गावोगावी ... (६)

मार्च महिना संपत आलेला होता. शाळांच्या परीक्षा चालू होत्या. आमच्या नवीन घरातील फर्निचरचे राहिलेले काम देखिल चालू होते. आणि मला बँकॉकला जायचे होते.  माझे पती नोकरीनिमित्त त्या वेळेस बॅकॉकमध्ये होते. साऱ्याच घडामोडी एकत्रच घडत होत्या. त्यातच माझ्या डोळ्याचे दुखणे  त्रास देत होते. तिकडे लक्ष द्यायला मला वेळ नव्हता. पण तरी  डॉक्टर कडे  तपासणीसाठी जावे लागत होतेच. 
पुणे-मुंबई  प्रवास, त्या नंतर मुंबई-बॅकॉक या सर्वांची तिकिटे,  व्हिसा ही सर्व कामे एकेक करून मार्गी लागत होती.  त्यात मुलाची परीक्षा चालू होती. प्रवासाला जाण्यासाठीची जुजबी तयारी झाली होती. तो काही माझा पहिलाच परदेश प्रवास नव्हता. आधीच्या अनुभवांमुळे थोडाफार आत्मविश्वास होता. परीक्षा संपली आणि दुसऱ्याच दिवशी आमच्या दोघांचा (मी आणि माझा मुलगा) प्रवास सुरू झाला . 
बॅकॉकचा विमानतळ इतर कुठल्याही विमानतळाप्रमाणेच मोठा आणि गर्दी असलेला होता. अधूनमधून इंग्लिश आणि थाई भाषेतल्या उद्घोषणा ऐकू येत होत्या. सारे सोपस्कार पार पडले आणि आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणाकडे निघालो. हवेत चांगलाच उष्मा होता. रस्ते प्रशस्त होते. आणि त्यावर प्रचंड रहदारी होती. टॅक्सी चालक अगम्य इंग्रजीत बोलत होता. त्यातला एखादा शब्द मला ओळखीचा वाटायचा. रस्त्याला नावे रामा नाइन, रामा फोर अशी. तिथे विमानतळावरील सुंदरीने आमचे हात जोडून भारतीय पद्धतीने स्वागत केले होते. नंतर कळले, ती तिथल्या लोकांची अभिवादनाची पद्धतच होती.  दुकानांमध्ये, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स इ.  ठिकाणी देखील तिथले कर्मचारी दोन्ही हात जोडून अभिवादन करीत असत. 
थायलंड मध्ये अजूनही राजे, राण्या आणि राजघराण्यातील सदस्य यांचे मोठे प्रस्थ आहे. राजा म्हणजे तेथील लोकांसाठी देवच आहे. राजा आणि राजघराण्यातील व्यक्तींबद्दल कुणीही चुकूनसुद्धा  अनुचित अथवा अनादराने बोलत नाहीत. तेथील राजवाडा हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. परंतु तिथे पोषाखासंबंधी काही नियम आहेत. तसेच तिथे वावरताना काय काळजी घ्यायची, ज्या योगे त्या वास्तूची मर्यादा भंग होणार नाही याच्या काटेकोर सूचना दिलेल्या असतात. तुमचा पोषाख त्यांच्या नियमात बसणारा नसेल तर तिथे तुम्हाला काहीवेळाकरता दुसरा पोषाख दिला जातो, अर्थात थोडाफार मोबदला घेऊनच (जाताना तो परत करायचा असतो). थायलंडमध्ये बहुसंख्य लोक बौद्ध धर्माचे पालन करणारे आहेत. ठिकठिकाणी बुद्ध मंदिरे आणि बुद्धाच्या मूर्ती दिसतात. राजवाड्यात देखिल एक बुद्धमंदिर होते. रस्त्यावरून कधीही भगवी कफनी धारण केलेल्या बौद्ध साधूंचा जथा दिसतो.
बॅकॉक मध्ये एक मंदिर आहे, त्याचे नाव "वाट अरूण". वाट म्हणजे थाई भाषेत मंदिर. नदीच्या पात्रा जवळच असलेले ते मंदिर आहे. मंदिरात जाताना अगदी कमी उंचीच्या असंख्य पायऱ्या चढून जायला लागतात. येताना, त्या पायऱ्या उतरताना प्रकरण अधिकच अवघड होते, कारण आधारासाठी कठडे वगैरे काही नाही. 
