भूतलावरील स्वर्गाच्या वाटेवर भाग १

        स्वर्ग! लहानपणापासून ही कल्पना वेगवेगळ्या प्रकारे समोर आली. मराठी वाङ्मयातून आणि पुढे संस्कृतामधूनही ती पुन्हा पुन्हा भेटत राहिली. मी माझ्या मनात अनेक वेळा स्वर्गाचं चित्र क्लिक करण्याचा प्रयत्न केला; पण ते कधीच मला पूर्ण क्लिक झालंच नाही. मग मी माझ्यापुरती स्वर्गाची व्याख्या केली, की जिथे सारं सौंदर्य आणि  सारी सुखं एकवटलेली असतात तो स्वर्ग! पण 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ' म्हणतात.
      स्वर्गाचं प्रत्यंतर जर मृत्यूनंतरच येणार असेल, तर त्याचा उपयोग तरी काय? कारण कोणत्याही सुखाची चव जर आपल्या माणसांबरोबर चाखता आली नाही, तर त्याला परिपूर्णता येणार कशी? मृत्यूनंतरच्या स्वर्गसुखाची परिपूर्ण अपेक्षा मी करायची, तर तो इतरांवर जरा अन्यायच होईल, नाही का?


            तेव्हा तो विचार सोडून संजीवनी मराठे या प्रसिद्ध कवयित्रीच्या शब्दांत सांगायचं तर ' स्वर्ग कल्पनेतला येईल कधी भूतला' असं मी म्हणत बसले आणि याचा तृप्त करणारा अनुभव 'व्हॅली ऑफ़ फ़्लॉवर्स' आणि 'हेमकुंड्साहिब' यांच्या परिसरात मनमुराद घेतला. तसंही बद्रिनाथपासून पुढच्या उत्तरांचलमधील प्रदेशाला 'देवभूमी' असंच म्हणतात. पुराणांपासून ज्यांचं महत्त्व मानलेलं आहे, अशा अलकनंदा, मंदाकिनी, भागिरथी या साऱ्या नद्या आणि देवप्रयाग, रुद्रप्रयाग यांसारख्या ठिकाणी असलेले त्यांचे अलौकिक संगमही याच परिसरात आहेत. व्यासमुनींनी जिथे बसून महाभारत लिहिलं, ती व्यासगुंफ़ा आणि गणपतीबाप्पाने जिथे बसून ते लिहून घेतलं, ती गणेशगुंफ़ाही याच भागात आहे; आणि पांडव जेव्हा स्वर्गात जायला निघाले, तेव्हा नदी ओलांडण्यासाठी भीमानं डोंगर आडवा टाकून तयार केलेला भीमपूलही इथंच आहे. पांडवांची स्वर्गाची वाट इथून गेली ती अशीच कुठं तरी ढगांच्या वर दिसणाऱ्या हिमाच्छादित पर्वतरांगात लुप्त झाली असेल. कारण स्वर्ग, स्वर्ग तो यापेक्षा आणखी निराळा काय असणार, असं वाटायला लावणारा हा परिसर!
        मुंबई ते दिल्ली व दिली ते हरिद्वार हा प्रवास आगगाडीने, हरिद्वार-जोशीमठ-गोविंदघाट हा जवळपास साडेचारशे किलोमीटरचा प्रवास बसने आणि गोविंदघाट ते गोविंदधाम म्हणजेच घांग्रिया हा चौदा किलोमीटरचा प्रवास घोड्यावरून असे प्रवासाचे टप्पे ओलांडत तिसऱ्या दिवशी घांग्रियाला पोचलो. मुंबई ते पुणे या प्रवासातला घाटाचा भाग कधी संपतोय, असे म्हणणारे आम्ही साडेचारशे  किलोमीटरचा घाट सतत बारा तास ओलांडत होतो. बाहेरची हिरवीगार पर्वतराजी, डोंगरातून वळणावळणाने जाणारा रस्ता, मध्येच कुठे नदीची रेघ, तर कुठे कौलारू इमारती! बाहेर सतत हेच दृश्य. एक डोंगर संपतो,दुसरा सुरू होतो; पुढे जाते ती फ़क्त आमची बस! शेवटी बस थांबली; डोंगर संपलेच नाहीत.


