युति का तुटली ? भाग १

माझा राजकारणाचा अभ्यास नाही व तो माझा प्रांतही नाही. मी नेहमी त्यापासून लांब राहत आलो आहे. पण भाऊ तोरसेकर यांच्या एका लेखाची लिंक मला माझ्या पुतण्याने वर्षापूर्वी पाठवली होती. वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या वाचून माझे मोदींबाबत जे मत तयार झाले होते त्याच्या पेक्षा अगदीच वेगळे वाचायला मिळाल्याने माझे कुतहूल जागे झाले. आंणखी काही लेख वाचल्यावर माझ्या लक्षात आले की परीस्थोती खूप झपाट्याने व आमूलाग्र बदलते आहे. व याकडे काणाडोळा करून चालणार नाही. मग मात्र भाऊ तोरसेकरांचे जागतापहारा, उलटतपासणी व पंचनामा हे तीनही ब्लॉग वरील सर्व लेख वाचले. मानुषी या साईटवरील माहिती पण वाचनात आली. मोदींच्या भाषणाचे सारांश पण वाचत राहिलो. मोदींच्या विरोधातील माहिती या अगोदर १० वर्षे कळलेली होतीच. माझा अभ्यास येवढाच आहे. महाराष्ट्रातील निवडणूकीचे वारे वाहू लागल्यावर मनात अनेक प्रकारे विचार येऊ लागले. पण त्या विचारांशी जवळ जाईल असे काही वाचनात येत नव्हते. मी विचार बरोबर करतो आहे की नाही हेच कळेनासे झाले. शेवटी मनाचा हिय्या करून माझे विचार लिहून काढून ते इथे मांडायचे प्रयत्न करतोय. त्यामागे एकच हेतू आहे तो म्हणजे माझ्या विचारात काही त्रुटी असल्यास किंवा ते विचार एकांगी होत असतील तर ते तपासून पाहणे.
मात्र एक गोष्ट अगोदरच स्पष्ट करू इच्छितो की, मी कोणा एका व्यक्तीचा अथवा पक्षाचा नाही. माझी एवढीच अपेक्षा आहे की, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी भ्रष्टाचार करू नये. त्याच्याकडे भारताची प्रगती करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असावी आणि सनदी नोकरांकडून हे काम करून घेण्यासाठी प्रशासनावर घट्ट मांड ठोकून बसण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी. मग असा माणूस कोणीही असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मोदी मला वाटते कोणतीही गोष्ट करताना खूपच अगोदर तयारी करत असावेत. लोकसभेची तयारी पण त्यांनी इतरांच्या मानाने खूप अगोदर सुरू केली होती. आणि असे असेल तर मला वाटते महाराष्ट्र विधानसभेचा विचारही त्यांनी लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या अगोदरच केलेला असावा अशी दाट शंका येते.
तसे म्हटले तर प्रत्येक राजकारणी आपली तयारी नेहमीच खूप अगोदर करत असतो त्यामुळे याबाबतीत मोदीची भलावण करण्याची काय जरूरी आहे असे वाटण्याची शक्यता आहे.
तरीपण एक मोठा फरक शिल्लक राहतोच. आणि त्या मुद्द्याबद्दलच लिहितोय.
साधारणत: राजकारणी जे डावपेच आखतात त्यांमध्ये त्यांना सतत बदल करायला लागतो. "मी व माझे" हे स्वार्थीपणाचे दोन घटक त्यांच्या डावपेचांवर सातत्याने परिणाम करत असतात. उदा. माझा मुलगा, माझे घराणे, केलेली पापे उघडकीस येऊ नये म्हणून करायला लागणाऱ्या तडजोडी वगैरे.  निव्वळ सत्तेसाठी सत्तासंपादन करणाऱ्यांचे नेहमी असेच होत असते. थोडक्यात आखलेले मूळचे डावपेच व प्रत्यक्षात आणले गेलेले डावपेच यात फरक पडल्याने त्या डावपेचांची परिणामकारकताच खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते.
