अजून ह्रदयी तिच्या भुतांचा खडा पहारा
तिच्याविना हे शरीर भासे सजीव कारा
निवेल वादळ मनातले या अशांत केंव्हा
करील केंव्हा सखी पुन्हा एकदा पुकारा
नको अपेक्षा करूस इतक्यात चेतण्याची
विझू तरी दे उरातला हा जुना निखारा
अजून माझी शहारण्याची न वेळ झाली
अशा अवेळी कुठून आला पहाटवारा
नवीन वाटा, नवीन सोबत, नवी भ्रमंती
जुन्या स्मृतींचा, मिलिंद, चल, आवरू पसारा