         चौदा किलोमीटर घोड्यावरून हेही एक दिव्यच होतं. रस्ता डोंगराळ, एका बाजूला प्रचंड दरी व त्यात रोंरावत कोसळणारी नदी, दुसऱ्या बाजूला डोंगरांचे कडे, मध्ये चिंचोळा रस्ता, नदीतल्या गुळगुळीत गोट्यांनी बनवलेला चढा-उताराचा! त्या गोट्यांवरून घोड्यांचे खूर सारखे घसरत. घोडे कुठूनही चालत. कधी अगदी डोंगराच्या जवळून, तर कधी रस्त्याच्या दरीच्या बाजूच्या काठाने! एखाद्या दगडाने किंवा खाली वाकलेल्या झाडाने कपाळमोक्ष तरी व्हायचा, नाही तर रोंरावणारी नदी शॉर्टकटने खऱ्याखऱ्या स्वर्गात नेऊन पोचवायची. मनाच्या 'नाऱ्या'ला  गप्प बसवत आपल्याला आधी भूतलावरचा स्वर्ग बघायचा आहे, नवरा आणि मुलांच्या सहवासातच बघायचा आहे, असं ठामपणे स्वतःला सांगत निघाले. मधूनमधून माझ्या तोंडून बाहेर पडणाऱ्या किंकाळ्यांकडे माझा घोडेवाला साफ़ दुर्लक्ष करीत होता. रोज मरे त्याला कोण रडे! पण जिवाच्या करारानं हे सगळं दिव्य पार पडल्यावर जो अनुभव पदरात पडला , तो जर पुन्हा घेता येणं व्यावहारिक दृष्ट्या शक्य असेल ,तर असली हजार मरणं  मरायला कुणीही हसत तयार होईल.                                                                 घांग्रियात पहिली रात्र विश्रांती घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी व्हॅलीत जायचं होतं. लांबवर दिसणारी हिमाच्छादित शिखरं, ओघळताना गोठलेल्या हिमनद्या मोहवीत होत्या. व्हॅलीत घोडे नेता येत नाहीत. डोंगरातून तीन किलोमीटरची चाल होती. सकाळी छोटे-मोठे पाण्याचे प्रवाह, कधी पाण्यातून, कधी डगडगत्या पुलावरून ओलांडत आम्ही व्हॅलीच्या रस्त्याला लागलो.


        विविध रंगांची आणि आकारांची लहान-मोठी फ़ुलं डोळे फ़ाडफ़ाडून आमच्याकडे टकमका बघत होती. निळा, गुलाबी,जांभळा असे निराळेच रंग, निराळ्याच छटा! काही मिश्र रंगांचे तुरे, तर काही लालभडक रंगांची पानं! कुठे कुठे पाहू आणि किती किती पाहू! आमच्या मनाची तहान वाढतच चाललेली आणि दोन डोळे अपुरे पडणारे! 'व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे शरीर सारे म्हणते पाज!' रोमारोमात डोळे फुटावेत आणि ते फ़ाडफ़ाडून आपणही सर्व दिशांना सौंदर्याची बरसात करणाऱ्या त्या फ़ुलांकडे टकमका पाहावं.


        हिमनदीवरून जाताना तर अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले. सर्व बाजूंनी पसरलेल्या हिमाच्या चकाकत्या पांढऱ्या रंगात आम्ही उभे! सर्व बाजूंनी ज्यांची माथी हिमानं झाकली आहेत असे डोंगर, पुढ्यात दरी, त्यात खळाळणाऱ्या नदीचं फ़ेसाळ पाणी, आम्ही उभे असलेली हिमनदी त्याच दिशेनं ओघळणारी, हिमाच्या पांढऱ्या रंगापलीकडे हिरवागार रंग आणि त्यावर पसरलेला विविधरंगी गर्भरेशमी पदर!


        दोन डोळ्यांव्यतिरिक्त प्रवीणने कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्यांत शक्य तेवढे त्या अफ़ाट निसर्गरूपाचे कण बंदिस्त करून घेतले आणि आम्ही परत फ़िरलो. वाढत जाणारी थंडी, विजेच्या दिव्याचा मिणमिणता उजेड, हातात गरम गरम सूप, गप्पा आणि हसण्याचे धबधबे! बाह्यात्कारी हे सगळं करताना मनातल्या अनुभवाची सुगंधी कुपी उधळू न देण्याचा माझा प्रयत्न!