याउलट जे डावपेच मोदी आखतात त्यात फार मोठे बदल करण्याची मोदींना आवश्यकता भासत नाही. स्वतः:साठी किंवा नातेवाईकांसाठी किंवा पैशासाठी काहीच करायचे नसल्याने व समाजसेवेचे साधन म्हणून सत्तासंपादन करायचे असल्याने काही बदल करायला लागले तरी ते फार वरवरचे असतात. त्यामुळे  होते काय की, संपूर्ण वाटचालीत एकसूत्रीपणा असतो. गडबड गोंधळ अजिबात होत नाही. साहजिकच प्रयत्नांचा पुरेपूर फायदा होतो. मूळ डावपेच व प्रत्यक्षात आणले गेलेले डावपेच यात फारसे अंतर पडलेले नसते.
लोकसभेच्या निवडणूकां जिंकून भारताची सेवा करायची असेल तर भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार असले पाहिजे आणि प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेऊन कधीही काहीही साधता येणार नाही ह्या मूलभूत विचाराने मोदींची वाटचाल सुरू झाली व या मूलभूत संकल्पनेत त्यांना काढीही बदल करायला लागला नाही. कसे ते पाहू या.
भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवली पाहिजे (मिशन २७२+) आणि ते शक्य आहे हे मोदी मांडत गेले. तर बाकी सर्व आघाडीच्या सरकारशिवाय गत्यंतर नाही या मतांवर ठाम असल्याने पहिला संघर्ष सुरू झाला. आत्मविश्वास दोन्ही बाजूंना होता. मोदी एवढे म्हणताहेत तर देऊ त्यांना संधी. निदान नुकसान तर नक्कीच होणार नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. या विचाराच्या आधारावर मोदी पहिली लढाई गोव्यात जिंकले व त्यांना लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख बनता आले.
मोदींना पंतप्रधान पदाची उमेदवारी व नितिशकुमार बाहेर पडणे हा दुसरा मोठा संघर्ष होता. तेव्हाही मिशन २७२+ यशस्वी झाले तरच मी पंतप्रधान होईन अन्यथा मी बाजूला होईन या एका आश्वासनाच्या जोरावर त्यांनी हा संघर्ष मिटवला असावा अशी दाट शंका येते. विरुद्ध बाजूच्या लोकांची आघाडी सरकारशिवाय कोणताही पर्याय नाही या विचारावर एवढी अतोनात श्रद्धा होती की मोदींचा पूर्ण वापर करून घेऊन आपल्या हातात अलगद पंतप्रधान पद येईल या स्वप्नात बाकीचे मशगुल झाले. कोणत्याही प्रकारे आपले नुकसान होत नाहीये किंवा आपली पंतप्रधान होण्याच्या इच्छापूर्तीच्या काहीही आड येत नाहीये या विचाराच्या आधारावर विरोधकांनी त्यांचा विरोध सोडून दिला असला पाहिजे.  हा दुसरा विरोधही मोदी बाजूला सारू शकले कारण मोदींना वैयक्तिक स्वार्थ नसल्याने व निव्वळ समाजसेवेसाठी सत्ता पाहिजे असल्याने त्यांना आघाडीचा पंतप्रधान होण्यात स्वारस्य असण्याचे काही कारणच नव्हते. त्यामुळे फक्त दोन दिवसात सर्व संघर्ष मिटून सर्व गाडी पूर्वपदावर आलेली होती. इतकेच नव्हे तर स्वपक्षातल्या विरोधकांच्या कारवायांना तोंड देण्यात फारशी शक्ती खर्च करायला लागली नाही. कारण आपल्याला अपयश येईल असे त्यांच्या विरोधकांना कधी वाटलेच नाही.
निकाल लागल्यावर मोदी विरोधकांची एक प्रकारची नाराजी दिसून आली कारण निकालाचा दिवस उजाडेपर्यंत आपलाच विजय होणार ह्या त्यांच्या ठाम विश्वासाला कधीच तडा गेला नाही. मात्र निकालाच्या पहिल्या काही तासात हा तडा जेव्हा गेला तेव्हा विरोधकांच्या हातात काहीच शिल्लक राहिलेले नव्हते. 
आता थोडेसे महाराष्ट्राबद्दल.
