तू "आलीस" की तू "आली"?

नमस्कार, 

बरीच वर्षे यासंदर्भात डोक्यात स्पष्टता आहे अशी माझी समजूत होती, पण हल्ली कानावर पडणाऱ्या भाषेतून त्याविषयी हल्ली शंका येवू लागल्याने येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे म्हणून हा प्रयत्न.

व्याकरणातील बारकावे आता पुरेसे आठवत नाहीत, पण मुद्दा मांडण्यापुरते पुढील प्रगटन पुरेसे असावेः
मी आलो / आले , आम्ही आलो
तू आलास (आला) / आलीस (आली), तुम्ही आला, 
तो आला / ती आली / ते आले, ते आले / त्या आल्या / ती आली 

वरीलपैकी पार्श्वरंगीत रूपे बरोबर आहेत की  न रंगवलेली?

प्रश्न हा क्रियापदांच्या द्वितीय पुरुषी, सामान्य भूतकाळातल्या (किंवा वर्तमानकाळातल्याही) रूपांविषयी आहे. त्यात एकवचनात "स" असावे की नाही? आणि अनेकवचनात "त" असावे का? (तुम्ही आलात की तुम्ही आला? ) 
(अर्थात हा प्रश्न पूर्ण अथवा चालू वर्तमानकाळात, क्रियापदांचा संधी होवून "स" लागतो त्याबद्दल नाही. - उदा आला आहेस = आलायस, करतो आहेस = करतोयस इ. तर केवळ सामान्य भूतकाळाविषयी आहे. तोच नकारात्मक विद्ध्यर्थालासुद्धा लागू होतो. उदा.  करू नकोस / नको. ) 

फार सोपे वाटत असेल, तर हवे तर आणखी उदाहरणे देतो: त्यांतील शुद्धाशुद्धतेविषयी निर्णय द्या, आणि शक्य झाल्यास सार्वत्रिक नियमसुद्धा सांगा.  

तू गेलीस /गेली, 
तू गेली नाहीस / गेली नाही, 
तू नाही गेलीस / तू नाहीस गेली
तू केलेस / केले,  केले नाहीस / नाही केलेस 
तू असे करू नकोस / करू नको
तू काय करतोस? करतो? 
तू असे का बोलतेस? / बोलते?  
डाव मोडू नको / मोडू नकोस 
(शेवटचे उदाहरण अर्थातच गाण्यातून घेतले आहे. गेयतेसाठी कवितेत व्याकरणाचीच काय, शब्दांचीही तोडमोड होणे पूर्ण स्वीकारार्ह आहे. पण गद्यात हे व्याकरण कसे चालते हा प्रश्न आहे.)
उत्तर कृपया व्याकरणाच्या "प्रमाण" नियमांना अनुसरून द्यावे, "प्रचलित वापरातून रूड" झालेल्या नियमांना (made acceptable & standard due to wider usage) नको. (यात दुसऱ्या प्रकाराला दुय्यम लेखण्याचा प्रयत्न नाही. फक्त पारंपरिक प्रमाण नियम काय आहे ते माहिती करून घेणे हा उद्देश आहे. )
धन्यवाद,
मराठा