गावोगावी
"आपल्याला बीजिंगला जायला लागणार आहे. "
संध्याकाळी घरी आल्यानंतर माझ्या पतीने मला बातमी दिली.
का? कशासाठी? वगैरे विचारणे गैरवाजवी होते.
"कशासाठी म्हणजे काय, ऑफिसचे काम आहे"', असच उत्तर मिळणार होते.
त्या वेळी मी बॅकॉक मध्ये होते. त्या लहानशा सुट्टीत अजून एका देशाची सफर होणार होती. पूर्वी एकदा चीनमध्ये जायची संधी माझ्या हातातून निसटली होती. दैवयोगाने, मला ती परत एकदा मिळत होती. आनंद होताच त्याबरोबर उत्सुकता खूप जास्त होती. प्रवासात, एखाद्या नवीन प्रदेशात गेल्यावर साहजिकच प्रेक्षणीय स्थळे पाहण्याला प्राधान्य दिले जाते. मी पण अनेक प्रेक्षणीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक इ. स्थळांचे दर्शन घेतले आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमधील समाजजीवन, संस्कृती, धार्मिक चाली रीती बद्दल मला नेहमीच कुतूहल वाटते. तसेही "माहितीचा विस्फोट" असलेल्या काळात जवळ जवळ काहीच अप्राप्य राहिलेले नाही. घरात बसूनही अनेक देशांची सफर करता येते. अनेक पर्यटन स्थळांची स्थिरचित्रे, चलतचित्रे आपल्याला कधीही उपलब्ध होऊ शकतात. माहिती मिळविण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध असतात. तरीही प्रत्यक्ष तिथे जाणे हा एक निराळाच अनुभव असतो. मोबाईल फोन, कॅमेरा इ. साधने माझ्याकडे नव्हतीच. त्यामुळे बघणे आणि ऐकणे यावरच जास्त भर होता.
बीजिंग विमानतळावर विमान उतरत होते. भारत देशा सारखीच पुरातन संस्कृती आणि परंपरा असलेला आणि भारताचा सख्खा शेजारी असलेला चीन हा देश. अशिया खंडातील चीन हे एक बलशाली राष्ट्र आहे. भारताप्रमाणेच महाप्रचंड लोकसंख्या असलेला हा देश आहे. चीन चे सत्ताधारी सरकार आणि चिनी जनतेने अनुशासन, निष्ठा आणि अमाप कष्टाच्या योगे आश्चर्यकारक प्रगती साधली आहे. चीन देशाच्या, त्यांच्या इतिहास आणि संस्कृतीच्या अनेक कथा वाचलेल्या होत्या. डॉ कोटणीस आणि चिंगलानची कथा तर रूपेरी पडद्यावर पाहिलेली होती. चीनच्या "ग्रेट वॉल" , "फोर्बिडन सिटी" इत्यादीच्या कथा ऐकलेल्या होत्या. आता ते सारे मी प्रत्यक्ष पाहणार होते. माझे पती त्या आधी, काही काळासाठी कामानिमित्ताने चीन देशी वास्तव्यास होते. त्याचे तिथले अनुभव, ऐकून बरीच माहिती माझ्याकडे आहे असे वाटत होते. परंतु जेव्हा प्रत्यक्ष चिनी भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा ते सारे किती तोकडे आहे हे लक्षात आले.
बीजिंग चा विमानतळ चांगलाच मोठा, नीटनेटका आणि खूप गर्दी असलेला असा आहे. तिथे येणारे आणि तिथून प्रवासासाठी जाणारे असे असंख्य प्रवासी दिसत होते. विमानतळावर, येणाऱ्या प्रवाशांचे तापमान तपासणारी उपकरणे तिथे लावलेली होती. नुकतीच सार्स ची साथ येऊन गेलेली होती. त्यामुळे ही दक्षता घेतलेली दिसत होती. विमानतळावरचे कर्मचारी त्यांच्या कामात कुशल होते. इतकी गर्दी असूनही कुठेही अडथळे न येता, फार थोड्या कालावधीत आम्ही तिथून बाहेर आलो होतो.
