औषध नलगे मजला !

     नलाच्या विरहामुळे आजारी पडलेल्या दमयंतीला औषधाची विचारणा केली असता तिने "औषध नलगे मजला" असे उत्तर दिले त्यावरून  इतरांनी "तिला औषध नको ( न लगे )"असा अर्थ काढला  तर खरे पहाता  तिच्या मनातून "मला नल हेच औषध(नल गे)" असे तिला म्हणायचे होते असा श्लेष मोरोपंतांनी काढला आहे   "औषध नल गे मजला " हे दमयन्तीने वेगळ्या संदर्भात म्हटले असले तरी निरोगी जीवनासाठी "औषध न लगे मजला" हाच मंत्र प्रत्येकाने शक्यतो जपायला हवा कारण औषधांचे रोगहारक सुपरिणाम होतात तसेच नकळत त्यांचे दुष्परिणामही होतात व ते आपल्याला लवकर कळत नाहीत असे माझे काही अनुभव सांगतात. याचा अनुभव सगळ्यांनाच आला असणार . योग्य प्रमाणात आणखी निकडीच्या वेळी औषध घेणे आवश्यक आहेच पण अगदी सहजपणे उपलब्ध आहे म्हणून सरसकट औषधांचा वापर करणे योग्य नाही. तशी संवय बऱ्याच जणांना असते  यासाठी ही सूचना !
         आजच्या काळात  आणि पूर्वीही "मला औषध नको " असे लहान मुलांच्या तोंडून अनेक वेळा ऐकायला मिळायचे व मिळते  कारण गोळी गिळणे त्यांना अवघड जात असल्याने तिची पूड करून घ्यावी लागते आणि मग तिची कडू चव त्यांना नको वाटते त्यानंतर चॉकलेटच्या गोळीचे आमीष दाखवून त्यांना औषध घ्यायला लावावे लागते.बऱ्याच मोठ्या व्यक्तींनाही औषधाची गोळी गिळणे कठीण वाटते आणि मग तिची पूड करून घशात लोटावी लागते,पण त्यांना मात्र त्या कडू चवीमुळे "औषध नलगे  मजला "म्हणण्याची सोय नसते.
      आमच्या लहानपणी आजच्याइतका औषधी गोळ्यांचा सुळसुळाट झाला नव्हता. कोणी आजारी पडले  तर गावातल्या दवाखान्यात औषधासाठी बाटली घेऊन जावे लागे .डॉक्टर " काय होतेय?"असे बरोबरच्या वडीलधाऱ्या व्यक्तीस विचारत व नंतर जवळच्या खुर्चीवर बसवून छातीवर स्टेथो चिकटवून पहात आणि  मनगटावर आंगठ्याने दाब देत नाडीचे ठोके मोजत आणि नंतर समोरच्या गठ्ठ्यातील एका पानावर त्यांच्या अगम्य अक्षरात काहीतरी लिहून आमच्या हातात तो कागद देत.तेथून आम्ही उजव्या बाजूला असणाऱ्या खिडकीतून फक्त ज्याचे डोके दिसत असे त्या कंपाउंडरच्या खोलीत जाऊन त्याच्या हातात तो कागद देत असू तो पाहून लगेच आम्ही नेलेल्या त्या बाटलीत निरनिराळ्या मोठ्या बाटल्यात भरून ठेवलेले निरनिराळ्या रंगाचे द्रव वेगवेगळ्या प्रमाणात भरून ती बाटली हलवून त्यांचे मिश्रण व्यवस्थित झाले हे पाहून ते त्या बाटलीवर एक कागदाची उभी पट्टी चिकटवून देत  त्या पट्टीवर केलेल्या भागामुळे प्रत्येक वेळी त्या द्रवाचा किती भाग घ्यायचा हे कळत असे.गोळ्या बहुधा नसतच त्या ऐवजी पूडच मिळे व त्याच्या छोट्या छोट्या पुड्या करून देत. मग त्यातली पूड मधात कालवून चाटावी लागे.
