गावोगावी
सतत बदलणे, पुढे पुढे जाणे हा तर काळाचा नेमधर्मच आहे. या सतत पुढे जाणाऱ्या काळाच्या चालीशी जुळवून घेण्यातच शहाणपणा आहे. कारण " थांबला तो संपला". हे सर्व खरे असले, तरी नित्यनेमाने घडणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना कधी कधी गोंधळायला होते. जसेजसे वय वाढत जाते, तशी आपली मते, आवडीनिवडी आणि सवयी देखिल पक्क्या होत जातात. चवींचे देखिल तसेच आहे.
पुण्याजवळच्याच एका लहानशा गावी जाण्याचा योग आला. अगदी अभ्यासदौरा नाही म्हणता येणार, परंतु पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षातले जमिनीवरील अनुभव हे कितपत मिळतेजुळते आहेत? हे तपासून बघण्याचा उद्देश होता. थोडीफार ज्ञानप्राप्ती, आणि थोडी खेडेगावाची सैर असा कार्यक्रम होता. गाव प्रगतिशील होते. तेथील गावकरी गृहोद्योग, शेती आणि इतर संलग्न व्यवसाय म्हणजे (पशुपालन, पोल्ट्री इ. ) यशस्वीपणे चालवीत होते. शेतीच्या जोडीला भाजीपाला होता. अनेक लहानमोठे व्यवसाय होते. विशेष म्हणजे यात गावातील महिलांचा देखिल सहभाग होता. त्यांचे शालेय शिक्षण जेमतेमच असावे, परंतु व्यवहारज्ञान चांगले पक्के होते. त्यामुळे आर्थिक प्रगती झाली होती. सामाजिक सुधारणा पण चांगली झाली होती. गावात शाळा होती, दवाखाना होता. आणि मुख्य म्हणजे कर्जाचा बोजा नव्हता.
त्यांनी ही आर्थिक स्वयंपूर्णता कशी साधली ते समजून घेणे हा मुख्य उद्देश होता. त्यावेळी मी अर्थशास्त्राची विद्यार्थिनी होते, आम्हाला " ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, ऍग्रिकल्चरल फायनान्स" अस काय काय शिकवायचे. ते सगळे पुस्तकी ज्ञान. म्हणून प्रत्यक्षात ते सर्व काय आणि कसे असते याबद्दल कुतूहल होते.
गावातील महिला, सर्व कार्यात अग्रेसर आहेत हे लक्षात आले. त्यातील एक बाई, लहानशी पोल्ट्री चालवीत होत्या. सावकाराकडून नाही, बॅकेचे कर्ज घेतले, हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांची पोल्ट्री बघितली. त्यातले असंख्य बारकावे त्या मोठ्या उत्साहाने सांगत होत्या. आम्ही विस्मयाने ते सर्व पाहत आणि ऐकत होतो.
त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी यायचा आग्रह केला. घराच्या परसात भाजीपाला लावलेला. मंडईत, किंवा भाजीवालीच्या टोपलीत बघितलेल्या भाज्या, प्रथमच झाडावर पाहत होते. गायी होत्या, शेळ्या होत्या. एकुणात कार्याचा पसारा मोठा होता. आणि बाई अगदी उत्साही आणि हसतमुख.
स्वयंपाकघरात एक सतरंजी अंथरली होती. समोरच चूल. पाने मांडलेली होती. पितळेच्या थाळ्या होत्या. त्यात लाललाल लसणीची चटणी वाढलेली. एक लहान खोलगट ताटली होती, त्यात दाण्याचा कूट, आणि मिरचीचा ठेचा घालून केलेली, तिखटजाळ वांग्याची भाजी होती. देठासकट शिजवलेली ती चवदार काटेवांगी, आणि सोबत गरम ज्वारीची भाकरी. कसलाही थाटमाट नाही, रांगोळ्या, उदबत्त्यांची सजावट नाही. अकृत्रिम अगत्याने आणि आपुलकीने केलेले ते साधे आणि रुचकर जेवण कायमचे स्मरणात राहिले आहे.
पदार्थांची चव असतेच, चांगली अथवा वाईट. पाककृती करताना वापरलेले विविध पदार्थ, त्यांची प्रत, प्रमाण, शिजविण्याची पद्धत, लागणारा वेळ, या सर्वांचा योग्य ताळमेळ साधला गेला, की एक चवदार पदार्थ तयार होतो. पण माझ्या मते इतकेच पुरेसे नसते. त्यात थोडी आपुलकी, स्नेहभाव, मनापासूनचे अगत्य मिसळले असेल, तरच तो पदार्थ चांगला वाटतो. रागारागाने केलेले, उपकार केल्याच्या भावनेने वाढलेले अन्नं, कितीही स्वर्गीय चवीचे असले, तरी गोड लागत नाही.
आम्ही गोव्यामध्ये होतो. पुण्याच्या गर्दी पासून दूर, आणि नेहमीचा बांधलेला दिनक्रम नाही. त्यामुळे छान वाटत होते. आम्ही जिथे राहत होतो, त्या जागेपासून समुद्रकिनारा जवळच होता. रात्रीच्या शांततेत समुद्राची गाज सतत सोबत करीत असे. पुण्याहून बसने जवळ जवळ ११ तास लागले होते. पण गोव्यात पोहोचल्यावर तो शीण कधीच नाहीसा झाला होता.
