पंचायत - प्रतिज्ञाभंग आणि तदनंतर...

पंचायत ह्या वेबसीरीजचा दुसरा भाग (सीझन) पाहून खंतावलो होतो. अजून पुढचा सीझन आला तर त्या वाटेला जाणार नाही अशी प्रतिज्ञाही करून ठेवली होती.

पण भीष्म सोडला तर बाकीच्यांच्या प्रतिज्ञा मोडण्यासाठीच असतात. आणि आशा अमर असते. या दोन तथ्यांचे कॉकटेल होऊन मी तिसरा सीझन बघूनच टाकला. आणि पश्चात्ताप पावलो.

मी स्वतःलाच प्रश्न विचारला की मी त्या फंदात का पडलो? तर रघुवीर यादव नि नीना गुप्ता हे मुख्य कारण. त्यांच्यासारख्या प्रगल्भ अभिनेत्यांनी काम करण्याआधी काहीतरी विचार केलाच असेल या समजुतीने मी तिसऱ्या सीझनला हात घातला.

मी एक प्रघात पाळतो. पुस्तक, सिनेमा आणि वेबसीरीज ही अशक्य झाल्याखेरीज अर्ध्यात सोडायची नाही. एखादी कलाकृती निम्मी-पाऊण झाल्यावर पकड घेत असेल तर ते निसटायला नको. अर्थात 'अशक्य' हा शब्द हल्ली इतका दुर्मिळ राहिलेला नाही!

'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनने अनेक प्रश्न मनात उभे केले आणि काहींची उत्तरेही नजरेत आली.

कुठल्याही कलाकृतीचा भाग-२, भाग-३ हे जेव्हा होते तेव्हा त्यामागे तीन कारणे असू शकतात.

एक म्हणजे मूळ कल्पनाच इतकी भव्य असते की त्याचा एक भाग हा वाचकांना/प्रेक्षकांना सोयीचा जावा यासाठी पाडलेला तुकडा असतो. महाभारताची अठरा पर्वे वा रामायणाची सप्तकांडे ही टोकाची उदाहरणे. पीटर ब्रूक्स यांनी रंगमंचावर आणलेले नऊ तास चालणारे महाभारत नाटक हेही असेच एक उदाहरण.

दुसरे कारण म्हणजे मूळ कथानक आटोपशीरच असते. पण ते पूर्ण झाल्यावर त्याच दिशेने पुढे विचार करून पुढला भाग सुचू शकतो. 'बिफोर सनराईज' हा चित्रपट तयार केल्यानंतर सुमारे दहा वर्षांनी तेच कथानक दहा वर्षांत कसे पुढे गेले असेल याचा विचार करून केलेला 'बिफोर सनसेट' आणि अजून दहाएक वर्षांनी तेच कथानक पुढे नेऊन केलेला 'बिफोर मिडनाईट' हे एक चांगले उदाहरण. यात दोन मुख्य पात्रेही तेच कलाकार साकारत असल्याने रंगभूषेवर भर न देता ती पात्रे आपोआप दहा वर्षांनी मोठी झालेली दिसतात.

'सायको' या चित्रपटाचा दुसरा भाग हेही एक चांगले उदाहरण. मूळ चित्रपटानंतर तेवीस वर्षांनी आलेल्या या चित्रपटात 'नॉर्मल बेट्स'ची भूमिका त्याच नटाने (ऍंथनी पर्किन्स) साकारल्याने दृष्यात्मक एकसंधता येते.

तिसरे कारण म्हणजे मूळ कथानकाचा पुढे विस्तार करण्यासाठी शुद्ध 'गल्ला भरणे' हा हेतू बाळगून केलेला विस्तार.

असे करण्याची परंपरा चित्रपट निर्मितीच्या परंपरेइतकीच जुनी आहे. लॉरेल आणि हार्डीचे चित्रपट यशस्वी होताहेत हे निर्मात्यांना उमगल्यावर पुढले चित्रपट कथानकाचा विचार न करताच तयार झाले. त्या दोघांपैकी कुणीतरी (कुणी ते विसरलो) लिहून ठेवले आहे की निर्माते त्यांना कॅमेऱ्यासमोर ढकलत नि आदेश देत, "करा काहीतरी गमतीशीर".

अलिकडच्या काळात पाहिले तर 'रॅम्बो', 'मिशन इम्पॉसिबल' अशी अनेकानेक उदाहरणे सापडतील. वर नोंदलेल्या सायको-२ नंतर तीनेक वर्षात आलेला सायको-३ हे असेच एक उदाहरण. सायको-२ चालल्यावर ऍंथनी पर्किन्सला ते चिपाड अजून पिळून रस काढण्याचा मोह झाला. आणि त्याने आयुष्यातला पहिला चित्रपट (सायको-३) दिग्दर्शित केला. आणि आपल्या कारकीर्दीला बट्टा लावून घेतला.

या सर्व गल्लाभरू सीक्वेल्समध्ये बटबटीतपणा हा समान धागा. एका कलाकृतीत एखादे पात्र प्रेक्षकप्रिय होते म्हटल्यावर तेच पात्र तसेच पुढे रेटायचे. मग कथानकात जीव नसला (आणि तो बहुधा नसतोच) तरी हरकत नाही. हिंदीतली उदाहरणे तर अत्यंत ओकारीजनक आहेत. हंगामा आणि हेराफेरी या मूळ अवतारात नितांतसुंदर आणि प्रेक्षणीय असलेल्या चित्रपटांचे पुढले भाग काढणाऱ्यांची रवानगी करण्यासाठी 'ग्वांटानामो बे'देखील अपुरा पडेल.