आत्मविश्वास हा मोदींचा मुख्य गुण. दुसरा गुण म्हणजे संयम. ह्या गुणांबद्दल बरेच लिहिता येईल पण आत्ता नको. 
जर २७२+ मिशन यशस्वी झाले तर महाराष्ट्रात शिवसेना व भाजप युतीला यश नक्कीच मिळणार हे गृहीत धरायला लागते. आणि त्यासाठी शिवसेनेची व भाजपाच्या मतात वाढ होऊन मनसेची मते कमी व्हायलाच पाहिजेत. अन्यथा महाराष्ट्रात यश मिळणे शक्यच नाही. बाळासाहेबांच्या हयातीत सुद्धा मनसेला थोपवणे उध्द्ववजींना शक्य झाले नाही ते शक्य होण्याची शक्यता त्यामुळे गृहीत धरण्याशिवाय पर्यायच राहतं नाही. पण शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेऊन (महाराष्ट्राच्या भल्याचे) काहीही साधता येणार नाही हे तर मूळ गृहीतक आहे. मग...?
जर शिवसेनेला आटोक्यात ठेवायचे असेल तर मनसे जगली पाहिजे. मनसेच्या दारी गडकरी चपला झिजवत होते त्याचे हेच कारण होते. जर मनसेने त्या वेळेस मोदींचे ऐकले असते तर १) मनसेची मूठ झाकलेली राहिली असती. २) शिवसेना जिंकूनही सारे श्रेय मोदींना किंवा शिवसेनेला न मिळता मनसेला मिळाले असते. ३) आपल्याला निव्वळ आपल्या जोरावर मते मिळाली किंवा आपण स्वबळावर मनसेवर मात केली असा भ्रम शिवसेनेला न झाल्याने विचानसभेच्या जागावाटपात मोठा वाटा मिळवता आला असता. ४) मनसेलाही युतीत सामील करून घेऊन शिवसेनेच्या जागा आणखी कमी करता आल्या असत्या. ५) तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही मनसे बरोबर जाऊ हा शेवटचा दरडावणीचा उपाय योजता आला असता. 
थोडक्यात महाराष्ट्राच्या राज्यकारभारात शिवसेनेच्या कुबड्या घेऊन भव्यदिव्य काही साधता येणार नाही हा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा हा प्रयत्न होता व तो सुद्धा लोकसभा निवडणुकांची धामधूम चालू असताना. 
मुख्य म्हणजे ह्या सर्व प्रयत्नात अपयश येण्याचा प्रश्नच येत नव्हता. कारण मिशन २७२+ यशस्वी झाले नाही तर बाजूला होऊन गुजराथेत परत जायची तयारी होतीच. पंतप्रधान पदाचा मोह कधीच नव्हता. आघाडी सरकारचा पंतप्रधान म्हणून तर कदापिही नाही. कोणी पंतप्रधान पद  देऊ केले तरी नको म्हणायचे हे निश्चित झालेले होते. शिवाय नवीन पंतप्रधान जो कोणी होईल तो कॉग्रेसचा नसल्याने गुजराथामध्येही बरेच काही करता येण्यासारखे होते जे कॉग्रेसचा पंतप्रधान असताना करता आले नव्हते. कोणत्याही प्रकारे अजिबात नुकसान नाही ही पूर्ण खात्री असते ना तेव्हा त्याला म्हणतात आत्मविश्वास. आणि जेव्हा मी व माझे हे दोन स्वार्थी घटक नसतात ना तेव्हाच हे शक्य होते.
अशा प्रकारचा आत्मविश्वास न भूतो न भविष्यति अशा घटना घडवून आणतो. शिवरायांच्या जीवनात अशा कित्येक घटना घडल्याचे आढळून येईल.
शेवटी एक वाक्य लिहून थांबतो.
मोदी समजणे फार अवघड आहे असे वाटतेय. नेहमीच्या राजकारणी माणसा सारखे त्याच्या कडे पाहिले तर फसगत व्हायची शक्यता जास्त असावी. अध्यात्मिक चष्म्यातून पण थोडेसे पाहायला लागेल असे मला वाटायला लागलेय. 
हा चष्मा बाजूला ठेवला तर शिवाजी पण कळणे कठीण जाईल. असो.