गावोगावी ... (४)

प्रत्येक गाव, प्रत्येक शहर वेगळेच असते. त्यांना स्वतःचे एक व्यक्तिमत्त्वही असते. भाषा धर्म, चाली-रीती एक असले तरीही हे वेगळेपण अढळते. भाषेचा लहेजा देखील वेगळा भासतो. नुसत्या बोलण्याच्या पद्धतीवरून, बोलणारा पुण्याचा आहे की मुंबईचा, नागपूरचा आहे की साताऱ्याचा हे ओळखता येतेच. प्रत्येक शहराची एक खासियत असते. वेगळेपण म्हणा ना. आणि त्या वेगळेपणाचा, तिथल्या शहरवासीयांना अभिमान असतो.
पुणे शहरा जवळ असलेले अहमदनगर हे शहर, पुण्याच्या तुलनेत लहान असले, तरी महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे.
विशेषतः कापड, कपडे इ च्या व्यापारासाठी. लग्नाचा बस्ता बांधण्याकरिता, खरेदी करता बाहेरच्या शहरांमधून वऱ्हाडी मंडळी इथे येतात. प्रवासी सुविधा आणि उत्तम रस्ते, यामुळे नगरला जाणे आता चांगलेच सोयीस्कर झाले आहे.
परंतु काही वर्षांपूर्वी परिस्थिती जरा वेगळी होती. पुण्यापासून नगरपर्यंत जायला. साडे तीन ते चार तास सहज लागत, एसटी बसने. कारण बस शिरूर, शिक्रापूर असा वाटेत लागणारा प्रत्येक थांबा घेत चालत असे. काही वेळा एका थांब्यावर किती वेळ थांबायचे, हे वाहक आणि चालकाच्या मर्जीवर ठरत असे.
बस स्टॅंड पासून घरी जायला टांगा करावा लागे. टांग्यात पुढच्या बाजूला टांगेवाला बसलेला असे.
त्याच्या हातात चाबूक असला, तरी त्याचा वापर करायची वेळ त्याच्यावर सहसा येतच नसे. टांग्याची घोडी चांगलीच माणसाळलेली असत. तिथले गर्दीचे रस्ते, त्यांच्या चांगले सवयीचे झालेले असत. टांग्यात पाठीमागे दोन अथवा जास्तीत जास्त तीनजण बसतील इतकीच जागा असे. पायापाशी प्रवासी सामान ठेवून आम्ही तिथे बसत असू. नंतर नंतर तिथे रिक्षाही दिसू लागल्या होत्या. परंतु आम्ही मात्र घरी टांग्यातूनच जायचे.
अहमदनगर म्हणजे माझे आजोळ. तिथल्या चितळे रस्त्यावर, माझ्या आजीचे दुमजली घर होते.
घर अजून आहे, पण जुने स्वरूप जाऊन आता तिथे चार मजली नवी इमारत उभी आहे. अनेक वर्षात मी तेथे गेले नाहीये. आजी गेली मामा, मामी, मामेबहिणी आणि भाऊ आता पुण्यातच असतात.
अहमदनगर तसे लहानसे शहर. माणसे मिळून मिसळून राहणारी. वागण्या बोलण्यात मोकळेपणा असलेली अशी..
निदान माझ्या आठवणीत तरी तशीच आहेत. आजीच्या घराच्या एका बाजूला गांधी, मेहेर असे गुजराथी शेजारी, तर दुसऱ्या बाजूला डॉ ताबे यांचे घर. आजीचे घर जुनेच पण दोन मजली होते. तळमजल्यावर स्वयंपाक घर, त्याच्या मागे चौक, न्हाणीघर, तिथेच पाण्याचा एक लहानसा हौद होता. दुसऱ्या मजल्यावर, एक खूप मोठी खोली (त्याला सगळे हॉल म्हणत) होती. त्याच्या बाजूला आणखी एक खोली आणि गच्ची. हॉलच्या समोर आणि बाजूला चांगली लांब रुंद बाल्कनी होती.
