निर्भार आणि निर्जोर (९)

हा लेख वाचकाला आपण निर्वस्तू आहोत असा उलगडा घडवू शकतो.

जोपर्यंत नॉन-मॅटर (निर्वस्तू) म्हणजे काय हे उमजत नाही तोपर्यंत स्वरूपाचा उलगडा असंभव आहे. 

शांतता ही नॉन-मॅटर आहे. म्हणजे शांतता सर्वव्यापी आहे, तिचं अस्तित्व नाकारता येत नाही, पण ती नक्की कुठे आहे हे सांगता येत नाही. शांततेचा जन्म होऊ शकत नाही, ती निर्भार आहे आणि तिच्याकडे कोणताही फोर्स नाही, ती निर्जोर आहे. आपण शांततेला काहीही करू शकत नाही कारण ती नॉन-मॅटर आहे. आपण शांत होऊ शकत नाही कारण ती क्रियोपलब्ध नाही.

थोडक्यात, शांतता प्रयासानं उपलब्ध होत नाही तर आपणच शांतता आहोत हा उलगडा होऊ शकतो. पण हा उलगडा आपल्याला निरर्थक वाटतो ! म्हणजे आपण निर्वस्तू आहोत हे आपल्याला मान्यच होत नाही. आपण निर्भार आणि निर्जोर आहोत ही कल्पनाच सहन होत नाही. प्रत्येकाची आकांक्षा बलवान होण्याची आहे, निर्भार आणि निर्जोर होऊन काय साधणार अशी प्रत्येकाची धारणा आहे. त्यामुळे आपण शांतता आहोत हा उलगडा आपल्याला निरुपयोगी वाटतो. उलट पक्षी आपण शांतता झालो तर जगाचा कोलाहल आपल्याला संपवून टाकेल अशी भीती वाटते आणि मजा अशी की आपण शांतता आहोत हा उलगडा झाला तर आपल्यात बदल असंभव होईल ! कारण शांतता अपरिवर्तनीय आहे.

स्वरूपाचा वेध तीन प्रकारे घेता येतो :

१. आपण शांतता आहोत हे तुम्हाला मंजूर झालं तर आता या क्षणी तुम्ही स्वरूपात स्थिर व्हाल. आपण निर्भार आणि निर्जोर आहोत, सर्वव्यापक आणि मुक्त आहोत हा उलगडा होऊन तुम्ही आनंदून जाल.

२. आपण निर्भार आणि निर्जोर आहोत हे जरी तुम्हाला मान्य झालं तर तुम्हाला नॉन-मॅटरचा उलगडा होईल. तुम्ही आता या क्षणी देहाच्या आरपार व्हाल कारण देहाला वजन आहे आणि तो क्रियामान आहे. मृत्यूपूर्वी तुमचा देह व्यापक सार्वत्रिकतेत विरघळून जाईल आणि देहाचं काहीही झालं तरी आपण अबाधित असू हे तुमच्या लक्षात येईल.

३. जाणण्याची क्षमता सार्वत्रिक आहे आणि आपल्याला होणारी जाणिव हा तिचा इंद्रियगम्य उपयोग आहे ही वस्तुस्थिती लक्षात आली तरी आपण देहात नाही किंबहुना देहात कुणीही नाही हा उलगडा होऊ शकतो. या उलगड्यासरशी तुम्ही आतून अंतर्धान पावता आणि देह जीवंत असतांना मुक्त होता !