यावरून तो कशा प्रकारचा माणूस आहे हे कळतंय. काही तरी वेगळं, प्रस्थापित गोष्टींच्या विरूद्ध काही तरी करण्याची आवड असलेला.

सर हेन्री म्हणाले, "सिडक्शन ही गोष्ट  फार पूर्वीपासूनची आहे. अर्थात ती खुनाइतकी  पुरातन नाही."

"खरं आहे, खरं आहे" कर्नल मेल्चेट काही तरी बोलायचं म्हणून म्हणाले.

"सर हेन्री, ही घटना फार वाईट आहे, पण केस म्हणून अगदी साधी, सरळ आहे. सॅन्डफर्डचं आणि त्या मुलीचं लफडं. मुलगी आली अडचणीत. त्यानं ठरवलं की आपण आता लंडनला परत गेलेलं बरं. तिथे त्याची एक गर्ल फ्रेंड आहे. त्यांचं लवकरच लग्न होणार आहे. तिच्या कानावर ही गोष्ट गेली तर ती त्याला भाजून खाईल. म्हणून तो रोझला पुलावर भेटला. संध्याकाळची वेळ, शिवाय धुकंही होतं. जवळपास कुणी नाही. त्यानं मागून येऊन तिला धरलं आणि दिलं ढकलून. ..... असं माझं मत आहे." ड्रुइट म्हणाला.

सर हेन्री काही बोलले नाहीत. पण त्यांच्या लक्षात आलं की लहान गावातल्या माणसांचा  शहरातल्या लोकांविषयी एक पूर्वग्रह असतो तो इथे जाणवत आहे. सेंट मेरी मीड सारखं लहानसं गाव एका आधुनिक आर्किटेक्टला स्वीकारणं कठीणच आहे. उघडपणे ते म्हणाले, "ते मूल सॅन्डफर्डचंच आहे याची खात्री आहे?"

ड्रुइट म्हणाला, "अगदी १०० टक्के. रोझ एमटनं स्वत:च आपल्या वडिलांना तसं सांगितलं. तिला वाटत होतं, तो तिच्याशी लग्न करेल! पण तो? आणि लग्न करणार? शक्यच नाही!" 

सर हेन्रींच्या मनात आलं, ’ही तर मिड-व्हिक्टोरियन काळतली गोष्ट दिसतेय. साधीभोळी मुलगी, लंडनहून आलेला लबाड, छाकटा तरुण, मुलीचा कडक बाप, मुलानं मुलीला फसवणं... आता फक्त गावातला साधा, प्रामाणिक आणि मुलीवर एकनिष्ठपणे आणि एकतर्फी प्रेम करणारा मुलगा हवा. म्हणजे कहाणी पूर्ण!’

उघडपणे ते म्हणाले, "ह्या मुलीचा कोणी गावातलाच प्रेमी नाही का?"

"आहे तर! जो एलिस. फार चांगला मुलगा. सुतारकाम करतो. ती जो एलिसलाच धरून राहिली असती तर ..."

कर्नल मेल्चेटनं सहमतीदर्शक मान हलवली. ते म्हणाले, "आपल्या वर्गाच्या लोकांनाच धरून रहावं."

"जो एलिसला हे सगळं ऐकून काय वाटलं?" सर हेन्रींनी विचारलं.

इन्स्पेक्टर म्हणाला, "ते काही कुणाला कळलं नाही. जो स्वभावानं फार शांत आहे. शिवाय त्याच्या नजरेत रोझनं केलेली कोणतीही गोष्ट चूक असतच नाही. तिनं त्याला चांगलंच झुलवलं. पण त्याला खात्री वाटत होती की ती शेवटी त्याच्याकडे परत येईल."

"मला त्याला भेटायला आवडेल." सर हेन्री उत्साहाने म्हणाले.

कर्नल मेल्चेट म्हणाले, "आपण जाणारच आहोत त्याच्याकडे. कोणताही मुद्दा आपण सोडणार नाही. आपण आधी एमटला भेटू, त्यानंतर सॅन्डफर्ड आणि मग आपण जो एलिसकडे जाऊ. क्लिदरिंग, तुम्हाला काय वाटतं?"  

"ठीक आहे." सर हेन्री म्हणाले.

ते टॉम एमटला भेटायला ब्लू बोअर मध्ये गेले. एमट एक उंचापुरा, धिप्पाड मध्यमवयीन माणूस होता. त्याच्या डोळ्यावरून तो विश्वास ठेवण्यासारखा माणूस वाटत नव्हता. शिवाय चेहऱ्यावरून तो भांडणारा असेल असेही वाटत होते.

