तुटलेली युती परत जुळेल का?

युती तोडायचा निर्णय महाराष्ट्रातील नेत्यांनी मोदींना प्रत्यक्ष भेटीत कळवला त्या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनुसार हा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला अशी विचारणा महाराष्ट्रातील नेत्यांना करून मोदींनी त्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या असा काहीसा आशय त्या बातमीचा होता.
महाराष्ट्रात पश्चिमेकडून जसजसे पूर्वेला जावे तसतसा भाजपचा जोर वाढताना दिसतो आहे. पूर्वेकडील विदर्भात तो जोर सर्वात जास्त तर पश्चिमेकडे मुंबईत सर्वात कमी असल्याचेही जाणवते आहे. मुंढेजी हे संपूर्ण महाराष्ट्र भाजपाचे नेते होते. पण त्यांच्या अकाली निधनाने विभागीय नेतृत्वाकडे पुढारीपण आले. त्यामुळे नागपूरच्या  फडणविसांना युती तुटली तर भाजपाचा फायदा होईल असे वाटतेय तर त्याच्या उलट मुंबईतील पुढाऱ्यांची अवस्था आहे. मुंबईत शिवसेनेचा जोर असल्याने युती तुटली तर त्याचा फार मोठा फटका भाजपाला बसेल अशी एक शंका त्यांना भेडसावतेय. पूर्व व पश्चिम या दोन्ही टोकांच्या मधल्या भागातील पुढाऱ्यांची अवस्था तर फारच दयनीय झालेली असावी. त्यांना एकाच वेळी पूर्वेचेही पटतेय व पश्चिमेचे पण खरे वाटतेय पण काही केल्या बाजू कोणाचीच घेता येत नाहीये. अशा परिस्थितीत हे सर्व पुढारी एकत्र आले आणि युती तोडायची की नाही? याचा विचार करायला लागले तर त्याची परिणिती भरपूर चर्चा, खलबते पण निर्णयाच्या दृष्टीने मात्र बोंब अशी झाली नाही तर नवल नाही.  अगदी तसेच घडल्यामुळे युती तोडायचा निर्णय घ्यायला भाजपाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांना खूप वेळ लागला असावा अशी शंका येतेय.
खूप मोठ्ठा अवघड प्रश्न सोडवायचा असल्याचा तणाव त्यांच्यावर असणार हे नक्कीच.  त्यातून असे गुंतागुंतीचे व राजकारणावर दीर्घकाळ परिणाम करू शकणारे प्रश्न सोडवायची फारशी सवय नसेल तर दुसरे काय होणार? मला वाटते मोदीना याचा थोडाफार अंदाज असावा. "मुंढे जर असते तर मला इथे यायची काही जरूरीच पडली नसती" असे वक्तव्य त्यांनी बीडच्या सभेत म्हणूनच तर केले नसेल ना?
पण जर एखाद्याला असे अवघड व आव्हानात्मक प्रश्न सातत्याने सोडवायची सवय असेल किंवा त्याने जर अशाच प्रकारचा प्रश्न या अगोदर सोडवलेला असेल तर मात्र त्याला हे पुढारी इतका छोटा प्रश्न सोडवायला फारच वेळ घेताहेत, कालापव्यय करताहेत असेच वाटत राहील. 
जर मोदींना सर्व लढाई खेळायची असेल तर त्यासाठी आवश्यक असलेला वेळ मोदींना काढायचा होता त्यामुळे जर युती तोडायचीच होती तर वेळ का घालवला? हा त्यांचा प्रश्न संयुक्तिक वाटतो. जर प्रचारासाठी १ महिना मोदींना मिळाला असता तर मोदींवर ताण न पडता जास्त सभा घेता आल्या असत्या. २५ ते ३० मिनिटांच्या जागी तासाभराच्या सभा घेणे शक्य झाले असते शिवाय आवाज बसल्याने एक सभा ८-१० मिनिटात संपवावी लागली तशी परिस्थिती ओढवली नसती.
मोदी हे सगळे आत्मविश्वासाच्या आधारावर बोलत असले पाहिजे असाच आशय बातमीतील मोदींची प्रतिक्रिया सुचवत आहे. पण असे नुसते वाटून काय उपयोग? काही पुरावा मिळतोय का ते ही पाहिले पाहिजे.
२०१२ च्या गुजराथ निवडणूकीत केशुभाई पटेल भाजपातून बाहेर पडले. वयाने अनुभवाने मोदींच्या पेक्षा मोठे. कॉंग्रेसच्या मुस्लिम व्होट बँकेला शह म्हणून पटेलांची व्होट बँक स्थापन करून भाजपाचे पहिले सरकार स्थापन करणारे तसेच मोदींना पुढे आणण्यात मदत करणारे केशुभाई मोदींच्या विरोधात गेले. मोदीविरुद्ध अपप्रचार सुरू झाला. मोदींवर वैयक्तिक पातळीवर आरोप केले गेले आणि पुढे पुढे तर ही प्रचाराची पातळी खूपच हीन पातळीवर गेली. मोदींनी त्यांच्या विरोधात केल्या गेलेल्या आरोपांबाबत खुलासे जरूर केले  पण मोदींनी एकही अपशब्द केशुभाईंविरूध्द उच्चारला नाही. पण आपला खुलाशांचाही विपर्यास केला जातोय हे लक्षात आल्यावर खुलासे देण्याचे थांबवून गुजराथचा विकास व अस्मिता यावरच पुढच्या प्रचारात भर दिला. 