तिथल्या प्रसिद्ध कामत खाणावळीमध्ये जेवण घेतले. माशाची आमटी, तळलेला मासा, आणि पांढरा फडफडीत भात. अतिशय रुचकर जेवण होते ते. गोव्यात सर्वत्र तिथल्या बसने प्रवास केला. खूपच सोयीस्कर बस सेवा होती. मला आठवते त्याप्रमाणे तिकिटाचे दर देखिल अगदीच कमी. बसमध्ये गर्दी असे, पण त्रासदायक नाही वाटायची. माणसे साधीसुधी, बोलताना जरा चढ्या स्वरामध्येच बोलणार. त्यांचे मराठी वेगळेच, पण कानाला गोड वाटायचे.
एकदिवस सकाळी एक कोळीण आली होती. टोपलीभर मासे होते तिच्याकडे. तिथे स्वयंपाक करणारी मुलगी त्यातले मासे निवडून घेत होती. अगदी ताजे ताजे मासे. घेताना मला सांगत होती, मासा ताजा आहे की शिळा कसा ओळखायचा ते.
ती कोळीण मला म्हणाली, " तू पण घे की मासे. "
म्हटलं, "मी घेऊन काय करू? मी थोडाच स्वैपाक करणार आहे? "
तेव्हा साधी तुरीच्या डाळीची आमटी देखिल करायची वेळ, माझ्यावर अगदी क्वचितच येत असे.
दिवेआगरला आम्हाला असेच चवदार मासे मिळाले होते. घरमालक जिथे राहत, त्याच्याच बाजूला काही खोल्या बांधलेल्या. समोर जेवण आणि नाश्त्याची सोय. दिवेआगर मध्ये मुक्काम करून, आजूबाजूच्या ठिकाणांना भेटी देण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे जेवण वगैरेला फारसा वेळ नव्हता. वाटेत जे काही मिळेल तेच. तिथे नाश्त्याची सोय होती. पण रस्त्याचा प्रवास मला त्रासदायक होतो. त्यामुळे प्रवासाच्या आधी मी शक्यतो चहासुद्धा घेत नाही.
पण एक दिवस फारसे कुठे जायचे नव्हते. मग तिथेच समुद्री भोजनाची थाळी घेतली होती. सुरमई च्या मोठाल्या तुकड्यांना, काही मसाले, वाटण वगैरे लावलेले होते. तांदुळाच्या पिठीमध्ये जरासा रवा मिसळलेला. त्यात तो मसालेदार तुकडा घोळवून छानसा तळलेला होता. अत्यंत रुचकर मासा. त्याचीच आमटी देखिल केलेली होती. प्रत्येकाला चांगला मोठा तुकडा दिला होता. सोबत तांदुळाची भाकरी, सोलकढी इ. होतेच. परमेश्वराच्या प्रथमावतारावर आम्ही बेहद्द प्रसन्न होतो.
तिथेच एक दिवस नाश्त्याचा योग आला. म्हणजे मी काही घेणार नव्हते. बाकीच्यांचा नाश्ता होई पर्यंत तिथे थांबणार होते फक्त. पण सगळ्यांच्या बरोबर, माझ्यापण हातात त्यांनी ताटली दिलीच. तिथल्या चुलीवर मोठे ऍल्युमिनियमचे पातेले ठेवले होते. त्यावर झाकण घालून, त्याच्या कडेने एक फडके गुंडाळले होते. जशी वाफ यायला सुरुवात झाली, तसे ते फडके पूर्ण ओले झाले. मग काहीवेळाने त्यांनी झाकण उघडले. आत रोवळीसारखे काही होते. त्यावर तांदुळाच्या पांढऱ्याशुभ्र पातळ पापड्या ( त्याला आमच्याकडे सालपापड्या म्हणतात ) होत्या. त्या लहान लहान स्टीलच्या ताटलीतून आम्हाला दिल्या. सोबत लिंबाचे लोणचे होते. आमच्या ताटलीतले संपेपर्यंत, काकूंचा पुढचा घाणा तयार असे. त्यांच्या घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत ती चूल होती. घराच्या पायऱ्या, आणि पुढे काही भागात फरश्या होत्या. बाकीच्या भागात, कोंकणची तांबडी माती. कसल्यातरी फुलांनी बहरलेला दाट वेल होता. त्याचा मंडपच तयार केलेला. आणिक पण बरीच लहान मोठी झाडे होती. पाण्याचा एक नळ होता आणि एक लहानसा हौद. चुलीतून उठणारा धूर, चुलीत जळणाऱ्या लाकडाचा वास आणि त्या चुलीवरील पातेल्यात रोवळी ठेवणाऱ्या, गोऱ्यापान, कपाळावर मोट्ठे कुंकू लावलेल्या काकू, हे चित्र मनावर जणू कोरले गेले आहे. मला तो नाश्ता अजूनही आठवतो. त्यापासून प्रेरणा घेऊन मी तुळशीबागेतून सालपापड्यांचा स्टॅण्ड आणलाय, परंतु पापड्यांचा योग काही अजून आलेला नाहीये.
"सारे प्रवासी घडीचे.. " असे म्हणतात. या घडीभराच्या प्रवासातच, असंख्य अनुभव आणि आठवणींचा खजिना जमा होतो. अविरत धावणाऱ्या काळाबरोबर, अनेक घटना, प्रसंगांचे धागे गुंफले जातात. बघता बघता सुखदुःखाचे चमकदार रंग त्यात भरले जातात. आठवणींची सुरेखशी नक्षी चितारली जाते. माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या असंख्य क्षणांची रेशमी किनार लाभते. आणि मग नेहमीचे, नीरस, काळे-पांढरे आयुष्य जरतारी होऊन जाते.
(क्रमशः)