मी बीजिंग मध्ये आले तो मे महिना होता. हवा आल्हाददायक होती. ज्या हॉटेलमध्ये मुक्काम होता, त्याच्या अगदी समोरच एक पार्क होता. तिथे दिवसाची सुरूवात खूपच लवकर होत असे. पहाटे चार साडेचार वाजताच चांगले उजाडलेले असायचे. आणि संध्याकाळी अगदी उशीरापर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत, मावळतीच्या सूर्याची किरणे रेंगाळत असायची. दिवसभर माझे पती त्यांच्या कार्यालयीन कामात व्यस्त असत. तो देश माझ्यासाठी अनोळखी होता. तिथली भाषा मला समजत नव्हती. त्यामुळे मला एकटीला फार कुठे जाणे शक्यच नव्हते. मी कधी कधी मुलाला घेऊन समोरच्या पार्क मध्ये जायची. तिथे इतरही काही लोक असायचेच. लहान मुले लगेच एकमेकात मिसळून खेळायला लागत. त्यांना ओळखीपाळखीच्या शिष्टाचारांची गरजही लागत नसे. तेच भाषेबद्दल. माझा मुलगा त्या वेळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असला, तरी अजून संभाषण करण्याइतकी ती भाषा त्याला अवगत नव्हती. आणि असती तरी उपयोग नव्हताच. त्या मुलांसोबत असलेले पालक मात्र, ओळख नाही म्हणून आणि भाषेचा प्रश्न म्हणून बाजूला थांबलेले असत. मला कुठे जायचे असेल तर ज्या हॉटेलमध्ये राहत होते, तिथल्या स्वागतकक्षातील कर्मचाऱ्याकडून मला जिथे जायचे असेल, त्या ठिकाणाचे नाव आणि पत्ता पत्ता चिनी भाषेत लिहून घ्यावे लागे. कारण मला नाव जरी माहीत असले, तरी माझे बोलणे/ उच्चार चालकाला कळतीलच असे नाही.
बीजिंग हे शहर खूप सुंदर आहे. भव्य इमारती आणि आणि प्रशस्त रस्ते आहेत. रहदारी खूप असतेच, पण ती शिस्तबद्ध आहे. तिथे काही ठिकाणी मी रस्त्यांच्या दुभाजकांवर विविध रंगाची फुलझाडे पाहिली. एकही फूल कुणी तोडलेले, ओरबाडलेले दिसत नाही. सार्वजनिक जागांची स्वच्छता देखिल कसोशीने सांभाळलेली दिसते. बीजिंगमध्ये रोजच्या प्रवासासाठीचे वाहन म्हणून अनेक लोकं सायकली वापरताना दिसत होते. अगदी रहदारीच्या रस्त्यांवर देखिल सायकलींसाठी एक भाग राखीव असतो.
बीजिंगमधील प्रसिद्ध तिआनमेन चौक आहे तिथून जवळच पर्ल मार्केट आहे. विविध रंगांचे आणि आकाराचे असंख्य मोती तिथे होते. मोत्यांच्या माळा, ब्रेसलेट्स, अंगठी असे अनेक दागिने घडवलेले दिसत होते. काही ठिकाणी सुंदर रेशमी किंवा सॅटीनच्या कापडाचे बटवे तयार करून तर काही ठिकाणी सुबक लाकडी पेट्यांमध्ये दागिने ठेवलेले होते. पुट्ठ्याच्या विविध आकाराच्या पेट्या तयार करून, त्यावर सॅटीनचे आवरण लावून, त्यात असंख्य लहान मोठ्या वस्तू विकल्या जात होत्या. उत्कृष्ट प्रतीच्या चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू तिथे होत्या. तसेच रेशमी आणि सॅटीनचे कापड खूप कमी किमतीत विकले जात होते. तिथे जाऊन काहीही खरेदी न करता परतणे अशक्यच आहे. तेथील विक्रेते मला त्यांच्या कॅल्क्युलेटर वर वस्तूंची किंमत दाखवीत असत (कारण मला त्यांची आणि त्यांना माझी भाषा कळत नसे). मग त्याच कॅल्क्युलेटरवर मी किती किंमत देऊ शकेन त्याचा आकडा टाईप करीत असे. काही वेळानंतर कुठल्यातरी एका रकमेवर एकवाक्यता झाली, की मी ती वस्तू खरेदी करीत असे.