तिथे अशी आख्यायिका सांगितली जाते, की (बहुतेक) चीन देशातून जेडचा  (एकप्रकारचा मूल्यवान हिरव्या रंगाचा दगड) साठा असलेले जहाज त्या ठिकाणी बुडाले. नंतर त्यातील जेड आणि इतर मूल्यवान वस्तू हस्तगत करून, मंदिरासाठी आणि त्यातील मूर्तीसाठी वापरण्यात आले. मंदिर खूपच सुंदर आहे. त्या मंदिराच्या आजूबाजूला, जवळपास दुसरे कुठलेच  बांधकाम नाही. समोर नदीपात्र. संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या झळाळणाऱ्या केशरी, पिवळ्या, सोनेरी  किरणांमध्ये ते दृश्य अजूनच देखणे दिसत होते.  
सकाळी दहा अकराची वेळ असेल. मला तिथल्या सुपर मार्केट मध्ये जायचे होते. तिथे आम्हाला पिण्याचे पाणी विकत घ्यायला लागत असे. हॉटेलपासून मार्केट १५-२० मिनिटांच्या अंतरावर असेल. पण माझ्या मुलाच्या चालीने चालायला अजून जास्त वेळ लागत होता. ऊन खूप होते आणि हवा अतिशय उष्ण आणि तापदायक होती. रस्त्यावर चालणारे फारसे कुणी नव्हते, पण वाहनांची रहदारी खूपच होती. फुटपाथवरून चालताना काही भटकी कुत्री दिसत होती. तिथे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. एकजात सारे मांसाहारी. त्या सर्व पदार्थांचा गंध वातावरणात पसरलेला होता. तिथे अनेक रिकाम्या टॅक्सी जाताना दिसत होत्या. परंतु मला पायी जाणे भाग होते, कारण मला जायचे असलेल्या ठिकाणाचे नाव आणि पत्ता मला माहीत नव्हता. मला सांगितलेल्या रस्त्यावरच्या खाणाखुणा शोधत मी चालले होते. मला माझ्या मुलासाठी जरा वाईट वाटत होते. कारण मलाच त्या उन्हात चालणे त्रासदायक वाटत होते, मग तो तर लहान मुलगा. पण बिचारा माझ्याबरोबर कुरकुरत का होईना चालत होता. 
सुपरमार्केट तसे फार मोठे नव्हते. परंतु विविध खाद्य सामुग्रीने भरलेले दिसत होते. सामानाने भरलेल्या उंच मांडण्या रांगेत ठेवलेल्या होत्या. समोरासमोर ठेवलेल्या मांडण्यांमधील जागा अगदी अरूंद होती. आणि दुपारची वेळ असूनही भरपूर गर्दी होती. एका विभागात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे होती. फ्लॉवर, कोबी, गाजर, टोमॅटो अशी काही मोजकी ओळखीची मंडळी सोडली तर बाकीचा सारा अनोळखीच जमाव होता. खूपसाऱ्या हिरव्यागार पालेभाज्या सुद्धा होत्या. चांगल्या आणि ताज्या दिसत असूनही, त्यांचे नक्की काय करता येईल हे माहीत नसल्याने घेतल्या नाहीत. अनेक प्रकारची ताजी, रसदार फळे तिथे होती. रांबुतान नावाचे लाल रंगाचे लहानसे फळ होते. त्याची चव साधारण आंबटसरच असते. आणखी एक गोटीच्या आकाराचे लोंगॉन नावाचे फळ होते. वरचे कवच पूर्ण काढल्यावर आत अगदी मऊ आणि पांढऱ्या रंगाचे फळ असते.  त्यातली बी  बरीच मोठी असते. फळ चवीला चांगलेच गोड असते. तिथे एक खूप मोट्ठ्या मोसंबीसारखे दिसणारे फळ होते, त्याला पामेलो असे म्हणतात. ते सोलल्यावर आत फिक्कट पिवळा, पांढुरका असा गर असतो. साधारण संत्र्याच्या फोडीसारखा . चवीला आंबट, पण तिखट मीठ लावल्यावर चव चांगली लागते. तिथे तोतापुरी आंब्यासारखाच आकार असलेले, आत पिवळसर पांढऱ्या रंगाचा गर असणारे आंबे होते. त्याची साल पिवळी असली तरी आंबा चवीला बऱ्यापैकी आंबट असतो. हे आंबे तिथे सॅलड मध्ये वापरलेले बघितले. 