हॉल मध्ये दुपारच्या वेळी आजीचा शिवणक्लास चालत असे. दोन तीन शिवणाची मशीन्स होती. तिच्याकडे शिवण शिकायला पुष्कळ मुली, बायका येत. आजीला त्या सगळ्या 'बाई' म्हणत. मला पाहिले की म्हणत, "पुण्याहून नात आली वाटतं?" आजीच्या शिवणकामाच्या वह्या होत्या. सुंदर, एकसारखे हस्ताक्षर आणि आखीव रेखीव आकृत्या असलेल्या. त्या सर्व आजीने स्वतः लिहून काढलेल्या होत्या. छापील काही नाही. त्यातून बघून, तिच्याकडे शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनी, त्यांच्या वह्यांमध्ये सारे उतरवून घेत असत.
नगरमधला रामप्रसाद चिवडा फार प्रसिद्ध. भाजलेल्या पोह्यांचा, भरपूर दाणे, खोबऱ्याचे काप असलेला आणि तेलाच्या सढळ वापराने चांगलाच चमचमीत असलेला असा चिवडा. नगरला गेले, की एकदा तरी तो चिवडा घ्यायचाच असा रिवाजच होता. तिथली दुर्गासिंगची लस्सी फार लोकप्रिय. मामा आम्हा सर्वांना आवर्जून तिथे नेणारच. दाट मलई असलेली, गोड लस्सी ही तिथली खासियत. तिथले गुलाबजाम सुद्धा प्रसिद्ध होते. एखाद्या वाटीत अथवा काचेच्या कप मध्ये गरम गुलाबजाम, पाकासकट दिला जाई. एक एक गुलाबजाम चांगला मोठ्ठा. नगर मध्ये एक लहानशी बाग होती (अजूनही असेल). सिद्धी बाग तिचे नाव. त्या बागेच्या प्रवेशदाराच्या एका बाजूला लहानशी खिडकीसदृश्य जागा होती. तिथे एक दूरचित्रवाणी संच ठेवलेला होता. समोर वाळू असलेली मोकळी जागा. चित्रपट बघण्यासाठी ही मोफत सुविधा उपलब्ध केलेली होती. "संत सखू" हा कृष्ण-धवल चित्रपट मी तिथे पहिल्याचे चांगले स्मरते. तिथेच बाजूला एक तरण तलाव होता.
काही वर्षांनंतर, जुन्या घरात काही सुधारणा करून तळमजल्याची जागा भाड्याने दिली होती. आजीला जिन्याची चढ-उतार त्रासदायक होऊ लागली होती. त्या जागेत आलेले भाडेकरू शेतकरी कुटुंबातले होते. नगरच्या जवळ गुंडेगाव नावाचे गाव आहे तिथले. एका वर्षी आम्ही गुंडेगावाला गेलो होतो. हुरड्याच्या मोसमात, आणि फक्तं दोनच दिवसासाठी. म्हणजे सकाळी जाऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत यायचे .
गुंडेगावात सगळे मातीचेच रस्ते होते. शेताकडे जाणारा रस्ता देखिल अरुंद, एकावेळी एकच बैलगाडी जाऊ शकेल असा. जुनी, दगडी बांधकाम असलेली लहान लहान घरे. तिथेच एक मंदिर देखिल होते. विजेचा वापर जवळपास नाहीच. गावातील प्रत्येकजण एकमेकांना ओळखणारा. कारण लोकवस्ती काही फार नाही. आम्ही ज्यांच्याकडे राहणार होतो, त्यांचे घर चांगले प्रशस्त ओवरी असलेले होते.
पायवाटेने गेल्यावर तीन चार दगडी पायऱ्या चढून जायला लागत.
मग एक लाकडी दरवाजा. तिथून आत गेल्यावर सुबकपणे सारवलेले अंगण. तिथे एक विहीर होती. पाणी काढण्यासाठी ठेवलेल्या, दोर लावलेल्या बादल्या आणि कळश्या तिथे होत्या. तिथेच बाजूला जनावरांचा गोठा होता. समोर आणखी दोनतीन पायऱ्या चढून गेले, की एक प्रशस्त ओवरी होती. लाकडी खांब असलेली. तशीच ओवरी बाजूला पण होती. ओवरीतून एक लाकडी दार होते, आतमध्ये घर. घरातल्या जमिनी देखिल नीटनेटक्या सारवलेल्या. भीतींना मोठाले कोनाडे होते. स्वयंपाक चुलीवरच केलेला. तिथे पहिल्यांदाच मी साखरे ऐवजी गूळ वापरून केलेला चहा घेतला होता.