भारताप्रमाणेच चीनमध्ये देखिल लोकसंख्या आणि गरिबी या समस्या आहेत. चिनी जनता खरोखरच अतिशय कष्टाळू आहे. वेगवेगळी कौशल्ये त्यांच्याकडे आहेत. त्याचा वापर करून अनेकजण आपली उपजीविका करतात. येथे तयार होणाऱ्या सुंदर कलाकुसरीच्या वस्तूंना जगभरातून मागणी असते.
चीनची प्रसिद्ध प्राचीन भिंत बघताना आश्चर्याला पारावार राहत नाही. जुन्या काळात उपलब्ध असलेली अगदी अल्प आणि अप्रगत साधने वापरून एव्हढे प्रचंड बांधकाम कसे केलेले असणार. त्याचे वास्तू रचनाकार, बांधकाम करणारे कामगार, कारागीर इत्यादींनी हे काम कसे केले असेल? सारेच अद्भुत.. तिथून खाली उतरताना अगदी अरुंद असा पायऱ्या पायऱ्यांचा रस्ता आहे. तिथे दुतर्फा अनेक विक्रेते अनेक नवलाईच्या आणि कलाकुसरीच्या वस्तू विकत होते. चिनी लोक चांगली कुशल आणि कसबी कलाकार असतात. कागद, कापड, बांबू अशा सहजपणे मिळू शकणारे सामान वापरून तयार केलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या सुंदर, कलात्मक वस्तू तिथे होत्या.
"समर पॅलेस" ही एक पुरातन वास्तू आहे. तशा अनेक पिढ्या तिथे राहिलेल्या, वावरलेल्या आहेत. अगदी अलीकडील काळात चीन च्या डोवेजर क्वीन चे ( राजमाता ) वास्तव्य तिथे असे. चीन च्या राजघराण्याच्या अनेक पिढ्यांनी वेळोवेळी नूतनी करून त्या वास्तूचे भव्य आणि सुबक स्वरूप कसोशीने जपलेले आहे. आधुनिक काळात देखिल त्या ऐतिहासिक वास्तूचे जतन खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे. राजवाड्याच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला कठडे असलेला आणि व्हरांड्याप्रमाणेच छत असलेला एक लहानसा अरुंद रस्ता आहे. त्याच्या बाजूला विस्तीर्ण असा जलाशय आहे. थंडीच्या दिवसात तो तलाव पूर्ण गोठलेला असतो.
खूप मोठ्या परिसरावर पसरलेला अतिभव्य राजवाडा म्हणजेच "फोरबिडन सिटी" . चीनच्या सामर्थ्यशाली सम्राटांचे निवासस्थान. अर्थात आता तिथे कुणीही राजवंशातले सदस्य वास्तव्यास नसतात. चीनव्या इतिहासाचा, संस्कृतीचा अनमोल असा ठेवा असलेली ती संपूर्ण वास्तू, कसोशीने जतन केलेली आहे. तिथे सम्राटांचे राजसिंहासन देखिल आहे.
बीजिंग मध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. ते शहर देखिल अनेक ऐतिहासिक घटना आणि स्थित्यंतराचे साक्षीदार आहे. आधुनिक काळाला साजेशी जीवनशैली आता तिथल्या जनतेने आत्मसात केली आहेच, परंतु परंपरा आणि संस्कृतीची जोपासना देखिल केलेली दिसून येते.
बीजिंगमध्ये आमचा मुक्काम हॉटेल मध्येच असल्याने स्वयंपाक करण्याच्या कामातून मला आपोआपच रजा मिळाली होती. दिवसभर माझे पती कार्यालयीन कामात व्यस्त असत. संध्याकाळी जसा वेळ मिळेल त्या प्रमाणे आसपास कुठे थोडफार जाणे जमत असे. शनिवार रविवारी मात्र भ्रमंतीसाठी मोकळा वेळ मिळत असे.