'मँगो स्टिकी राईस'  ही त्यांची स्वीट डिश आहे. आंब्याची साल काढून, त्याच्या एकसारख्या चौकोनी फोडी करतात. नंतर त्यावर नारळाचे दाटसर दूध घालून, अगदी चिक्कट अशा भाताबरोबर देतात. त्याचीसुद्धा चव चांगली लागते. तिथे दुरीयान नावाचे अत्यंत उग्र वासाचे फळ होते. बाह्यभाग आपल्याकडील फणसासारखाच दिसतो. आतील गर देखील फणसाच्या गऱ्यासारखाच. इतरही विविध प्रकारची फळे तिथे होती. अनेक प्रकारच्या बेरी, चेरी, काळी, लाल, हिरव्या रंगांची द्राक्षे, आणि पेरू. तिथले पेरू आकाराने मोठे आणि खूप बिया असलेले होते. तिथे निरनिराळ्या फळांनी भरलेल्या लहान मोठ्या टोपल्या ठेवलेल्या होत्या. त्या टोपल्यांना रंगीत आणि आकर्षक रिबिनी लावलेल्या होत्या. सण, समारंभ अथवा अन्य काही निमित्ताने कुणाच्या घरी जाताना अशा फळांच्या टोपल्या भेटीदाखल दिल्या जातात. माझ्या पतीच्या कार्यालयातील सहकारी कर्मचारी, आमच्याकडे अशीच एक भलीमोट्ठी फळांची टोपली घेऊन आल्या होत्या. 
मार्केट मधल्या फ्रीज मध्ये गोड पाणी आणि मऊ, पांढऱ्या रंगाचे कोवळे खोबरे असलेली शहाळी ठेवलेली दिसत होती. शहाळ्याचा वरचा भाग छिललेला असतो. अगदी लहानसे गोल आकाराचे कवच ठेवलेले असते, जे सहजतेने काढता येते. मग त्यामध्ये स्ट्रॉ घालून आतील पाणी पिता येते.  खोबरे हवे असेल तर बाकीचे आवरण काढण्यासाठी जरा मेहनत घ्यावी लागते. 
एकंदरीत तिथली खरेदी फारच आनंददायक होती. परत येताना मी टॅक्सी करू शकत होते, कारण माझ्याकडे आम्ही राहत असलेल्या हॉटेलचे,  (इंग्रजी आणि थाई भाषेमध्ये) नाव आणि पत्ता छापलेले कार्ड होते. त्या नंतर मात्र मी जुजबी, उपयुक्त असे थाई भाषेतील शब्द पाठ करून ठेवले होते, जसे  साय, क्वॉ, तोंग इ. (डावीकडे, उजवीकडे, सरळ ). त्यामुळे तेथील विविध ठिकाणी जाणे येणे अधिक सुलभ झाले होते. 
बॅकॉक मधील वास्तव्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची ओळख झाली. थाई पदार्थ जगप्रसिद्ध आहेत. त्यांचे पदार्थ अत्यंत रूचकर तर असतातच, त्यात वैविध्यही खूप अढळते. तिथे भात आणि नारळ याचा वापर अनेक पदार्थामध्ये केला जातो. लाल मिरच्यांचा वापर देखिल सढळपणे केलेला असतो. त्या पदार्थांच्या चवीची जरा सवय व्हावी लागते. तिथली ग्रीन किंवा रेड चिकन करी हा एक अत्यंत चविष्ट पदार्थ आहे. ज्यांना नारळाचे वावडे आहे, असे लोक सोडून सर्वांना नक्कीच आवडेल असा. बोनलेस चिकन (शाकाहारींनी वांग्याचे अथवा सुरणाचे काप वापरून बघावेत) नारळाच्या दुधात शिजवलेले असते. त्याच्यासाठी वापरले जाणारे वाटण देखिल वैशिष्ट्यपूर्ण असते. करण्यासाठी जरा किचकट. त्यात अनेक पदार्थ कमी जास्त प्रमाणात वापरलेले असतात. ते प्रमाण योग्य असणे फार महत्त्वाचे असते.  कारण प्रमाण कमी जास्त झाले की चवीमध्ये फरक पडतो. वाटण केल्यानंतर कोरड्या काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवले, की तीन साडेतीन महिने सहज टिकते. साधारण चारजणांसाठी पुरेल इतके चिकन करण्यासाठी  त्यातले एक किंवा दोन मोठे चमचे इतकेच वाटण पुरते.