पुस्तकात वाचलेले आणि मराठी चित्रपटातून पाहिलेले खेडेगाव, प्रत्यक्षात प्रथमच पाहत होते. गावकऱ्यांचे आयुष्य मोठे कष्टाचे होते. त्यांचा दिवस खूप लवकर, भल्या पहाटे होई. यंत्रांची मदत न घेता सर्व कामे करायची. शेतावरील कामे, जनावरांची देखभाल आणि गृहकृत्ये देखिल कष्टप्रदच. घरातील प्रत्येकालाच या कष्टाची चांगली सवय असावी.
पुढे पुढे आमचे नगरला जाणे कमी कमी होत गेले. माझी आजी, कधी मामेभावंडांना बरोबर घेऊन तर कधी एकटीच पुण्याला येत असे. आजी गेल्यानंतर नगरला जाण्याचे कारणच उरले नाही.
आता तिथे खूप सुधारणा झाल्यात म्हणे. पण माझ्या आठवणीतले नगर, आणि आजीचे घर मात्र अजूनही तसेच, जुन्या स्वरूपातच आहे. काही गोष्टी मनात घर करून राहतात ना? त्या अशा...
महाराष्ट्र देशीची महती थोर. जितके बघू, जितके समजून घेण्याचा प्रयत्न करू तितकी ती अपार आहे. मराठी माणसे साधी, प्रामाणिक आणि कष्टकरी आहेत. रोखठोक बोलणे आणि हातचे न राखता वागणे -- त्यांमुळे भांडखोर आहेत असे वाटतात. पण तसे नाही. गोड गोड, गोल गोल बोलणे आणि "देखल्या देवा दंडवत" असे वागणे जमत नाही. काही गणंग असतातच. पण "उडदामाजी काळे गोरे" असायचेच, त्यांना कसे टाळणार?
उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतराजी, निबिड अरण्ये, खोल खोल दऱ्या यांनी वेढलेल्या अशा महाराष्ट्र देशी, अजंठा, वेरूळ सारखी कोरीव आणि देखणी लेणी सुद्धा बघायला मिळतात.
मी औरंगाबादला गेले होते. सोबत चिरंजीव, वय वर्षे ३ फक्त. एका प्रकल्पानिमित्त, आहोंचा मुक्काम काही काळापुरता औरंगाबादेत होता. मी काही दिवसांकरता म्हणून तिथे जायचे ठरवले होते. एप्रिल, मे महिन्याचा काळ होता. भयंकर ऊन आणि उकाडा.
तशात असे हिंडणे फिरणे चिरंजीवांना फारसे पसंत नसे. बाहेर निघाले, की त्याचे असहकार आंदोलन चालू होई. पण फिरण्याची आणि नवीन शहर, ते सुद्धा औरंगाबाद सारखे ऐतिहासिक शहर, पाहण्याची दुर्दम्य इच्छा असल्याने, तशातही स्कार्फ, छत्री इत्यादी साधने घेऊन औरंगाबाद दर्शन सुरू होते. बिबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला, औरंगजेब बादशहाची कबर इ.प्रसिद्ध ठिकाणांचे दर्शन घेऊन झाले होते. आता अजंठा, वेरूळ...
बघताना आश्चर्याचा पारावार राहत नाही. कसे असतील ते शिल्पी, ते कलाकार? इतक्या अवघड अशा डोंगरात, कशा कोरल्या असतील इतक्या जिवंत, देखण्या मूर्ती? ते अज्ञात कलाकार जरी कधीच काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांनी घडवलेल्या, दगडांमधून साकारलेल्या या कलाकृती, शेकडो वर्षांपासून जनमानसाला भुरळ घालीत आल्या आहेत.
बाहेर जरी ऊन तापलेले असले तरी, लेणी असलेल्या गुहा मात्र छान थंड होत्या, काहीशा अंधाऱ्या. तिथे गेल्यावर सारेजण आपसूकच शांत होत. तिथली शिल्पे, कोरीव काम बघताना थक्क होऊन जात. अनेक कथा त्या शिल्पकारांनी, दगडांमधून जिवंत केल्या आहेत. बरोबर असणारा गाईड, प्रत्येक लेण्याची माहिती, कथांचे रसाळ वर्णन करीत होता. चिरंजीव देखिल शांतपणे सारे काही पाहत, ऐकत होते. त्यातले त्याला काय कळत होते माहिती नाही, परंतु तिथली सर्व लेणी त्याने आमच्याबरोबर न कुरकुरता पाहिली.