एके दिवशी एका भारतीय रेस्टॉरंट मध्ये जायचा योग आला होता. लहानशा आटोपशीर जागेमध्ये टेबल खुर्च्या इत्यादींची सुबक मांडणी केलेली ती जागा होती. नाव होते हॉटेल "ताज". आम्ही तिथे गेलो तेव्हा अजिबातच गर्दी नव्हती. खरं म्हणजे आम्ही तिघेच जण तिथे होतो. तिथे आम्हाला शाही म्हणता येईल अशी बिर्याणी देण्यात आली. आणखी काय घेतले होते ते आठवत नाही आता. परंतु त्या बिर्याणीची चव धेणारा प्रत्येकजण नक्की म्हणेल .. "वाह ताज! ".
असेच एकदा दिवसभर हिंडून फिरून दमायला झाले होते. जरा उशीरच झाला होता, चांगला अंधार झालेला. हॉटेलकडे जायच्या वाटेवरच असलेल्या एका चिनी खानपानगृहामध्ये जायचे ठरवले. संध्याकाळची वेळ .. गर्दी भरपूर होती. नशिबाने अगदी कोपऱ्यातले एक टेबल मिळाले. माझे पती काही काळ तिथे वास्तव्यास असल्याने, काय आणि कसे मागवायचे याची त्यांना चांगली माहिती होती. एका मोट्ठ्या चिनीमातीच्या पसरट अशा भांड्यामध्ये त्यांनी आम्हाला एक अख्खा मासा आणून दिला. भांड्यामध्ये तो मासा पूर्ण बुडेल इतके लालसर रंगाचे जरासे तिखट असे तेल होते. त्या तेलात आणखी पण काही मसाले असावेत. मासा त्या तेलामध्ये चांगलाच मुरलेला होता. सुरीने त्याचा एक तुकडा कापून आपल्या समोरील लहान ताटलीमध्ये काढून घ्यायचा. पाहिजे तितकाच शिजलेला तो मासा, खूपच चवदार होता. सोबत एका वाडग्यामध्ये थोडा भात दिलेला होता. भात जरी पांढरा दिसत असला तरी त्याला एक वेगळी चव होती. त्या बरोबरच मोठ्या लाडूसारख्या आकाराचा, पण अगदी मऊ आणि बाहेरून पांढरे तीळ लावलेला गोड पदार्थ होता. आणखी पण काही पदार्थ होते. वेगवेगळ्या आकारांच्या भांड्यातून आणि ताटल्यांमधून कलात्मकरितीने वाढलेले होते. जेवताना तिथे भारतीयांसारखे पाणी पीत नाहीत. एका लहान कप मध्ये आम्हाला गरम चहा दिलेला होता. अत्यंत रूचकर असे ते भोजन होते.
भारता प्रमाणेच चिनी खाद्य संस्कृती अतिशय समृद्ध आहे. घाईघाईने, येताजाता अशाप्रकाराने त्याचा नीट आस्वाद घेता येत नाही. त्यासाठी व्यवस्थित, ऐसपेस असा वेळ द्यायला पाहिजे. तसेच काही नवीन आणि वेगळे चाखायची तयारी असायला हवी. आहाराचे नियम आणि पथ्य देखील कधीतरी बाजूला सारता यायला हवे.
अनेक प्रकाराची व्यंजने असलेले त्यांचे भोजन असते. त्यात सुप्स, व्हेज, नॉनव्हेज पदार्थ, राईस, नूडल्स यांचा प्रामुख्याने समावेश असतो. या बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, लोणची इ. लहान भांड्यामधून दिलेले असते. भोजनासाठी वापरली जाणारी लहान मोठी पात्रे (जास्त करून चिनीमातीची असतात) देखिल अत्यंत सुबक असतात. त्यामुळे रसने सोबत दृष्टी देखिल तृप्त होते.
आमच्या घरातील सर्व सदस्यांना चिनी भोजन अतिप्रिय आहे.
बीजिंगमधील थोड्या कालावधीच्या वास्तव्यात चीनच्या वैभवशाली इतिहासाची आणि प्राचीन संस्कृतीची फक्त एक झलक माझ्या दृष्टिपथात आली होती. ती लहानशी झलक देखिल मोहक होती, अजून काही जाणून घ्यायची उत्सुकता वाढविणारी होती. तिथे परत जाणे जमेल किंवा जमणार नाही, परंतु तिथल्या आठवणी मात्र माझ्यापाशी कायमस्वरूपातच असतील हे नक्की.
(क्रमशः)