मोदी जिंकले. पण हे यश त्यांच्या डोक्यात गेले नाही. जिंकल्यावर त्यांनी काय केले असेल? पेढ्याचा पुडा घेऊन थेट केशुभाईंच्या घरी गेले व त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद मागितला व त्यांना पेढा भरवला. परिणाम असा झाला की, केशुभाई परत भाजपात परतले. 
राजकीय विश्लेषक याला राजकारणातला कसलेला मुरब्बीपणा म्हणतील व विषय संपवतील.  पण हा मुरब्बीपणा का आला याचा शोध घेणार नाहीत. गोष्ट अशी आहे की जेव्हा माणसातील मी व माझे हे स्वार्थीपणाचे दोन घटक (याला देहबुद्धी असेही नाव आहे) कमी होऊ लागतात त्याप्रमाणात त्या माणसात कृतज्ञता बुद्धी वाढत जाते. अशा माणसाला अगदी छोटीशी जरी मदत कुणी केली तर असा माणूस ते उपकार जन्मभर विसरत नाही. तो त्याचा स्वभाव बनलेला असतो. त्यामुळे केशुभाईंबद्दल अपशब्द उच्चारायचा नाही ही खूप मोठ्या विचारमंथनातून जन्म पावलेली खेळी नसून ती कृतज्ञतेच्या सहजप्रवृत्तीतून सहज आलेली आहे हे भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही. आणि जेव्हा कमीत कमी कष्टात व वेळेत जेव्हा एखादी गोष्ट साध्य होते तेव्हाच सहज या शब्दाचा वापर केला जातो हे लक्षात घेतले तरच मोदींच्या झटपट निर्णयांच्या कौशल्याचे इंगित लक्षात येऊ शकेल. 

मात्र कोणाचातरी गोडीगुलाबीने वापर करून घ्यावयाचा व वापर करून झाल्यावर मात्र त्याला लाथाडायचे हे मात्र कृतज्ञता नसलेल्या माणसालाच शक्य होऊ शकते व त्यासाठी त्याच्यात मी व माझे ह्या दोन घटकांचे प्रमाण खूप मोठे असावे लागते. असो.
आज महाराष्ट्रात वेगळे काय होतेय? महाराष्ट्रातील लढाईची रंगीत तालीम मोदींनी २०१२ सालीच गुजराथेत केलीय. लढाईच्या त्या गुजराथ मॉडेलवर ते महाराष्ट्रातील योजना ठरवत आहेत. पण गुजराथ मॉडेल हे  शब्द आले रे आले की, त्यांचे विरोधक लागलीच म्हणणार की तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात. देशाबद्दल बोला. सारखे गुजराथ गुजराथ काय करताय? पण या लढाईच्या गुजराथ मॉडेलनेच मोदींना आत्मविश्वास दिलाय हे विसरून कसे चालेल? त्यामुळे मोदींमधील अध्यात्मिक वृत्ती म्हणजे माणसातील मी व माझे ह्या दोन घटकांचे खूपच घटलेले प्रमाण लक्षात न घेतलेले लोक मोदींनी खूप मोठा जुगार मांडला असेच म्हणणार आहेत.
मोदींच्या केशुभाई पटेलांच्या विरोधातील लढाईत सावधगिरीचा भाग म्हणून काही जणांना ते लायक नसूनही तिकिटे द्यावी लागली होती. केशुभाईं भाजपातून बाहेर पडले नसते तर ही तिकिटे नक्कीच योग्य माणसांना देता आली असती. पण केशुभाईंशी केलेल्या समझोत्यामुळे ते सावधगिरीचे उपाय अपायकारक ठरू शकले नाहीत. पण तो मुद्दा आत्ता नको.
थोडक्यात सांगायचे तर.....
१) मोदी शिवसेनेला युतीत परत घेण्याच्या मन:स्थितीत असतील व त्यासाठी ते पुढाकारही घेतील. 
२) त्यामुळे महाराष्ट्रात सावधगिरीसाठी जे उपाय योजले होते ते अपायकारक ठरणार नाहीत याचीही काळजी आपोआप घेतली जाईल. 
३) तसेच पुढील ५ वर्षात युतीत सामंजस्य राखण्याची जबाबदारी कायमस्वरूपी पंकजा मुंढे यांचेकडे सोपवली जाईल असे सद्या तरी वाटते आहे. 
४) अनंत गीते यांनी न दिलेला राजीनामा उद्धव ठाकरेंची विचाराशी दिशा स्पष्ट करतोय.
५) सन्मानाने परत युती स्थापन झाली असे दर्शविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी शिवसेनेच्या खासदाराची वर्णी लागू शकेल. मात्र असे करताना हक्क व जबाबदाऱ्यांचे मोदींची व्याख्या मोदी अमलात आणतील असे वाटते.
६) हा माझा राजकारणावरील शेवटचा लेख असेल.
समाप्त.