तिथे आम्ही एका वॉटर पार्क मध्ये गेलो होतो. तेथे निरनिराळ्या आकाराच्या, उंचीच्या स्लाईडस होत्या. अनेक वळणे घेत पसरलेला स्विमिंग पुल तिथे होता. तो तलाव असला तरी त्यातील पाणी स्थिर नव्हते तर प्रवाही होते. एका विशिष्ट वेगाने आणि दिशेने ते सतत वाहत होते. जलक्रीडेची बरीच साधने तिथे होती. लहान मुलांबरोबरच काही मोठी माणसे देखिल जलक्रीडेचा आनंद लुटत होती. बाजूला काही लहान मोठे स्टॉल्स होते. त्यात पोहण्याचे पोशाख, टॉवेल्स, जलक्रीडा साहित्य असं बरच काही विक्रीस ठेवलेले होते. काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखिल होते. तिथे एक सॅलड होते, त्याचे नाव म्हणे "गाडो गाडो" . कैरी, कांदा, गाजर आणिक कुठल्या कुठल्या भाज्यांचे पातळ, उभे काप केलेले होते. त्यात भरपूर लाल मिरची (खूप बारीक चिरलेली) आणि दाण्याचा (भरड) कूट, इत्यादी  मिसळलेले होते. खाताना डोळ्यात पाणी येईल इतके तिखट, परंतु चव मात्र अप्रतिम होती.
आम्ही कंचनाबुरी येथे गेलो होतो. जाताना प्रसिद्ध क्वाय नदी लागते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी सैन्याने ब्रिटिश युद्धकैद्यांकडून तेथे पूल बांधून घेतला होता. त्या पुलावरून एक ट्रेन ये जा करते. ते एक ऐतिहासिक महत्त्वाचे असे स्थळ आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसून तो पुल ओलांडला म्हणून आम्हाला एक छोटेसे पत्र/प्रशस्ती पत्र देण्यात आले होते. तेथे घडलेल्या घटनांवर चित्रित केलेला  "ब्रिज ऑन दी रिव्हर क्वाय" नावाचा चित्रपट प्रसिद्ध आहे. कंचनाबुरीमध्ये पुरातन थाई संस्कृतीचा वारसा असलेलेली काही मंदिरे आहेत. दुसऱ्या महायुद्धासंदर्भातील एक संग्रहालय देखिल आहे. कंचनाबुरी हे फारसे गर्दी नसलेले शहर/गाव  आहे. संध्याकाळी  हॉटेल कडे परत येण्यासाठी वाहन मिळणे देखिल कठीण झाले होते. संध्याकाळी जेवणासाठी कुठले पदार्थ मागवावेत काही कळत नव्हते. पदार्थांची नावे अनोळखी, त्यात नक्की काय असेल माहीत नाही. त्यातल्या त्यात ओळखीचा म्हणून राईस मागवायचे ठरवले. त्यात देखील ऑलिव्ह राईस, पाईनॅपल राईस असे प्रकार होते. मनात आले अननस आणि चिकन हे एकत्र कसे लागेल?  एका प्लेट मध्ये गरम वाफा येत असलेला राईस आम्हाला आणून देण्यात आला. अननस आणि चिकनचे बारीक तुकडे त्यात होते. त्यावर कदाचित सजावटी साठी असेल.. थोडी कांद्याची हिरवीगार पात  चिरून पसरलेली होती, बेझील ची पाने पण दिसत होती. त्या सर्व मिश्रणाची एकत्र चव फारच छान होती. 