लेणी पाहून आम्ही परत बसकडे आलो. काहीजण अजूनही परत आलेले नव्हते म्हणून बस तिथेच थांबलेली होती. आता आमचा छोटा प्रवासी खूपच थकला होता. त्याच्यासाठी बरोबर घेतलेल्या डब्यातला खाऊ खातानाच त्याचे डोळे मिटत होते. तितक्यात बाहेर कसलीतरी गडबड ऐकू आली. बसच्या बाहेर थांबलेले सहप्रवासी घाईघाईने आतमध्ये येत होते. मी खिडकीबाहेर पाहिले तर तिथे माकडांची टोळीच आली होती. लहान, मोठी अनेक माकडे. काही अगदी छोटी पिल्ले होती, त्यांच्या आयांना घट्ट चिकटलेली. आणि अशा पिल्लाना घेतलेल्या माकडिणी, झाडावरच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सहजपणे झेपावत होत्या. मी म्हणाले, " अरे गंमत बघ बाहेर. कोण आलंय बघ? " तशी माझा मुलगा बसमधल्याच आसनावर उभा राहिला. खिडकीचा आडवा गज पकडून निरखून बाहेर पाहत होता. त्याने हे प्राणी आधी कधीच पाहिलेले नव्हते. डोळ्यावरची झोप कुठल्या कुठे गेली होती. उत्साहाने तो मला दाखवत होता, " आई ते पिल्लू बघ, कसं करतंय ते.. आई त्याची शेपटी बघ". बस पासूनच काही अंतरावर ती टोळी बसलेली होती. काही मधूनच बसजवळ यायचा प्रयत्न करीत होती. आमच्या गाइडने सांगितले त्यांना काही खायला वगैरे देऊ नका, नाहीतर ते सगळेच बसमध्ये सुद्धा येतील. मग कठीण होईल. वराच वेळ त्याच्या साऱ्या लीला लोक बघत होते. काही वेळाने बसमधले सारे प्रवासी परतले आणि आमचा प्रवास सुरू झाला.
त्यावेळी माझा मुलगा खूपच लहान होता. त्याला अजून बाहेरचे खाद्य पदार्थ शक्यतो द्यायचे नाहीत असे ठरवले होते. त्यांमुळे आपोआप आमच्यावर देखिल बंधन असे. हॉटेल मध्ये वगैरे जाणे जवळ जवळ नाहीच. पण एक दिवस तिथे खरेदीसाठी बाजारात जायचे होते. औरंगाबादच्या प्रसिद्ध शाली बघायच्या होत्या. तिथून येताना एका पानाच्या दुकानाजवळ आमचे वाहन थांबले. ते म्हणे औरंगाबाद मधले प्रसिद्ध पानाचे दुकान होते. दुकान चांगलेच मोठे होते. तिथे मिळणाऱ्या विविध प्रकारच्या पानांची यादी बाहेरच्या बोर्डावर लिहिलेली होती. मसाला पान, किंवा गुलकंद मसाला पान या पलिकडे माझे विडापानविषयक ज्ञान नव्हते. तिथे तर भलीमोठी यादीच होती. पाहावे ते नवलच. कुठले पान मी घेतले होते, आता आठवत नाही, पण त्यात गुलकंदाबरोबर खोबरे घातलेले होते ते आठवते. माझ्या मुलासाठी सुद्धा एक छोटे कात, चुना न लावलेले, स्पेशल पान बनवून दिले होते. अर्थात त्याने त्यातलापण फक्त गुलकंदच खाल्ला होता.
पुण्याला परत आल्यावर, कॅमेरातल्या निगेटिव्हजचे फोटो आणले. त्यावेळी मोबाईल फोन, कॅमेरा वगैरे नव्हते. त्यामुळे फोटो काढायची मर्यादा असे, जास्तीत जास्त २५ ते ३० फोटोज. पण तेव्हढे पुष्कळ वाटायचे. आत्ता हे लिहित असताना माझ्याजवळ ते फोटो देखिल नाहियेत. पण मनात कोरलेली ही स्मृतीचित्रे बघण्यासाठी मला त्यांची गरज भासत नाही. त्यावेळी काढलेले फोटो कदाचित हरवतील, खराब होतील, त्याचे रंग फिक्के होतील. परंतु माझ्या स्मरणवहीतील चित्रे अजूनही तितकीच ताजी आहेत. त्याचे रंग कधीही विटणार नाहीत, बेरंग होणार नाहीत.
(क्रमशः)