"गुड मॉर्निंग कर्नल. गुड मॉर्निंग सर. बरं झालं तुम्ही आलात ते. या, इकडे आत या म्हणजे आपल्याला जरा नीट बोलता येईल. बरं साहेब, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? काहीच नाही? ठीक आहे. तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही माझ्या मुलीसाठी आला असाल. रोझ फार चांगली मुलगी होती हो. पण हा भोxxxx आला! माझ्या भाषेसाठी मला माफ करा, पण तो तसाच होता. त्यानं रोझला लग्नाचं वचन पण दिलं होतं. मी त्याला कोर्टात खेचणार आहे. त्यानं तिच्यावर ही वेळ आणली. एक प्रकारे त्यानं तिचा खूनच केला आहे. आमची मुलगी गेली ती गेली आणि आमच्या कुटुंबाचीही नाचक्की झाली."

"तुमच्या मुलीनं तुम्हाला अगदी खात्रीनं सांगितलं की सॅन्डफर्डच तिच्या ह्या परिस्थितीला कारणीभूत आहे."

"हो अगदी शपथेवर. ह्याच खोलीत तिनं मला हे सांगितलं."

"मग तुम्ही तिला काय म्हणालात?"

"काय म्हणालो?" रोझचा बाप जरा सटपटलाच.

"हो. म्हणजे घरातून हाकलून देईन असं काही म्हणाला नाहीत?"

"नाही. मी खूपच अपसेट झालो. तुम्हालाही हे पटेल पण मी तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली नाही. मी तसं केलंही नसतं." त्यानं पुन्हा आपला रुद्रावतार धारण केला. "अहो, कायदा कशासाठी आहे? हं? कशासाठी आहे कायदा? त्यानं माझ्या मुलीला जी वागणूक दिली आहे त्याची भरपाई त्यानं करायलाच पाहिजे. नाही केली तर त्याला त्याची शिक्षा भोगायला लागेल. नक्कीच लागेल." असे म्हणत त्याने आपली मूठ टेबलावर आपटली.

"तुम्ही मुलीला शेवटचं केव्हा बघितलं होत?" मेल्चेटनं विचारलं.

"काल संध्याकाळी, चहाच्या वेळेला."

"तेव्हा तिचा मूड कसा होता?"

"नेहमीसारखाच होता. मला तर तिच्या बोलण्याचालण्यात काही वेगळं वाटलं नाही. मला जर हे माहीत असतं....."

"पण तुम्हाला माहीत नव्हतं." इन्स्पेक्टर तुटकपणे म्हणाला आणि ते जायला निघाले.

"एमटबद्दल माझं काही फारसं चांगलं मत झालं नाही." सर हेन्री म्हणाले.

"तो चांगला माणूस नाहीच. " कर्नल मेल्चेट म्हणाले. "त्याला संधी मिळाली असती तर त्यानं सॅन्डफर्डला पिळून काढलं असतं."

त्यानंतर ते सॅन्डफर्डच्या घरी गेले. रेक्स सॅन्डफर्डबद्दल सर हेन्रींनी जी कल्पना केली होती त्यापेक्षा तो अगदीच वेगळा निघाला. तो गोरापान, उंच आणि बारीक होता. डोळे निळे आणि स्वप्नाळू होते. केस जरा लांब आणि विस्कटलेले होते आणि त्याचा आवाज जरा बायकी होता.

कर्नल मेल्चेट यांनी स्वत:ची आणि इतरांची ओळख करून दिली आणि आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. आदल्या दिवशीच्या संध्याकाळच्या आपल्या हालचालींबद्दल सॅन्डफर्डनं स्टेटमेंट द्यावं असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही स्टेटमेंट दिलंच पाहिजे अशी सक्ती मी तुमच्यावर करू शकत नाही. आणि एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की स्टेटमेंटमध्ये तुम्ही जे सांगाल ते तुमच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरलं जाईल."   

सॅन्डफर्ड जरा गोंधळून म्हणाला, "मला.. मला काहीच कळत नाहीये."

"तुम्हाला रोझ एमट काल रात्री बुडून मेली हे माहीत असेल."