दुसऱ्या दिवशी आम्ही बँकॉक मध्ये  परत आलो. मुक्कामी पोहोचायला दुपार झाली होती. घरी काही करायचे किंवा जेवणासाठी बाहेर जायचे हे दोन्ही पर्याय मला फारसे रूचत नव्हते. मग आम्ही त्याच हॉटेलच्या किचन मधून थोडेफार जेवण मागवायचे ठरवले. भरपूर दमणूक झाल्याने कुणालाच फारशी भूक नव्हती. परत राईसच मागवला होता कारण थाई पदार्थांची अजून नीट ओळख झालेली नव्हती. आम्ही जो पदार्थ मागवला होता त्याचे नाव 'गाँग बाओ जिडींग' (मला ऐकून समजलेला उच्चार असा आहे). बोनलेस चिकन, त्यात भरपूर लाल मिरच्या आणि काजू होते.  लाल  मिरच्या असल्या तरी चव अजिबातच तिखट नव्हती. ग्रेव्ही नव्हती पण अगदी कोरडेही नाही. काहीसा गोडसर, तिखट असा दाट सॉस त्यामध्ये होता. सोबत लांब, जाडसर कणी असलेला पांढराशुभ्र आणि सुवासिक भात. तिथल्या तांदूळाचा भात थोडासा चिकटच होतो. अप्रतिमच  चव होती त्याची. सिंगापूर मध्ये सुद्धा हा पदार्थ मिळतो. फक्त त्यात काजू ऐवजी तळलेले दाणे वापरलेले असतात. 
बँकॉक मध्ये असताना आम्ही काही वेळा बोलिंग  साठी जायचो. निरनिराळ्या वजनाच्या बॉल्सच्या सहाय्याने, दुसऱ्या टोकापाशी असलेल्या लाकडी बाहुल्या पाडायच्या. प्रत्येक लेन वर एक छोटा स्क्रीन टांगलेला असतो, त्यावर तुमचा स्कोअर दिसतो. परत येताना तिथेच खालच्या मजल्यावरच्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही जात असू. वेगवेगळे रूचकर थाई आणि इतरही काही पदार्थ  तिथे मिळायचे. फार कमी शाकाहारी पर्याय उपलब्ध होते. सुंदर आणि आकर्षक भांडी, थाळ्या, पेले इ. मध्ये विविध पदार्थ मिळत. तिथले कर्मचारी ते सारे टेबलवर नीट नेटके मांडत असत. अत्यंत आदबीने काय हवे, नको याची चौकशी करीत. तशीच आदब, तसेच सौजन्य मी बँकॉक मध्ये सर्वत्र अनुभवले. बहुसंख्य  थाई लोक गोरीपान आणि सडपातळ.  प्रत्येकवेळी दोन्ही हात जोडून अभिवादन करीत.  दुकाने, हॉटेल्स इ. ठिकाणचा कर्मचारीवर्ग मदतीसाठी तत्पर असे. 
बँकॉक मधील सुखुमवित नावाच्या अत्यंत गजबजलेल्या विभागात आम्ही गेलो होतो. फुटपाथवर अनेक विक्रेते वेगवेगळ्या वस्तू विकत होते. विकत घेणारे किंमतीसाठी घासाघीस करीत  होते. तिथे मात्र सर्व सौजन्य, आदब इ. लुप्त झालेले दिसले.  "हं म्हणजे थायलंड मध्ये देखिल पृथ्वीतलावरचीच माणसे राहतात तर.. " माझ्या मनात आले. तिथे 'डोसा हट' नावाचे खाद्यगृह बघितले. एका भारतीय क्षुधाशांती गृहामध्ये आम्ही गेलो होतो. बॅकॉक मधले असले, तरी तिथले कर्मचारी अगदी भारतीय पद्धतीनेच वागत होते. बऱ्याच दिवसांनी रोटी, मेथी-मटर-मलई, पालक-पनीर, जिरा-राईस  इ. ओळखीची नावे मेन्यू कार्डवर बघितल्यावर बरे वाटले. त्या हॉटेलजवळच एक लहानसे दुकान होते. तिथे सर्व भारतीय किराणा सामान मिळत होते. 
