जगू दे मला एकट्याने जरासे

जगू दे मला एकट्याने जरासे
(भुजंगप्रयात)


जगू दे मला एकट्याने जरासे
कशी साथ देशील टाळून आता
कसे प्रेम झाले तुला हे नकोसे?
कळू दे मला सोडुनी आज जाता

    कुठे जागतो? जाळतो रात सारी
    दिशा म्लान झाल्या न साथीस वारे
    नुरे चेतना काय ओठात न्यारी
    उरी पेटती वेदनांचे निखारे

तसे स्पर्शवेडे कुठे प्रेम होते?
कधी शब्द कोणी दिले बंधनांचे?
परी का तुटावे सखे सांग नाते
कसे सोसतो शल्य मी आसवांचे

    किती भाव मी मोजतो रे सुखाचा
    तरी मी जुगारी अखेरीस दुःखी
    नको प्रेम, उन्माद आता मनाचा
    नको दुःख कोते मला मोरपंखी

पहा, बंद होतील दारे मनाची
नको शोध घेऊस तू काळजाचा
तरी थाप दारी पडे काळजीची
पसारा पुन्हा आत का वादळाचा?

-नीलहंस.