       त्या वेळी सगळ्या रोगावर औषध मिळायचेच असे नाही. दाढदुखीचा त्रास मला होई तसा माझ्या आईलाही होई पण त्यावर काही औषध दवाखान्यात मिळत नसे, स्वतंत्र दंतवैद्य गावात नव्हता त्यामुळे दाढदुखीवर औषध म्हणजे दाढ काढणे तेवढेच फक्त दवाखान्यात होत असे.त्यामुळे  बहुधा लवंग तेल किंवा असेच काही तरी दुखऱ्या दातावर लावून दाढदुखी थांबण्याची वाट पहाणेच नशिबी असायचे.पण मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यास येईपर्यंत या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली होती म्हणजे आता गोळ्या सर्रास मिळू लागल्या होत्या व त्यावेळी कोडोपायरीन ( अलीकडील डिस्प्रीन) ही वेदनाशामक गोळी घेतली की माझी दाढ दुखी थांबायची आणि ती मी अगदी दाढदुखी थांबेपर्यंत घ्यायचो.
            त्यानंतर पुढे आमच्या मुलांच्या लहानपणी नेहमीच उद्भवणाऱ्या आजाराला तोंड देण्यासाठी आमच्या फॅमिली डॉक्टरनी माझ्या सौभाग्यवतीला सांगूनच ठेवले होते तापासाठी प्रथम क्रोसीन किंवा तत्सम  गोळ्या द्यायच्या आणि एक दोन दिवसात बरे वाटले नाही तरच त्यांच्याकडे जायचे कारण माझा एक वर्षाचा मुलगा त्यांच्या दवाखान्यात मोठ्याने रडून सर्व वाट पहाणाऱ्या इतर रुग्णांचा ताप आणखीनच वाढवायचा,शिवाय डॉक्टरांनाही रुग्णाची तपासणी करणे अवघड व्हायचे त्यामुळे आम्हाला बहुधा किरकोळ आजारासाठी करावयाची उपाययोजना माहीतच झाली होती व नंतर भाऊच डॉक्टर झाल्यामुळे ताबडतोब उपाययोजना होत असे पण त्याची पद्धत ही अशीच ठरलेली असायची.
        आजच्या काळात बहुधा काही औषधे सर्वांना माहीत असावी अशी अपेक्षा असते आणि त्यामुळे डॉक्टर ताबडतोब उपलब्ध नसल्यास प्राथमिक उपाययोजना आपण करू शकतो.अमेरिकेत जातानाही आम्ही क्रोसिन, एव्हिल,लोमोटील अशी औषधे बरोबर घेऊनच जातो,कारण तेथे बरीच औषधे डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय मिळत नाहीत,जी तशी मिळतात त्यांचे over the counter असे वर्गीकरण असते व ती कुठल्याही औषधाच्या दुकानात मांडूनच ठेवलेली असतात. पण त्यांची नावे आपल्याला माहीत असणे आवश्यक असते शिवाय भारतात अगदी स्वस्त मिळणारे औषध तेथे खूपच महाग मिळते.उदा एविल (Avil )भारतात अगदी २० पैशात मिळणारी गोळी घ्यायला मला पाच सहा रुपये (त्यावेळच्या विनिमय दरानुसार  १० सेंट म्हणजे अमेरिकेतील भावाने स्वस्तच) मोजावे लागले.त्यामुळे  आमच्या बी.पी.मधुमेह या विशिष्ट रोगावरील गोळ्या तर आम्ही नेतोच पण सर्वसाधारण गोळ्यांचाही  भरपूर साठा घेऊन जातो . 
        काही वेळा मात्र औषधाऐवजी काही इतरच युक्तीचा वापर करावा लागला.रात्री आमची सगळ्यांची जेवणे चालली होती अगदी मजेत आणि अचानक एका पापडाचा कडक तुकडा सूनबाईच्या घशात अडकला आणि तो बाहेर येईना की पोटात जाईना आणि घशात तो जणु रुतून बसला आणि तिला तीव्र वेदना होऊ लागल्या.काय करावे कोणलाच काही सुचेना अश्या वेळी केळ खावे असे वाचल्याचे मला आठवले.घरात केळही नव्हते पण सुदैवाने त्यावेळी एक मॉल अगदी घराजवळ होते आणि ते रात्री २ वाजेपर्यंत उघडे असे त्यामुळे मुलाने तडक जाऊन केळी आणली आणि त्याचे दोन घास जाताच पापडाचा तुकडा पोटात जाऊन सूनबाईचा त्रास एकदम नष्टच झाला.तोवर मी माझ्या डॉक्टर भावालाही फोन लावला होता व त्यानेही हाच उपाय सांगितला.
