युती का तुटली ? भाग २

इथे एक गोष्ट प्रथमच स्पष्ट करतो की, मोदींना प्रादेशिक पक्षाबद्दल राग अथवा द्वेष नाही पण काही झाले तरी प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेऊन भव्य दिव्य असे काहीही साकार करता येणार नाही या निष्कर्षाप्रत ते आलेले असून आता तर ते त्यांचे मुख्य धोरण बनले असावे. कदाचित गेल्या दोन दशकापेक्षा जास्त काळ चाललेल्या आघाडी सरकारांचा कार्याचा अनुभव त्याला कारणीभूत असू शकेल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत असून या गृहितकावर पुढील विचार आधारित असल्याने हे सर्व स्पष्ट करणे जरूरीचे वाटले.
माणसाला प्रथम कोणत्यातरी व्यक्तीचा राग येतो प्रत्येक वेळेस असा राग त्या माणसाची सारासार विवेकबुध्दी कमकुवत करत असतो. हे वारंवार घडू लागले की, रागाचे रूपांतर द्वेषात होऊ लागते. याचकाळात सुरवातीच्या धुसफुशीचे रूपांतर भाऊबंदकीत होऊन तिने चांगले बाळसे धरलेले असते. अशी चांगली पिकायला आलेली भाऊबंदकी जेव्हा परिपक्व होते तेव्हा, स्वत:चे नाक कापीन पण तुला अपशकून करीन ही वृत्ती जन्माला येते. या महाराष्ट्राला हा भाऊबंदकीचा शाप फार भोवतोय. मी व माझे हे स्वार्थाचे दोन घटक नेहमीच यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ही सगळीच प्रक्रिया इतकी सावकाशीने होत असते की रोग झाल्याचे कळतच नाही. आणि हा रोग जेव्हा भरात असतो ना तेव्हा सूड घ्यायला मिळणार या आनंदाच्या धुंदीत सर्व निर्णय प्रक्रिया त्या माणसाकडून राबवली जात असते. असो.
तर सांगायचा मुद्दा असा की राज ठाकरेंच्या घरी गडकरींच्या फेऱ्या सुरू असताना उद्धव ठाकरेंनी अचूक खेळी खेळली. त्यांनी त्या वेळेस केलेल्या वक्तव्यांनी राज ठाकरेंचा राग अनावर झाला असावा असे वाटते. एकवेळ भाजपाविरुद्ध उमेदवार देणार नाही पण शिवसेनेला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे केले.
मात्र मोदीची खेळी ओळखून उद्धवजी तसे वागले का गडकरी व राज ठाकऱ्यांची भेट होतीय हे कळल्यामुळे उद्धवजींची भाऊबंदकी उफाळून येऊन त्यांनी रागाच्या भरात राज ठाकरेंना राग येईल असे वक्तव्य केले हे देवच जाणे.
मात्र माझा पाठिंबा मोदींनाच अशी गर्जना करत पुण्यात भाजपविरोधात उमेदवार उभा केल्याने सर्वसामान्य भाजपप्रेमी व कदाचित मनसे समर्थक नक्कीच बुचकळ्यात पडलेले असणार हे नक्की. मग त्यामागे मनसेचे काहीही गणित असो.
पण काहीही असो. पहिली फेरी उद्धवजी जिंकले हे नक्की.
तरीपण युती तोडायची जरूरी नाही फक्त शिवसेनेचा वरचष्मा नको व त्यासाठी समान जागा वाटप व जास्त जागा जिंकणाऱ्याचा मुख्यमंत्री इतकेच साधायचे होते. शिवसेनेची एवढी अलर्जी मोदींना का होती याची कारणमीमांसा करता येणे शक्य असले तरी तो विचार सध्या बाजूला ठेवू.
पण देवाच्या मनात काहीतरी वेगळेच घाटत असावे. मुंढे यांच्या दुर्दैवी देहावसानामुळे सगळीच गणिते उलटीपालटी झाली. मुंढे हे महाराष्ट्र भाजपाचे एकमुखी नेता होते. मात्र इतर नेते महाराष्ट्राच्या विशिष्ट भागाचे पुढारीपण करत होते. मग आता पुढे काय....?
मुंढेजींच्या आकस्मिक निधनानंतर मोठा भाऊ छोटा भाऊ च्या व्याख्या ऐकायला येऊ लागल्या. व शिवसेना मोठा भाऊ असल्याने उद्धवजींच मुख्यमंत्री होणार हे शिवसेनेने घोषित करून टाकले होते
उध्दवजीं वारसाहक्काने सेनापती बनले होते व त्या वारसाहक्काच्या न्यायाने १९८९ साली झालेला करारानुसार जागावाटपाचा आग्रह धरून बसले होते. याच्या उलट मोदी स्वपक्षातील बुजुर्ग, माध्यमे व कॉग्रेस अशा तीन मोठ्या आघाड्यांवर एकाचवेळी एकहाती लढून फावल्या वेळेत मुलायम, ममता, मायावती जयललिता,लालू व नितिशकुमार यांच्याशीही कुस्ती खेळत होते. व अशा रितीने स्वपराक्रमावर पंतप्रधान झाले होते. निव्वळ घराणेशाहीच्या आणि वारसा हक्काच्या आधारावर मोदींना जागावाटप मान्य होणेच शक्य नव्हते.