"हो, माहीत आहे मला. फार वाईट झालं. काल रात्रभर मला झोप लागली नाही. आज सकाळपासून माझं कामात लक्ष लागत नाहीये. मला काय होतंय ते तुम्हाला कळणार नाही. मला वाटतं की मीच ह्या सगळ्याला जबाबदार आहे."

सॅन्डफर्ड तुटकतुटक बोलत होता. तो बेचैन आहे दिसतच होतं. तो मधूनच केसांमधून हात फिरवत होता आणि आधीच विस्कटलेले त्याचे केस आणखी विस्कटले जात होते. 

"असं काही होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. ती असं काही करेल हे माझ्या स्वप्नातही आलं नाही."

तो खाली बसला आणि त्याने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला.

"मिस्टर सॅन्डफर्ड, तुम्ही काल रात्री साडेआठच्या सुमारास कुठे होता त्याबद्दलचं स्टेटमेंट देणार नाही असं मी समजू का?"

"नाही, नाही. असं नाही. मी घरी नव्हतो. बाहेर फिरायला गेलो होतो."

"तुम्ही मिस एमटला भेटायला गेला होता?"

"नाही. मी एकटाच नदीकाठच्या झाडीमध्ये गेलो होतो."

"असं असेल तर त्या मुलीच्या खिशात सापडलेल्या ह्या चिठ्ठीचं तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल?"  असे म्हणून इन्स्पेक्टर ड्रुइटने ती चिठ्ठी निर्विकारपणे वाचून दाखवली आणि पुढे तो म्हणाला, "ही चिठ्ठी तुम्ही लिहिली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का?"

"नाही, नाही. ती चिठ्ठी मीच लिहिली आहे. रोझनं मला भेटायला बोलावलं होतं. ती अगदी मागेच लागली. मला कळेना काय करावं? शेवटी मी ती चिठ्ठी लिहिली."

"हंऽऽ, आता कसं!"

हे ऐकून सॅन्डफर्ड एकदम ओरडला, "पण मी गेलो नाही. मी खरंच गेलो नाही. मला वाटलं मी गेलो नाही तरच बरं. मी उद्या लंडनला जाणार होतो. मला वाटलं, तिला न भेटलेलंच बरं. मी लंडनला जाऊन तिच्यासाठी काही तरी व्यवस्था करणार होतो आणि तिला तसं कळवणार होतो."

"तुम्हाला हे माहीत आहे का की तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे पिता तुम्ही आहात असं तिनं सांगितलं आहे?"

सॅन्डफर्डच्या तोंडून नुसताच  कण्हल्यासारखा आवाज आला.

"तिचं- म्हणणं- बरोबर- होतं- का?" इन्स्पेक्टरने एकेका शब्दावर जोर देत विचारले.

सॅन्डफर्डने आपला चेहरा दोन्ही हातात लपवला आणि कसंबसं म्हणाला, "हो."

"हंऽ"  इन्स्पेक्टर ड्रुइटला झालेला आनंद त्याला लपवता आला नाही!  "आता तुमच्या संध्याकाळच्या ’वॉक’बद्दल! कुणी तुम्हाला तेव्हा पाहिलं कां?"

"मला नाही माहीत. मला नाही वाटत कुणी मला पाहिलं असेल. निदान मला तरी कुणी भेटलं नाही."

"अरेरे!"

"म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय?" सॅन्डफर्ड चमकून म्हणाला. "मी फिरायला गेलो होतो किंवा नाही त्यामुळे काय फरक पडणार आहे?  रोझनं नदीत जीव दिला त्याच्याशी ह्याचा काय संबंध?"

इन्स्पेक्टर म्हणाला, "मि.सॅन्डफर्ड, तिनं जीव दिला नाही, तिला पुलावरून कुणीतरी ढकलून दिलं."

सॅन्डफर्डला एक मिनिटभर आपण काय ऐकतोय तेच कळेना. "माय गॉड" असं म्हणत तो धपकन खुर्चीत बसला.

तिघे जण जायला निघाले. जाता जाता कर्नल मेल्चेट सॅन्डफर्डला म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हे घर सोडून जायचं नाही."  आणि मेल्चेट आणि ड्रुइट यांनी एकमेकांकडे सहेतुक नजरेने पाहिले.

ड्रुइट म्हणाला, "सर, सगळं स्पष्ट झालं आहे."

"हो, त्याच्या नावे वॉरंट काढा आणि त्याला अटक करा."

तेवढ्यात सर हेन्री म्हणाले, "अरेच्चा, मी माझे हातमोजे आतच विसरलो."
------------
क्रमशः