       भारतात असतानाही प्रत्येक औषध आपण डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेतो असे नाही.मला मलावरोधाचा त्रास असल्याने मी त्यावर वेगवेगळे उपाय करून बघत असे शेवटी धौतियोग हे औषध मला बऱ्याच प्रमाणात लागू पडले आणि त्याचा प्रयोग मी दोन तीन वर्षे केला.अमेरिकेस जातानाही मला दोन तीन बाटल्या घेऊन जाव्या लागत.त्यानंतर इतर काही कारणासाठी डॉक्टर भावाकडे गेल्यावर रक्ताची तपासणी सहज करायची म्हणून केली तर तपासणी करणारा डॉक्टर त्याचा मित्रच असल्यामुळे त्याने "तुझ्या भावाच्या रक्तात बी १२ फारच कमी असे सांगितल्यावर भावाने मला बी १२ ची इंजेक्शन्स घ्यायला लागतील असे सांगितले.त्याच दिवशी रात्री मी धौतियोग घेत असताना त्याने मी काय घेतो हे विचारले मी ते धौतियोग आहे जे सांगितल्यावर एकदम तो म्हणला, "मग बरोबर आहे  त्याच्यामुळेच बी १२ एकदम कमी झाले " ते घेणे ताबडतोब बंद करायला सांगितले आणि नंतर इंजेक्शन्स न घेता त्यासाठी पावडर  दुधातून घ्यायला सांगितली व धौतियोग बंद करून तो उपाय काही दिवस केल्यावर माझे रक्तातील बी१२ चे प्रमाण सुधारले पण त्यामुळे त्यानंतर मलावरोधावरील औषध घेताना त्याला विचारूनच घेऊ लागलो. अमेरिकेत पुढया वेळी मित्रमंडळीत चर्चा करताना धौती योगचा हा अनुभव त्यातील इतर काहीजणांनीही सांगितला.
       कधी कधी डॉक्टर्सनाही औषधाच्या अश्या अन्य परिणामांची कल्पना नसते  आणि रोग्याने स्वत:ही त्याविषयी दक्ष रहायला हवे याचाही अनुभव आम्हाला आला.अमेरिकेत जाण्याच्या वेळी तपासणी करताना  माझ्या सौ.ला मधुमेह निघाला त्यानंतर रक्तातील शर्करा प्रमाण योग्य तेच राखण्यासाठी नियमित औषधांचा वापर करणे हे ओघाने आलेच. सुरवातीच्या काळात  सेमिडायोनिल व ग्लासिफेस या गोळ्यांनी  ते प्रमाण योग्य राहिले पण पुढे ते वाढू लागल्यामुळे सेमिडायोनिलची जागा डायोनिलने घेतली.त्यानंतर ते मर्यादेत रहाण्यासाठी जानुमेटचा वापर करावा लागू लागला.त्याच काळात सांधेदुखीसाठी प्रिगॅबलिन ही गोळी घेण्याची सूचना भावाने दिली.त्यानंतर एकदोनदा ती चक्कर येऊन पडली सुदैवाने घसरून पडताना फारशी दुखापत झाली नाही,पण एकदा झोपेतच बिछान्यावरून ती घसरून खाली पडली हे कसे झाले हेही तिला कळले नाही.त्यामुळे कमरेला थोडी दुखापत झाली मात्र हाडे मोडली नाहीत.पण असे का व्हावे याचा शोध घेता प्रिगॅब्लिनचा हा सहपरिणाम आहे असे शोध घेतल्यावर आढळून आले.त्या कालात जानुमेटचे प्रमाणही वाढवले होते,पण तसा त्याचा परिणाम नाही हे समजले पण त्यानंतर प्रिगॅब्लिन बंद केल्यावर थोड्याच दिवसात तिला अतिसाराचा त्रास होऊ लागला आणि बराच विचार केला असता हा जानुमेटचा परिणाम आहे असे जाणवले व त्याचे प्रमाण कमी केले.त्यापूर्वी हा त्रास न होण्याचे कारण त्यावेळी प्रिगॅबलिन चालू होते व त्याचा सहपरिणाम मलावरोधाचा आहे असे दिसून आले.थोडक्यात औषधांचा उपायाबरोबर होणारा अपाय काय आहे हे रोग्यानेही विचारपूर्वक शोधणे आवश्यक आहे असे दिसून आले.येथे उपाय सुचवणारा डॉक्टर खुद्द माझा भाऊच होता हे विशेष ! आता आंतरजालावर औषधाविषयी  माहिती सहज उपलब्ध होते तरी "मी नाही त्यातली/ला" म्हणणाऱ्यांनीही त्या माहितीचा उपयोग करून घ्यावा.