मी येथे वारसाहक्क म्हणतोय याचे कारण म्हणजे जागावाटपाचा करार जेव्हा झाला तेव्हा उध्दवजी सक्रिय राजकारणात होते की नाही ते आठवत नाही. जर नसतील तर हा करार घडवून आणंण्यात त्यांचे काही योगदान असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय करार घडवून आणणारे बाळासाहेब, महाजन व मुंढे कालवश झालेले. अटलजी निवृत्त झालेले. राहिले फक्त अडवानीं. पण ते स्वत:हूनच मोदींच्या विरुद्ध गटात जाऊन बसलेले. मोदींचा प्रश्नच उद्भवत नाही कारण हा करार झाला त्या वेळेस मोदींचे नावही कोणाला माहीत नव्हते. म्हणजे त्यांचा या कराराशी दुरान्वयेही संबंध नव्हता. थोडक्यात मोठा भाऊ छोटा भाऊ किंवा जागावाटपाचा हा जुना करार मोदी मान्य करू शकतील हे संभवतच नव्हते. इतकेच नव्हे तर करार झाला त्यावेळची परिस्थिती पाहता, भाजपने स्वबळावर केंद्र सरकार स्थापन केलेले आहे अशा प्रकारचे स्वप्नसुध्दा करार करणाऱ्यांना पडणे शक्य नव्हते.
लोकसभा निवडणूकीनंतरच्या या आमूलाग्र बदललेल्या परिस्थितीत उद्धवजींचा वारसा हक्क मान्य करण्याऐवजी मायबाप जनतेच्या दरबारात जाऊन थेट जनतेकडूनच छोटा भाऊ मोठा भाऊ या शब्दांच्या व्याख्या बनवून घ्याव्यात व त्यानुसार भविष्यातील जागावाटपाचे तसेच मुख्यमंत्री ठरविण्याचे सूत्र ठरविले जावे असे मोदी यांना वाटले असल्यास ते फार चुकीचे होते असे म्हणवत नाही.
युतीची २५ वर्षांची वाटचाल व ती पुण्याई मोदी विसरलेले नसावेत असा निष्कर्ष काढावासा वाटू लागलाय. कॉग्रेसमुक्त भारत हे मोदींचे आजचे धोरण असले तरी या धोरणाचा  पाया घालणाऱ्यांमध्ये बाळासाहेब असून त्यांचे याबाबतीतील  योगदानाचे विस्मरण मोदींना कधीही झाले नाही हे सातत्याने जाणवत होते.
त्यामुळे युतीमधे फक्त एकाच मुद्द्याबाबत मतभेद असून, मोठा भाऊ छोटा भाऊ या व्याख्यांबद्दल असलेले मतभेद परस्परात मिटवता न आल्यास ते मतभेद थेट जनतेच्या दरबारात जाऊन सोडवायचे इतके स्पष्ट धोरण मोदींच्या हालचालीतून सतत जाणवत होते.
बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त करून शिवसेनेबद्दल काहीही बोलणार नाही हे वचन त्यामुळेच ते देऊ शकले व शेवटपर्यंत पाळूही शकले. त्याच्याविरुद्धचा प्रचार हीन पातळीवर जाऊनही त्यांचा संयम शेवटपर्यंत कायम राहिला.
इतकेच नव्हे तर त्यांच्या या उक्तीमुळे व त्यानुसार कृती करत राहिल्याने भाजपाच्या काही उतावळ्या व आक्रमक नेत्यांच्या जिभांना वेसण घातली गेली जी शेवटपर्यंत सैल पडू शकली नाही. परिणामत: भाजपकडून प्रचाराची पातळी हीन पातळीवर जाणार नाही यावर ते ताबा ठेवू शकले. ही एक मोठीच उपलब्धी समजली पाहिजे.
युती तोडायचा निर्णय महाराष्ट्रातील नेत्यांनी मोदींना प्रत्यक्ष भेटीत कळवला त्या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनुसार हा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला अशी विचारणा महाराष्ट्रातील नेत्यांना करून मोदींनी त्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या असा काहीसा आशय त्या बातमीचा होता.
या एका बातमीवरून मोदींचा आत्मविश्वास, जिंकण्याची खात्री, हक्क व जबाबदाऱ्या यासंबंधातील त्यांची मते, दरबारी राजकारणाबाबतची त्यांची मते यावर प्रकाश टाकणे शक्य होऊ शकेल.
त्यामुळे माझे असे वैयक्तिक मत आहे की जागावाटप व जास्त जागा मिळवणाऱ्याचा मुख्यमंत्री ह्या मोदींच्या अटी शिवसेनेने मान्य केल्या असत्या तर भाजप मोठा भाऊ जरूर ठरला असता पण  भाजप शिवसेनेतील अंतर फक्त १५ ते २० जागा एवढेच राहिले असते.
हे सगळे थोडक्यात सांगायचे झाल्यास....
युती तोडण्याचे धाडस भाजप करणार नाही अशा भ्रमात शिवसेना राहिली.
तर भाजपची वाढलेली ताकद तसेच मोदींच्या नेतृत्व गुणांची दखल चीन जपान व अमेरिकाही घेत असेल तर शिवसेनेच्याही ते नक्कीच लक्षात आलेले असल्याने शिवसेना युती तोडायचे धाडस न करता जागावाटपाचा समझोता करेल या भ्रमात भाजप राहिली.
त्यामुळे युती तुटली.
(समाप्त)