पुण्याच्या पश्चिमेला असलेल्या चार धरणांच्या साखळीतून पुण्याला आणि पुढल्या प्रदेशाला पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी पाणीपुरवठा होतो.
त्यातील खडकवासला धरण हे पुण्याच्या सर्वात नजिक. त्यातून विसर्ग केला की नदीकाठच्या वस्त्यांना धोका उत्पन्न होऊ शकतो. बऱ्याचदा होतो, जसा दोन दिवसांमागे झाला.
या चार धरणांची साखळी टेमघर - वरसगांव - पानशेत - खडकवासला अशी आहे.
या धरणांची क्षमता खालीलप्रमाणे:
टेमघर - १०,५०१ कोटी लिटर्स
वरसगांव - ३६,३१३ कोटी लिटर्स
पानशेत - ३०,१६१ कोटी लिटर्स
खडकवासला - ५,५९१ कोटी लिटर्स
मॅप्सवर पाहिले तर रस्त्याने खडकवासला ते टेमघर हे अंतर सुमारे सत्तर किमी आहे. पण मॅप्सवरून हेही कळते की प्रत्यक्ष पाण्याचा प्रवाह टेमघर ते खडकवासला तीसेक किमीच वाहतो.
https://numerical.co.in/numerons/collection/5985e2501d6090dc136dc381 या वेबसाईटवर या धरणांतील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती दिल्याचा दावा आहे. तो खरा धरून पुढे जाऊ.
या वेबसाईटनुसार २३ जुलैचे आकडे असे
टेमघर - ४,४६५ कोटी लिटर्स (६,०३६ कोटी लिटर्स साठवणक्षमता शिल्लक)
वरसगांव - १७,५३५ कोटी लिटर्स (१८,७७८ कोटी लिटर्स साठवणक्षमता शिल्लक)
पानशेत - १८,७३१ कोटी लिटर्स (११,४३० कोटी लिटर्स साठवणक्षमता शिल्लक)
खडकवासला - ४,५१० कोटी लिटर्स (१,०८१ कोटी लिटर्स साठवणक्षमता शिल्लक)
यातील खडकवासला धरणातून २४ जुलैला विसर्ग वाढवण्यात आला म्हणजे एका दिवसात खडकवासल्याची क्षमता ओलांडली गेली.
मुळात खडकवासला हे या साखळीतले सर्वात छोट्या क्षमतेचे धरण. टेमघर खडकवासल्याच्या सुमारे दुप्पट क्षमतेचे, वरसगांव सातपट नि पानशेत सहापट.
२३ जुलैला खडकवासल्याच्या पूर्ण क्षमते एवढी साठवणक्षमता टेमघरला शिल्लक होती, खडकवासल्याच्या क्षमतेच्या तिपटीहून जास्ती क्षमता वरसगांवला शिल्लक होती आणि खडकवासल्याच्या क्षमतेच्या दुप्पट क्षमता पानशेतला शिल्लक होती.
ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असे कधी झाले आहे का हे तपासण्यासाठी अधिकृत म्हणून खालील वेबसाईट पाहिली. [धरणांच्या क्षमतेचे आकडे वरील वेबसाईटवरून घेतले, पण खालील वेबसाईटशी ताडूनही पाहिले]
https://punefloodcontrol.com/index.php
पण तिथे भूतकाळातली माहिती (हिस्टॉरिकल डाटा) मिळत नाही. त्यासाठी दुसरीकडे शोधाशोध करावी लागेल. पण वैयक्तिक स्मरणशक्तीवर भरंवसा ठेवला तर चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत असे आठवत नाही. खरे तर तीन धरणे. खडकवासला लगेच भरते.
जेव्हांजेव्हां खडकवासल्यातून विसर्ग करायची वेळ येईल तेव्हां तेव्हां ते पाणी उचलून (लिफ्ट इरिगेशन) साखळीतल्या वरच्या धरणात - जिथे साठवणक्षमता शिल्लक आहे - सोडणे (शक्यतो टेमघरमध्ये) हा पर्याय होऊ शकेल का?