         कधी कधी अचानक कोठले तरीच औषध लागू पडते हेही निदर्शनास येते. तसा अनुभव मला एकदा अमेरिकेत असताना आला.माझी दाढदुखी अलीकडे उद्भवली नव्हती त्यामुळे मी त्याविषयी बेफिकीर होतो.अमेरिकेत व भारतातही शक्य तो मी थंड पेये विशेषत: कोका कोला घेणे टाळतो पण त्यादिवशी सर्वांच्याबरोबर तो घेण्याचा मोह झाला आणि पहिल्याच घोटाबरोबर दाढेतून तीव्र कळ आली आणि पुढचा घोटही घेणे अशक्य झाले.त्यानंतर दाढेचा ठणका इतका तीव्र होता की आम्ही बाहेर जाणार होतो ते मला बरोबर न घेताच जावे असे ठरले.त्यनंतर सौ.कडे होमिओपथीच्या गोळ्या होत्या त्यातील एक पेनकिलर म्हणून दिली होती ती तिने "ही घेऊन पहा" म्हणून मला दिली       
 माझा होमिओपॅथीवर विश्वास फारच कमी आहे तरी अडला नारायण म्हणून ती गोळी मी तोंडात ठेवली व थोड्याच वेळात दाढेचा ठणका पूर्ण थांबला व मी आनंदाने बाहेर पडू शकलो.
       हा माझा अनुभव हा कदाचित योगायोग असेल असा समज काही दिवस माझ्या मनात होता.पण त्यानंतर सौ.चा भाचा अमेरिकेतच आहे तो सपत्निक आमच्याकडे आला.नेहमी बडबड करणारा तो अगदी गप्प गप्प होता त्याचे कारण त्याला विचारले तर आपली दाढ खूप ठणकते आहे असे कारण त्याने दिले लगेच मी त्यालाही परवा माझ्यावर यशस्वी झालेली गोळी देण्याची सूचना सौ.ला केली अर्थात तिला माझ्या सूचनेची आवश्यकता होती अशातला भाग नाही.तिने लगेच तिचा बटवा उघडून त्या गोळीचा प्रयोग त्याच्यावर केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी ताबडतोब त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागले आणि त्याची बडबड सुरू झाली अर्थात त्याचाच अर्थ गोळीने आपली जादू केली होती हे उघडच आहे नंतर जेवणावरही त्याने ताव मारला.जाताना तो थोड्या गोळ्या बरोबरही घेऊन गेला,            
         कधी कधी डॉक्टरचा सल्ला व आपला अनुभव यांचा सुवर्णमध्य साधावा लागतो.मला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने काही पेन किलर्स उदा.व्हॉवेरॉन,नाल्जिस (Nalgis) घेऊ नयेत असा सल्ला माझ्या भावाने मला दिला होता.पण माझ्या दातांचे रूट कॅनाल करताना दंतवैद्याने नाल्जिसचीच शिफारस केली होती व त्याला मी माझी अडचण सांगितल्यावर त्याने अशा वेळी घेण्यास हरकत नाही असे सांगितले.अमेरिकेला जाण्यापूर्वी माझे दात बरेच सुस्थितीत आल्यामुळे ती गोळी अमेरिकेत जाताना मी नेली नव्हती पण त्यामुळे होमिओपॅथीच्या गोळीचा शोध लागला.पण घरातील डॉक्टरच्या सल्ल्याविरुद्ध जावून मी नाल्जिसची गोळी जवळ बाळगल्याचा फायदा एकदा माझ्या मित्राला झाला.तो औरंगाबादहून मला सहकुटुंब भेटायला आला पण आल्यापासून अगदी गप्प त्यामुळे मला आश्चर्य वाटले शेवटी न राहवून मी विचारलेच त्यावर त्याने आपल्या गालावर हात ठेवीत आपली दाढ प्रचंड दुखते असे सांगितले त्यावेळी माझ्यकडे नाल्जिसची गोळी होती व माझ्या मित्राला बी.पी.नाही हे मला माहीत होते त्यामुळे मी त्याला एक गोळी पाण्यात विरघळवून दिली व पंधरा मिनिटातच तो घडाघडा बोलू लागला.