कुठल्याही क्षेत्रात कुठे थांबावे हे जिला कळते ती व्यक्ती महान. अद्वितीय खेळाबरोबरच आपली फलंदाजीची सरासरी तीन आकडी व्हावी म्हणून ताणत न बसण्यात ब्रॅडमनची महानता होती. दुर्दैवाने ब्रॅडमन हे 'रेअरेस्ट ऑफ रेअर' उदाहरण. बाकी बहुतेक विक्रमवीरांचा विक्रम साध्य होण्याच्या जरा आधीचा काळ हा कुंथण्यात आणि/वा धापा टाकण्यात जातो.

'वेबसीरीज'चा तर सतत येत रहाणारे पुढले सीझन हा अस्तित्वाचाच भाग. पण त्यातही फार ऊतमात न करता संथपणे मार्गक्रमण करणाऱ्या वेबसीरीज आहेत. 'इनसाईड एज' आणि 'ब्रीद इन्टू द शॅडोज' ही मी पाहिलेली भारतातली उदाहरणे. 'द गुड वाईफ', 'द मेन्टलिस्ट', 'ऑल राईज' आणि 'रिझोली ऍंड आइल्स' ही अमेरिकेतली.

'पंचायत'मध्ये डाव हातातून निसटत चाललेला सीझन-२ मध्येच जाणवला होता. सीझन-३ ने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले.

तरीही शेवटपर्यंत बघू शकलो याचे एकुलते एक कारण म्हणजे त्यात काम करणारे अभिनेते.

काही लोकांचा पडद्यावर वा रंगमंचावर वावर हा दृष्यसुखद असतो. बघत राहावा असा. मग कथानक आणि पात्र राहते बाजूला, आपण त्या अभिनेत्या/अभिनेत्रीला बघत बसतो. एखादा 'सुपरस्टार' जन्माला येतो तो याच कारणामुळे. एकदा रजनीकांत वा टॉम क्रूजला पहायला जायचे असे ठरले की मग चित्रपटाचे नाव नि कथानक दुय्यम सोडाच, मोजण्यातही येत नाही.

पण सीझन-३ मध्ये जरी सर्व पात्रे अभिनित करणारी नटमंडळी उत्तम असली, तरी पोकळ आणि अतार्किक कथानक त्यावर बोळा फिरवते. काही 'मॅनरिझम्स'ही पिळून काढलेले आहेत - गेंगाण्या आवाजात रघुवीर यादवने 'बढिंयां हैं' म्हणणे, चंदन रॉयने 'अबिसेक सर' वा 'पल्लाच्चा' म्हणणे, पंकज झा ने सदैव खुनशी नजरेने पहाणे, नीना गुप्ताने सदैव शांत-सोज्वळ-सोशिक भारतीय स्त्रीचा मुखवटा चेहऱ्यावर चिकटवून ठेवणे, सान्वीने सतत 'क्यूट' दिसण्याचा प्रयत्न करणे. नट म्हणून जेव्हा यांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडला जाईल तेव्हा या भूमिका त्यांच्या बॅलन्सबुकात डेबिट साईडला पडतील हे नक्की.

कुठे थांबणे हे न कळणे ही मूलभूत मानवी प्रवृत्ती असावी.

जोसेफ मीघर या लेखकाच्या आत्मवृत्तात एक प्रसंग आहे. लहान टिपी (जोसेफचे घरातले नाव) बोलायला नुकताच शिकलेला आहे. घरी येणारी पाहुणे मंडळी घरातील शालेय वयातल्या मुलामुलींना अभ्यासापैकी एकादा प्रश्न विचारून पिडण्याची परंपरा पाळीत असत. त्याप्रमाणे याच्या थोरल्या भावाला 'अमेरिकेतली सगळ्यात मोठी नदी कुठली' असा प्रश्न विचारण्यात येतो. टिपी मध्येच तोंड घालून 'मिस्टर टिपी नदी' असे उत्तरतो. हंशा उसळतो. मग हा प्रयोग पुनःपुन्हा होत राहतो.

आणि एक दिवस हंशा उसळणे थांबते.

टिपीला प्रश्न पडतो, जी गोष्ट कालपर्यंत गंमतीची/विनोदी होती ती आज अचानक कशी बदलली?

जेव्हा एखाद्या कलाकृतीचे एकामागून एक भाग पाडले जातात तेव्हा त्यातली रंजकता कुठे संपते नि रटाळवाणे रहाटगाडगे कुठे सुरू होते हा प्रश्नही मूलभूत मानवी प्रवृत्तीचा द्योतक आहे. तो प्रश्नच न पडणारी मंडळी जेव्हा कलानिर्मितीच्या क्षेत्रात उतरतात तेव्हा मग आपणा प्रेक्षकांच्या नशिबी हे भोग येतात.

अवांतर - पुढल्या सीझनची तरतूद म्हणून या सीझनचा शेवट एका संघर्षप्रसंगाच्या मध्यावर केलेला आहे.