बॅकॉक मध्ये "चाओ फ्राया" नावाची नदी आहे. आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो तेथील नदीचे पात्र तसे खूप विस्तीर्ण वगैरे नाहीये, परंतु पाण्याला जबरदस्त ओढ होती. पाणी तसे बऱ्यापैकी गढूळच दिसत होते, म्हणजे पिण्यासाठी फारसा उपयोग नसावा. त्या नदीच्या किनाऱ्यावर  तरंगता बाजार भरलेला असतो. दुकाने म्हणजे लहानमोठ्या नौका आणि तराफे. खरेदी करणारे देखिल लहान लहान नौकांमधून तेथे येतात. किनाऱ्यावर काही  लाकडी बांधणीची घरे देखिल दिसतात. त्या घरांचे अंगण म्हणजे नदीचे पात्र. भारतामध्ये घरांपाशी जशी वाहने उभी असतात, तशा त्या घरांजवळ लहान लहान नौका ठेवलेल्या असतात. थाई काकू, मावशा  खरेदीला, एकमेकींकडे जाताना वगैरे नौकेतून प्रवास करतात.  चाओ फ्राया नदीतून प्रवाशांसाठी काही मोटर बोटी असतात. एका बोटीत नावाडी धरून चार ते पाच जण बसू शकतील इतक्याच मोठ्या असतात. खूप वेगाने त्या बोटी चालविल्या जातात. परंतु ज्या ठिकाणी तरंगता बाजार असतो, तिथे त्यांचा वेग कमी केला जातो. त्यातून जाताना किनाऱ्यवरील बाजार बघता येता. नदीत लहान मोठे मासे भरपूर असतात. त्यांना देण्यासाठी काही अन्नपदार्थ किनाऱ्यावर आणि काही वेळेस नावाड्याकडे देखिल  विक्रीस असतात. बोटीतून जाताना ते पदार्थ नदीत टाकले, की माशांच्या झुंडी बोटीच्या भोवती जमतात. 
रात्री खूप उशीरापर्यंत चालू असणारे "फ्ली मार्केट"  हे बॅकॉकमधील एक आकर्षण केंद्र आहे. कधीही तिथे गर्दी असतेच. विविध प्रकारच्या वस्तूंनी सजलेली असंख्य दुकाने तिथे आहेत. वस्तू खूपच स्वस्त असतात. तुमच्याकडे थोडेफार बार्गेनिंग स्किल असेल तर तुम्हाला अत्यंत माफक दरात कलाकुसरीच्या सुंदर सुंदर वस्तू, रेशमी कापड, कपडे इ. मिळू शकतात. परंतु तिथले अरूंद गल्लीबोळ, गर्दी आणि सततचे अवाज यामुळे त्यामुळे नकोसे वाटते. आम्ही उत्साहाने तिथे गेलो होतो, परंतु एकंदरीत रागरंग पाहून लगेचच तेथून काढता पाय घेतला. 
बघता बघता माझ्या परतीचा दिवस आला होता. अजून पाच सहा महिन्यांनी मला परत यायचेच होते, कारण पतिदेवांचे वास्तव्य अजून काही काळ तरी बँकॉक मध्येच असणार होते. त्या दिवशी आभाळ अगदी भरून आले होते. आम्ही तिघे विमानतळावर पोहोचलो तेव्हा पावसाची सुरूवात झालीच  होती. विमानतळावर एक निराळेच नाटक सामोरे आले होते. आमची तिकिटे असलेल्या विमानाचे, क्षमतेपेक्षा जास्त आरक्षण केले गेले होते. कुणाची चूक होती माहिती नाही, पण मी आणि आणखी काही प्रवासी उगीचच अडकले होते.  काहीवेळाने आम्हाला परत बोलावण्यात आले. आम्हाला दुसऱ्या विमानाची तिकिटे देण्यात आली. तसदी बद्दल दिलगिरी व्यक्तं करून, नुकसान भरपाई म्हणून तिकिटाची रक्कम परत करण्यात आली होती.  परंतु माझ्या मनात काळजीचे काहूर उठले होते. मला ज्या विमानाचे तिकीट देण्यात आले होते ते बॅकॉक-मुंबई असे नव्हते, तर बॅकॉक-दुबई होते. आधी दुबईला जाऊन नंतर दुसऱ्या विमानाने मुंबई गाठायची होती. माझ्याकडे सामान भरपूर होते. पुण्यातील आमच्या नातेवाइकांना देण्यासाठी म्हणून बरीच खरेदी केलेली होती. सोबत माझा लहान मुलगा  होता. या सर्वांना सांभाळून, दुबईच्या अनोळखी विमानतळावर मी सारे सोपस्कार पार पाडू शकेन की नाही? ही चिंता मला सतावत होती. माझे मुंबई-पुणे  तिकीट तर वायाच गेले होते. दुसरी बस कधीची मिळेल? माहिती नव्हते. पण सध्या तो विचार करण्यात काही अर्थच नव्हता. मी आणि माझा मुलगा काहीच कारण नसताना, दुबईला जाणार होतो. 
(क्रमशः)