           नाक चोंदणे ही तक्रार बऱ्याच जणांच्या बाबतीत आढळून येते.आमच्या लहानपणी ती तक्रार माझी स्वत:ची होती व त्यावर उपाय म्हणजे तोंडाने श्वास घेणे  हाच होता. मोठेपणी नाकात घालायच्या ड्रॉप्सची माहिती झाल्यावर बरीच वर्षे त्यांचा वापर मी करत असे,पण त्यामुळे नाक चोंदणे बंद झाले नाही फक्त ते ड्रॉप्स घातले की नाक मोकळे व्हायचे.त्यामुळे त्या ड्रॉप्सच्या इतक्या बाटल्या लागायला लागल्या की आमच्या घरात त्यांची अगदी माळ तयार झाली. वर्गात शिकवायला जाण्यापूर्वी पुण्याच्या कॉलेजमध्ये आमचे एक प्रोफेसर सिगरेटचा शेवटचा झुरका ओढून ती फेकून देत वर्गात प्रवेश करीत, तसे मला नाकात ड्रॉप्स टाकून वर्गात प्रवेश करावा लागे नाहीतर वर्गात बोलणे अशक्य व्हायचे.माझ्याबरोवर माझ्या एका मित्रालाही हा त्रास होत असे.पुढे एका आयुर्वेदतीर्थ डॉक्टरांनी त्यावर सूत्रनेती हा उपाय सांगितला.तसा तो उपाय कष्टप्रदच होता पण त्यामुळे ड्रॉप्सचा वापर जवळ जवळ बंद झाला. पुढे जलनेती हाही उपाय सापडला व तो सूत्रनेतीपेक्षा कमी कष्टप्रद आहे असे आढळून आले.ड्रॉप्सच्या वापराने नाक चोंदणे बरे होत नाही उलट त्याचा बराच वाईट परिणाम श्वसन संस्थेवर होतो असे आमच्या मित्रमंडळातील एकाने अनुभवांती सांगितले. व माझेही मत अनुभवांती तेच झाले आहे.
        सध्या वातावरणातील प्रदूषणामुळे प्रत्येकाचेच आरोग्य धोक्यात आलेले असल्यामुळे त्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणेच आवश्यक आहे व त्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाण्याच्या गुळण्या व नंतर मध लिंबू,तुलसी अर्क गरम पाण्यात मिसळून ते गरम पाणी एक पेलाभर दररोज घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढते.कोणत्याही प्रकारे (धौतियोग सोडून) पोट साफ राखणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे,त्यासाठी सुखसारक वटी व त्रिफळा चूर्ण यांचा वापर मला लागू पडला आहे.या गोष्टी पाळल्यास "औषध नलगे मजला" म्हणणे शक्य होईल असे वाटते.
( हा लेख लिहिण्याचा उद्देश आपल्या अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा असा आहे ! कारण आता उरलो उपकारापुरता )